श्ट्रूव्हे, फ्रीड्रिख गेओर्ख व्हिल्हेल्म फोन : (१५ एप्रिल १७९३-२३ नोव्हेंबर १८६४). रशियन ज्योतिषशास्त्रज्ञ. त्यांनी खगोलीय निरीक्षण तंत्र आणि ज्योतिषशास्त्रविषयक उपकरणे तयार करणे याबाबत बहुमोल कार्य केले. त्यांनी युग्मताऱ्यांच्या निरीक्षणाचा पाया घातला.

श्ट्रूव्हे यांचा जन्म जर्मनीतील आल्टना येथे झाला. लष्करातील सक्तीची भरती टाळण्याकरिता ते १८०८ मध्ये जर्मनी सोडून डेन्मार्कला गेले. नंतर त्यांनी रशियातील डॉर्पाट विदयापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी १८१० मध्ये भाषाशास्त्रातील पदवी संपादन केली. गेओर्ख फ्रीड्रिख पॅरट या भौतिकीविज्ञांच्या प्रभावामुळे श्ट्रूव्हे यांना सम्यक् विज्ञानामध्ये, विशेषतः ज्योतिषशास्त्रामध्ये, आवड निर्माण झाली. १८१२ मध्ये श्ट्रूव्हे यांनी डॉर्पाट वेधशाळेत नवीन उपकरणे बसविली व ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणे घेण्यास सुरूवात केली. यांवरून त्यांनी डॉर्पाट वेधशाळेच्या इमारतीचे अक्षांश व रेखांश बिनचूकपणे काढले. या कार्यामुळे त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली (१८१३). मग ते डॉर्पाट विदयापीठात ज्योतिषशास्त्र आणि गणित विषयांचे प्राध्यापक (१८१३-१७) आणि डॉर्पाट वेधशाळेचे संचालक (१८१८-३८) झाले. १८२४ मध्ये त्यांनी फाऊनहोफर विषुववृत्तीय दूरदर्शक मिळविला. यूरोपातील या सर्वोत्कृष्ट दूरदर्शकातील विवर्ण वस्तुभिंगाचा रंध्रव्यास ९.६ इंच (२६ सेंमी.) होता. या दूरदर्शकाच्या साहाय्याने युग्मताऱ्यांचे निरीक्षण व अभ्यास करण्यात आला. श्ट्रूव्हे यांनी खगोलीय उत्तर ध्रुवापासून (ध्रुवताऱ्यापासून) १०दक्षिण क्रांतीपर्यंतच्या आकाशातील क्षेत्रात १८२३-२७ या काळात, १३८ रात्री जागून ३२० तासांत १ लक्ष २२ हजार ताऱ्यांचे वेध घेतले. त्यांपैकी ३,११२ युग्मतारे होते आणि त्यांत ५१८ बहुकुटे (दोनपेक्षा अधिक ताऱ्यांचा समुच्च्य) होती [→ तारा ]. त्यांनी युग्मताऱ्यांतील घटकांच्या अंतराच्या दृष्टीने ताऱ्यांचे वर्गीकरण केले. त्यांनी आपले निष्कर्ष Stellarum Duplicium Mensurae Micrometricae (१८३८ इं.शी. मायकोमेट्रिक मेझर्मेंट ऑफ डबल स्टार्स) या सूचिखंडात प्रसिद्ध केले. हा युग्मताऱ्यासंबंधीचा ज्योतिषशास्त्रातील अभिजात गंथ आहे. याशिवाय तारकीय पराशय व अवकाशातील ताऱ्यांची वाटणी ठरविणे गह, चंद्र, धूमकेतू इत्यादींचे वेध घेणे याम्योत्तर वृत्ताचे मापन करणे संख्याशास्त्रीय तंत्रे वापरणे आणि ज्योतिषशास्त्रीय व भूगणितीय उपकरणांचे आराखडे तयार करणे व त्यांच्यात सुधारणा करणे इ. कामेही त्यांनी केली.

रशियाचे झार पहिले निकोलस यांच्या विनंतीवरून श्ट्रूव्हे यांनी सेंट पीटर्झबर्ग (आता लेनिनग्राड) जवळ पूलकव्ह येथे त्या काळातील फार मोठी वेधशाळा उभारली. यूरोपमधील सर्वांत मोठा दूरदर्शक (३८ सेंमी. रंध्रव्यास असलेले वस्तुभिंग) वेधशाळेसाठी त्यांनी विकत घेतला. इतरही पुष्कळ साधने जमवून त्यांनी वेधशाळा अद्ययावत केली. ते या वेधशाळेचे संचालक होते (१८३९-६१).

युग्मताऱ्यासंबंधी केलेल्या निरीक्षणांवरून श्ट्रूव्हे यांनी सूर्यकुलाच्या बाहेरही न्यूटन यांचे गुरूत्वाकर्षण नियम लागू पडतात, असे सिद्ध केले. १८३८ मध्ये त्यांनी ⇨ अभिजित ताऱ्याचा आणि इतर काही ताऱ्यांचे (उदा., आल्फा ॲक्विली, डेल्टा उर्सा मेजोरीस) ⇨ पराशय काढले. त्यांनी भूगणित शास्त्रातही कार्य केले. काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्र यांच्या पातळ्यांतील फरक त्यांनी मोजला. त्यांनी अक्षवृत्त, काल व दिगंश निश्चित करण्याच्या बुद्धीगम्य पद्धती शोधून काढल्या. त्यांनी नॉर्वेच्या उत्तर किनाऱ्यापासून ते डॅन्यूब नदीच्या किनाऱ्यावरील ईस्माईलपर्यंत असलेल्या रेखांशिक चापाचे अंतर मोजले. ते चाळीसहून अधिक संस्था संघटनांचे (उदा., सेंट पीटर्झबर्ग ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, रशियन जिऑगाफिकल सोसायटी इ.) सदस्य होते. त्यांच्या चार पिढ्या आणि त्यातही सहा व्यक्तींनी सलग १५० वर्षे ज्योतिषशास्त्रात उच्च दर्जाचे संशोधन कार्य केले. [→ श्ट्रूव्हे, ओटो.]

सेंट पीटर्झबर्ग येथे त्यांचे निधन झाले.

गोखले, मो. ना.