ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति : पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचा निर्देश करण्यासाठी किंवा नकाशावर दाखविण्यासाठी अक्षांश व रेखांश यांचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे खगोलात एखाद्या खस्थ ज्योतिचे स्थान दाखविण्यासाठी ज्योतिषशास्त्रात वरीलसारख्या सहनिर्देशक पद्धती आहेत.

निरीक्षक मध्यभागी असून सर्व तारे, ग्रह, वगैरे खस्थ ज्योती अनंत त्रिज्येच्या काल्पनिक खगोलावर प्रक्षेपित केल्या आहेत असे समजून त्यांचे स्थान ठरवितात. ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धतीत सर्व अंतरे कोनीय असतात. सहनिर्देशक मोजण्याकरिता घेतलेल्या संदर्भानुसार ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धतींचे क्षैतिज, वैषुव, आयनिक व गांगेय असे चार प्रकार आहेत.

(१) क्षैतिज पद्धती : म निरीक्षकामधून जाणारी ओळंबारेषा वरच्या बाजूस वाढविल्यास खगोलास ज्या बिंदूत छेदते त्यास खस्वस्तिक म्हणतात व खालच्या बाजूस वाढविल्यास खगोलास ज्या बिंदूत छेदते त्यास अधःस्वस्तिक म्हणतात (आ. १). आणि यांपासून समान अंतरावर असणाऱ्या बृहद्‌वृत्तास क्षितिज म्हणतात. उखद हे सममंडल असून या ताऱ्यातून जाणारे ऊर्ध्वमंडल क्षितिजास मध्ये छेदत असेल, तर तल या अंतराला उन्नतांश म्हणतात. उन्नतांश ०° ते ९०° क्षितिजाच्या वर धन व खाली ऋण असे मोजतात. खत अंतरास नतांश म्हणतात. क्षितीजावरचा उत्तरबिंदू हा मूळ बिंदू समजून तेथून पूर्वेकडे उपूदल हे अंतर दिगंश होय. हे नेहमी पूर्वेकडे ०° ते ३६०° मोजतात. दिगंश व उन्नतांश स्थलसापेक्ष व कालसापेक्ष असतात. क्षैतिज पद्धतीत दिगंश व उन्नतांश किंवा दिगंश आणि नतांश हे सहनिर्देशक आहेत [→ उन्नतांश दिगंश].

आ. १. क्षैतिज पद्धती : (१) सममंडल, (२) क्षितिज. आ. २. वैषुव पद्धती : (१) याम्योत्तर वृत्त, (२) क्षितिज, (३) खगोलीय विषुववृत्त. आ. ३. आयनिक पद्धती : (१) आयनिक वृत्त, (२) खगोलीय विषुववृत्त.

(२) वैषुव पद्धती : पृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल सर्व बाजूंस वाढविल्यास खगोलास ज्या वर्तुळात छेदते ते खगोलीय विषुववृत्त होय. तसेच पृथ्वीचा अक्ष दोन्ही बाजूंस वाढविल्यास तो खगोलास ज्या दोन बिंदूंत छेदतो त्यांस उत्तर ध्रुवबिंदू व दक्षिण ध्रुवबिंदू म्हणतात. विषुववृत्त व क्रांतिवृत्त (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीचा मार्ग) एकमेकांस वसंत संपात आणि शरत् संपात या दोन बिंदूंत छेदतात (आ. २). त्यांपैकी हा आदिबिंदू (संदर्भ बिंदू) मानतात. खगोलीय उत्तर व दक्षिण ध्रुवबिंदू यांतून जाणारी वृत्ते विषुववृत्तास लंब असतात. या वृत्तांना होरावृत्ते म्हणतात. ताऱ्यातून जाणारे होरावृत्त विषुववृत्तास मध्ये छेदत असेल, तर तल या अंतरास क्रांती म्हणतात. ही ०° ते ९०° उत्तरेस धन व दक्षिणेस ऋण अशी मोजतात. पासून विषुववृत्तावर पूर्वेकडे मोजलेले वल अंतर हे विषुवांश होय. विषुवांश ०° ते ३६०° किंवा होरा ० ते २४ तास असे, तास-मिनिट-सेकंद, यांत मोजतात. म्हणून वैषुव पद्धतीत विषुवांश व क्रांती हे सहनिर्देशक आहेत. हे सहनिर्देशक बव्हंशी स्थलनिरपेक्ष व कालनिरपेक्ष आहेत. संपात बिंदूच्या विलोम (उलट्या) गतीमुळे [⟶ संपातचलन] कालांतराने यात किंचित फरक पडत जातो. म्हणून कोणत्या वर्षाच्या संपात बिंदूस आदिबिंदू मानले होते हे सांगावे लागते.

विषुववृत्तावरील या बिंदूपासून अंतर मोजण्याऎवजी निरीक्षकाचे याम्योत्तर वृत्त क्षितिजाच्या वर असलेल्या विषुववृत्तार्धास ज्या बिंदूत छेदते तेथपासून पश्चिमेकडे मोजलेले यल अंतर विषुवांशाऐवजी वापरतात. याला गतांश म्हणतात. गतांश हे स्थलसापेक्ष व कालसापेक्ष असतात.

(३) आयनिक पद्धती : त या ताऱ्यापासून आयनिक वृत्ताला (क्रांतिवृत्ताला) तल लंब काढला, तर तल या अंतरास शर म्हणतात (आ. ३). शर उत्तरेस धन व दक्षिणेस ऋण ०° ते ९०° मोजतात. वसंत संपात हा आदिबिंदू धरून वल या पूर्वेकडे मोजलेल्या अंतरास भोग किंवा भोगांश असे म्हणतात. हे ०° ते ३६०° मोजतात. म्हणून आयनिक पद्धतीत भोग आणि शर हे सहनिर्देशक आहेत. वैषुव पद्धतीप्रमाणेच हे सहनिर्देशक स्थलनिरपेक्ष व कालनिरपेक्ष आहेत, परंतु संपातचलनामुळे दीर्घकालानंतर भोगात किंचित फरक पडतो.

(४) गांगेय पद्धती : या पद्धतीत गांगेय (आकाशगंगेचे) विषुववृत्त हे प्रमाण मानतात. पूर्वी खगोलीय विषुववृत्त व गांगेय विषुववृत्त ज्या ठिकाणी (गरूड तारकासमूहात) छेदतात त्या बिंदूस आदिबिंदू समजत असत. परंतु आता ज्या दिशेस आकाशगंगेचे केंद्र आहे, ती दिशारेषा गांगेय विषुववृत्तास ज्या बिंदूत छेदते त्या [होरा १७ ता. ४२·४ मि. क्रांती – २८° ५५’ (१९५०)] बिंदूला आदिबिंदू समजतात. हा आदिबिंदू धनुराशीत आहे. ताऱ्यापासून गांगेय विषुववृत्ताला काढलेला लंब हे गांगेय अक्षांश ०° ते ९०° उत्तरेस धन व दक्षिणेस ऋण असे मोजतात. आदिबिंदूपासून लंबाच्या पायापर्यंत पूर्वेकडे मोजलेले ०° ते ३६०° अंतर हे गांगेय रेखांश होय.

पहा : उन्नतांश उन्नतांशमापक उन्नतिदिगंशमापक क्रांति – १ दिगंश भोगांश विषुवांश शर होराकोण.

संदर्भ : Weigert, A. Zimmermann, H. Trans. Dickson, J. H. ABC of Astronomy, London, 1967.

कोळेकर, वा. मो.