चतुर्थयंत्र : चतकोर वर्तुळाच्या आकाराचे खस्थ ज्योतींचा ⇨उन्नातांश (क्षितिज सापेक्ष कोनात्मक उंची) वा नतांश (उन्नतांशाचा कोटिकोन) मोजण्यासाठी पूर्वी वापरात असलेले उपकरण. त्याने ९० अंशांपर्यंतचा (किंचित जास्तही) कोन मोजता येतो. ते लाकडाचे, दगडाचे, पितळेचे किंवा लोखंडाचे असते. त्याच्या वक्र बाजूवर ९० अंशांच्या खुणा कोरून त्यांचे छोटे भागही पाडलेले असतात. शून्याची खूण वर्तुळमध्याच्या बरोबर खाली असते. वर्तुळमध्याभोवती फिरू शकणारा दर्शदंड (निरीक्षण नलिका) असतो. कोठेही हलवता येणाऱ्या उपकरणांची उभी बाजू ओळंब्याने प्रथम तंतोतंत उदग्र (उभी) करून घ्यावी लागते. भिंतीतील यंत्रे त्याप्रमाणे पक्की केलेली असतात. नंतर दर्शदंड ताऱ्यावर रोखून त्याच्या दिशेत आणतात व मापनीवर ताऱ्याचा नतांश मिळतो. सर्वेक्षण, नौकानयन, तोफा व बंदुका यांचे शास्त्र यांच्यातही चतुर्थयंत्र वापरीत.

खस्थ ज्योतींचे अचूक स्थान ठरविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वांत जुन्या उपकरणांपैकी हे एक असून ते सु. अठराशे वर्षे उपयोगात होते. टॉलेमी यांनी इ. स. १५० च्या सुमारास याचे तत्त्व सुचविले. मात्र त्यांनी ते बनविले नसावे. परंतु सूर्याचा उन्नातांश काढण्यासाठी त्यांनी लाकडी किंवा दगडी चतुर्थयंत्र वापरल्याचा उल्लेख आहे. त्यामध्ये वर्तुळमध्याशी असलेल्या खुंटीची सावली मापनीवर पडून मापन मिळे. चर्तुथयंत्रात त्यानंतर सुधारणा होत गेल्या. अरबी ज्योतिर्विदांनी त्याचा विकास करून प्रचंड आकारमानाची चतुर्थयंत्रेही बनविली. ट्यूको ब्राए वापरीत असलेल्या सु. दोन मीटरच्या पितळी चतुर्थयंत्राची अचूकता एक मिनिटाहून अधिक होती. त्यांनी वापरलेली बहुतेक चतुर्थयंत्रे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येण्याजोगी होती. पीकार यांनी १६६७ साली प्रथम दर्शदंडाऐवजी दूरदर्शकाची (दुर्बिणीची) योजना केली. सतराव्या शतकाअखेर त्यामध्ये प्रणमन- दूरदर्शक (वस्तूपासून येणारे किरण एकत्रित करण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा उपयोग करणार दूरदर्शक) वापरात आला. नंतरची शंभर वर्षे ताऱ्यांची व ग्रहांची क्रांती (खगोलीय विषुववृत्तापासूनचे कोनात्मक अंतर) काढण्याचे चतुर्थयंत्र हेच प्रमुख उपकरण होते. ग्रॅहॅम यांनी १७२५ मध्ये हॅली यांच्यासाठी सु. अडीच मीटरचे लोखंडी तर रीड यांनी १७५० साली ब्रॅड्‌ली यांच्याकरिता पितळी चतुर्थयंत्र बनविले.

चतुर्थयंत्राची रेखाकृती : (१) किलक (टेकू), (२) खस्थ ज्योतीकडे, (३) दर्शक, (४) ओळंबा.

अचूक वक्र बाजू, अंश व दर्शदंड यांची एककेंद्रता आणि वर्तुळमध्याची स्थिरता ही साधणे कठीण असल्याने चतुर्थयंत्राच्या जागी क्रमाक्रमाने ⇨याम्योत्तर चक्र, हॅडली चतुर्थयंत्र, ⇨ कोणादर्श  व चतुर्थयंत्र विद्युत्‌ मापक ही आली. यांच्याशिवाय पुढील चतुर्थयंत्रेही असत. सागरी चतुर्थयंत्रात अरीय भुजेप्रमाणे क्षैतिज (क्षितिज समांतर) भुजेतही वेध घेण्यासाठी सोय होती. अरीय भुजेतून सूर्य व क्षैतिज भुजेतून क्षितिज दिसेपर्यंत भुजा हलवून वेध घेत. कोलंबस यांनी सूर्याचा व ध्रुवताऱ्याचा उन्नतांश सागरी चतुर्थयंत्रानेच काढला होता. इंग्रज खलाशी जॉन डेव्हिस यांनी शोधून काढलेल्या डेव्हिस चतुर्थ यंत्राने मापन घेताना निरीक्षकाची पाठ सूर्याकडे असते. सोयीचे व निरीक्षणासाठी भिंगाची योजना केल्याने कोणादर्शाच्या शोधानंतरही काही काळ ते वापरात होते. कोणादर्शाच्या तत्त्वावर आधारलेले हॅडली चतुर्थयंत्र हे खरे अष्टयंत्रच होय. ते वर्तुळाच्या आठव्या भागाएवढे असले, तरी त्यावर ९० अंशांपर्यंतचा चाप मोजता येतो.

ठाकूर, अ. ना