हस्तसामुद्रिक : हाताच्या तळव्याचा आकार, उंचसखलपणा,रंग व त्यावरील त्वचेचे स्वरूप बोटांची ठेवण, त्यांची लांबी-रुंदी, पेरीव त्यांची वैशिष्ट्ये नखे व त्यांचा आकार आणि तळहातावरील उंचवटे,रेषा व चिन्हे या सर्वांच्या अवलोकनावरून परंपरा प्राप्त अनुभवाधिष्ठित नियमांच्या साहाय्याने माणसाचा स्वभाव, अनुवंश, पात्रता आणि घडलेल्या व पुढे घडणाऱ्या सुख-दुःखात्मक घटना यांचा अंदाज वर्तविणारे शास्त्र म्हणजे हस्तसामुद्रिकशास्त्र होय. जगभर मान्यता पावलेली ज्योतिष-शास्त्राची ही विद्याशाखा प्रथमतः भारतात उत्पन्न झाली आणि येथून ग्रीस, ईजिप्त, पर्शिया, चीन इ. देशांत प्रसार पावली. याबाबत पौर्वात्यव पाश्चात्त्य ग्रंथकारांचे एकमत आहे.

 

भारतात वराहमिहिरा चार्यांनी लिहिलेल्या बृहत्संहिते त असलेले हस्तसामुद्रिकाचे विवरण सर्वांत जुने समजले जाते. प्राचीन भारतीयांनी केवळ हस्तसामुद्रिकाचा अभ्यास करण्याऐवजी सर्व सामुद्रिकशास्त्राची मांडणी केलेली होती. सामुद्र म्हणजे अंगलक्षण. अंगलक्षण म्हणजे देहावर आढळणारी चिन्हे. पूर्वकर्मानुसार प्राप्त होणारी बुद्धी आणि सुख-दुःखात्मक भवितव्य हे देहाच्या निरनिराळ्या सर्व अवयवांवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सूचित होते, अशी प्राचीन लोकांची श्रद्धा होती. समुद्र ऋषींनी हेशास्त्र सांगितले म्हणून सामुद्रिक असे नाव या विद्याशाखेस मिळालेअसावे, असा एक खुलासा एका जुन्या संस्कृत ग्रंथात (कार्तिकेय–सामुद्रिकशास्त्र) आढळतो. सामुद्रिक-तिलक या नावाचाही संस्कृत ग्रंथ प्रकाशित असून प्रकाशात न आलेले, ताडपत्रावर लिहिलेले, द्राविड लिपीत आणि अर्धसंस्कृत भाषेतील बरेच ग्रंथ असल्याचे कळते. वराहमिहिराप्रमाणे गर्ग, नारद व प्रह्लाद यांचाही उल्लेख जुन्या ग्रंथांत आदराने केलेला आढळतो. इतिहासकाव्ये रामायण व महाभारत यांमध्ये सामुद्रिक चिन्हांचा व त्यांनी दर्शविलेल्या शुभाशुभ फलांचा उल्लेख केलेला आहे. उदा., रामायण (युद्धकांड सर्ग ४८ सीताशोक), अग्निपुराण, स्कंदपुराण इ. ग्रंथांत त्यांचे उल्लेख आहेत.

 

चीनमध्ये इ. स. पू. तीन हजार वर्षे इतक्या जुन्या काळात हे शास्त्र अस्तित्वात होते. त्यापूर्वी प्राचीन काळात ग्रीकांना हे ज्ञान अवगत होते. तेथूनच याचा यूरोपभर प्रसार झाला. भारतीय सामुद्रिकशास्त्र परदेशात गेल्यावर त्याचे स्वरूप हस्तसामुद्रिक असे सीमित झाले. फ्यूजिऑनॉमिया या ॲरिस्टॉटलरचित ग्रंथाव्यतिरिक्त प्लिनी, पॅरासेल्सस, कॅराडामिस इ. ग्रीक ग्रंथकारांनी प्राचीन काळात यावर लिहिले. त्यांच्या विवेचनाचे दोन भाग झाले. त्यात काइरोग्नॉमी ही एक शाखा तर काइरोमॅन्सी ही दुसरी शाखा. हात व बोटे यांच्या आकार इत्यादींचा मुख्य विचार पहिली शाखाकरते तर तळहातावरील रेषा, चिन्हे, उंचवटे इत्यादींचा विचार दुसऱ्याशाखेत अपेक्षित असतो. वरील ग्रीक शब्दातील ‘काइरो’ आणि संस्कृत शब्दातील ‘कर’ यांमधील ध्वनी व अर्थ यांचा सारखेपणा लक्षणीय आहे. ग्रीकांकडून प्रसारित झालेली ही विद्या अनेक शतके अशिक्षित, भटक्या जमातींतील लोकांच्या आणि अरबांच्या आश्रयाने थोड्या अप्रतिष्ठित अवस्थेत असताना इंग्लंडमध्ये विचक्राफ्ट हा कायदा झाला (१७३५). त्यानुसार भविष्य सांगणे हा गुन्हा समजला जाऊ लागला. नंतर एकोणिसाव्या शतकात रॅफल, डेसबेरोलेस, विल्यम बेनहॅम इ. अभ्यास-कांनी तिला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि पुन्हा ती सर्व देशांत उत्सुक-तेचा विषय बनली. लुईस हार्मन (टोपण नाव चिरो) या लेखकाने मांडलेले निरीक्षण हे जगन्मान्य झाले आहे. भारतातील हिंदी, गुजराती व मराठी भाषांतील या विषयावरील आजची पुस्तके म्हणजे मुख्यतः चिरो यांचे अनुवाद आहेत.

 

प्राचीन भारतीय परंपरेनुसार हातावरील रेषांची नावे व अर्वाचीनपाश्चात्त्य परंपरेनुसार असणारी त्याच रेषांची नावे भिन्न आहेत. सध्या तरी पाश्चात्त्य पद्धतीनुसारच हस्तसामुद्रिकाचे (आ. १) सर्वत्र वाचन व अभ्यास होत आहे. त्यामुळे हातावरील रेषांची सध्याची नावे सांगून त्यांना प्राचीन भारतीय नावे कोणती आणि त्या रेषांवरून भारतीय हस्तसामुद्रिक (आ. २) कोणत्या गोष्टींचा विचार करीत असत ते पाहू.

 

आ. १. अर्वाचीन पाश्चात्त्य सामुद्रिकशास्त्रानुसार हातावरील महत्त्वाच्या रेषा व ग्रहांचे उंचवटे : (१) आयुष्यरेषा. (२) धनरेषा (भाग्यरेषा), (३) रविरेषा, (४) मस्तकरेषा, (५) अंतःकरणरेषा, (६) शुक्रकंकणरेषा, (७) विवाहरेषा.आ. १ मध्ये दर्शविलेल्या रेषा या प्रमुख रेषा असून गौण रेषापुष्कळच असतात. आयुष्य, आरोग्य व व्यक्तित्व यांची निदर्शक आयुष्य-रेषा असते. आयुष्यरेषा अथवा मस्तकरेषा जर चंद्रपर्वतावर विराम पावत असेल, तर तो माणूस स्वप्नाळू , हळवा व कल्पक असा होतो. तेथेचदुश्चिन्ह (काळी फुली, आडव्या तिडव्या रेषा इ.) असल्यास वेडलागणे, पाण्यात बुडणे, आत्मघात करणे इ. फले मिळतात. आयुष्यरेषा किंवा मस्तकरेषा गुरूवर उगम पावत असल्यास सात्त्विकपणा, परोपकारी वृत्ती व महत्त्वाकांक्षा जास्त असतात. कोणत्याही आदर्श रेषेचे सु. शंभर भाग पाडून तिची हातावरील प्रत्यक्ष रेषेच्या प्रारंभापासून अखेरपर्यंतच्या लांबीशी तुलना करून वयाचा अंदाज कल्पितात. ज्या ठिकाणी रेषेवर आडवे छेद, यव इ. चिन्हे असतात, त्या वयाच्या सुमारास काही संकटवा संघर्ष उत्पन्न होतात.

 

मस्तकरेषा ही बौद्धिक कुवत व व्यवसायातील यशापयश दर्शविते. ती रेषा ज्या ग्रहावरून निघते अथवा जेथे ती पोहोचते त्या ग्रहाचे गुणधर्म व्यक्तिमत्त्वात व व्यवसायात दिसून येतात. दोन मस्तकरेषा किंवा दोन ठिकाणी वळून विसर्जित झालेल्या मस्तकरेषा असामान्य बुद्धिमत्ता वदुहेरी व्यक्तित्व दर्शवितात. अंतःकरणरेषा स्वभावाचे निदान करते व कौटुंबिक सुख-दुःख दर्शविते. विवाहरेषा जेवढी अंतःकरणरेषेला जवळ तितका विवाह लवकर होतो. ती जितकी करांगुलीच्या पायथ्याला जवळ तेवढा विवाह उशीरा होतो. धनरेषा पैशाची स्थिती तर रविरेषा बुद्धी व यशस्विता किती हे दाखविते. सर्वसाधारणपणे उभ्या रेषा प्रगतीच्या असतात, तर अधोमुख किंवा आडव्या रेषा अधोगती किंवा संकटनिदर्शक असतात. कोणतीही रेषा बारीक, खोल, सुस्पष्ट, सरळ व दुश्चिन्हरहित असावी. अंतःकरणरेषा फक्त जाड व फाटे असणारी असावी.

 

हस्तसामुद्रिकाची भारतीय परंपरा : पाश्चात्त्य विचारसरणीनुसार आज जिला आयुष्यरेषा म्हणतात तिला भारतीय पितृरेषा म्हणत. तिचेगौरी, रमा, संगूढ, विगूढ, परगूढ इ. प्रकार त्यांनी केले होते. पितृरेषा मस्तकरेषेकडे थोडी वर जाऊन परत सरळ निर्दोष अशी पुढे जात असेल, तर तिला गौरी रेषा असे म्हणत. अशी रेषा असणे भाग्याचे मानले जाईव जन्मदिन कृष्णपक्षाच्या अखेरीस असण्याची शक्यता मानली जाई.

 

आजच्या मस्तकरेषेला भारतीय ज्ञानी मातृरेषा म्हणत. तिच्यावरून मातृसुख, प्रापंचिक परिस्थिती, स्वभाव व शीलाचा विचार केला जाई. तिच्या उगमावरून व स्वरूपावरून मृगीगती, नाभी, वराटकी, कुमुखी, कृष्णकचा, पांसुला इ. प्रकार केले गेले आणि त्या प्रकारांवरून फले सांगितली जात. ही रेषा चंद्रपर्वताकडे झुकणे हे चांगले लक्षण मानले गेले. जन्म कोणत्या महिन्यात झाला असावा, हे या रेषेवरून ठरविण्याचा प्रयत्न होई.


आजची अंतःकरणरेषा ही भारतीय परंपरेनुसार आयुष्यरेषा मानली गेली होती. ही रेषा स्पष्ट, सरळ व निर्दोष असणे दीर्घायुष्याचे लक्षण मानले गेले होते. अखंड, सुंदर व स्पष्ट आयुष्यरेषेला जगती असे म्हणत. जगती, कुमारी, धृती, रमणी व त्रिपदी असे तिचे प्रकार केले गेले होते आणि आरोग्य व आयुष्य यांच्याशी तिचा संबंध जोडला गेला होता. या रेषेवरून व्यक्तीचा जन्म सकाळी, दुपारी, रात्री इ. दिवसाच्या कोणत्या प्रहरी झाला असावा, याचा अंदाज वर्तविला जाई. उदा., जगती रेषेवरून पहाटे तीनच्या सुमाराचा जन्म असावा असे सांगितले जाई. आयुष्यरेषा बुधाच्या उंचवट्यावरून निघून गुरूच्या उंचवट्यावर पोहोचली असेल, तर शतायुषी जीवन समजले जाई. परंतु तीच जर शनीच्या उंचवट्याखाली थांबत असेल, तर साठ वर्षांचे आयुष्य मानले जाई. आयुर्मर्यादेचा विचार अशा प्रकारे होई.

आ. २. प्राचीन भारतीय हस्तसामुद्रिकशास्त्रानुसार रेषा व चिन्हे : (१) चक्र, (२) शंख, (३) यव, (४) स्वस्तिक, (५) मत्स्य, (६) देऊळ, (७) कमळ, (८) अंकुश, (९) वृक्ष, (१०) छत्र, (११) ध्वजा.)

सध्याच्या रविरेषेला धनरेषा अथवा धर्मरेषा असे नाव होते. ती स्पष्ट असल्यास ती व्यक्ती धनवान व धार्मिक वृत्तीची आहे, असे समजले जाई. यांशिवाय विवाहरेषा, अपत्यरेषा इ. आजच्या प्रचलित रेषा भारतीय परंपरे- नुसारच आहेत. शुक्रकंकणरेषा ही सुद्धा आजच्या गर्डल ऑफ व्हिनस-प्रमाणेच मानली गेली होती. ही रेषा गुरू व शनी या उंचवट्यामधून निघून रवी व बुध उंचवट्यांच्या दरम्यान जाते. ती अखंड आणि निर्दोष असेलव हातावरील इतर चिन्हे चांगली असतील, तर अशी व्यक्ती प्रतिभासंपन्न, हुशार, कलावान किंवा शास्त्रज्ञ होते.

 

भारतीय परंपरा ही हातावरील रेषा व उंचवटे यांच्याइतकेच किंबहुनात्याहून थोडे जास्तच महत्त्व शंख, चक्र, मत्स्य, ध्वजा, अंकुश, वृक्ष, देऊळ इ. चिन्हांना देते. उदा., देऊळ चिन्ह हातावर धारण करणारी व्यक्ती राजतुल्य मानसन्मान प्राप्त करून घेणारी सामर्थ्यसंपन्न असते. स्वस्तिक चिन्ह दयाळूपणा व मत्स्य चिन्ह ऐश्वर्य दाखवितात. शंख करोडपतींच्या हातावर असतो. धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत चारित्र्यामुळे पुढे येणाऱ्या व्यक्तींच्या हातावर ध्वज व छत्री ही चिन्हे आढळतात. पालखी चिन्हाने श्रीमंती व सात्त्विकता दाखविली जाते. वरील चिन्हांखेरीज भाला, तलवार व अंकुश अशा अनेक चिन्हांचा विचार भारतीय परंपरेमध्ये केला जातो.

 

भारतीय परंपरेत हातावरील चिन्हांना जास्त महत्त्व दिले गेले आहेतर पाश्चात्त्य परंपरेत हाताचा आकार, उंचवटे, रेषा, बोटे व नखे यांना अधिक महत्त्व दिलेले आढळते. आ. २ मधील हातात ज्या ठिकाणीचिन्हे दर्शविली आहेत, ती सर्व प्रत्येकाच्या हातावर व त्या त्याठिकाणीच असतात असे नाही. काही चिन्हे असतात वा असू शकतात आणि ती हातावर कोणत्याही ठिकाणी असतात.

 

पाश्चात्त्यांच्या मदतीने भारतात आज स्थिर झालेल्या हस्तसामुद्रिक-शास्त्रात हाताच्या आकाराला बरेच महत्त्व दिले गेले. रेषांचे फल सांगण्यापूर्वी जर हाताचा आकार व प्रकार लक्षात घेतला नाही, तर ज्योतिष्याच्या हातून चूक होईल, असे सांगितले आहे. तळवा चौरस असेल, बोटांना जेथून आरंभ होतो ती बाजू व बोटांची टोके काटकोनाने युक्त असतील, तर अशी व्यक्ती एकमार्गी, शिस्तप्रिय, विवेकी, कष्टाळू व समतोल असते. बोटांची लांबी अत्यंत आखूड असून नखे आखूड असतील, तर त्या मनुष्यात वासनात्मकता जास्त राहून सुसंस्कृतपणा कमी असतो. बोटे पुष्ट पण सुबक व निमुळत्या टोकांची असतील, तर माणूस बोलका, समाजप्रिय व सर्व विषयांत डोके असणारा, परंतु अस्थिर चित्त असतो. बोटे व नखे फारच निमुळती होत गेली असल्यास माणूस अत्यंत भावविवश आणि हळव्या स्वभावाचा, स्वतंत्र विवेक व निश्चय नसणारा असा होतो. बोटे वेडीवाकडी, संधीची वाढ झाल्याने गाठयुक्त असल्यास तो माणूस चिकित्सक, तार्किक व भावनेच्या आहारी न जाणारा बनतो.

 

नखांचा रंग हा मनोवृत्तीचा तसाच आरोग्याचा द्योतक असतो.नखावरील चंद्राकृती पांढरा भाग उत्कृष्ट रुधिराभिसरणाचा द्योतक समजतात. नखाच्या आकारावरून व स्वरूपावरून रोगनिदान सांगतात. हाताचा आकार व प्रकार पाहिल्यावर तळहाताचा अभ्यास करता येतो. जो ग्रह बलवान असेल त्याचा उंचवटा बलवान असतो. आ. १ मध्ये ग्रहांचे उंचवटे (पर्वत) दाखविले आहेत. जो ग्रह शुभ व बलवान असेल त्या त्या उंचवट्यावर उभ्या रेषा, त्रिकोण व शुभचिन्ह असते किंवा ते ते बोट त्याच्या सर्वसाधारण लांबीहून अधिक प्रमाणात लांब असते. उदा., मध्यमेच्या पहिल्या पेऱ्याच्या मध्याहून तर्जनी लांब असेल तर तो मनुष्य महत्त्वाकांक्षी, नेतृत्व करणारा व योजना राबवणारा असतो. शनी ग्रह प्रधान असलेला मनुष्य अंतर्मुख, वास्तववादी, कष्टाळू , कोणत्याही विषयाचा वा विचाराचा सर्व बाजूंनी विचार करणारा आणि उदास मनोवृत्तीचा असतो. अनामिका मोठी असेल किंवा रवीवर शुभ चिन्ह असेल, तर त्या माणसाला त्याच्या हयातीत प्रसिद्धी, यश इ. मिळून त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांचा खूप बोलबाला होतो. अशी माणसे उदार, गुणग्राहक, रसिक व सर्वांना वश करणारी असतात. बुध ग्रह किंवा करांगुली बुद्धिवैभवाने तळपणाऱ्या असतात. व्यापारी, वकील, डॉक्टर, संपादक, लेखक इ. भूमिका यशस्वी-पणे पार पाडणाऱ्या व्यक्तीच्या हातावरील बुध उंचवटा लक्षणीय असतो.

 

हस्तसामुद्रिकशास्त्रातील नियम हे कार्यकारणशृंखलेने वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केलेले नाहीत. तथापि, या नियमांच्या आधारे तपशिलासह अचूक भविष्य सांगून थक्क करणारे अभ्यासक आहेत. जीवशास्त्रीय कारणाने हातावर उंचवटे किंवा रेषा उद्भवतात हे अर्धसत्य आहे. हातावरील रेषाया व्यवसायावर अवलंबून नाहीत. (रेषांवरून व्यवसाय ठरविता येईल.एका माणसाच्या हातावरील रेषा दुसऱ्यासारख्या नसतात. म्हणून सही करता येत नसल्यास सहीऐवजी अंगठ्याचा ठसा प्रमाण मानतात.)

 

पहा : कुंडली फलज्योतिष.

 

संदर्भ : 1. Ayer, V. A. K. Indian Science of Palmistry, Mumbai, 1960.

           2. Ceiro, Language of the Hand, London, 1900.

           3. Webster, Richard, Palmistry Made Easy, New Delhi, 2000.

          ४. करंदीकर, श. दि. भाग्यरेषा, मुंबई, १९५७.

          ५. केळकर, द. शं. तुमचा हात तुमचे भाग्य, मुंबई, १९६३.

           ६. तांबे, ल. के. करदर्शन, पुणे, १९५१.

           ७. तांबे, ल. के. ब्रह्मलिखित, पुणे, १९५०.

           ८. नवाथे, दत्तात्रय गोपाळ सामुद्रिक प्रबोध, मुंबई, १९४८.

           ९. पटवर्धन, रघुनाथशास्त्री सामुद्रिक तिलक अथवा सामुद्रिक शिक्षक, पुणे, १९४०.

दीक्षित, प्र. ना. शेजवलकर, बा. ग.