आकृतिबंध : कलाकृतीचा प्रत्यक्ष आविष्कार तिच्यातील विविध घटकांच्या ज्या समुचित संश्लेषणातून साधला जातो, त्या संश्लेषणाचे स्थूल व प्राथमिक आरेखन किंवा शीघ्ररेखन म्हणजे आकृतिबंध होय.

आ.१. मूर्तिकलेतील आकृतिबंधाचे तीन नमुने. आ.२. चित्रकलेतील तीन आकृतिबंध. आ.३. वास्तुकलेतील एक रचनाकल्प.

आविष्कृत कलाकृतीतील संश्लेषणाकारालाही पुष्कळदा आकृतिबंध असे म्हटले जाते. ‘आकृतिबंध’ ही संज्ञा इंग्रजीतील ‘डिझाइन’ या शब्दाची पर्यायी असून, इंग्रजी शब्दातील ‘de signum’या मुळे लॅटिन धातूचा अर्थ ‘चिन्हांनी दाखविणे’ असा आहे व हा धात्वर्थही आकृतिबंधाच्या संकल्पनेत अर्थपूर्ण ठरतो. कलावंत व रसिक या दोहोंच्या दृष्टीने आकृतिबंधाची संकल्पना लक्षणीय आहे : स्थूल पण निश्चित असा कलाकृतीचा आराखडा तयार करण्याची प्रवृत्ती कलावंतांत आढळते. चित्र, मूर्ती व वास्तू या कलाक्षेत्रांतील कलावंतांनी तयार केलेल्या आराखड्यांचे पुरावेही उपलब्ध आहेत. आकृतिबंध म्हणून कलावंत जे प्राथमिक आरेखन किंवा शीघ्ररेखन करतो, त्याचा उपयोग प्रत्यक्ष कलाकृति-निर्मितीत निश्चितपणे होतो. रसिकाला एखाद्या कलाकृतीत जाणवणारा आकृतिबंध स्वयंसूचित असतो कलावंताप्रमाणे संकल्पित नसतो. अमुक एका गायनात सुसंवादी आकृतिबंध आहे किंवा शाकुंतलातील आकृतिबंध अमुक एक प्रकारचा आहे, असे किंवा या प्रकारचे उद्गार रसिक काढतो. संबंधित कलाकृतीचा स्वत:ला जाणवलेला संश्लेषणाकार अशा उद्गारांतून तो व्यक्त करतो. आकृतिबंध कलांतर्गत घटकांच्या योग्य परस्परसंबंधांवर आधारलेला असतो. काही कलांतील माध्यमद्रव्यांचे काही विशेष बदलता येत नाहीत पण काही विशेषांत मात्र बदल करता येतो. उदा., मूर्तिकलेत व वास्तुकलेत पाषाण व मृत्तिका यांसारख्या द्रव्यांची मूलभूत सांद्रता बदलता येत नाही पण त्यांचे वजन कमीअधिक ठेवणे शक्य असते. माध्यमाप्रमाणेच कलाकृतीची अन्य सामग्री, साधने, घडण या विशेषांचा आणि तिच्या संभाव्य उपयोगितेचा परस्परसंबंधही निश्चित करावा लागतो. रसिकवर्गाच्या अपेक्षांचा कमीअधिक विवेकही आकृतिबंधाशी निगडित असतो. रेषा, रंग, छायाप्रकाश, आकारमान यांसारख्या लवचिक कलांगांचा विचारही आकृतिबंधात गर्भित असतो. उपर्युक्त सर्व घटकांच्या स्वरूपाचे आणि संबंधाचे भान ठेवणे आवश्यक असते. कलावंत आकृतिबंध तयार करतो, तो  अशा आवश्यकतेमुळेच होय. प्रत्यक्ष कलानिर्मितीत ज्या सौंदर्यपूर्ण संश्लेषणाची गरज असते, तिची प्राथमिक रूपरेषा विशद करण्याचे कार्य आकृतिबंध करतो.

(आ.४.) नक्षीचे आकृतिबंध. (आ.५). शिलाशिल्पनाचा आकृतिबंध.

विविध प्रकारच्या रूपण कलांतील आकृतिबंधाची कल्पना अन्य संज्ञांनीही व्यक्त केली जाते. वास्तुकलेतील आकृतिबंधास सामान्यत: ‘रचनाकल्प’ (प्लॅन) म्हटले जाते. त्यात व्यावहारिक उपयोगितेच्या प्रश्नाला पुष्कळदा महत्त्व दिले जाते. चित्रकलेत व ललित साहित्यात आकृतिबंधाचा प्रश्न अंतर्गत घटकांच्या यथार्थ संबंधनिश्चितीचा असतो त्यास पुष्कळदा ‘रचनांबंध’ (पॅटर्न) म्हणण्यात येते. अवकाशविभागणीलाही चित्रकलेत महत्त्व असतो. या दृष्टीने आकृतिबंध या अर्थाने अनेकदा ‘संयोजन’ (काँपोझिशन) ही संज्ञाही तीत वापरतात. यांशिवाय मूर्तिकलेतील नमुनाकृती, चित्रजवनिका, भित्तिचित्रे, चित्रकाच, कुट्टिमचित्र इत्यादींमधील ‘कार्टून्स’ किंवा पूर्वरेखने आणि नृत्यकलेतील नृत्यालेखन या कल्पनाही आकृतिबंधाशीच निगडित आहेत.

आकृतिबंधाचे प्रत्यक्ष स्वरूप विविध प्रकारचे असते : मृत्स्नाशिल्पात व हस्तकलांत कागदावरी रंगरेषांचे स्थूल रेखांकन पुरेसे ठरते. वास्तुकलेतील रचनाकल्प गुंतागुंतीचा असून, तपशिलाने व चिन्हांनी भरलेला असतो. वस्त्रकलेतील आकृतिबंध कागदावर रंगरेखांनी तयार केला जातो. काही चित्रकार कोळशाने चित्राचा स्थूल आकृतिबंध आधी तयार करतात.

आकृतिबंधाची तत्त्वे म्हणजे सौदर्यतत्त्वेच होत. त्यांत सुसंवाद, समतोल, प्रमाणबद्धता, लय यांसारख्या सौंदर्यतत्त्वांचा अंतर्भाव करता येईल. कलावंत आपल्या दृष्टिकोनानुसार या तत्त्वांचा कमीअधिक उपयोग करतो. आकृतिबंधाच्या संकल्पनेत ज्ञापकाचाही अंतर्भाव होऊ शकतो. ज्ञापक हे एका दृष्टीने आकृतिबंधाचा आकृतिबंध होय. याचे कारण कलावंताला अभिप्रेत असलेल्या कलाकृतीच्या अंत:प्रतिमेचेच ते निदर्शक असते आणि त्या अंत:प्रतिमेत संपूर्ण कलाकृतीच बीजरुपाने असते.

सौंदर्यतत्त्वांच्या आधारे कलाकृतीच्या अंतर्गत घटकांत संश्लेषण साधून तिच्या आशयाचा विकास घडवून आणणारा जो सौंदर्यबंध असतो, त्याची अभिज्ञता चोखंदळ रसिकांना असते. तो सौंदर्यबंध किंवा आकृतिबंध त्या त्या कलाकृतीला विशिष्टत्व व वैशिष्ट्य प्राप्त करून देतो. अंतिम चिकित्सेत कलावंत व रसिक यांच्या आकृतिबंधाच्या कल्पना एकरूपच असतात.

पहा : औद्योगिक आकृतिबंध.

जाधव, रा. ग.