रोकोको कला : एक पश्चिमी कलासंप्रदाय. फ्रान्समध्ये अठराव्या शतकाच्या प्रारंभी तो उदयास आला. ‘रोकोको’ ही संज्ञा ‘Rocaille’ या मूळ शब्दापासून उद्‌भवली असून, तिचा अर्थ ‘खडकावरील वा शिंपल्यावरील अलंकृत आकृतिबंध’ असा होतो. अलंकरणप्रधान अशा ⇨बरोक कलाशैलीतून रोकोको शैली विकसित झाली. बरोक शैलीतील गुंतागुंतीची व काहीशी बोजड अलंकरणशैली रोकोको कलेत सुलभ, हलकीफुलकी बनली. वास्तुकला, चित्रकला, शिल्पकला या प्रमुख क्षेत्रांत रोकोको शैलीचे विविध आविष्कार जसे दिसून येतात, तसेच तिच्या अलंकरणप्रधान स्वरूपामुळे फर्निचर, वस्त्रप्रावरणे, चिनी मातीची भांडी व वस्तू, सोन्या-चांदीची पात्रे व दागदागिने इत्यादींच्या आलंकारिक आकृतिबंधांत व कलाकुसरीत दिसून येतात. वास्तूंच्या अंतर्भागांच्या सजावटीसाठीही या शैलीचा विशेषत्वाने वापर झाला. रोकोको शैलीतील प्रमाणबद्धता ही उंची व सडसडीतपणा या घटकांवर आधारित होती. पाने, फुले, वेली, शंखशिंपले, खडक अशा नैसर्गिक आकारांपासून प्रेरणा घेऊन प्रवाही वक्राकारयुक्त आकृतिबंध घडवण्यावर या शैलीत विशेष भर देण्यात आला. स्वैर व समतोलविरहित रचना हे तिचे वैशिष्ट्य. अलंकरण-सजावटीत सोनेरी रंगांचा व आरशांचा जास्त वापर करण्याकडे कल होता.

फ्रान्समध्ये पंधराव्या लूईच्या कारकीर्दीत (१७१५-१७७४) या शैलीला विशेष बहर आला. परिणामी फ्रेंच रोकोको शैली त्याच्या नावानेही ओळखली जाते. फ्रेंच रोकोको वास्तुशैलीची उत्कृष्ट उदाहरणे म्हणजे शेतीयीच्या ‘पेतीत शातो’ या हवेलीतील ‘सालाँ दी एम्. ल प्रीन्स’ (१७२२ मध्ये पूर्ण) हे सजवलेले दालन. झां ओबेअर हा त्याचा सजावटकार. तसेच पॅरिसमधील ‘Hotel de Soubise’ या वास्तूची अलंकृत शोभिवंत दालने (सु. १७३५-४०)- झेरमँ बोफ्रान्दने या वास्तूचे अलंकरण केले. प्येअर लपोत्र याने मार्ली येथील हवेलीच्या सजावटीमध्ये नव्या अलंकरणात्मक कल्पनांचा अवलंब केला त्यात रोकोको शैलीची बीजे आढळतात. लपोत्रचा वारसा अनेक सजावटकारांनी व वास्तुविशारदांनी पुढे चालवला, त्यात रॉबेअर द कॉत व झ्यूस्त-ऑरेल मेसॉन्ये हे प्रमुख होत. त्यांनी तयार केलेले आकृतिबंध पुस्तकरूपाने प्रकाशित होऊन सर्वत्र प्रसृत झाले व ते अठराव्या शतकातील रोकोको शैलीच्या प्रसारास साहाय्यभूत ठरले. अल्पावधीतच हा संप्रदाय यूरोप खंडात सर्वत्र पसरला.

फ्रान्स खालोखाल जर्मनी व ऑस्ट्रिया या देशांत ह्या संप्रदायाचा प्रभाव जाणवतो. वास्तुकलेच्या क्षेत्रात अमीर-उमरावांच्या हवेल्या व प्रासाद, चर्चवास्तू, तसेच वास्तूंचे अंतर्भाग ह्यांत ह्या शैलीचा आविष्कार दिसतो. त्यांतील अलंकरण हे अत्यंत सुबक व परिष्कृत आहे. रोकोको वास्तुशैलीचे अत्यंत प्रगल्भ आणि विकसित रूप जर्मनीमध्ये पाहावयास मिळते. म्यूनिकमधील आमालेईंबुर्क येथील नाजुक व परिष्कृत रूपात सजवलेली वास्तू (१७३४-३९) आणि ‘रेसिडेन्झ थीएटर’ (१७५०-५३) ह्या फ्रांस्वा द क्यूव्हीये या वास्तुकाराने उभारलेल्या वास्तू उत्कृष्ट होत. उल्लेखनीय जर्मन रोकोको चर्चवास्तू अशा : ‘Vierzehnheiligen’ (१७४३ मध्ये प्रारंभ) हे बव्हेरियातील चर्च-ह्याचा वास्तुकल्प बाल्टासार नॉइमानने केला तसेच म्यूनिक नजीकचे ‘Wieskirche’ (१७४५ मध्ये प्रारंभ) हे डोमीनिकस त्सिमरमानने उभारलेले चर्च- ह्या चर्चची सजावट त्याचा बंधू योहान बाप्टिस्ट त्सिमरमानने केली होती. आंत्वान व्हातो (१६८४-१७२१), फ्रांस्वा बूशे (१७०३-७०) व त्याचा शिष्य झां ऑनरे फ्रागॉनार (१७३२-१८०६) हे रोकोको शैलीतील आघाडीचे फ्रेंच चित्रकार होत. व्हातोने रूढ केलेल्या ‘फेत ग्‌लान्त’ (अठराव्या शतकातील फ्रेंच राजदरबारातील व्यक्तींचा खुल्या निसर्गरम्य परिसरातील आनंदमेळावा) ह्या चित्रप्रकारात रोकोको शैलीची बीजे आढळतात. त्याची  Embarquement Pour Cythere (१७१७), Les Plaisirs du Bal (१७१९) यांसारखी चित्रे या प्रकाराची उत्कृष्ट उदाहरणे होत. फ्रागॉनारचे ब्‍लाइंड-मॅन्स-बफ (सु. १७७५) हे चित्रही याच परंपरेतले मानले जाते. बूशेचे ट्रायम्फ ऑफ व्हीनस (१७४०) आणि फ्रागॉनारचे द स्विंग (सु. १७६६) हीदेखील या संप्रदायातील महत्त्वाची चित्रे होत. पंधराव्या लूईच्या कारकीर्दीतील स्वच्छंदी व आनंदी समाजजीवनाचे प्रतिबिंब ह्या चित्रांतून दिसते. तद्वतच तत्कालीन अमीर-उमराव स्त्रीपुरुषांचे प्रातिनिधिक चेहरेही त्यांत डोकावतात. अन्य अग्रगण्य रोकोको चित्रकारांत इटलीचा जोव्हान्नी त्येपलो (१६९६-१७७०) व इंग्‍लंडचा टॉमस गेन्झबरो (१७२७-८८) यांचा उल्लेख करता येईल. पंधराव्या लूईच्या कारकीर्दीतील फ्रान्समधील रोकोको शैलीचे फर्निचर आकर्षक व वैविध्यपूर्ण आहे. त्याच्या सजावटीत ब्राँझचा तसेच छटेदार लाकडी तुकड्यांच्या जडावकामाचा व लाखेच्या रंगकामाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर केला आहे. इंग्‍लंडमध्ये ⇨टॉमस चिपेंडेलने (१७१८-७९) रोकोको शैलीचा उपयोग करून उत्तम फर्निचर तयार केले. रोकोकोच्या प्रभावातून घडलेली त्याची खास शैली ‘चिपेंडेल शैली’ ह्या नावानेच ओळखली जाते. सोन्याचांदीची पात्रे व दागदागिने यांवरील रोकोको शैलीच्या अलंकरणात नाजुक व सुबक असे विविध आकृतिबंध पाहावयास मिळतात. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात नव-अभिजाततावादाच्या उदयाबरोबरच रोकोको संप्रदायाचा अस्त झाला. 


संदर्भ : 1. Bazin, Germain, Baroque and Rococo, London, 1964.

           2. Schwartz Michael, The Age of the Rococo, New York, 1971.

           3. Sypher, Wylie, Rococo to Cubism in Art and Literature, New York, 1963.

इनामदार, श्री. दे.

श्लोस व्हिल्‌हेल्मस्टाल (प्रारंभ १७५३), कासेलनजीक वास्तूचे अंतर्दालन व जिना- फ्रांस्वा द क्यूव्हीये.‘व्हीनस ऑफ द डोव्हज’ च्या रूपात मादाम द पाँपादूर संगमरवरी शिल्प (सु. १७६३) -इ.एम्. फाल्कॉने.पोर्सलीनचे अलंकृत घड्याळ, स्ट्रॅस्‌बर्ग, अठराव्या शतकाचा मध्यकाळ.‘रोकाय’ : शिंपल्यावरील अलंकृत आकृतिबंध, १६५१-७४. ‘फीरझेनहायलिगेन’ चर्च, बव्हेरिया (१७४३-७१) -बाल्टासार नॉइमान.‘मेझेटिन’ : रोकोको चित्रशैलीतील विनोदी व्यक्‍तिरेखा (सु. १७१९) —व्हातो.