आ. १. धूमकेतूचे विविध भाग : (१) सूर्याची दिशा, (२-२) धुमकेतूचा मार्ग, (३) गाभा, (४) शिखा, (५) धुमकेतूचे 'वातावरण', (६) चंचू.

धूमकेतु : (शेंडे नक्षत्र). सूर्यकुलातील एक प्रकारच्या खस्थ ज्योती. वैशिष्ट्यपूर्ण दृश्य स्वरूपात वाटचाल, तसेच अकस्मात उगवणे यांमुळे सर्व आकाशस्थ ज्योतींमध्ये धूमकेतू हे सर्वांत आकर्षक ठरतात. याच्या लांब पुच्छामुळे याला शेंडे नक्षत्र असेही म्हणतात. एखाद्या ताऱ्याला अभ्राच्छादनासारखे दाट वेष्टन आणि लांब पुच्छ किंवा पिसारा असे नुसत्या डोळ्यांना दिसणारे याचे स्वरूप असते. केंद्रस्थानी असणाऱ्या सकृत् दर्शनी ताऱ्यासारख्या वाटणाऱ्या भागाला धूमकेतूचा ‘गाभा’ असे म्हणतात. त्याभोवतालच्या वेष्टनाला शिखा (कोमा) म्हणतात. गाभा आणि शिखा दोन्ही मिळून धूमकेतूचे शीर्ष किंवा डोके तयार होते. शीर्षापासूनच निघालेल्या लांबट अंधूक अशा पिसाऱ्याला पुच्छ किंवा केतू असे म्हणतात. शिखा कोठे संपली व पुच्छ कोठे सुरू झाले हे ओळखता येत नाही. पुच्छाचेही दोन भाग पडतात. त्यांतील एक भाग अगदी सरळ असून तो सूर्याला जोडणाऱ्या रेषेत परंतु सूर्याच्या विरुध्द बाजूला असतो. हा भाग म्हणजे वायुपुच्छ संपूर्णपणे वायू व आयन (विद्युत‌् भारित अणू, रेणू किंवा अणुगट) यांचा बनलेला असतो. दुसरा भाग म्हणजे धूलिपुच्छ. हा पिसाऱ्यासारखा पसरलेला व वक्र असतो. तो संपूर्णपणे धूलिकणांचा बनलेला असतो (आ.१). शिखेभोवती धूमकेतूचे ‘वातावरण’ असते. याशिवाय कित्येकदा शिखेपासून सूर्याच्या दिशेने एक चोचीसारखा फाटा आलेला दिसतो, त्याला ‘चंचू’ किंवा ‘प्रतिपुच्छ’ असे म्हणतात.

लहान धूमकेतू फक्त दूरदर्शकातूनच दिसतात. जरासा तेजस्वी धूमकेतू वर्षाकाठी एखादा दिसतो आणि सामान्य लोकांचे लक्ष वेधील असा धूमकेतू कित्येक वर्षांतून एखादाच. आकस्मिक आगमन, पिसाऱ्याचे चमत्कारिक दृश्य व काही दिवसांनंतर नाहीसे होणे यामुळे कुतूहलाबरोबरच त्याच्याबद्दल मानवी मनात प्राचीन काळापासून एक प्रकारची अपशकुनात्मक भीती निर्माण होत आली आहे. विशेषतः त्याच्या आगमनाने राजेलोक, राजकारणी व्यक्ती यांचे मृत्यू, दुष्काळ, उत्पात, रोगाच्या साथी, युद्धे अशी भयंकर संकटे कोसळतात, असे पूर्वीच काय पण आताही कित्येक देशांत समजले जाते. धूमकेतूच्या आगमनाशी निगडित अशा काही ऐतिहासिक घटना घडलेल्याही आहेत. त्यामुळे असा समज दृढ झालेला आढळतो.

ग्रह व लघुग्रह (मंगळ व गुरू यांच्या दरम्यानचे छोटे ग्रह) यांच्या मानाने धूमकेतूंच्या कक्षा क्रांतिवृत्तांच्या (सूर्याच्या वार्षिक आभासी गतिमार्गाच्या) पातळीशी पुष्कळच कललेल्या असतात तसेच त्यांच्या कक्षांची विकेंद्रता (वर्तुळाकारापासून असणारे भिन्नत्व) बरीच अधिक असते.

प्राचीन उल्लेख : वैदिक वाङ्‌मयात धूमकेतूंची वर्णने आहेत (कौशिक सूत्र ९४·३४·१२७–१ अथर्ववेद १८-१-३०,१९-९-३० शुक्ल यजुर्वेद वाजसनेयी संहिता ३२-२) इ. स. पाचव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेल्या वराहमिहिर यांनी आपल्या बृहत्संहितेत केतुचार या ६४ श्लोकांच्या अध्यायात धूमकेंतूची स्वरूपे, रंग, संख्या, आकार वगैरेसंबंधी वर्णन केले आहे. काही ऋषी एकशे एक तर काही एक हजार धूमकेतू असल्याचे सांगतात, असे त्यात म्हटले आहे. भटोत्पल यांनी बृहत्संहितेवरील लिहिलेल्या टीकेत पारशरादि ऋषींनी केलेल्या धूमकेतूंच्या वर्गीकरणासंबंधी उल्लेख आहेत. यावरून भारतात प्राचीन काळी निरीक्षणावरून धूमकेतूंचा अभ्यास झाला होता, असे दिसते.

चिनी वाङ्‌मयात इ. स. पू. ३००० वर्षे पूर्वीपासून धूमकेतूंचे उल्लेख आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्राचीन ग्रीक व रोमन लोकांनीही धूमकेतूचे उल्लेख केलेले आढळतात. बॅबिलोनियन, जपानी व कोरियन प्राचीन ग्रंथांतही धूमकेतूंचे उल्लेख आहेत.

सोळाव्या शतकापर्यंत धूमकेतू म्हणजे काही तरी वातावरणीय आविष्कार असावा, अशी पाश्चिमात्यांची कल्पना होती परंतु १५७७ मध्ये दिसलेल्या धूमकेतूच्या पराशयावरून (निरीक्षकाच्या स्थानात बदल झाल्यामुळे खस्थ ज्योतीच्या खगोलवर होणाऱ्या आभासी स्थानांतरणावरून) ट्यूको ब्राए व मायकेल मीस्टलीन यांनी हे स्पष्ट केले की, धूमकेतू पृथ्वीपासून खूपच दूर म्हणजे चंद्राच्याही पलीकडे असले पाहिजेत. १६८० मध्ये दिसलेल्या धूमकेतूची कक्षा अन्वस्ताकार [ → अन्वस्त] आहे, असे गृहीत धरून न्यूटन यांनी प्रथम धूमकेतूच्या गतीचे योग्य स्पष्टीकरण दिले. एडमंड हॅली यांनी कित्येक धूमकेतूंच्या कक्षा गणिताने निश्चित केल्या. यावरून त्यांच्या हे लक्षात आले की, पूर्वी १३७८, १४५६, १५३१, व १६०७ मध्ये दिसलेला तेजस्वी धूमकेतू हाच १६८२ मध्येही दिसत असला पाहिजे. यावरून त्याचा आवर्तन काल सु. ७५ वर्षांचा असून तो सूर्याभोवती लांबट विवृत्ताकार मार्गाने फिरत असला पाहिजे, हे त्यांनी ओळखले व हाच धूमकेतू पुढे १७५८ च्या सुमारास दिसेल असे त्यांनी वर्तविले. ते भाकित खरेही झाले. या धूमकेतूला ‘हॅली धूमकेतू’ हे नाव देण्यात आले. धूमकेतूंच्या अभ्यासात हॅली यांचे कार्य हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. १८०९ मध्ये जर्मन गणितज्ञ सी. एफ‌्. गौस यांनी धूमकेतूंच्या कक्षांचे गणित करण्याची एक व्यापक पद्धत शोधून काढली. तिचा उपयोग करून योहान एंके यांनी १८१८ मध्ये एक धूमकेतू शोधून काढला आणि पूर्वी १७८६, १७९५ व १८०५ मध्ये दिसला होता तो हाच धूमकेतू, हे सिद्ध केले.


आ. २. धूमकेतूचे पुच्छ नेहमी सूर्याच्या विरुद्ध बाजूस असते : (१) सूर्य, (२) धुमकेतूची कक्षा, (३) उपसूर्य बिंदू.

सूर्याभोवती घन पदार्थांचे समुदाय ठराविक कक्षांतून फिरत असून जेव्हा या गतीमुळे हे समुदाय पृथ्वीच्या वातावरणात येतात तेव्हा उल्कावर्षाव होतात. या समुदायांच्या कक्षा एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला निश्चित करण्यात आल्या व त्यावरून असे दिसून आले की या कक्षा व काही धूमकेतूंच्या कक्षा एकच आहेत. यांतील काही धूमकेतू परत दिसलेले नाहीत. यावरून असे समजून आले की, एखाद्या धूमकेतूचे पूर्णपणे विघटन झाले म्हणजे त्यापासून तयार झालेले तुकडे मूळ धूमकेतूच्या (जवळजवळ) कक्षेतूनच फिरत राहतात.

अभ्यास : कक्षा निश्चित करणे हा धूमकेतूंच्या अभ्यासाचा एक भाग होय. धूमकेतूचे विविध भाग कसे उत्पन्न होतात, त्यांची घटक द्रव्ये कोणती आहेत, त्याचप्रमाणे त्यांची उत्पत्ती कशी झाली असावी, हे शोधून काढणे हा त्यांच्या अभ्यासाचा दुसरा महत्त्वाचा भाग होय.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत धूमकेतूंच्या भौतिकीय संरचनेच्या बाबतीत काहीच माहिती उपलब्ध नव्हती. १८६४ मध्ये प्रथम धूमकेतूंच्या अभ्यासासाठी दृश्य वर्णपटलेखकाचा उपयोग करण्यात आला. त्यानंतर विसाव्या शतकाच्या प्रारंभी या पद्धतीत महत्त्वाच्या सुधारणा झाल्या व त्यामुळे धूमकेतूच्या पुच्छाचे वर्णपटही अभ्यासता येऊ लागले. १९५५ नंतर या शास्त्रात फारच मोठी प्रगती झाली. कृत्रिम उपग्रहांतील उपकरणांच्या साहाय्याने अवरक्त व जंबुपार (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील आणि जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य किरणांच्या) वर्णपटांचाही अभ्यास करण्यात येऊ लागला. त्याचप्रमाणे रेडिओ वर्णपटांचाही उपयोग सुरू झाला. १९७३ मध्ये आगमन झालेल्या कोहाउटेक धूमकेतूच्या अभ्यासाने धूमकेतूंबद्दलच्या ज्ञानात महत्त्वाची भर पडली. विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत धूमकेतूजवळ अवकाशयान पाठवून त्याचा अगदी जवळून अभ्यास करावा अशी शास्त्रज्ञांची मनीषा आहे, मग धूमकेतूबद्दलची काही गूढे उकलली जातीत.

स्वरूप : धूमकेतूचे आगमन होते तेव्हा तो अत्यंत अंधूक असतो. जसजसा तो सूर्याजवळ येतो तसतसे त्याचे तेज वाढत जाते व त्याच्या पुच्छाचा आकारही वाढत जातो. सूर्याच्या जवळ येताना पुच्छाचे दोन भाग होतात, त्यांतील एक सूर्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने जातो. दुसरा भाग वक्राकार होतो व केव्हा केव्हा त्याचे वेगवेगळे भाग पडतात. धूमकेतूचा रंग फिकट नारिंगी दिसतो.

शिखेच्या वेष्टनामुळे गाभ्याचा आकार किंवा स्वरूप निश्चितपणे समजू शकत नाही परंतु धूमकेतूच्या वस्तुमानाचा बहुतेक सर्व भाग गाभ्यातच समाविष्ट झालेला असून शिखेच्या तुलनेने गाभ्याचा व्यास मात्र फारच कमी असतो. हल्लीच्या अंदाजानुसार धूमकेतूंचे वस्तुमान १०१३ ते १०१८ किग्रॅ. ( पृथ्वीच्या वस्तुमानाच्या एकदशलक्षांश ) व गाभ्याची घनता सु. १,००० किग्रॅ./घ.मी. असते. गाभ्याचा व्यास १० किमी.च्या जवळपास असतो.

दृश्य शिखेचा व्यास सु. १०,००० किमी. असतो परंतु जंबुपार किरणांच्या छायाचित्रांवरून असे दिसून आले की, या दृश्य शिखेभोवती हायड्रोजन वायूचे एक विरल आवरण असून त्याचा व्यास ५०,००,००० किमी. पेक्षाही अधिक (सूर्याच्या व्यासाच्या चौपटीपेक्षा जास्त) असतो.

पुच्छाची लांबी २०,००,००० ते १,००,००,००० किमी. असून ते इतके विरल असते की, त्यातून पलीकडचे तारे सहज दिसू शकतात. पुच्छाचे जे दोन भाग होतात, त्यांतील सरळ राहणाऱ्या भागाला वायुपुच्छ  व वक्र होणाऱ्या भागाला धूलिपुच्छ म्हणतात. वायुपुच्छात CO, CO2, N2, CH, OH हे आयन आणि CN रेणू असतात, असे त्याच्या वर्णपटावरून समजते. वायुपुच्छाचा आकार थोड्या कालावधीत बदलू शकतो. शिखेमधील वायूंचे आयनीकरण होते आणि मग सौरवातामुळे ( सूर्यापासून येणाऱ्या आयनीभूत कणांच्या झोतामुळे ) ते आयन दूर लोटले जातात. अशा तऱ्हेने वायुपुच्छ उत्पन्न होते, हे निश्चित समजलेले आहे.

धूलिपुच्छ हे सूक्ष्म धूलिकणांचे बनलेले असते. हे धूलिकण प्रामुख्याने सिलिकेटांचे असून त्यांची लांबी-रूंदी १०-६ ते १०-५ मी. असते. या कणांमुळे पुच्छ कसे तयार होते याचे गणित एम्. एल्. फिन्सन व आर्. एफ्. प्रॉबस्टीन यांनी १९६८ मध्ये केले असून ते सर्वमान्य झाले आहे. यानुसार गाभ्याच्या परिसरात हे कण एकसारखे मुक्त होत असून सूर्यापासून येणाऱ्या प्रारणाच्या (तरंगरूपी ऊर्जेच्या) दाबामुळे ते मागे रेटले जातात व त्यांचे धुलिपुच्छ बनते. यामुळे जेव्हा धूमकेतू सूर्याकडे येत असतो तेव्हा पुच्छ त्याच्या मागे असते, तर तो सूर्यापासून दूर जाऊ लागतो तेव्हा पुच्छ त्याच्या पुढे येते.

या कणांवर सूर्याचे गुरुत्वाकर्षण व प्रारणाचा दाब या दोन्ही प्रेरणा एकदमच कार्य करीत असतात परंतु कणांच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व त्यांचे वस्तुमान यांचे गुणोत्तर लहान कणांच्या बाबतीत जास्त आणि मोठ्या कणांच्या बाबतीत कमी असते. त्यामुळे तुलनेने मोठ्या कणांवर प्रारण-दाबाचा प्रभाव कमी होतो म्हणून धूलिपुच्छ वक्राकार झालेले दिसते किंवा त्याचे अनेक भाग पडतात. चंचू दिसण्याचे कारणही याचप्रमाणे आहे. चंचूमधील कणांचे आकारमान ०·१ ते १ मिमी. असते. त्यांच्या मोठ्या आकारमानामुळे ते लहान कणांच्या मागेमागे पडत जातात व (भूमितीय प्रक्षेपणामुळे) यथादर्शनात ते सूर्याकडे वळलेले आहेत, असे सकृद्दर्शनी वाटते.

भौतिक प्रतिमाने : धूमकेतूंची सर्व ज्ञात वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांवरून त्यांच्या संरचनेबद्दल वेगवेगळी प्रतिमाने किंवा परिकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत. १९५० मध्ये एफ्. एल्. व्हिपल यांनी मांडलेल्या प्रतिमानात काही फरक करून सध्या हे प्रतिमान सर्वमान्य झालेले आहे.


या प्रतिमानानुसार धूमकेतूचा गाभा बर्फ व काही गोठलेल्या जैव रसायनांचा (अमोनिया, मिथेन, कार्बन डाय-ऑक्साइड इ.) बनलेला असून त्यात वायू व धूलिकण अडकलेले असावेत. मात्र मोठे खडक तेथे नसावेत. हा धूमकेतू सूर्यापासून सु. ३ ज्योतिषशास्त्रीय एकक (१ ज्यो. ए. = १·५ × १० किमी.) अंतरावर आला म्हणजे सूर्यापासून मिळणाऱ्या प्रारणाने तो गरम होऊ लागतो आणि पाण्याचे बर्फ प्रथम वितळू लागते आणि त्याची वाफही होते. या वाफेपासून हायड्रोजनाचे आवरण तयार होते. त्याचबरोबर बर्फात अडकलेले वायू व धूलिकण मुक्त होत जातात आणि त्यांच्यापासून शिखा व पुच्छ बनते.

मुक्त वायूचे रेणू गाभ्यापासून सु. १ किमी./से. या वेगाने दूर जाऊ लागतात. त्यामुळे गाभ्याच्या पृष्ठभागावरील धूलिकण मुक्त होतात. ‘जुन्या’ धूमकेतूंच्या पृष्ठभागावर मोठे कण चिकटत जातात व त्यांचे पट्टे तयार होतात. हे पट्टे मोठे होत जातात व गाभ्याला जणू काही झाकतात. त्यामुळे गाभ्याला मिळणाऱ्या उष्णतेचे मान कमी होते आणि वायू व धूलिकणांचे उत्पादन त्यामुळे घटते. या धूलिकणांच्या झाकणामधून वायू आरपार जाऊ शकतात, पण धूलिकण जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शिखेमधील धूलिकणांचे प्रमाण वायूच्या तुलनेने जास्त होऊ लागते. यामुळे नव्या धूमकेतूंच्या शिखांमध्ये व पुच्छांत वायू व धूलिकण जास्त होतात, पण जुन्यांच्या बाबतीत ते कमी असतात.

शिखांच्या व पुच्छांच्या निरीक्षणावरून असे दिसून येते की, धूमकेतू सूर्याजवळ येतो तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्यातील काही द्रव्य बाहेर निघून जाते. धूमकेतूच्या एकूण वस्तुमानापैकी १/१००० ते १/१०० भाग याप्रमाणे दर वेळी निघून जातो. यावरून असे दिसून येईल की, कमी आवर्तन काल असणारे धूमकेतू सु. १,००,००० वर्षांनी संपुष्टात यावेत आणि दीर्घ आवर्तन काल असणाऱ्या धूमकेतूंचे आयुर्मानही ८,००,००,००० वर्षांपेक्षा जास्त नसावे परंतु सूर्यमालेचे वय सु. ४,८०,००,००,००० वर्षे आहे. या अवधीत सर्व धूमकेतू नष्ट झालेले नाहीत याचाच अर्थ हा की, धूमकेतू नव्याने तयार होत असावेत किंवा ते कोठे तरी ‘साठवून ठेवले’ जात असावेत.

ऊर्ट मेघ : जे. एच‌्. ऊर्ट यांना असे आढळले की, दीर्घ आवर्तन काल असणाऱ्या धूमकेतूंच्या कक्षांच्या दीर्घ अक्षाची लांबी ५०,००० ते १,५०,००० ज्यो. ए. इतकी असते. यावरून त्यांनी असा तर्क केला की, सूर्यापासून ५०,००० ते १,५०,००० ज्यो. ए. अंतरावर या धूमकेतूची दाटी होऊन त्यांचा जणू काही एक मेघ बनला असावा. या भागात सु. १०११ इतके धूमकेतू असले पाहिजेत, असे त्यांनी प्रतिपादन केले. यालाच ऊर्ट मेघ असे म्हणतात. हे धूमकेतू वितळण्याइतपत सूर्याच्या जवळ कधीच येत नाहीत म्हणून त्यांचा द्रव्य संचय कमी होत नाही. जणू काही हा धूमकेतूंचा खजिनाच म्हटले तरी चालेल परंतु दूरच्या ताऱ्यांपैकी एखादा मोठा तारा जेव्हा या मेघाच्या पुरेसा जवळ येतो तेव्हा त्याच्या गुरुत्वाकर्षणाने एखादा धूमकेतू या मेघातून भ्रष्ट होतो आणि त्याची कक्षा बदलते. मग तो सूर्याच्या जवळ येऊ लागतो, तेव्हा त्याची कक्षा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे बदलू शकते. त्याचप्रमाणे त्याच्यापासून जेव्हा वायूचे फवारे निघतात तेव्हा त्या क्रियेनेही कक्षेत बदल होतो. असे धूमकेतू जेव्हा सूर्याच्या खूप जवळ येतात तेव्हाच ते आपणाला दिसू शकतात.

अंत : वर वर्णन केल्याप्रमाणे वितळून व बाष्पीभवन होऊन जेव्हा धूमकेतूच्या गाभ्यातील सर्व द्रव्य निघून जाईल तेव्हा त्याचा अंत होईल. उर्वरित धूळ व तुकडे जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात येतील तेव्हा ते उल्कांच्या वर्षावाच्या रूपाने आपणाला दिसतील असे अनेक उल्कावर्षाव ज्ञात आहेत.

धूमकेतूच्या अंताचा दुसरा पर्याय असा : धूमकेतूचा गाभा प्रत्येक वेळी सूर्याजवळ येईल तेव्हा थोडाथोडा लहान होत जाईल. मग त्यातील वायू जास्त प्रमाणात निघून गेल्याने धुळीचे प्रमाण अधिक होईल. धूलिकण निखळून टाकण्यासाठी वायूची कमतरता झाल्याने गाभ्याभोवती धुळीचा थरच तयार होईल व हा थर हळूहळू जाड होत जाईल. मग या धुळीच्या पांघरुणामुळे अंतर्भागाला उष्णता पोहोचू शकणार नाही व वायूही निर्माण होणार नाही. परिणामी हा धूमकेतू दिसू शकणार नाही म्हणजेच ह्याचा अंत झाला असे म्हणता येईल. असे ‘निष्क्रिय धूमकेतू’ लघुग्रह म्हणून फिरत असलेले (रडारच्या साहाय्याने) आढळले आहेत.

उत्पत्ती : धूमकेतूंच्या उत्पत्तीबद्दल सध्या दोन पर्यायी कल्पना आहेत. एकीप्रमाणे धूमकेतूंचा जन्म सूर्यमालेतच झाला असावा, तर दुसरीप्रमाणे तो आंतरतारकीय धूलिमेघांतून झाला असावा.

पहिल्या कल्पनेनुसार सूर्यमालेच्या आरंभकालात हल्ली गुरू ग्रह जेथे आहे त्या परिसरात अनेक ‘धूमकेतू’ तयार झाले असावेत. यांतील अनेक वेगवेगळ्या ग्रहांनी (गुरुत्वाकर्षणामुळे) आत्मसात केले असावेत किंवा त्यांच्यापासून उत्सर्जित झाले असावेत. उत्सर्जित झालेल्यांपैकी बहुतेक सूर्यमाला सोडून गेले. फक्त सु. २·५% ऊर्ट मेघात राहिले असावेत.

दुसऱ्या कल्पनेनुसार सूर्यमाला जेव्हा आंतरतारकीय अवकाशात भ्रमण करीत असते तेव्हा ती आंतरतारकीय द्रव्याचे मेघ गोळा करते व त्यांच्यापासून शेवटी ऊर्ट मेघ बनतात.

या कल्पनांपैकी कोणती अधिक ग्राह्य आहे याचा अद्याप निर्णय लागलेला नाही.


आ. ३. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली खस्थ पदार्थ ज्या कक्षांत फिरू शकेल त्यांचा आकार : (१) सूर्य, (२) उपसूर्य बिंदू, (३) अपसूर्य बिंदू, (४) विवृत्त, (५) अन्वस्त, (६) अपास्त.

कक्षा : धूमकेतू हे सूर्यकुलातील ग्रहांप्रमाणेच सूर्याभोवती भ्रमण करतात. त्यांचा प्रकाश बहुतेक परावर्तनानेच येणारा आहे (सूर्याकडून मिळणाऱ्या प्रकाशापैकी थोड्या भागाचे शोषण होऊन नंतर हळूहळू तो उत्सर्जितही होत असतो. अशा दोन्ही प्रकारच्या प्रकाशाने धूमकेतू दिसतो). ग्रहाच्या भ्रमणाच्या कक्षा किंचित विवृत्ताकृती असतात, पण धूमकेतूंच्या कक्षा मात्र तीन प्रकारच्या असतात. विवृत्त, अपास्त किंवा अन्वस्त (आ. ३) धूमकेतू आपल्या प्रवासात उपसूर्य बिंदूत (कक्षेतील सूर्याच्या सर्वांत जवळचा बिंदूत) किंवा आसपास आला म्हणजे थोडा काळ दिसतो. तेवढ्या थोड्या अवधीत कक्षा विवृत्त, अपास्ती की अन्वस्त हे कळणे कठीण जाते. कक्षा विवृत्त असली, तरीही हे विवृत्त अतिशय लांबट असते. हॅली धूमकेतूचा उपसूर्य बिंदू पृथ्वीच्या कक्षेच्या आतील बाजूस, तर अपसूर्य बिंदू (कक्षेतील सूर्यापासून सर्वांत दूरचा बिंदू) वरुणाच्या (नेपच्यूनाच्या) कक्षेच्याही थोडा पलीकडे असतो (आ. ४) विवृत्त कक्षा असणाऱ्या धूमकेतूंचे उपसूर्य बिंदू साधारणपणे पृथ्वीच्या कक्षेच्या आसपास असतात. पृथ्वीच्या कक्षेच्या पातळीशी या धूमकेतूंच्या पातळ्या इतर ग्रहांप्रमाणे लहान कोनच करतात. ते अपसव्य (घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या विरुद्ध) दिशेनेच भ्रमण करतात परंतु मोठमोठे कोन असणाऱ्या पातळ्यांचे धूमकेतूही असतात. हॅली धूमकेतू तर ९०° पेक्षा जास्त म्हणजे १६२° चा कोन करणाऱ्या पातळीत भ्रमण करतो. त्यामुळे तो सव्य दिशेने भ्रमण करतो असे वाटते. ५६६ धूमकेतूंच्या कक्षांचे अवलोकन केले तेव्हा त्यांपैकी ४०७ (७२%) कक्षा अन्वस्त, ६५ (११%) अपास्त आणि ९४ (१७%) विवृत्त असल्याचे आढळून आले.

आ. ४. हॅली धूमकेतूची कक्षा : (१) उपसूर्य बिंदू, (२) सूर्य, (३) पृथ्वीचे कक्षा, (४) मंगळाची कक्षा, (५) गुरूची कक्षा, (६) शनीची कक्षा, (७) प्रजापतीची कक्षा, (८) वरुणाची कक्षा, (९) अपसूर्य बिंदू.

विवृत्त कक्षा असली तरी ती कायम विवृत्तच राहते असे नाही. मोठ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने त्या क्रमाने अन्वस्त आणि अपास्तही होतात. त्यामुळे वरील आकडेवारी कायमची नव्हे. ८०% धूमकेतू सूर्यकुलाच्या बाहेरून येतात. विवृत्त कक्षा असल्याखेरीज धूमकेतू पुन्हा दर्शन देणार नाही. वरीलपैकी सु. ५० धूमकेतू एकदा तरी पुन्हा येऊन गेलेले असे आहेत. कधीकधी सूर्यापासून १ ज्यो. ए. अंतरापेक्षा कमी अंतरावरून धूमकेतू गेला, तर त्याचा प्रवेग (प्रत्येक सेकंदाला वाढणारे वेगाचे प्रमाण) अतिशय वाढून सूर्याला वळसा घालताना त्याची परिभ्रमण कक्षा विवृत्त न राहता अन्वस्त किंवा अपास्त बनते व धूमकेतू पुन्हा दिसत नाही. शनी, गुरू यांच्या फार जवळून जर धूमकेतू गेले, तर त्यांच्या आवर्तन कालावर परिणाम होतो. लेक्सेल धूमकेतूचा आवर्तन काल तो १७६७ साली गुरुजवळून गेल्याने ५·६ वर्षांपर्यंत कमी झाला, तर १७७९ साली त्यात बरीच वाढ झाली. पण पुढे तो दिसलाच नाही.

दोन प्रकार : आवर्तन कालावरून धूमकेतूंचे दोन प्रकार पडतात. ज्यांचा आवर्तन काल २०० वर्षांहून कमी आहे असे लघू-आवर्तनी व त्याहून जास्त असलेले दीर्घ-आवर्तनी. लघु-आवर्तनी धूमकेतूंच्या कक्षा साधारणपणे क्रांतिवृत्ताच्या पातळीत असतात पण दीर्घ-आवर्तनी धूमकेतूंच्या कक्षा वाटेल तशा असतात. काही लघु-आवर्तनी धूमकेतूंचे अपसूर्य बिंदू ते ज्या ग्रहांच्या आकर्षणामुळे खेचले गेले असतील त्या ग्रहांच्या कक्षेच्या जवळपास असतात. अशा कक्षा असलेले धूमकेतू संबंधित ग्रहांच्या गटातील समजण्यात येतात. गुरुगटात ६० (३०), शनिगटात ८ (६), प्रजापतिगटात ३ (२), वरुणगटात ९ (५) व त्यापलीकडे १२३ (१) अशी साधारण विभागणी आहे. कंसाबाहेरील संख्या सर्व आवर्तनी धूमकेतूंची असून कंसातील आकडे ज्यांचे पुनरागमन प्रत्यक्ष पाहिले गेलेले आहे अशांचे आहेत. सुप्रसिद्ध हॅली धूमकेतू हा वरुणगटातील होय. गुरुगटातील धूमकेतू सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्या सर्वांच्या कक्षांमध्ये विलक्षण साम्य आहे. २४ धूमकेतूंचे अपसूर्य बिंदू सूर्यापासून गुरुकक्षेच्या अंतरावर असतात. आणखी २६ धूमकेतूंचे त्या गुरुकक्षेच्या १ ज्यो. ए. अंतराच्या आत असतात. पूर्वी कधी तरी हे धूमकेतू गुरूने पूर्वीच्या त्यांच्या कक्षेतून ओढून घेऊन आपल्या प्रभावातील कक्षेत त्यांना भ्रमण करावयास लावले असावे. गुरुगटातील धूमकेतूंचे आवर्तन काल ३·३ वर्षांच्या आसपास आहेत.


नामकरण : बहुधा धूमकेतूला त्याच्या संशोधकाचे नाव देण्याची प्रथा आहे परंतु एखादा धूमकेतू एका निरीक्षकाला दिसलेला असेल, पण दुसऱ्या एखाद्या संशोधकाने त्याच्या बाबतीत विशेष कार्य केलेले असेल, तर त्याचे नाव त्या धूमकेतूला देण्यात येते. हॅली धूमकेतू प्रथम हॅली यांनी पाहिलेला नव्हता. पूर्वी तो अनेक वेळा येऊन गेलेला होता. १५३१, १६०७, १६८२ या वर्षी आलेले धूमकेतू एकच होत, असे हॅली यांनी सोळाव्या व सतराव्या शतकांत दिसलेल्या तेजस्वी धूमकेतूच्या निरीक्षणावरून ठामपणे सांगितले. इतकेच नव्हे, तर त्याचा आवर्तन काल सु. ७६ वर्षांचा असून तो पुन्हा १७५८ मध्ये दिसेल, असेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे तो दिसलाही म्हणून याला हॅली धूमकेतू म्हणतात. दुसरे असेच उदाहरण झां ल्वी पाँस यांना १८१८ मध्ये सापडलेला धूमकेतू व १७८६, १७९५ आणि १८०५ या वर्षी आलेले धूमकेतू एकच होत असे एंके यांनी दाखवून दिले. त्याचा आवर्तन काल त्यांनी ३·३ वर्ष ठरविला आणि हा १८२२ मध्ये दिसेल असे भाकीत वर्तविले व त्याप्रमाणे तो दिसलाही. म्हणून या धूमकेतूचे नाव एंके धूमकेतू असे पडले. एकच धूमकेतू स्वतंत्र रीत्या दोन किंवा अधिक संशोधकांना सापडल्याची उदाहरणेही आहेत. अशा वेळी जोड नावे देतात. उदा., इकेया-सेकी, टटल-गियाकोबिनी-क्रेसाक वगैरे परंतु आता तीनपेक्षा जास्त स्वतंत्र संशोधक असले, तर तीनपेक्षा जास्त नावे धूमकेतूच्या नावात घालू नयेत असे ठरविण्यात आले आहे. त्याला अनुसरून पाँस-कॉगिया-व्हिनेके-फॉर्बस याचे नाव अशा प्रकारे न देता क्रोमेलिन धूमकेतू असे देण्यात आले. क्रोमेलिन यांनी या धूमकेतू बाबत गणित केले होते. हल्ली एक वेगळीच पद्धत प्रचारात आहे. धूमकेतूचा शोध जाहीर झाला की, लगेच एक तात्पुरते नाव देण्यात येते. त्या नावात शोधाचे वर्ष आणि त्यापुढे इंग्रजी लिपीतील लहान अक्षर घालण्यात येते उदा., 1910a, 1957d, 1965f. लहान अक्षर हे त्या वर्षी सापडलेला कितवा धूमकेतू हे दर्शविते. a पहिला, d चवथा आणि f सहावा. त्यानंतर त्याची कक्षा आवर्तन काल व उपसूर्यी येण्याची तारीख विश्वसनीय रीत्या ठरली म्हणजे पक्के नाव देण्यात येते. त्यामध्ये उपसूर्यी येण्याचे वर्ष लिहून त्यापुढे रोमन आकड्यांनी त्या वर्षी उपसूर्यी येणाऱ्या त्या धूमकेतूचा क्रमांक घालतात जसे १९६६I, १९६६II याचा अर्थ असा की, १९६६ मध्ये उपसूर्यी येणारा पहिला व दुसरा धूमकेतू असा होतो. काही धूमकेतूंना कायमचे असे नाव मिळणार नाही, कारण त्यांसंबंधीची माहिती अपुरीच राहते. एखाद्या धुमकेतूचा शोध लागण्याच्या पुढच्या वर्षीही तो उपसूर्यी येण्याचा संभव असतो. उदा., व्हिपल धूमकेतूचे पहिले नाव १९४०b  पण पक्के नाव १९४१IIIP/व्हिपल असे देण्यात आले.

धूमकेतूचा शोध : हल्ली वेधशाळांनी इतर काही कामांकरिता घेतलेल्या खगोलीय छायाचित्रांचे सूक्ष्म अवलोकन करीत असता कधीकधी धूमकेतूंचे शोध लागतात. इकेया व सेकी यांच्यासारखे हौशी खगोल निरीक्षक धूमकेतूंच्या मागावरच असतात. सूर्यास्तानंतर काही वेळा पश्चिम आकाश व सूर्योदयापूर्वी पूर्व आकाश ही धूमकेतू शोधण्याची मुख्य ठिकाणे असतात.

प्रतिवर्षी सरासरीने ५-६ धूमकेतू आढळून येतात, यांपैकी १/३ पूर्वी येऊन गेलेले आणि बाकीचे नव्याने भेट देणारे असतात. आतापर्यंत हजाराच्यावर धूमकेतूंची यादी तयार झालेली आहे. इ. स. पू. २३६९ पासून सु. १,६०० धूमकेतू दिसले. वास्तविक ही यादी मोठी असावयास पाहिजे पण दूरदर्शकाचा शोध लागल्यानंतरच धूमकेतूंच्या संख्येत झपाट्याने भर पडत गेली.

धूमकेतूंच्या शोधाची बातमी (त्याचे स्थान व ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवरील त्याच्या गतीची दिशा) कोपनहेगन वेधशाळेतील सेंट्रल ब्यूरो ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिग्रॅम्स या विभागाला किंवा अमेरिकेतील हार्व्हर्ड वेधशाळेला देण्यात येते. या वेधशाळा नंतर ही बातमी इतर वेधशाळांना देतात. काही दिवसांच्या अंतराने धूमकेतूची तीन स्थाने निश्चित केल्यावर त्याची प्राथमिक कक्षा ठरविण्यात येते. या निरीक्षणांवरून धूमकेतू नवा आहे की पूर्वी नोंद झालेलाच पुन्हा आलेला आहे, हे ठरविता येते. आणखी निरीक्षणे घेतल्यानंतर त्यांची निश्चित कक्षा गणिताने ठरविण्यात येते.

विघटन : धूमकेतू हे अवकाशातील ग्रहगोल किंवा तारे यांच्या मानाने बरेच अल्पायुषी असतात. निरीक्षण केलेल्या अवस्थेत त्यांचे अस्तित्व १०,००० ते १० लक्ष वर्षे ठरेल. आवर्तनी धूमकेतूच्या वरचेवर सूर्यापाशी येण्याने गाभ्यातील व शिखेतील द्रव्य निघून जाते, त्यामुळे त्यांचे तेज कमी कमी होत जाते. सूर्याजवळ असताना मिळालेल्या प्रखर उष्णतेमुळे व प्रभावी आकर्षणामुळे गाभासुद्धा फुटून जातो व त्यातून उल्काप्रवाह तयार होतात. १८२६ साली दिसलेला बीला धूमकेतू १८४६ मध्ये पुन्हा आला तेव्हा तो दुभंगला होता दोन्ही भागांना वेगवेगळे पुच्छ होते आणि १८५२ साली ते विभाग कित्येक लक्ष किमी. दूर दूर आढळले. पुढे ते दिसेनासे होऊन त्याच कक्षेत एक उल्काप्रवाह सुरू झाला. या प्रवाहालाच अँड्रोमेडीड (बिलीड) म्हणतात. १८८२II हा धूमकेतू सूर्याच्या फार जवळ आल्याने त्याचे ५ भाग झाले. मोठ्या ग्रहाजवळून धूमकेतू गेला, तरीही त्याचे विघटन होण्यास मदत होते. ब्रुक्स धूमकेतूचे १८८९ मध्ये पुष्कळ भाग झाले त्यांपैकी दोन मोठे भाग हळूहळू दूर सरकत होते. त्यामुळे मागे मागे तलास काढीत गेल्यावर तो जेव्हा १८८६ मध्ये गुरूजवळ आला होता आणि गुरूच्या आतल्या उपग्रहाच्या कक्षेच्याही आत आला होता तेव्हा त्या वेळी त्याचे विघटन झाले असे ठरले. त्याचा आवर्तन काल २९·२ वर्षे होता तो ७·१ वर्षे झाला. १८९७III/पेरिन व १९१३ VI P/वेस्टफाल हे धूमकेतू अपसूर्य बिंदूत जाईपर्यंतच नाहीसे झाले. ऑक्टोबरमधील ड्रॅकोनीड या उल्कावर्षावाचा धूमकेतूशी संबंध विशेष महत्त्वाचा आहे. मेमधील ईटा-ॲक्वॅरीड व ऑक्टोबरचा ओरिऑनीड यांचा संबंध हॅली धूमकेतूशी लागतो. एंके धूमकेतूशी टॉरीड, एरिटीड व झीटा-पर्सीड हे उल्कावर्षाव निगडित आहेत [ → उल्का व अशनि].


काही विशिष्ट धूमकेतू : हॅली धूमकेतू : सोळाव्या व सतराव्या शतकांत दिसलेल्या सर्व तेजस्वी धूमकेतूंचा अभ्यास करून हॅली यांनी १५३१, १६०७, १६८२ या साली दिसलेले धूमकेतू एकच असून १७५८ मध्ये तोच पुन्हा दिसेल, असे भाकित केले, त्याप्रमाणे तो दिसलाही म्हणून त्यांचेच नाव या धूमकेतूला दिले गेले. १९०९ च्या सप्टेंबरमध्ये हा आढळला १९१० च्या मे महिन्यामध्ये फार मोठा दिसला, जून १९११ पर्यंत तो दिसत होता. त्यानंतर तो गुरूच्या कक्षेच्याही बाहेर गेला व दिसेनासा झाला. याची कक्षा वरुणाच्या कक्षेपलीकडे जाते. १९४५ मध्ये तो कक्षेत अपसूर्यी येऊन गेला. त्याचा आवर्तन काल सु. ७५ वर्षांचा आहे. त्यामुळे त्याचे पुनरागमन फेब्रुवारी १९८६ मध्ये अपेक्षित आहे. हा प्रथम इ. स. पू. २४० मध्ये चिन्यांनी पाहिला व तेव्हापासूनची त्याची २८ आगमने (एक सोडून) इतिहासात नमूद आहेत. १९१० सालच्या त्याच्या आगमनाच्या वेळी २० एप्रिल १९१० रोजी तो उपसूर्यी आला होता. नंतर १ महिन्याने तो पृथ्वीला अगदी जवळ आला. १५ मे च्या आसपास त्याचे पुच्छ ५०° पर्यंत वाढले. १८ मे रोजी तो सूर्यावरून गेला सूर्यबिंबावर त्याचा लेशही दिसत नव्हता पण सकाळी पुच्छ मात्र दोन दिवस दिसत होते. या सुमारास ते सु. ६·४ कोटी किमी. लांबीचे होते. या धूमकेतूची कक्षा क्रांतिवृत्ताशी १६२° म्हणजे ९०° पेक्षा मोठा कोन करते म्हणून तो ग्रहांपेक्षा उलट गतीने जातो असे भासते. लघु-आवर्तनी धूमकेतूंत हा सर्वांत प्रमुख होय. हा वरुणगटातील समजला जातो. १९८६ मध्ये हा पुन्हा दिसेल तेव्हा निरीक्षणात वा नुसत्या डोळ्यांनी पाहण्यात विद्युत‌् दिव्यांचा झगमगाटाचा व्यत्यय येईल.

कोष्टक क्र. १. इ. श. १९२७ पासून दिसलेले काही आवर्तनी नसलेले तेजस्वी धूमकेतू 

नाव 

वर्ष व दिसण्याचा क्रम 

उपसूर्य काल 

उपसूर्यी अंतर (ज्यो. ए. मध्ये) 

कक्षेचा कल (अंशांत) 

स्केलरूप

१९२७ k

१९२७ (डिसेंबर)

०·१८

८५

रॉयव्हिस

१९३१ c

१९३१ (ऑगस्ट)

०·०६

१६७

पेल्‌तिए

१९३६ a

१९३६ (जुलै)

१·१०

७९

फिन्सलर

१९३७ f

१९३७ (ऑगस्ट)

०·८६

१४६

कनिंगहॅम

१९४० d

१९४१ (जानेवारी)

०·३७

५२

पारास्केव्होपलॉस

१९४१ c

१९४१ (जानेवारी)

०·७९

१६८

व्हिपल

१९४२ f

१९४३ (फेब्रुवारी)

१·३६

२०

बेस्टर

१९४७ k

१९४८ (फेब्रुवारी)

०·७५

१४०

 

१९४७ n

१९४७ (डिसेंबर)

०·११

१३८

हॉन्ड

१९४८ g

१९४८ (मे)

०·२१

२३

बेर्‌नॉस्कोनी

१९४८ l

१९४८ (ऑक्टोबर)

०·१४

२३

विल्सन-हॅरिंग्टन

१९५१ i

१९५२ (जानेवारी)

०·७९

१५३

म्रकॉस

१९५५ e

१९५५ (जुन)

०·५४

८७

आरें-रोलंड

१९५६ h

१९५७ (एप्रिल)

०·३२

१२०

म्रकॉस

१९५७ d

१९५७ (ऑगस्ट)

०·३५

९४

कोष्टक क्र. २. आर्वाचीन काळात द्दग्गोचर झालेले काही आवर्तनी धूमकेतू 

नाव 

प्रथमावलोकन 

शेवटचे अवलोकन 

आवर्तन काल वर्षे 

उपसूर्यी अंतर (ज्यो.ए.मध्ये) 

एंके

१७८६

१९५७

३·३०

०·३४

पाँस-ब्रुक्स

१८१२

१९५३

७०·८८

०·७७

क्रोमेलिन

१८१८

१९५६

२७·८७

०·७४

पाँस-व्हिनेके

१८१९

१९५१

६·२६

१·२३

फेए

१८४३

१९५४

७·४१

१·६५

द् आरे (दारे)

१८५१

१९५०

६·६९

१·३८

टेंपल २

१८७३

१९५६

५·३१

१·१४

गियाकोबिनी-झिना

१९००

१९५३

६·५९

१·००

ग्रीक स्केलरूप

१९०२

१९५६

४·९०

०·८६

डॅनिएल

१९०९

१९५०

६·६६

१·४६

शॉऊमासे

१९११

१९५१

८·१७

१·२०

नॉईमिन

१९१३

१९४८

१७·९३

१·५४

शव्हासमन-वाखमन

१९२७

१६·१५

५·५२

ऑटरमा

१९४३

७·९५

३·४१

एंके धूमकेतू: हा प्रथम पाँस यांना १८१८ मध्ये दिसला पण एंके यांनी त्याचा आवर्तन काल ३·३ वर्षे ठरविला. सर्व धूमकेतूंत याचा आवर्तन काल कमी आहे. प्रथम दिसल्यापासून आजपर्यंत ज्याचे प्रत्येक आगमन पाहिले गेलेले आहे, असा हा एकच धूमकेतू आहे. त्यामुळे याचा आवर्तन काल १०० वर्षात २ ½ दिवसांनी कमी झाला,  असे आढळून आले. यावरून याची कक्षा हळूहळू संकुचित होत असल्याचे दिसते. काही हजार वर्षांपूर्वी याची कक्षा गुरूच्या कक्षेच्याही पलीकडे असावी. हा पूर्वी दीर्घ-आवर्तनी असून गुरूच्या सान्निध्यामुळे तो असा लघु-आवर्तनी झाला असावा. हा गुरुगटापैकी आहे.

आरें-रोलंड (१९५६h) धूमकेतू : हा पुन्हा न येणारा धूमकेतू आहे. तो दिसला तेव्हा त्याचे पुच्छ नुसत्या डोळ्यांनी सुद्धा २०° ते ३०° एवढे मोठे दिसले. ८ एप्रिल १९५७ रोजी तो उपसूर्य बिंदूत १/३ ज्यो. ए. अंतरावर होता. २५ एप्रिलला पृथ्वी त्याच्या पुच्छातून गेली, त्या वेळी सु. ८ दिवस त्याला सूर्याच्या बाजूस लांब चोच दिसत होती. ती लांबत लांबत २०° पर्यंत टोकदार अशी लांबली व पुढे आखूड होत नाहीशी झाली. ही चोच म्हणजे जाताजाता कक्षेत सुटलेले धूमकेतूचे द्रव्य होय. हे पंख्याच्या आकाराचे असले, तरी त्याची कडा पाहणाराकडे असल्याने ती टोकदार दिसते. अशीच चोच १८६२III या धूमकेतूलाही होती.

८५२II धूमकेतू: अलीकडे दिसलेल्या अत्यंत तेजस्वी धूमकेतूंपैकी हा आहे. हा दिवसाढवळ्याही दिसत होता. तो सूर्याच्या किरीटातून सूर्यपृष्ठापासून ४·८ लाख किमी. इतक्या जवळून गेला. त्याचा वेग ताशी १५ लाख किमी. हून अधिक होता. त्याच्या गाभ्याचे ४ भाग झाले. हे चार वेगवेगळे धूमकेतू म्हणून पंचविसाव्या व अठ्ठाविसाव्या शतकांत दिसतील.

श्व्हासमन-वाखमन (१९२५II) धूमकेतू : याची कक्षा संपूर्णपणे गुरू व शनी यांच्या कक्षांच्या मध्ये आहे. इतर धूमकेतूंहून वेगळी म्हणजे याच्या कक्षेची विकेंद्रता ०·१४ म्हणजे बुधाच्या कक्षेहूनही कमी आहे. कक्षेच्या अपसूर्य बिंदूत दिसलेला हा पहिलाच धूमकेतू होय. जरी तो अठराव्या प्रतीचा [ → प्रत] असला, तरी त्याच्यावरील उद्रेकामुळे क्वचित एका दिवसाच्या आत तो पाचव्या प्रतीपर्यंत तेजस्वी होतो.

ऑटरमा धूमकेतू : हा १९४३ साली दिसला. १९६१ पर्यंत त्याची कक्षा मंगळ व गुरू यांच्या कक्षांच्या दरम्यान जवळजवळ वर्तुळाकार होती. १९६१ नंतर गुरूच्या प्रभावामुळे त्याची कक्षा विवृत्ताकृती होऊन आवर्तन कालही लांबला.

१८४३ धूमकेतू : १८४३ साली दिसलेल्या या मोठ्या धूमकेतूचे पुच्छ आजपर्यंत पाहिलेल्यांत सर्वांत मोठे म्हणजे ३० कोटी किमी. होते. त्यामुळे त्याची आकाशातील व्याप्ती ६८° होती (परंतु १८६१ चा धूमकेतू लहान असूनही त्याच्या पुच्छाची व्याप्ती ११८° होती).

इकेया-सेकी धूमकेतू : हा १९६५ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पहाटे दिसत होता. तो बऱ्याच वेळा सूर्यप्रकाशातही दिसे. उपसूर्यी आल्यावर सूर्याच्या अगदी जवळून जाणाऱ्या आकर्षक धूमकेतूंच्या गटापैकी हा आहे. याच्या वर्णपटामध्ये लोह, कॅल्शियम, निकेल, मँगॅनीज, क्रोमियम, पोटॅशियम, तांबे, सिलिकॉन आणि बहुधा ॲल्युमिनियम यांच्या रेषा दिसल्या होत्या. (चित्रपत्र २४).

संदर्भ : 1. Baker, H. R. Astronomy, Princeton, 1960.

    2. King, H. C. Astronomy, London, 1960.

    3. Littleton, R. A. Comets an their Origin, Cambridge,1953. 

    4. Pickering. J. K. 1001 Questions Answered About Astronomy, London, 1965.

    5. Richter, N. B. Nature of Comets, London, 1963.

मोडक, वि. वि. पुरोहित, वा. ल.


(अ) कोहाउटेक धूमकेतूचे ४ जानेवारी १९७४ रोजी दृश्य प्रकाशाच्या साहाय्याने घेतलेले छायाचित्र.   (आ) त्याच धूमकेतूचे ७ जानेवारी १९७४ रोजी जंबुपार किरणांच्या साहाय्याने घेतलेले छायाचित्र.यात हायड्रोजन वायूची प्रचंड शिखा दिसत असून हिचा व्यास सु. सूर्याच्या व्यासाच्या ४ पट होता.    हॅली धूमकेतूचे ८ मे १९१० रोजी घेतलेले छायाचित्र. यात शिखा व पुच्छाचा प्रारंभीचा भाग स्पष्ट दिसत आहे.    हॅली धूमकेतू : (अ) १२ मे १९१० व    (आ) १५ मे १९१० रोजी घेतलेली छायाचित्रे. यात तीन दिवसांत पुच्छाच्या लांबीत झालेली प्रचंड वाढ दिसून येते.    आरें-रोलंड धूमकेतूचे १९५७ साली घेतलेले छायाचित्र यात खालच्या दिशेने आलेली चोच स्पष्ट दिसत आहे.    कनिंगहॅम धूमकेतूचे २१ डिसेंबर १९४० रोजी घेतलेले छायाचित्र. वर दिसणाऱ्या पांढऱ्या रेघा पृथ्वीच्या अक्षभ्रमणामुळे ताऱ्यांचे उमटलेले मार्ग आहेत.    म्रकॉ धूमकेतूची २२, २४, २६ व २७ ऑगस्ट १९५७ ला घेतलेली छायाचित्रे. सरळ गेलेले वायुपुच्छ व उजवीकडे वाकलेले छुलिपुच्छ