पीकार, झां : (२१ जुलै १६२० – १२ जुलै १६८२). फ्रेंच ज्योतिषशास्त्रज्ञ. १० रेखावृत्ताची लांबी काढून त्यावरून गणिताने त्यांनी पृथ्वीची त्रिज्या काढली आणि कोनीय मापे घेण्यासाठी दूरदर्शकाचा प्रथम उपयोग केला. त्यांचा जन्म फ्रान्समध्ये ला फ्लेश येथे झाला. १६५५ मध्ये ते पॅरिसच्या कॉलेज द फ्रान्समध्ये ज्योतिषशास्त्राचे प्राध्यापक झाले. १६६६ मध्ये स्थापन झालेल्या रॉयल ॲकॅडेमी देस सायन्सेस या संस्थेचे ते संस्थापक सभासद झाले. १ रेखावृत्ताची लांबी काढण्यासाठी त्यांनी पॅरिसच्या नजीकच्या एकाच रेखावृत्तावरची दोन ठिकाणे निवडली. त्यांमधील अंतर अचूकपणे मोजून त्यावरून १  रेखावृत्ताची लांबी किती ते काढले आणि त्यावरून पृथ्वीची त्रिज्या गणिताने काढली. यात फक्त काही मीटरांचाच फरक आहे. हा प्रयोग १६६८ ते १६७० पर्यंत चालला होता. न्यूटन यांना आपले गुरुत्वाकर्षणाचे निष्कर्ष १६८४ मध्ये यावरून पडताळून पाहता आले. पीकार यांनी मंगळाच्या वेधांवरून सूर्य-पृथ्वी अंतर त्यांच्या काळापर्यंत अचूकपणे काढले. त्यांनी स्वीडनमधील व्हेन बेटावरच्या ट्यूको ब्राए यांच्या वेधशाळेला १६७१ मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अक्षांश-रेखांश निश्चित केले. त्यामुळे ब्राए यांच्या निरीक्षणांची इतरत्र घेतलेल्या वेधांशी तुलना करणे शक्य झाले. पॅरिसचे अक्षांश-रेखांशही त्यांनी काढले होते. पीकार यांनी त्या काळच्या वेध -पद्धतीत व उपकरणात सुधारणा केल्या. अचूक ज्योतिषशास्रीय वेध घेण्यासाठी दुरदर्शकात त्यांनी प्रथमच लंघक तंतूंचा (एकमेकांना लंब असलेल्या व ज्यांचा छेदबिंदू दुरदर्शकाच्या अक्षावर आहे अशा सूक्ष‌्मतंतूचा) उपयोग केला (१६६७). सूक्ष‌्ममापकामध्ये सरकती तार वापरून त्यांनी सूर्य, चंद्र व ग्रह यांचे व्यास मोजले. १६७३ मध्ये त्यांनी पॅरिस वेधशाळेत कार्य करण्यास सुरुवात केली आणि नंतरच्या काळात ओ. रोमर, जे. डी. कासीनी इ. प्रसिध्द ज्योतिर्विदांबरोबर काम केले. १६७५ मध्ये त्यांनी प्रथमच वातावरणीय दाबमापक इतस्तत: हलविला असता त्यातील पाऱ्याच्या वर असलेला निर्वातामध्ये प्रकाश-चमका निर्माण होतात, या आविष्काराचे निरीक्षण केले (नीच दाबाखालील वायूमध्ये विद्युत् विसर्जन होत असल्याचे हे पहिलेच निरीक्षण असल्याने त्याला नंतर विशेष महत्त्व आले). १६७९ साली त्यांनी ठराविक कालांतरानंतरची ग्रहस्थिती देणारे ग्रहपंचांग काढले व ते त्याचे पहिले संपादक झाले.  वेधशाळेत लंबकाचे घड्याळ वापरण्याचे श्रेय पीकार यांनाच देण्यात येते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांपैकी Mesure de la terre (१६७१) आणि Traite du’ nivellemnt (१६८४) ही महत्त्वाची होत.

ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.