अवस्थिती : (आस्पेक्ट). दोन ग्रहांची शरवृत्ते (खगोलीय अक्षांशवृत्ते, → शर) ð क्रांतिवृत्तास ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूजवळील कोनीय अंतर म्हणजेच भोगांतर. काही विशिष्ट भोगांतरांना ‘अवस्थिती’ म्हणतात. फलज्योतिषी अवस्थितीला ‘दृष्टी’ किंवा ‘योग’ असे म्हणतात. या योगांचे सौम्य आणि क्रूर असे दोन प्रकार मानण्याचा फलज्योतिषशास्त्रात प्रघात आहे.

ग्रह आकाशात बिंदुरूप असल्याने अवस्थिति-कोन अचून मोजता येतो. पण रवी व चंद्र यांची बिंबे असल्याने त्यांची परस्पर-अवस्थिती किंवा इतर ग्रहांशी त्यांची अवस्थिती अचूक मोजता येत नाही. म्हणून या अवस्थिती मोजताना कोष्टकात दाखविलेल्या फरकापेक्षा दोन अंशांचे न्यूनाधिक्य क्षम्य मानले जाते.

यांशिवाय समसप्तम व नवपंचम अशाही अवस्थिती मानतात. पंचराश्यंतर अवस्थितीस ‘षडाष्टक’ असेही म्हणतात. द्रेष्काण म्हणजे १० अंतर हीही एक अवस्थिती मानली जाते.

फडके, ना. ह.