मार्गशीर्ष :  हिंदू कालगणनेनुसार मार्गशीर्ष हा नववा महिना असून या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र मृग नक्षत्रासमीप असतो, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष हे नाव पडले. पूर्वी या महिन्यापासून वर्षारंभ होत असल्याने याला अग्रहायन (हायन= वर्ष) असेही नाव आहे. शिवाय ‘मासानाम्‌ मार्गशीर्षोऽहम्‌’ असे  भगवद्‌गीतेत म्हटले आहे, यावरून याचे विशेषत्व लक्षात येते. या महिन्याची अधिदेवता केशव आहे. यात मार्तंड, भैरव, मल्हारी किंवा खंडोबा या कित्येकांच्या कुदैवतांचा षड्‌रात्रोत्सव (शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी) असतो याच्या पहिल्या दिवसाला देव दीपावली म्हणतात व शेवटचा दिवस चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी हा असतो. या दिवशी शंकरांनी मणिअल्ल दैत्याच्या वधासाठी अवतार घेतला असे मानतात. या दिवशी जेजुरी, पाली किंवा खंडोबाच्या अन्य क्षेत्रस्थानी मोठी यात्रा भरते. शुद्ध पंचमीस नागपूजा असते. शुद्ध एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी व त्याच दिवशी गीताजयंती आणि पौर्णिमेस दत्तजयंती हे या महिन्यातील महत्त्वाचे दिवस आहेत. बहुतेक याच महिन्यात उत्तरायणास प्रारंभ (२२ डिसेंबर) होतो. शिखांचे नववे गुरू तेगबहादुर यांचा वध, कौरव-पांडवातील युद्धास सुरूवात, लंकादहन इ. घटना या महिन्यातील आहेत.

ठाकूर, अ. ना.