खगोल भौतिकी : भौतिकीचे नियम, तत्त्वे, सिद्धांत व तंत्रे यांच्या साहाय्याने खस्थ पदार्थ व विश्वातील घटना यांच्या भौतिक व रासायनिक स्वरूपांचे अध्ययन करणारी ज्योतिषशास्त्राची शाखा. खगोल भौतिकीमध्ये ज्योतिषशास्त्र आणि भौतिकी, विशेषत: आधुनिक भौतिकी, यांचा समन्वय साधण्यात आला आहे. ग्रह, उपग्रह, सूर्य, लघुग्रह यांसारख्या जवळच्या तारे, आकाशगंगा इत्यादींसारख्या दूरच्या व ⇨दीर्घिका, ⇨ क्वासार  यांच्यासारख्या अतिदूरच्या किंवा थोडक्यात पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडील सर्व पदार्थांच्या वस्तुमान, आकारमान, तापमान, रासायनिक संघटन, प्रारण, उत्पत्ती, उत्क्रांती इत्यादींविषयीची माहिती मिळविणे हा खगोल भौतिकीचा उद्देश आहे. यासाठी खस्थ पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांच्या जोडीनेच त्यांच्या अंतरंगात व आंतरतारकीय (ताऱ्यांच्या मधील) अवकाशात द्रव्य व प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) यांच्यामध्ये होणाऱ्या आंतरक्रियांचे अनुसंधानही (काळजीपूर्वक निरीक्षणही) केले जाते.

खगोल भौतिकी व इतर संबंधित विषय : खगोल भौतिकीमध्ये ज्योतिषशास्त्राच्या बहुतेक सर्व शाखांचा अभ्यास केला जातो. ज्योतिषमापन (खस्थ पदार्थांचे स्थान व गती ठरविणे), खगोल यामिकी (सूर्यकुलातील पदार्थांच्या गतीचे अध्ययन), कालमापन इत्यादींचा परंपरागत ज्योतिषशास्त्रात समावेश होतो. त्यासाठी खस्थ पदार्थांच्या  हालचालींचा आणि त्यांच्या प्रकाशाच्या दिशेचा विचार केला जातो. परंतु खगोल भैतिकीमध्ये प्रकाशाच्या व इतर प्रारणांच्या तीव्रतेचे व वर्णपटीय संघटनाचे अनुसंधान केले जाते. मात्र या दोन्हींमध्ये काटेकोर सीमारेषा आखता येत नाही. उदा., सूर्याचे किंवा गुरूचे अक्षीय परिभ्रमण त्यांच्या पृष्ठावरील खुणांच्या द्वारे परंपरागत रीतीने अथवा त्यांच्या पूर्व व पश्चिम बाजूंनी येणाऱ्या  प्रकाशाच्या वर्णपटांतील रेखांच्या विस्थापनांवरूनही (सरकण्यांवरूनही) ठरविता येते.

उलट खगोल भौतिकीची क्षेत्रे व समस्या यांचे भौतिकीची मूलभूत वा पूरक क्षेत्रे म्हणूनही वर्गीकरण करता येईल. कारण ⇨आयनद्रायू भौतिकी, अणुकेंद्रीय भौतिकी, पुंज भौतिकी (ऊर्जेच्या किमान अविभाज्य राशीसंबंधीची म्हणजे क्कांटमसंबंधीची भौतिकी), ⇨घनावस्था भौतिकी  इ. आधुनिक भौतिकीच्या सर्व आणि चुंबकत्व, विद्युत्‌, प्रकाशकी, उष्णता, ऊष्मागतिकी (उष्णता व यांत्रिकी किंवा इतर स्वरूपातील ऊर्जा यांतील संबंधांचे गणितीय विवरण करणारे शास्त्र) आणि सांख्यिकीय यामिकी (संख्येने मोठ्या प्रमाणात असलेल्या पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी संख्याशास्त्रीय सिद्धांताचा उपयोग करणारे शास्त्र) या परंपरागत भौतिकीच्या  शाखांचा खगोल भौतिकीमध्ये उपयोग होतो. वर्णपटीय विश्लेषणाने ताऱ्याची पृष्ठीय माहिती मिळाल्यावर तापमान, दाब इ. त्याच्या केंद्राकडे कशी वाढत जातात हे सैद्धांतिक भौतिकीने व गणिताने कळू शकते. परंपरागत यामिकीच्या (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या) साहाय्याने ताऱ्याचे वस्तुमान व घनता यांची माहिती मिळते, तर तारकीय वातावरणातील समतोलावस्था काढण्यासाठी वापरण्यात येणारी बोल्टस्‌मान-साहा यांची विच्छेदन समीकरणे ऊष्मागतिकी व सांख्यिकीय यामिकीवर आधारलेली आहेत. ज्योतिषशास्त्रीय उपकरणांमध्ये भूमितीय प्रकाशकी वापरलेली असते व वर्णपटरेखांच्या अपस्करणासाठी (तरंगलांबीनुसार होणाऱ्या वक्रीभवनासाठी)  आणि शोषणासाठी भौतिक प्रकाशकीय सूत्रे वापरतात. रेडिओ दूरदर्शकाच्या (दुर्बिणीच्या) वापरामागेही भूमितीय व भौतिक प्रकाशकी आहे. वर्णपटांचे अर्थ लावण्यास आणवीय व रेणवीय संरचना प्रमाणभूत ठरतात. वर्णपटांचे स्वरूप ताऱ्यांच्या रासायनिक संघटनावर व तापमानावर अवलंबून असल्याने निरीक्षणांवरून निष्कर्ष काढण्यासाठी प्रारण सिद्धांत व ⇨वर्णपटविज्ञान  उपयुक्त असतात. अवकाशातील कणनिर्मिती, ग्रह व अशनी (उल्का पृथ्वीवर पोहोचल्यावर तिचा उरणारा खनिजयुक्त भाग) यांची अंतर्रचना समजण्यास घनावस्था भौतिकीचा उपयोग होतो. सौरभौतिकी व सिंक्रोट्रॉन (प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांच्या वर्तुळाकृती कक्षेतील गतिवर्धनामुळे निर्माण होणाऱ्या) प्रारणांबाबत चुंबकत्व व विद्युत्‌ या शाखा महत्त्वाच्या ठरतात. सौरचक्राची उत्पत्ती व स्पष्टीकरण, वायुरूप अभ्रिकांचे आकार, तेज:शिखांमधील उच्च ऊर्जा कणांचा प्रवेग, क्रॅब अभ्रिका आणि इतर अतप्त उद्‌गमांसाठी ⇨चुंबकीय  द्रवगतिकीचे (विद्युत्‌ संवाहक द्रव वा वायू यांच्या चुंबकीय क्षेत्रातील गतिविषयीच्या शास्त्राचे) साहाय्य लागते. ताऱ्यांतील ऊर्जा उत्पत्ती, तारकीय संरचना, पूर्वेतिहास, उत्क्रांती व मूलद्रव्यांची उत्पत्ती यांच्यासाठी अणुकेंद्रीय व पुंज भौतिकीची गरज असते. विश्वकिरणांची (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर पडणाऱ्या अतिशय भेदक किरणांची) गती व प्रवेग यांवर चुंबकत्वाचा होणारा परिणाम व त्यांची उत्पत्ती या समस्या खगोल भौतिकीच्याच क्षेत्रातील मानल्या जातात. अशा प्रकारे भौतिकीचा खगोल भौतिकीमध्ये उपयोग होत असल्याने ती भौतिकीची शाखा मानली जाऊ शकते. पण वस्तुत: ज्योतिषशास्त्रीय वेधांमुळे भौतिकीच्या कक्षा रुंदावल्या आहेत तसेच विश्वासंबंधीच्या माहितीत भर टाकण्यास सिद्धांतवाद्यांना संधी मिळाली असून वैश्विक सिद्धांतांच्या प्रगत अध्ययनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हीलियमाचा शोध, अतिघन पदार्थांचे भौतिक गुणधर्म, औष्णिक अणुकेंद्रीय ऊर्जानिर्मिती इ. गोष्टींची खगोल भौतिकीमुळेच उलगडा झाला.

ग्रहांच्या व कमी पृष्ठतापमान असलेल्या ताऱ्यांच्या वातावरणातील रेणूंची वर्तणूक, आंतरतारकीय अवकाशातील साध्या रेणूंची व धूलिकणांची निर्मिती, ग्रहांच्या अंतरंगाचे व अशनींचे रासायनिक संघटन या गोष्टी समजण्यासाठी रसायनशास्त्राची मदत होते. चांद्रपृष्ठाचे स्वरूप, उल्काविवरे, गुरूवरील मोठा तांबडा डाग इत्यादींचा अभ्यास करताना भूभौतिकी आणि भूविज्ञान यांचा उपयोग होतो. पृथ्वीवरील कदाचित इतर ग्रहांवरील आणि अन्य ताऱ्यांभोवतालच्या ग्रहांवरील जीवांची उत्पत्ती व उत्क्रांती कळण्यास जीवभौतिकी (जैव प्रक्रिया वा आविष्कार यांचे भौतिकीच्या दृष्टीने अभ्यास करणारे शास्त्र) उपयुक्त आहे. तारकीय वातावरण, अंतरंग, उत्क्रांती व स्पंदन यांच्या अध्ययनामध्ये पुष्कळ आधुनिक गणितीय सिद्धांत वापरतात. उलट खगोल भौतिकीच्या काही समस्यांमुळे वैश्लेषिक गणितातील नवीन अन्वेषणाला (संशोधनाला) चालना मिळाली आहे. ज्या गणितीय कृत्यांना साध्या यंत्रांनी हजारो तास लागले असते, अशी गणितीय कृत्ये इलेक्ट्रॉनीय संगणकामुळे (गणितीय कृत्ये करणाऱ्या यंत्रामुळे) काही मिनिटांत सोडविता येऊ लागल्याने त्या अध्ययनातील एक अडसर दूर झाला. खगोल भौतिकीची विविध उपकरणे बनविण्यास अभियांत्रिकीतील विविध शाखांचा उपयोग होतो. कारण रेडिओ दूरदर्शक उभारताना व कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने व आकाशस्थ प्रयोगशाळा यांच्या साहाय्याने समन्वेषण करताना नवनवीन अभियांत्रिकीय प्रश्न निर्माण होत आहेत.


इतिहास : निरीक्षणांची विविध साधने वेळोवेळी उपलब्ध होत गेल्यामुळे खगोल भौतिकीचा विकास होत गेला असून कालपरत्वे या विषयाचा व्यापही बदलत गेला आहे. त्यामुळे या विषयाचे व्यवस्थित आकलन होण्यासाठी त्याचा विकास कसकसा होत गेला ते पहावे लागेल.

हा विषय विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून खरा विकसित झाला असला तरी सौरडाग, शनीच्या कड्यांच्या आकृत्या व चंद्राचा नकाशा यांच्यासंबंधीचे गॅलिलीओ यांचे व प्रकाशकीविषयीचे न्यूटन यांचे कार्य येथपासूनच या विषयाची सुरुवात झाली, असे म्हणता येईल. १८१४ साली फ्राउनहोफर यांनी ताऱ्यांचे वर्णपट मिळवून त्यांचे अध्ययन करण्यास प्रारंभ केला. खगोल भौतिकी ही संज्ञा अस्तित्वात नव्हती तेव्हापासूनच म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या विषयाचे कार्य चालू होते. उदा., १८७५ साली इंग्लंडमधील विल्यम हगिन्झ व इटलीतील प्येअत्रो आंजेलो सेक्की यांनी ताऱ्यांचे वर्णपट मिळवून त्यांचे अध्ययन करण्याचे काम चालू ठेवले होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जर्मनीतील फोगेल यांनी तारकीय वर्णपटविज्ञानात छायाचित्रणाचा वापर केला व डॉप्लर विस्थापनाच्या (निरीक्षण व उद्‌गम यांच्या सापेक्ष गतीमुळे, उद्‌गमापासून मिळणाऱ्या तरंगाच्या भासमान कंप्रतेत म्हणजे दर सेकंदास होणाऱ्या कंपन संख्येत होणाऱ्या व डॉप्लर या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या बदलाच्या) साहाय्याने ताऱ्यांचे वेग मोजण्यास आरंभ केला. १९१५ साली डब्ल्यू. एस्. ॲडम्स आणि ए. कोलशूटर यांनी ताऱ्यांची दीप्ती व तारकीय वर्णपटातील ठराविक शोषण रेखांची तीव्रता यांच्यातील सहसंबंध शोधून काढले. १९५० नंतर छायाचित्रणाऐवजी प्रकाशविद्युत् तंत्र (प्रकाशाच्या क्रियेने निर्माण होणाऱ्या विद्युत् ऊर्जेचा उपयोग करणारे तंत्र) वापरले जाऊ लागले. प्रकाशविद्युत् घटाची (प्रकाश पडला असता ज्याची विद्युत् स्थिती बदलते अशा प्रयुक्तीची) संवेदनशीलता अधिक असल्याने वर्णपटांचे क्रमवीक्षण (क्रमवार निरीक्षण) करणे सोयीचे झाले.

१८५९ नंतर झालेल्या अध्ययनाचे पुढील टप्पे पाडता येतात. १८८८ पर्यंतच्या काळात ग्रह, तारे व अभ्रिका यांच्या वर्णपटांचे वर्गीकरण करण्यावर विशेष भर दिला गेला. नंतरच्या १९१५ पर्यंतच्या कालखंडात ताऱ्यांचे अरीय (त्रिज्येच्या दिशेने असणारे) वेग मोजणे, आकाशगंगेतील ताऱ्यांचे वितरण (विभागणी) ठरविणे वगैरे गोष्टींचा अभ्यास झाला. पुढे १९३० पर्यंतच्या काळात निरनिराळ्या खस्थ पदार्थांतील मूलद्रव्यांची विपुलता ठरविण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी मेघनाद साहा, एडवर्ड आर्थर मिल्न, एच्. एन्. रसेल इत्यादींचे सिद्धांत उपयुक्त ठरले. १९३०–५० या काळात विविध निरीक्षणे व सैद्धांतिक पद्धती वापरून पुष्कळ ताऱ्यांच्या आणि अभ्रिकांच्या रासायनिक संघटनांमध्ये फरक असल्याचे आढळून आले. तद्नंतर तारकीय उत्क्रांतीतील प्रमुख प्रक्रिया व ह. र. (हर्ट्‌झस्प्रंग–रसेल) आकृतींमधील (ताऱ्यांचा वर्णपटीय प्रकार व त्यांची दीप्ती यांचा संबंध दाखविणाऱ्या आलेखांमधील) ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे मार्ग ओळखणे यांच्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण कार्य झाले. त्याकरिता श्व्हार्त्सशिल्ड, स्ट्रमग्रेन, हॉईल, सँडेज वगैरेंचे अन्वेषण विशेष उपयोगी ठरले. हे अन्वेषण श्द्रूव्हे, चंद्रशेखर, एडिंग्टन इत्यादींच्या सैद्धांतिक कार्यावर आधारलेले होते. डब्ल्यू. ए. फाउलर, जी. आर्. बरब्रिज व ई. एम्. बरब्रिज यांनी ताऱ्यांच्या अंतरंगात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अणुकेंद्रीय प्रक्रियांचा अभ्यास केला. त्यामुळे काही ताऱ्यांतील मूलद्रव्यांच्या विपुलतेविषयी महत्त्वाची माहिती मिळाली. १९६० सालानंतर रेडिओ उद्‌गमांचे विशेष अध्ययन सुरू झाले असून क्वासारांचे आणि कृष्णविवरांचेही (ताऱ्यांच्या गुरुत्वीय अवपातामुळे निर्माण होणारी आणि ज्यातून प्रकाश व द्रव्य बाहेर पडू शकत नाही किंवा आरपार जाऊ शकत नाही अशा अवस्थांचेही) सविस्तर अध्ययन चालू आहे. रॉकेटांच्या साहाय्याने क्ष-किरण आणि जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) प्रारण उद्‌गमांचाही अभ्यास चालू आहे. यांशिवाय फिरती सौर वेधशाळा, अंतराळवीरांनी चंद्रावर ठेवलेली उपकरणे, मंगळाकडे आणि शुक्राकडे पाठविलेली अन्वेषक याने, आकाशस्थ प्रयोगशाळा वगैरेंच्या साहाय्याने प्रयोग करून सूर्यकुलाबद्दल व ताऱ्यांसंबंधी विविध प्रकारची माहिती मिळत आहे. त्यामुळे खगोल भौतिकीचा विकास चालूच असून त्यातील भावी टप्प्यांविषयी काही अंदाजही करण्यात आले आहेत.

खगोल भौतिकी (ॲस्ट्रोफिजिक्स) ही संज्ञा प्रथम खस्थ पदार्थ व घटना यांच्या वर्णपटीय निरीक्षणांतून उद्‌भवणाऱ्या  समस्यांसाठी संदिग्धपणे वापरली जाई. अमेरिकी ज्योतिर्विद जॉर्ज एलरी हेल यांनी १८९२ साली यर्कीझ वेधशाळा व १९०४ साली मौंट विल्सन वेधशाळा येथे खगोल भौतिकीची अन्वेषण केंद्रे स्थापन केली. शिवाय त्यांनी १८९४ साली जेम्स एडवर्ड कीलर यांच्या साहाय्याने ॲस्ट्रोफिजिकल जर्नल  नावाचे नियतकालिक सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमधूनच खगोल भौतिकी या संज्ञेला निश्चित अर्थ आला व ती सर्वसामान्य वापरात येऊन रूढ झाली.

वैश्विक परिस्थितीचे परिणाम : विश्वातील प्रत्यक्ष परिस्थिती व प्रयोगशाळेतील परिस्थिती यांच्यात पुष्कळदा जमीन-अस्मानाचे अंतर असते. तापमान, दाब, वेग, चुंबकीय क्षेत्र इ. अत्यधिक किंवा अतिशून्य प्रमाणात असलेल्या सीमा स्थितींमध्ये प्रारण व द्रव्य ही कशी वागतात, हे प्रयोगशाळेत पाहता येत नाही. आपणास पृथ्वीवरील प्रयोगांनी माहीत झालेले प्रारण व द्रव्य यांना लागू पडणारे भौतिकीचे नियम वैश्विक स्थितीमध्ये दीर्घकालापर्यंत (कोट्यवधी वर्षांपर्यंत) आणि प्रचंड अंतरावर (४·८ × १०१९ किमी. पर्यंत) सुद्धा लागू पडतात की नाही हे पहावे लागते. तसेच पार्थिव परिस्थितीमध्ये कधीही लक्षात न येऊ शकणारी माहिती खगोल भौतिकीमुळे मिळते व निसर्गाचे नवीन नियम उजेडात येतात.

गुरुत्वाकर्षणाचे काही नियम ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणांद्वारे उजेडात आले. उदा., गुरुत्वप्रेरणेमुळे ज्याप्रमाणे चंद्र पृथ्वीभोवती व ग्रह सूर्याभोवती फिरतात त्याचप्रमाणे आकाशस्थ युग्ममालेतील घटकही समाईक गुरुत्वमध्याभोवती फिरत असल्याचे दिसून येते. या नियमांमुळे दीर्घिकेच्या गाभ्याभोवतालच्या ताऱ्यांच्या कक्षा ठरविता येतात. गुरुत्वप्रेरणा अधल्यामधल्या पदार्थांकडून शोषिली जात नाही किंवा ती आकर्षित होणाऱ्या पदार्थांच्या भौतिक व रासायनिक अवस्थांवर अवलंबून नसते, असे सूर्यग्रहणांच्या निरीक्षणांवरून दिसून येते. प्रयोगांद्वारे गुरुत्वीय प्रेरणेच्या प्रसारणगतीबद्दल अजून काहीच समजले नाही. त्यासाठी फक्त ज्योतिषशास्त्रीय वेधच उपयुक्त ठरू शकतील. गुरुत्वासंबंधीच्या न्यूटन यांच्या संकल्पनेत आइन्स्टाइन यांनी केलेल्या सुधारणा अशाच वेधांद्वारे पडताळून पाहण्यात आल्या आहेत. उदा., सूर्याजवळून जाणारे प्रकाशकिरण गुरूत्वाने वाकतात, हे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी घेतलेल्या वेधांवरून सिद्ध झाले. भूपृष्ठावरील व उपग्रहातील आणवीय घड्याळांनी कालाचे गुरुत्वीय मापन करता येईल. तसेच दूरवरचे तारे व दीर्घिका यांच्या निरीक्षणांमुळे गतिमान उद्‌गमांपासून येणाऱ्या प्रकाशाचा वेग निर्वातामध्ये व सर्व तरंगलांब्यांशी स्थिर असल्याचे प्रस्थापित झाले आहे.

सूर्याच्या केंद्राचे तापमान सु १·६ कोटी अंश से. व घनता अंदाजे १०० ग्रॅ./घ. सेंमी. असते. अशा परिस्थितीतच हायड्रोजन अणूंचे हीलियमात संघटन (एकत्रीकरण) होऊ शकते. कारण अणुकेंद्रीय विक्रियांचा वेग मुख्यत: तापमान व घनता यांवर अवलंबून असतो. सूर्याच्या सु. पन्नासपट मोठे तारे दर सेकंदाला सूर्याच्या दहा लक्षपट ऊर्जा निर्माण करीत असतात ते याच विक्रियांमुळे. तसेच लघुतम ताऱ्याचे वस्तुमान सूर्याएवढे परंतु त्रिज्या पृथ्वीएवढी असल्याने त्याची सरासरी घनता सूर्याच्या घनतेच्या दहा लक्ष पट येते. अशा उच्च घनतेत वायूंचा ऱ्हास होतो. म्हणून अशा वायूंना नेहमीची आदर्श वायूची समीकरणे लागू पडत नाहीत.


लिथियम, बेरिलियम व बोरॉन ही मूलद्रव्ये पृथ्वीवर आणि सूर्याच्या वातावरणात अत्यल्प प्रमाणात आढळतात. त्यांच्या अणुकेंद्रीय रूपांतरणास सापेक्षत: कमी तापमान लागते, हे त्याचे संभाव्य कारण आहे. परंतु काही ताऱ्यांच्या वातावरणांमध्ये लिथियमाच्या अतिशय तीव्र वर्णपटरेखा आढळल्या आहेत. ताऱ्यांच्या पृष्ठांवरील आविष्कारांमुळे लिथियम अणू निर्माण होणे शक्य असते व ते ताऱ्यांच्या अंतरंगातील अणुकेंद्रीय विक्रियांमुळे नष्ट होणाऱ्या अणूंच्या जागी येत असावेत.

आंतरतारकीय वायूंची घनता दर घ. सेंमी.ला एक अणू (सु. १०-२४ ग्रॅ./घ. सेंमी.) इतकी कमी असल्याने तेथे जवळजवळ निर्वात अवस्था असते. तापमान कोठे ३० के. (के. म्हणजे केल्व्हिन निरपेक्ष तापक्रमाचा एकक), तर काही भागाचे तापमान १०,००० के. असते.ऊष्मागतिकीय समतोलावस्थेच्या मानाने या वायूंची आयनीभवनाची (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट तयार होण्याची) व उद्दीपनाची अवस्था अगदी निराळी असते.

निरीक्षणाची उपकरणे व तंत्र : मानवाने अवकाशामध्ये प्रवेश केला असला, तरी खगोल भौतिकी हा मुख्यत: निरीक्षणात्मक विषय आहे. दूरच्या खस्थ पदार्थांचे नमुने आणणे शक्य नसल्याने त्यांचे प्रयोगशाळेत अध्ययन करता येत नाही. त्यामुळे अवकाशयानांद्वारे झालेले काही अन्वेषण सोडल्यास त्यांच्या प्रारणांवरूनच सर्व निष्कर्ष काढावे लागतात. शिवाय पृथ्वीचे वातावरण व आंतरतारकीय द्रव्य यांच्यामुळे या प्रारणांमध्ये बदलही होतात. उदा., काही प्रारणे शोषिली जातात, काहींची तीव्रता घटते, तर काहींचे वर्णपटीय संघटन बदलते. यामुळे समस्या अधिक अवघड होते व उपकरणांवरही मर्यादा पडतात. काही विशिष्ट समस्यांसाठी मात्र प्रायोगिक संस्कारांची मदत घेता येते. या पद्धतीनेच जगातील हजारो वेधशाळांत आणि अन्वेषणकेंद्रांमध्ये खगोल भौतिकीचे अध्ययन चालू आहे.

खस्थ पदार्थांच्या प्रारणाचे गुणात्मक व परिमाणात्मक मापन करणे हा खगोल भौतिकीचा मूलाधार आहे. प्रारणांची ऊर्जा व तिचे वितरण तसेच प्रारणांचे ध्रुवण (एकाच विशिष्ट पातळीत कंप पावणे) व वर्णपट यांचे अध्ययन करतात. या प्रारणांचा वर्णपट अतिदीर्घ रेडिओ तरंगांपासून अतिशय ऊर्जायुक्त विश्वकिरणांपर्यंत पसरला आहे. त्याच्या विविध भागांचे निरीक्षण करण्यासाठी विविध उपकरणे वापरतात. ज्योतिषशास्त्रीय अध्ययनासाठी शतकानुशतके दृश्य प्रकाश हेच साधन होते. प्रकाशमितीय मापनांसाठी, दूरवरचे वेध घेण्यासाठी व पुरेसा प्रकाश एकत्रित आणण्यासाठी दूरदर्शक आवश्यक असतात. खगोल भौतिकीच्या प्रगतीबरोबरच मोठमोठे दूरदर्शकही बनविण्यात आले. प्रकाशमापकाने ताऱ्यांचा सापेक्ष भासमान तेजस्वीपणा मोजतात. ताऱ्यांचे अंतर माहीत असल्यास त्यांवरून त्यांची अंगभूत दीप्ती काढता येते. वर्णपटदर्शकाने प्रकाशाचे पृथक्करण करून खस्थ पदार्थांच्या रासायनिक संघटनाबद्दल व भौतिक स्वरूपाविषयी माहिती मिळते, कारण उद्‌गमाच्या स्वरुपानुसार त्याचा वर्णपट असतो. योग्य गाळण्या असणाऱ्या  छायाचित्रण पट्ट्या, प्रकाशविद्युत्‌ आणि प्रकाशसंवाहक (प्रकाशामुळे ज्याची  विद्युत् संवाहकता बदलते असा) घट, प्रतिमा नलिका (प्रकाशविद्युत्‌ पृष्टाचा उपयोग करून प्रतिमा देणारी एक प्रकारची इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती), तपयुग्म (दोन भिन्न धातूंची टोके एकत्र जोडून व उरलेली टोके विद्युत् प्रवाह मापकास जोडून तयार होणारे आणि एकत्र जोडलेल्या टोकांचे तापमान मोजणारे साधन), बोलोमीटर, प्रारणमापक [→ उष्णता प्रारण], शिशाच्या सल्फाइडाचे व टेल्यूराइडाचे घट इत्यादींचा प्रारण अभिज्ञातक (ओळखणारे उपकरण) म्हणून उपयोग होतो. प्रकाशविद्युतीय क्रमवीक्षक वापरण्याचे प्रमाण वाढत असले, तरी अजून पुष्कळदा अभिज्ञातक म्हणून छायाचित्रण पट्ट्याच वापरतात.

इ.स. १९३० नंतरच्या दोन महत्त्वाच्या शोधांमुळे ज्योतिषीय निरीक्षण क्षेत्रात बदल झाले व जलद प्रगती झाली. पहिला शोध विश्वकिरणांचा म्हणजे बाह्य अवकाशातून येणाऱ्या ऊर्जाकणांचा होय. पारंपरिक दूरदर्शकाने त्यांचे अध्ययन करता येणार नाही असे दिसून आले. विश्वकिरणांमुळे विश्वातील घटनांशी संबंध जोडता आला असून त्यांच्यामुळे खस्थ पदार्थांबद्दलची नवीन माहिती मिळण्याची शक्यता आहे. १९३२ साली कार्ल जान्स्की यांनी बाह्य अवकाशातून येणारे रेडिओतरंग शोधून काढले. त्यामुळे ⇨रेडिओ ज्योतिषशास्त्र  ही स्वतंत्र शाखा प्रस्थापित झाली. सुयोग्य रेडिओ कंप्रता अभिज्ञातक व आकाशक (रेडिओ तरंगांचे ग्रहण करणारा संवाहक), रेडिओ दूरदर्शक इत्यादींच्या विकासामुळे खगोल भौतिकीच्या विकासाला चालना मिळाली. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रमापनासाठी व उच्च सौरक्रियेने उद्‌भवणाऱ्या रेडिओ प्रारणांच्या अध्ययनासाठी खास उपकरणे बनविण्यात आली. फुग्याबरोबर सोडलेले दूरदर्शक (स्ट्रॅटोस्कोप) तसेच रॉकेट, कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने यांच्यातील प्रारण अभिज्ञातक यांच्यामुळे खगोल भौतिकीच्या प्रगतीचा वेग वाढला असून सूर्याची क्ष-किरणे व जंबुपार प्रारणे अखंडपणे अवलोकन करता येऊ लागली आहेत. खास उपकरणांच्या संचामुळे अतिदूरस्थ जंबुपार प्रारणांमध्ये सूर्याचे एकवर्णी  (एकाच तरंगलांबीच्या प्रकाशात) छायाचित्र घेणे शक्य झाले. तसेच जंबुपार आणि क्ष-किरण अभिज्ञातकांमुळे अनेक तीव्र उद्‌गम उघडकीस आले.

प्रायोगिक खगोल भौतिकीच्या क्षेत्रात तापमान व दाब यांच्या नियंत्रित परिस्थितींमध्ये उत्सर्जित झालेल्या वर्णपटरेखांचे आकार आणि तीव्रता मोजतात. त्यासाठी आघात नलिका (जिच्यात अतिशय उच्च दाबाखालील वायू एकदम सोडून अत्यल्प काल उच्च वेगयुक्त वायुप्रवाह निर्माण करता येतो अशी सापेक्षत: लांब नलिका), आणवीय शलाका तसेच बहुविध आयनीभूत लोह व इतर धातू क्षुब्ध करणारी उच्च ऊर्जा यंत्रे-उपकरणे वापरतात.

खगोल भौतिकीच्या खास निरीक्षण पद्धती असून त्यांचे प्रकाशमितीय, वर्णपटीय, रेडिओ, रॉकेट इ. विभाग पडतात.

प्रकाशमितीय निरीक्षणे : प्रत्यक्ष निरीक्षण करता येणारा खस्थ पदार्थांचा स्थानाशिवाय दुसरा गुणधर्म म्हणजे त्यांचा दृश्य व भासमान तेजस्वीपणा होय. त्याच्या अध्ययनास प्रकाशमिती म्हणतात. भासमान तेजस्वीपणावरून इ.स. पू. १४६–१२७ च्या सुमारास हिपार्कस या ग्रीक ज्योतिर्विदांनी ताऱ्यांचे सहा गट केले होते. डोळ्यास दिसणाऱ्या सर्वांत ठळक ताऱ्यांचा पहिला, तर सर्वांत मंद ताऱ्यांचा सहावा गट अशी विभागणी त्यांनी केली होती. ग्रीकांना हा तेजस्वीपणा खस्थ पदार्थांच्या आकारमानावर अवलंबून असावा असे वाटत असल्याने त्यांनी त्याच्यासाठी ‘मॅग्निट्यूड’ (म्हणजे प्रत) ही संज्ञा वापरली. तीच अजूनही वापरली जाते [→ प्रत].

३,००० A पासून (A म्हणजे अँगस्ट्रॉम हे तरंग लांबीचे एकक = १०-८ सेंमी.) साधारणपणे २५,००० A पर्यंतच्या तरंगलांबीचे वेध घेण्यास साधा दूरदर्शक चालतो. ताऱ्याचे बिंब वा प्रतिबिंब छायाचित्रण पट्टीवर किंवा प्रकाश विद्युत् घटावर पाडून प्रकाशाची तीव्रता मोजतात. तसेच अतिदूरच्या अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) प्रारणांसाठी बोलोमीटर हे उपकरण वापरतात. प्रकाशाची तीव्रता मोजणाऱ्या अशा उपकरणांना प्रकाशमापक म्हणतात. त्यांच्या साहाय्याने ताऱ्यांची सापेक्ष दीप्ती काढता येते. दोन ताऱ्यांची प्रत (m) व दीप्ती (l ) यांच्यातील संबंध पुढील सूत्राने दर्शवितात : m–  m2 = 2·5 log10 (l1/l2). ताऱ्यांची दृश्य पीत ( पिवळ्या प्रकाशाची ) प्रत – २६  (सूर्य) पासून + २३ ( २०० इंची व्यासाच्या दूरदर्शकातून दिसणारा सर्वांत मंद तारा) पर्यंत असते. पीत (V), नील (B), जंबुपार (U) व ऊर्जादर्शक (बोलोमीटरीय mb)  या प्रती काढण्याच्या पद्धती आहेत. प्रतींमधील B-V व U-B या फरकांना ताऱ्यांचे वर्णांक म्हणतात व mb-V याला बोलोमीटरीय ऊर्जाशुद्धी म्हणतात. सर्वांत निळ्या (उष्ण) ताऱ्यांचा B-V वर्णांक – ०·५ असून सर्वांत लाल (थंड) ताऱ्यांचा B-V वर्णांक + २ पर्यंत असतो. ताऱ्याचे आपल्यापासूनचे अंतर (d) माहीत असल्यास पुढील समीकरणाने त्याची निरपेक्ष प्रत (अंगभूत दीप्ती, M ) काढतात.


M= m+ 5 –5 log10 d – α (α चे स्पष्टीकरण खाली पहा). दहा पार्सेक (१ पार्सेक = ३·०८५६ × १०१३ किमी.) अंतरावरील ताऱ्याची दृश्य व निरपेक्ष प्रत सारखी मानतात. आंतरतारकीय द्रव्याने प्रारणाचे प्रकीर्णन (विखुरणे) व शोषण होते. त्यामुळे तारे वाजवीपेक्षा अधिक मंद दिसतात. त्यामुळे त्यांच्या प्रतींमध्ये होणारी वाढ वरील समीकरणात α ने दर्शविली आहे. अशा प्रकारे सामान्यत: १,००० पार्सेक अंतरात १ पीत प्रत इतका मंदपणा येतो. आकाशगंगेत – ६ ते + २० निरपेक्ष पीत प्रतीचे तारे आढळतात.

काही खस्थ पदार्थांची दीप्ती कालानुसार कशी बदलते, याच्या अध्ययनासही प्रकाशमितीय निरीक्षणे उपयुक्त असतात. ग्रहणे दर्शविणारे युग्मतारे व स्पंदमान तारे असा बदल दाखवितात. कधीकधी नवतारे व अतिदीप्त नवतारे यांच्यात प्रचंड स्फोट होऊन त्यांचा तेजस्वीपणा कोट्यावधी पट वाढू शकतो [→ नवतारा व अतिदीप्त नवतारा]. यांसारख्या भौतिक घटना प्रकाशमितीने चांगल्या समजू शकतात. १९१२ साली स्पंदमान ताऱ्यांचा स्पंदनकाल व त्यांची निरपेक्ष दीप्ती यांच्यातील संबंध समजला होता. तो आता अधिक स्पष्ट झाला असून त्याचा अभ्यास अजून चालू आहे. त्यामुळे खस्थ पदार्थांची अंतरे काढण्यास मदत झाली आहे.

(B-V) वर्णांक, हर्ट्‌झस्प्रंग - रसेल (ह. र.) आकृती : १ ते ८ या वक्ररेषेने ताऱ्यांची उत्क्रांती दाखविली असून सेफीड व दीर्घ आवर्तकाल असणाऱ्या रूपविकारी ताऱ्यांचा प्रदेश टिंबांनी दाखविला आहे. काळ्या चौकोनात R R लायरी तारे आढळतात.

क्ष अक्षावर तापमान (वर्णांक) व अक्षावर दीप्ती (प्रत) अशा प्रकारे काढलेल्या आलेखावरून ताऱ्यांसंबंधी पुष्कळ माहिती मिळते. अशा आलेखांना हर्ट्‌झस्प्रंग – रसेल किंवा . र. आकृती म्हणतात (आकृती पहा). त्यांत बहुतेक तारे वायव्य (डाव्या बाजूच्या वरच्या) भागातील अतितेजस्वी नील ताऱ्यांपासून आग्नेय (उजव्या बाजूच्या खालच्या) भागातील अतिमंद लाल ताऱ्यांपर्यंत जाणाऱ्या कर्णावर आढळतात. या ताऱ्यांच्या श्रेणीस ‘प्रमुख श्रेणी’ म्हणतात व त्यातील ताऱ्यांना प्रमुख श्रेणीचे तारे किंवा लघुतारे अशी संज्ञा आहे.शिवाय महातारे, मध्यम महातारे व महत्तम तारे, लघुतर तारे व लघुतम तारे या श्रेणीही आहेत. ह. र. आकृतींमधील ताऱ्यांच्या कालिक अनुक्रमांवरून विविध प्रकारच्या ताऱ्यांबद्दल व तारकीय उत्क्रांतीच्या प्रक्रियांविषयी माहिती मिळते [→ तारा].

खस्थ पदार्थांच्या इतरही काही गुणधर्मांचा प्रकाशमितीय अध्ययनाने उलगडा होतो. आंतरतारकीय अवकाश हे संपूर्ण पोकळी नसून तेथे अतिशय विरळ वायू व धूलिकण असतात, हे त्यांच्यामुळे प्रारणांवर होणारा परिणाम लक्षात आल्याने समजून आले. ताऱ्याच्या प्रकाशाचे आंतरतारकीय द्रव्याने प्रकीर्णन व शोषण झाल्याने तो व्यस्तवर्गीय नियमापेक्षा जास्त अंधुक दिसतो, हे वर सांगितलेच आहे. तसेच आंतरतारकीय धुळीने तांबड्यापेक्षा निळ्या प्रकाशाचे अधिक परिणामकारकपणे प्रकीर्णन होत असल्याने तारा लाल दिसतो. याला आंतरतारकीय आरक्तीभवन म्हणतात आणि त्याचे प्रकाशमितीद्वारे अध्ययन करतात [→ आंतरतारकीय द्रव्य].

ध्रुवण हे सुद्धा प्रकाशमितीचे एक साधन असून ते मोजण्यासाठी विशिष्ट प्रकारचे प्रकाशमापक असतात. ध्रुवणमापनाने ताऱ्यांसंबंधी व आंतरतारकीय माध्यमाबद्दल बरीच माहिती मिळते. आंतरतारकीय द्रव्याच्या ढगांमधून जाताना दूरच्या ताऱ्यांच्या प्रकाशाचे ध्रुवण होते हे १९४९ साली समजले. त्यानंतरच ध्रुवणमापनाचे तंत्र विकसित होत आहे. अवकाशामध्ये धुळीचे लांबट कण ओळीत मांडले गेल्यामुळे हे ध्रुवण होत असावे. प्रयोगशाळेतील स्फटिकांसंबंधी केलेल्या प्रयोगांवरूनही असेच दिसून येते. कण अशा प्रकारे मांडले जाण्यास तेथील दुर्बल चुंबकत्व कारणीभूत होत असावे असेही मानतात. म्हणून ध्रुवणमापनाने आंतरतारकीय चुंबकत्वाबद्दल आणि तेथील कणांसंबंधी माहिती मिळते. दूरचे तारकासमूह, दीर्घिका इत्यादींसारखे बिंदूहून मोठे दिसणारे पदार्थ हे प्रकाशमितीचे अंतिम क्षेत्र आहे. त्यांच्यातील घटकांच्या ढोबळ स्वरूपाचे वर्णन झटकन व स्पष्टपणे मिळू शकते. मात्र केवळ प्रकाशमितीय निरीक्षणांनी खस्थ पदार्थांच्या भौतिक स्वरूपाचे आकलन होत नाही, म्हणून तारकीय वर्णपटविज्ञानाचे साहाय्य घेऊन ताऱ्यांच्या रासायनिक संघटनाविषयी व भौतिक अवस्थांसंबंधी अंदाज करावे लागतात [→ प्रकाशमापन].

वर्णपटीय निरीक्षणे : वर्णपटलेखकाच्या साहाय्याने ताऱ्याचा वर्णपट मिळवितात. वर्णपटातील शोषण व उत्सर्जन रेखांवरून ताऱ्याबद्दल माहिती होते. हे तंत्र न्यूटन यांनी १६६६ साली सुचविले होते. वुलस्टन यांनी सौरवर्णपटरेखा १८०८ साली पाहिल्या होत्या. १८७५ साली फ्राउनहोफर यांनी सौरवर्णपटातील गडद रेखांसंबंधीचे निष्कर्ष प्रसिद्ध करून खगोल भौतिकीतील वर्णपटीय अध्ययनास सुरुवात केली. मात्र किरखोफ यांनी वर्णपटरेखांचे स्पष्टीकरण केल्याने खस्थ पदार्थांच्या भौतिकीय स्वरूपाच्या अध्ययनाची शक्यता निर्माण झाली, म्हणून किरखोफ यांना खगोल भौतिकीचे जनक मानले जाते. छायाचित्रण पट्टीवर ताऱ्याचा वर्णपट चित्रित करून वर्णपटरेखांचे आलेख काढतात. त्यामुळे तारकीय वातावरणातील मूलद्रव्यांचे प्रमाण, तापमान, दाब इत्यादींबद्दल अंदाज करता येऊ लागले. बऱ्याच वेळा वर्णपट सरळ प्रकाशविद्युत् घटावर पाडून व तो घट समग्र वर्णपटावर फिरवून वर्णपटाचे क्रमवीक्षण चित्र मिळवितात. मंद प्रकाश असलेल्या ताऱ्यांच्या बाबतीत ही पद्धती बरीच उपयोगी पडते. किरखोफ यांनी तारकीय वर्णपटांसंबंधी काही नियम तयार केले व सौरवर्णपटातील मूलद्रव्येही सांगितली. त्यामुळे ताऱ्यांच्या वातावरणाचे रासायनिक संघटन ठरविता येऊ लागले. तसेच निरनिराळ्या तरंगलांब्यांजवळील रेखांच्या सापेक्ष तीव्रतेवरून ताऱ्यांचे पृष्ठतापमान सांगता येऊ लागले. तारकीय द्रव्य वायुरूप असल्याचे समजल्याने ताऱ्यांच्या अंतरंगाचा सैद्धांतिक अभ्यास व त्यावरून तारकीय संरचनेचा गणितीय सिद्धांत प्रस्थापित करणे सोपे झाले.


खस्थ पदार्थांच्या व प्रयोगशाळेत मिळणाऱ्या वर्णपटांतील रेखांची तुलना करून त्या कोणत्या मूलद्रव्यांच्या आहेत ते ठरवितात. ज्या रेखा ओळखू आल्या नाहीत त्या इतर रेणूंच्या किंवा ज्ञात अणूंच्या अज्ञात परिस्थितींमधील असाव्यात असे दिसते. वर्णपटातील उत्सर्जन रेखांवरून उद्‌गमाचे स्वरूप लक्षात येते. तसेच वर्णपटरेखांवरून मूलद्रव्यांची विपुलता ठरविता येते. यावरून विश्वातील मूलद्रव्यांची विपुलता सर्वत्र जवळजवळ सारखी असल्याचे आढळते. हायड्रोजन सर्वांत विपुल व तदनंतर हीलियम असून कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे अल्प प्रमाणात तर इतर मूलद्रव्ये लेशमात्र आढळतात. याला अपवादही आहेतच. उदा., कार्बन ताऱ्यांत कार्बन अधिक तर लघुतम ताऱ्यांत हायड्रोजन बराच कमी असावा. मात्र अशी रासायनिक समानता असूनही बहुसंख्य ताऱ्यांच्या वर्णपटांमध्ये तापमान व दाब यांच्यामुळे फरक आढळतात. कारण ताऱ्यांतील आणवीय व रेणवीय ऊर्जास्तरातील इलेक्ट्रॉन संख्येवर तापमानाचा व दाबाचा परिणाम होतो. तसेच दाब हा ताऱ्याच्या पृष्ठीय गुरुत्वाकर्षणावर, गुरुत्वाकर्षण ताऱ्याच्या वस्तुमानावर व आकारमानावर आणि शेवटी त्याच्या दीप्तीवर अवलंबून असते. अशा प्रकारे तारकीय दाब दीप्तीच्या रूपात सांगता येतो.

वर्णपटातील शोषण किंवा उत्सर्जन रेखांची तरंगलांबी मोजतात. त्यावरून वर्णपटरेखांची च्युती (विस्थापन) समजते तिच्यावरून खस्थ पदार्थाचा पृथ्वीसापेक्ष दृष्टिरेषेतील म्हणजे अरीय वेग काढता येतो. या वेगातून पृथ्वीची गती वजा करून येणारा वेग सूर्यसापेक्ष समजतात. विश्वासंबंधी सध्या माहीत असलेली बहुतेक सर्व माहिती अरीय वेगमापनाने झालेली आहे. १९२० साली एडविन हबल यांनी दीर्घिकांची अंतरे व त्यांच्या वर्णपटरेखांची च्युती यांच्यातील संबंध सूत्ररूपाने दर्शविला. तसेच दीर्घिकांच्या ताम्रच्युती (तांबड्या रंगाकडे वर्णरेखांचे सरकणे) डॉप्लर परिणामामुळे उद्‌भवतात असे मानल्यामुळेच विश्वाच्या स्वरूपासंबंधीचा प्रसरणशील विश्व हा पहिला शास्त्रीय सिद्धांत पुढे आला. अरीय वेगांवरून तारकासमूहाच्या गतीबद्दल माहिती मिळते. वर्णपटरेखांच्या स्थानात आवर्ती बदल आढळल्यास त्यावरून युग्मताऱ्याचे किंवा स्पंदमान ताऱ्यांचे अस्तित्व कळते. युग्मताऱ्याच्या कक्षीय गतीने अरीय वेगात होणारे बदल तारकीय वस्तुमान काढण्यास उपयुक्त असतात. तसेच दीर्घिकेच्या कक्षीय परिभ्रमणाच्या वेगावरून पूर्ण दीर्घिकेचे वस्तुमान ठरविता येते. चल (ज्यांची भासमान प्रत कायम नसते अशा) ताऱ्यांबद्दल माहिती मिळविण्यासही अरीय वेगमापन उपयुक्त आहे.

वर्णपटरेखांची रुंदी मोजून ताऱ्याच्या अक्षीय परिभ्रमणाची गती काढता येते. ताऱ्यात चुंबकत्व पुरेसे असल्यास त्यामुळे वर्णपटरेखा अनेक घटकांत विभागल्या जातात. या झीमान यांनी शोधून काढलेल्या परिणामाच्या निरीक्षणांवरून तारकीय चुंबकक्षेत्राची तीव्रता ठरविता येते.

सौरवर्णपटलेखकाने एकावेळी एकाच वर्णपटरेखेच्या प्रकाशामध्ये सूर्यपृष्ठाचे अध्ययन करता येते. त्यामुळे सौरक्रियांची चांगली माहिती मिळते.

बहुसंख्य तारकीय वर्णपट एका अखंड रैखिक श्रेणीत मांडता येतात. त्यांचे O, B, A, F, G, K व M असे गट आणि या गटांचे पुन्हा प्रत्येकी दहा उपगटही ( उदा., B0, B1, B2 इ. ) पाडतात. वर्णपटावर आधारलेले ताऱ्यांचे हे वर्गीकरण नंतर तापमान व रंग यांच्यानुसार झाल्याचेही आढळून आले. O तारे सर्वांत निळे आणि उष्ण (४०,०००° के.) असून M तारे सर्वांत लाल व थंड (३,०००° के.) असतात. ह. र. आकृतींमध्ये वर्णांकाऐवजी (ताऱ्यांची छायाचित्रीय व दृश्य प्रत यांमधील फरकाऐवजी) हे गटही वापरतात. या श्रेणीत नसलेल्या ताऱ्यांच्या गटांना R, N व S अशी अक्षरे वापरतात. अधिक परिशुद्ध अध्ययनासाठी वर्णपटीय प्रकाराच्या जोडीनेच दीप्तिनिदर्शक अभिधाने जोडून दीप्तिगटही पाडले आहेत [→ तारा वर्णपटविज्ञान].

रेडिओ निरीक्षणे : १० ते १०० मी. पेक्षा जास्त तरंगलांबीचे रेडिओ तरंग पृथ्वीच्या आयनांबरात (जेथे आयनीभवन घडते अशा पृथ्वीच्या वातावरणाच्या ८० ते ३०० किमी. उंचीवरील विद्युत् संवाहक थरात) शोषले जातात. १ मिमी. ते १० मी. तरंगलांब्यांच्या तरंगांचे मात्र ⇨रेडिओ दूरदर्शकाने वेध घेता येतात. रेडिओ दूरदर्शकामध्ये काचेऐवजी धातूचा अन्वस्ताकार (विशिष्ट अंतर्गोल प्रकारचा, पॅराबोलिक) आरसा वा परावर्तक असतो. त्याच्या केंद्रावर द्विध्रुवी किंवा भोंग्याच्या आकाराचा अभिज्ञातक (शोध घेणारा घटक) ठेवून रेडिओ तरंग एकत्रित केले जातात. अभिज्ञातकाच्या मेलनाची (समायोजनाची) कंप्रता बदलून निरनिराळ्या कंप्रतांच्या तरंगांचे वेध घेता येतात. आंतरतारकीय द्रव्यातून जाताना रेडिओ तरंग दुर्बल होत नाहीत, ही गोष्ट रेडिओ उद्‌गमांचे निरीक्षण करण्याच्या दृष्टीने सोयीची आहे. मात्र प्रकाशापेक्षा रेडिओ तरंगांची लांबी जास्त असल्याने रेडिओ दूरदर्शकाची विभेदनक्षमता (उद्‌गम घटक अलग करण्याची क्षमता) कमी असते. त्यामुळे अचूक स्थान निर्णयासाठी परावर्तकाचा व्यास बराच मोठा असावा लागतो. इंग्लंडमधील जॉड्रेल बँक येथील सर्वांत मोठ्या परावर्तकाचा व्यास ८३·३३ मी. (२५० फूट) आहे, तरीही २१ सेंमी. तरंगलांबी असताना १० मिनिटांपेक्षा जास्त अचूक स्थान मिळविता येत नाही. म्हणून दोन वा अधिक दूरदर्शक दूर अंतरावर ठेवून त्यांचे संकेत एकत्र आणणारे व्यतिकरणमापक (दोन वा अधिक तरंगमालिका एकमेकांवर पडल्यामुळे तरंगाच्या परमप्रसरात, म्हणजे तरंगाच्या प्रसारणाच्या दिशेला लंब दिशेत होणाऱ्या कमाल स्थानांतरणात, अंतरानुसार होणारा बदल मोजणारे उपकरण) तयार करतात. एक दूरदर्शक ऑस्ट्रेलियात आणि दुसरा इंग्लंडमध्ये ठेवून एक सेकंदापेक्षा जास्त अचूकता गाठता आली आहे. रेडिओ दूरदर्शकाने हजारो रेडिओ उद्‌गमांचा शोध लागला असून क्वासार, पल्सार यांसारखे नवीन पिंडही सापडले आहेत.

वर्णपटाच्या रेडिओ विभागात फारच थोड्या रेखा असतात. त्यांच्यापैकी अनायनीभूत (विद्युत्‌ भारित न झालेल्या) हायड्रोजनाची २१ सेंमी. रेखा सर्वांत महत्त्वाची आहे. तिच्या निरीक्षणांवरून आकाशगंगेची रचना आणि तिच्यातील सर्पिल भुजांची (मध्यापासून बाहेर आलेल्या वक्र भागांची) ठेवण यांसंबंधी पुष्कळ माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच देवयानीतील दीर्घिकेसारख्या इतर दीर्घिकांचे भ्रमण व वस्तुमान अजमावता आले. त्यांशिवाय तिच्यामुळे हायड्रोजनाच्या ढगांची वाटणी व गती यांचे अध्ययन करता येते. हायड्रॉक्सिल (OH) गटाची १८ सेंमी., अमोनियाची १·२ सेंमी. आणि वाफेची १·४ सेंमी. या तरंगलांब्यांच्या रेखांचेही आता वेध घेण्यात आले आहेत.

रेडिओ तरंगांचे ध्रुवण मोजून रेडिओ उद्‌गमांच्या आणि आकाशगंगेच्या चुंबकीय क्षेत्राची माहिती मिळते आणि रेडिओ ऊर्जा उत्पन्न होण्याची सिंक्रोट्रॉन उत्सर्जनासारखी कारणे शोधून काढता येतात. विश्वातील रेडिओ प्रारणाच्या उत्पत्तीच्या अध्ययनामुळे सैद्धांतिक अध्ययनास मदत होईल व वैश्विक सिद्धांतावरही प्रकाश पडेल. रेडिओ उद्‌गमांचे तीन गट करतात. (१) सूर्यमालेतील उदा., सूर्य, गुरू (२) आकाशगंगेतील उदा., क्रॅब अभ्रिका व (३) गांगेयबाह्य (आकाशगंगेच्या बाहेरील) उदा., काही क्वासार. सूर्याचे रेडिओ उत्सर्जन हे सौरपृष्ठावरील क्रियांशी निगडीत असल्याने त्यांच्या अध्ययनास महत्त्वाचे स्थान आहे. गुरूला चुंबकक्षेत्र असल्याचे व त्याच्या भोवताली प्रारणपट्ट असल्याचे रेडिओ निरीक्षणांतूनच कळून आले. इतर ग्रहांबद्दलही नवीन माहिती अशा तऱ्हेने उपलब्ध झाली आहे. तसेच रेडिओ उद्‌गमांच्या अभ्यासामुळे विश्वकिरणांचे उद्‌गम ओळखण्यासही मदत होते [→ रेडिओ ज्योतिषशास्त्र].


रॉकेट तंत्राने केलेली निरीक्षणे : वर्णपटातील जंबुपार भागाचे वातावरणातील ओझोन या वायूमुळे शोषण होते. म्हणून त्याच्या अध्ययनासाठी वातावरणाबाहेर योग्य अशी उपकरणे ठेवलेले रॉकेट सोडून वेध घेतात. अशा तऱ्हेने सूर्याच्या आणि इतर ठळक ताऱ्यांच्या जंबुपार व क्ष-किरण वर्णपटांची माहिती मिळू लागली  असून काही क्ष-किरण उद्‌गमांचा शोधही लागला आहे. वातावरणातील वाफेने अधिक तरंगलांबीच्या अवरक्त भागाचेही शोषण होते. म्हणून त्याचे अध्ययन करण्यासाठी रॉकेटाचा किंवा १५ किमी.पेक्षा जास्त उंचीवर जाणाऱ्या विमानांचा उपयोग करतात. प्राथमिक प्रकारच्या विश्वकिरणांचे वेध घेण्यासाठी त्यांना वातावरणाबाहेर पकडावे लागते. त्यासाठी रॉकेटातील उपकरणे आणि जाड छायाचित्रीय पायस (प्रारणाला संवेदनशील असणारा रासायनिक द्रव्यांचा थर) वापरतात. आता कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने वगैरेंच्या साहाय्याने आंतरग्रहीय अवकाशाचे निरीक्षण करणे शक्य झाले आहे. त्यावरून तेथील घनता, चुंबकक्षेत्र, इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांची संख्या ही मोजता येतात व सौरवाताचीही (सूर्यातून बाहेर पडणाऱ्या कणांपासून बनलेल्या आयनीभूत वायूच्या झोताचीही)  माहिती मिळते.

सैद्धांतिक खगोल भौतिकी : निरीक्षणात्मक खगोल भौतिकीच्या जोडीनेच सैद्धांतिक खगोल भौतिकीचेही अध्ययन चालू आहे. परंतु या विषयाचे निरीक्षणात्मक आणि सैद्धांतिक असे परंपरागत विभाग पाडणे तितकेसे सोयीचे राहिलेले नाही. निसर्गाचे नियम व पद्धती यांच्या सैद्धांतिक चर्चेतून विश्वाच्या गुणधर्मांसंबंधी अंदाज करणे शक्य होते. असे काही अंदाज निरीक्षणांती खरेही ठरले आहेत. तसेच काही आविष्कारांचा सैद्धांतिकांना अंदाज आला नव्हता. उदा., ए. डब्ल्यू. हिल्टनेर आणि जे. एस्. हॉल यांनी लावलेला अतिदूरच्या ताऱ्यांच्या प्रकाशाच्या आंतरतारकीय ध्रुवणाचा शोध अनपेक्षित होता.

वेध घेण्यासाठी यामिकी, यंत्रतंत्र, प्रकाशकी, इलेक्ट्रॉनीय तंत्र इ. भौतिकीय तंत्राचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे सिद्धांत मांडण्यासाठी गणितीय तंत्राचे अवलंबन करतात. या सर्व साधनांमुळे ताऱ्यांचे संघटन व उत्क्रांती यांच्याबद्दल बहुमोल माहिती मिळाली आहे. यासंबंधात ताऱ्यांचे बाह्य वातावरण आणि त्यांची अंतर्रचना यांचा वेगवेगळा विचार करणे सोयीचे आहे.

ताऱ्यांचे बाह्य वातावरण : याचे तीन भाग पडतात. अखंड वर्णपट जेथे उत्पन्न होतो ते दीप्त्यंबर वा दीप्तिगोल, त्याच्या वरचे कमी तापमानाचे वर्णांबर (वर्णगोल) (यात फ्राउनहोफर यांना शोध लावलेल्या शोषणरेखा उत्पन्न होतात) आणि सर्वांत वरचा किरीट. दीप्त्यंबराचे प्रारण पुष्कळ अंशी कृष्ण पदार्थाच्या (प्रदीप्त होईपर्यंत तापविल्यास अखंड वर्णपट देणाऱ्या पदार्थाच्या) प्रारणासारखे असते म्हणून कृष्ण पदार्थाच्या प्रारणांसंबंधीचे नियम त्यास लावता येतात. ताऱ्याच्या अखंड वर्णपटातील निरनिराळ्या तरंगलांब्यांच्या किरणांची (प्रारणांची) तीव्रता (Bv) मोजून, त्यांना प्लांक यांचा सिद्धांत

Bv = (2πhν3/c2) / (e/kT – 1)

(येथे h प्लांक स्थिरांक, v  कंप्रता, c प्रकाश वेग, k बोल्टस्‌मान स्थिरांक व T तापमान ).

लागू केल्यास ताऱ्याच्या वातावरणाचे वर्णतापमान Tc काढता येते. तसेच संपूर्ण वर्णपटातील ऊर्जा मोजून, त्यास श्टेफान-बोल्टस्‌मान नियम U=σT4 (U प्रती सेकंदाला प्रत्येक चौ. सेंमी. पृष्ठभागापासून बाहेर पडणारी ऊर्जा, σ श्टेफान स्थिरांक, T तापमान) लावून ताऱ्याचे ऊर्जानुसारी तापमान काढता येते. ताऱ्याची निरपेक्ष दीप्ती L आणि त्रिज्या R आहे असे समजून L=4πσ R2Tu4 (Tu ऊर्जानुसारी तापमान) असे समीकरण लिहितात. अशा रीतीने सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ५,८०० ° के. येते. इतर ताऱ्यांचे वर्णतापमान Tc काढता येते, पण त्यांची त्रिज्या माहीत नसल्याने Tu काढता येत नाही. परंतु त्यांची ऊर्जानुसारी प्रत माहीत असल्यास Tu = Tc घालून त्यांची त्रिज्या काढता येते  [→ उष्णता प्रारण].

वरील दोन प्रकारांव्यतिरिक्त अतीव्र वर्णपटरेखांची रुंदी मोजून गत्यानुसारी तापमान Tk एखाद्या अणूच्या निरनिराळ्या ऊर्जास्तरांपासून उत्पन्न होणाऱ्या वर्णपटरेखांची तीव्रता मोजून उत्तेजित अवस्थादर्शक तापमान Tex आणि आयनीभूत व अनायनीभूत अणूंच्या वर्णपटरेखांची तुलना करून आयनीकरण तापमान Tion काढता येते. या शेवटच्या पद्धतीत मेघनाद साहा यांच्या आयनीकरण समीकरणाचा उपयोग करावा लागतो [→ वर्णपटविज्ञान ].

प्रारण संक्रमण समीकरण : ताऱ्याच्या वातावरणात खोलीबरोबर तापमान, दाब इ. प्रचल (विशिष्ट परिस्थितीत स्थिर राहणाऱ्या राशी) कसे बदलत जातात हे समजण्यासाठी ताऱ्याच्या वातावरणातून प्रारणाचे संक्रमण कसे होते हे सिद्धांतरूपाने माहीत करून घ्यावे लागते त्याकरिता पुढील प्रारण संक्रमण समीकरण वापरतात:

μ  p

dIv

= (Kv + σv) Iv — Kv Bv — σv

Iv´ P(μ´,μ) dμ´

dZ

μ´

येथे Iν ही ν कंप्रतेच्या प्रारणाची विशिष्ट तीव्रता, Z वातावरणातील खोली, ρ घनता, μ = cos θ (θ बाह्यदिशेशी होणारा प्रारणाचा कोन), Kν शोषणांक, σν प्रकीर्णनांक व p (μ´, μ) हे प्रकीर्णन फलन (गणितीय संबंध) आहे. ताऱ्यांच्या वातावरणात पुष्कळ अंशी ऊष्मागतिक समतोल स्थिती असते, म्हणून σν शून्य समजता येतो. याशिवाय वातावरणास करड्या पदार्थाचे (ज्याचा शोषणांक स्थिर असतो अशा पदार्थाचे) गुणधर्म लागू पडतात, असे मानल्यास Kν = K हा कंप्रतेवर अवलंबून नसलेला अंक होतो. तेव्हा dT = K ρd Z ही प्रकाशीय

                            dl

खोली वापरून μ — =  I – B हे समीकरण मिळते

                           dT

             ∞

येथे B = ∫ Bv dv

             v

या ⇨अवकल समीकरणाचा एडिंग्टन यांनी मिळविलेला सोपा निर्वाह (समीकरण सोडवून मिळणारे उत्तर) T4 = T04 (1 + 3/2 T) आणि Tu = 2T04 हा होय. यात T0 हे पृष्ठभागाचे तापमान, Tu हे ताऱ्याचे ऊर्जानुसारी तापमान आणि Τ हे T प्रकाशीय खोलीवरचे तापमान आहे. तेव्हा ऊर्जानुसारी तापमान माहीत झाल्यास ताऱ्याच्या वातावरणातील सर्व स्तरांचे तापमान काढता येते. त्यानंतर मूलद्रव्यांचे अणू काही विशिष्ट प्रमाणात वातावरणात असतात, असे मानून सरासरी शोषणांक K(T) काढता येतो. हे प्रमाण सु. ९० टक्के अणू हायड्रोजनाचे, सु. १० टक्के अणू हीलियमाचे व ०·०१ टक्का अणू धातूचे आहेत, असे मानले जाते. शेवटी द्रवस्थितिक समीकरण

 dP        g

— =    —  (g = गुरुत्वीय प्रवेग) वापरून सर्व थरांचा दाब P (T)

dT        K

काढता येतो. दाब व तापमान मिळविल्यानंतर वायूंस लागू पडणारा सिद्धांत वापरून घनता काढता येते. अशा रीतीने वातावरणाची रचना माहीत झाल्यावर प्रारण संक्रमण समीकरणावर आधारलेला वर्णपटरेखांच्या उत्पादनाचा सिद्धांत तयार करून वर्णपटरेखांच्या रूपालेखाचे (रेखेच्या बाहेरील अखंड वर्णपटाच्या तीव्रतेशी तुलना करता शोषण रेखेमधून व कंप्रतेनुसार सापेक्ष प्रारण तीव्रतेत होणाऱ्या बदलाचे) सैद्धांतिक गणित करता येते. त्यानंतर सैद्धांतिक व वेधाने मिळणाऱ्या रूपालेखांची तुलना करून सर्व मूलद्रव्यांच्या अणूंचे सापेक्ष प्रमाण अजमावता येते. या पद्धतीने विश्वातील सर्व ताऱ्यांत जवळजवळ तेच मूलद्रव्यांचे अणू एका विशिष्ट प्रमाणात असतात असे आढळले आहे. वर्णपटरेखांच्या रूपालेखांचा अभ्यास करून ताऱ्याच्या रासायनिक रचनेव्यतिरिक्त वातावरणातील प्रक्षोभन (खळबळ) व चुंबकीय क्षेत्र अजमावता येते. तसेच ताऱ्याचे अक्षीय परिभ्रमण किंवा स्पंदन यांचीही माहिती मिळते.


ताऱ्यांची अंतर्रचना : ताऱ्याचे ऊर्जानुसारी तापमान, त्याची निरपेक्ष दीप्ती व त्रिज्या यांपैकी कोणत्याही दोन गोष्टी आणि ताऱ्याचे वस्तुमान व त्यातील मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रमाण हे मूल प्रचल माहीत असल्यास ताऱ्याची अंतर्रचना केवळ सैद्धांतिक समीकरणावरून ठरविता येते. हे सर्व गुणधर्म कोष्टक क्र. १ मध्ये दाखविले आहेत. त्यांपैकी वस्तुमान मिळविण्यास युग्मताऱ्यातील ताऱ्यांचे त्यांच्या वस्तुमानमध्याभोवती होणारे परिभ्रमण मोजून केप्लर यांच्या तिसऱ्या नियमाचा उपयोग करावा लागतो. ताऱ्यांच्या सर्व मूल प्रचलांचे आपापसातील संबंध, ह. र. आकृती आणि वस्तुमान –दीप्ती (M – L) संबंध यांत दिसून येतात. सर्वसाधारणपणे L α M३·५ या ठोकळ नियमाने वस्तुमानाबरोबर दीप्ती वाढते. सूर्याच्या २·३ पट वस्तुमान असलेला व्याध तारा सूर्याच्या २० पट दीप्तीमान आहे.

कोष्टक क्र. १. ताऱ्यांचे प्रचल

वर्णपट विभाग

M K वर्ग

वर्णांक

B – V

पृष्ठतापमान

Te (के.)

निरपेक्ष पीत प्रत

Mv

दीप्ती

(सूर्याच्या पट)

L/L0

त्रिज्या

(सूर्याच्या पट)

R/R0

वस्तुमान

(सूर्याच्या पट)

m/m0

लघुतारे

O5

B0

A0

F0

G2 (सूर्य)

K0

M0

M5

-०·४५

-०·३१

०·००

+ ०·३०

+ ०·६२

+ ०·८४

+ १·३९

+ १·६१

३५,०००

२१,०००

९,७००

८,१००

५,८००

४,७००

३,३००

२,६००

– ६·०

– ३·७

+०·७

+ २·८

+ ४·८

+ ६·०

+ ८·९

+ १२·०

३·० × १०

१·२ × १०

८०

६·३

१·०

०·४०

०·०६

०·०१

१८

७.६

२.६

१.३५

१.०

०.८५

०.६३

०.३१

४०

१७

३.५

१.८

१.०

०.८१

०.४८

०.२२

महत्तम तारे

F0

G0

K0

M0

+०·३०

+०·७६

+१·४२

+१·९४

६,४००

५,४००

४,०००

२,८००

– ५·६

– ४·४

– ४·४

– ४·४

८ × १०

६ × १०

१० × १०

३० × १०

६०

१००

२००

५००

१२

११

१२

१६

लघुत्तम तारे

A5 (व्याध B)

F (प्रॉसियान B)

+ ०·००

+०·३५

१०,०००

७,०००

११·५

१३·१

३ × १०-३

३ × १०-४

०.०२

०.०१

०.९८

०.६४

तारे गोलाकार असल्याने त्यांची संरचना केवळ ताऱ्याच्या मध्यापासून मोजलेल्या r अंतरावर अवलंबून असते. Mr हे r अंतरापर्यंतचे वस्तुमान, Lr ही त्याच अंतरापर्यंतची दीप्ती, P हा दाब व Τ हे तापमान मानून पुढील चार समीकरणे लिहिता येतात.

सातत्य समीकरण :

∂ r

=

  1

∂Mr

4π r2p

(p = r अंतरावरची घनता)

द्रवस्थितिक समीकरण :

∂p

=   –

GMr

∂ Mr

4π r2

(G = गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक)

उर्जासमतोल समीकरण :

∂ Lr

=  E

∂ Mr

(E = दर ग्रॅममध्ये दर सेकंदात उत्पन्न होणारी ऊर्जा

औष्णिक समतोलाचे समीकरण :

∂T

=    —

G M rT    Δ

∂Mr

4 π r4 P

Δ =  तापमानाचा चढउतार, P = दाब)

ऊर्जेचे संक्रमण प्रारणाने होते की संनयनाने (माध्यमातील अणूंनी वा रेणूंनी ऊर्जा वाहून नेल्याने) होते यावर ∆ अवलंबून असतो. तसेच ऊर्जेची उत्पत्ती E, औष्णिक अणुकेंद्रीय विक्रियांवर किंवा गुरुत्वाकर्षणीय संपीडनावर (दाब देण्याच्या क्रियेवर) अवलंबून असते. p, E व ∆ या गोष्टी दाब (P), तापमान (T)  आणि इतर मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रमाण यांवर अवलंबून असतात. साधारणत: हायड्रोजनाचा वस्तुमानांश X = ०·७०, हीलियमाचा वस्तुमानांश Y = ०·२८ व इतर सर्व भारी मूलद्रव्यांच्या अणूंचा वस्तुमानांश Z = ०·०२ असतो. भौतिकीय सिद्धांतांचा उपयोग करून p, E व ∆ यांची मूल्ये ठरवून त्यांचा वरील समीकरणांत उपयोग केला असता कोष्टक क्र. २ मध्ये दाखविलेली प्रमुख श्रेणीतील ताऱ्यांची केंद्रस्थिती मिळते. त्याच कोष्टकात ऊर्जेच्या संक्रमणाची पद्धत आणि ऊर्जा उत्पादनाची प्रक्रिया या गोष्टीही दाखविल्या आहेत.

प्रमुख श्रेणीतील ताऱ्यांच्या केंद्र भागातच ऊर्जेचे उत्पादन होत असते. तेथे दोन प्रकारच्या अणुकेंद्रीय विक्रिया शक्य असतात. तापमान १५० लाख अंश के. पेक्षा कमी असल्यास प्रोटॉन-प्रोटॉन (p – p) साखळीची विक्रिया होते आणि १६० लाख अंश के. पेक्षा जास्त तापमान असल्यास कार्बन-नायट्रोजन (C – N) चक्राची विक्रिया होते. दोन्ही पद्धतींत पुढे दाखविल्याप्रमाणे चार हायड्रोजन अणूंचा एक हीलियम अणू बनतो.

+H1

+ H1

+H1

(p – p) साखळी: H1

He2

He3

He4.

+p

+p

+p

(C – N) चक्र : C12

N13

→ C13

N14

+p

O15

N15

O16


एका हायड्रोजन अणूचे आणवीय वस्तुमान १·००८ आणि एका हीलियम अणूचे आणवीय वस्तुमान ४·००४ असल्यामुळे वरील प्रक्रियांच्याद्वारे ०·७ टक्के वस्तुमानाचा नाश होतो व आइन्स्टाइन यांच्या E = mc2 या सूत्राप्रमाणे त्याची ऊर्जा बनते. ती ऊर्जा ताऱ्यांच्या बाहेर येताना तिचे तापमान कमी होत होत पृष्ठभागाशी ऊर्जानुसारी तापमान होते व ताऱ्यास त्या तापमानानुरूप विशिष्ट वर्णपटीय वर्ग प्राप्त होतो. ऊष्मीय अणुकेंद्रीय ऊर्जेचे उत्पादन केंद्रभागाच्या तापमानाबरोबर वाढते. म्हणून भारी ताऱ्यांचे केंद्रीय तापमान जास्त असल्याने ते जास्त दीप्तिमान असतात आणि त्यांच्या पृष्ठाचेही तापमान अधिक असते. अशा रीतीने ह. र. आकृती व M – L संबंध यांचा बोध होतो.

जसजशी ताऱ्यांची उत्क्रांती होत जाते तसतसे त्यांचे रासायनिक संघटन आणि अंतर्रचना बदलते. त्यामुळे त्याची ह.र. आकृतीतील स्थितीही बदलते.

तारकीय उत्क्रांती : आंतरतारकीय पदार्थाचे गुरुत्वाकर्षणाने आकुंचन होऊन ताऱ्यांची उत्पत्ती होते. आकुंचनास सुरुवात होण्यास १–१० के. तापमानाचा सूर्याच्या शंभरपट वस्तुमानापेक्षा जास्त असलेला आंतरतारकीय पदार्थाचा मेघ लागतो. या मेघाचे जसजसे आकुंचन होत जाते तसतसे स्थितिज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होत जाते व त्या मेघाचे तापमान वाढू लागते. बरेच आकुंचन झाल्यावर तो मेघ तळपू लागतो

कोष्टक क्र. २. प्रमुख श्रेणीतील ताऱ्यांची अंतर्रचना

वर्णपट

केंद्रीय घनता (ग्रॅ. / घ. सेंमी.)

केंद्रीय दाब (डाइन/चौ.सेंमी.)

केंद्रीय तापमान (के.)

ऊर्जेचे संक्रमण

ऊर्जा उत्पादनाची पद्धत

कालमान (वर्षे)

केंद्रभाग

बाह्यभाग

B0

६·३

२·७ × १०१६

३० × १०

संनयन

प्रारण

C – N चक्र

१०

A0

३१·६

१·० × १०१७

२२ × १०

संनयन

प्रारण

C – N चक्र

३ × १०

F0

१००

२·५ × १०१७

१८ × १०

संनयन

प्रारण

C – N चक्र

२ × १०

G2 (सूर्य)

१००

२·० × १०१७

१४ × १०

प्रारण

संनयन

C –N  चक्र+ p-p साखळी

१०१०

K0

१००

१·८ × १०१७

१३ × १०

प्रारण

संनयन

p-p साखळी

२ × १०१०

M0

८०

१·० × १०१७

९ × १०

प्रारण

संनयन

p-p साखळी

८ × १०१०

लाल महातारे

३·२ × १०

४० × १०

संवहन व प्रारण

संनयन

3He → C

१०

लघुतम तारे

१·६ × १०

१०० × १०

संवहन

संवहन व प्रारण

होत नाही

१०१२

व त्याचे बरेच तुकडे होतात. अशा रीतीने एका तारकासमूहाचा जन्म होतो. ताऱ्याच्या केंद्रभागाचे तापमान ४०-५० लाख अंश के. होईपर्यंत तारा आकुंचनाने चमकत राहतो. ताऱ्याच्या जीवनातील हा भाग आकृतीत १-२-३ या रेषेने दाखविला आहे. या स्थितीतील ताऱ्यांचे कालमान– यालाच आकुंचन कालमान म्हणतात– सर्वांत भारी (४० सौरवस्तुमानाच्या) ताऱ्यांसाठी १-२ लाख वर्षे व सर्वांत हलक्या ताऱ्यांसाठी २० कोटी वर्षे असते. सूर्याच्या आकुंचनास २-३ कोटी वर्षे लागली असावी, असा अंदाज आहे.

केंद्रतापमान ५० लाख अंश के. पर्यंत पोहोचले म्हणजे तेथे औष्णिक अणुकेंद्रीय विक्रिया सुरू होतात. त्यामुळे ऊर्जा उत्पन्न होऊन ताऱ्याचे आकुंचन कमी कमी होत जाते व केंद्रतापमान १-२ कोटी अंश के. झाले की, आकुंचन पूर्णपणे थांबते. आता हा तारा संपूर्णपणे औष्णिक अणुकेंद्रीय ऊर्जा उत्पादनावर अवलंबून राहतो व त्यास प्रमुख श्रेणीची स्थिती प्राप्त होते. औष्णिक अणुकेंद्रीय विक्रियांना लागणारे हायड्रोजनाचे इंधन भरपूर असल्यामुळे तो तारा एकाच दीप्तीने १० लाख (सर्वांत भारी तारा) ते १०० अब्ज (सर्वांत हलका तारा) वर्षांपर्यंत चमकू शकतो. आकुंचन कालमानापेक्षा हे कालमान पुष्कळच दीर्घ असल्याने शेकडा नव्वद तारे प्रमुख श्रेणीत सापडतात. निरनिराळ्या वस्तुमानाच्या ताऱ्यांचे प्रमुख श्रेणीतील कालमान कोष्टक क्र. २ मध्ये दाखविले आहे. आपला सूर्य प्रमुख श्रेणीत येऊन ४-५ अब्ज वर्षे झाली असून यापुढे तितकाच वेळ तो तेथे राहील.

प्रमुख श्रेणीत असताना ताऱ्याच्या मध्यभागात असलेला हायड्रोजन हळूहळू कमी होत जातो व हीलियम वाढतो. यामुळे ताऱ्याचा सरासरी रेणुभार वाढतो आणि केंद्रभागातील तापमान व दीप्तीही थोड्या प्रमाणात वाढतात. हा उत्क्रांतीचा भाग ह.र. आकृतीमध्ये ३-४ या रेषेने दाखविला आहे.

ताऱ्याच्या पूर्ण वस्तुमानापैकी १० टक्के हायड्रोजनाचे हीलियमामध्ये रूपांतर झाले म्हणजे केंद्रभागातील ऊर्जेचे उत्पादन मंदावते. त्यामुळे ताऱ्याचा केंद्रभाग पुन्हा आकुंचन पावू लागतो व त्याचबरोबर त्याचे बाह्य आवरण प्रसरण पावते. अशा रीतीने तो तारा प्रमुख श्रेणीतून महाताऱ्यांच्या श्रेणीत व तेथून महत्तम ताऱ्यांच्या श्रेणीत पोहोचतो. आकृतीमध्ये ही उत्क्रांती ४-५ या रेषेने दाखविली आहे. या भागात ताऱ्याच्या संरचनेत व अंत:परिस्थितीत पुष्कळ बदल होतो. केंद्रभागाचे तापमान २० कोटी अंश के. पर्यंत पोहोचले म्हणजे ३ हीलियम अणू एकत्र होऊन १ कार्बन अणू बनतो व तापमान आणखी वाढले की, कार्बन अणूंचे क्रमाक्रमाने ऑक्सिजन, निऑन, सोडियम असे रूपांतर होत जाते. या सर्व परिवर्तनांमुळे तारा स्पंदमान होतो. अशा स्पंदमान ताऱ्यांत सेफीड तारे, RR लायरी तारे इ. प्रकारच्या रूपविकारी ताऱ्यांचा समावेश होतो [→ तारा].

ताऱ्याच्या केंद्रभागाचे तापमान १ अब्ज अंश के. झाले म्हणजे लोह अणूंची संख्या वाढते व त्याहूनही भारी अणू तयार होतात. त्यावेळी ताऱ्याच्या केंद्रभागात इतकी ऊर्जा उत्पन्न होते की, त्याचे संपूर्ण आवरण जोरात बाहेर फेकले जाते. अशा महास्फोट पावणाऱ्या ताऱ्याचा म्हणजे अतिदीप्त नवताऱ्याचा प्रकार आकाशगंगेत २००–३०० वर्षांत एकदा पहावयास मिळतो. पण बहुतेक महत्तम तारे स्फोट न पावताही आतील पदार्थ हळूहळू बाहेर फेकीत असतात. या दोन्ही कारणांनी ताऱ्याचा पृष्ठभाग हळूहळू अधिक उष्ण व निळा होत जातो आणि तारा ह. र. आकृतीत डावीकडे सरकत जातो (आकृतीमधील ५-६ हा भाग). नंतर छोटे छोटे स्फोट पावत व आकुंचन होत होत त्याचे अतिघन पदार्थांनी बनलेल्या लघुतम ताऱ्यात रूपांतर होते ( आकृतीमधील ६-७  हा भाग). अशा लघुतम ताऱ्यांची सरासरी घनता १० ग्रॅ./घ.सेंमी. एवढी असते. त्यात औष्णिक अणुकेंद्रीय विक्रिया होत नाहीत, मात्र अतिघन अवस्थेमुळे काही इलेक्ट्रॉन अतिउत्तेजित स्तरात पोहोचलेले असतात व एखाद्या उष्ण धातूप्रमाणे तारा तळपत राहतो. पण हळूहळू थंड होत होत (आकृतीमधील ७-८ हा भाग) शेवटी तो दीप्तिविहीन होतो म्हणजेच एका अर्थाने तो मरण पावतो. अशा तेजोहीन पिंडाचे अस्तित्व केवळ त्यांच्या गुरुत्वाकर्षणानेच कळून येते.


लघुतम ताऱ्यांपेक्षाही जास्त घन (घनता १० ग्रॅ./घ सेंमी.) पदार्थात प्रोटॉन व इलेक्ट्रॉन एकवटून त्यांचे न्यूट्रॉन बनतात. अशा न्यूट्रॉन ताऱ्यांची त्रिज्या सु. १० किमी. इतकीच असेल व सरासरी घनता १०१४ ते १०१५

ग्रॅ./घ. सेंमी च्या आसपास असेल, असे अनुमान काढण्यात आलेले आहे. अलीकडे शोध लागलेले ०·०३३ ते ३·७ सेकंद आवर्तकाल असणारे पल्सार म्हणजे अक्षीय परिभ्रमण करणारे न्यूट्रॉन तारेच असावेत, असा अंदाज आहे. पृष्ठभागापासून निघणाऱ्या प्रारणाच्या झोताच्या परिभ्रमणामुळे स्पंद निर्माण होतात अशी एक कल्पना गोल्ड यांनी मांडली आहे. ही स्पंदमानता कमी कमी होत असल्याच्या अलीकडील शोधामुळे या कल्पनेस पुष्टी मिळते.

खगोल भौतिकीचे क्षेत्र अतिशय विस्तृत आहे म्हणून सोयीसाठी योग्य त्या कसोट्यांनुसार तिचे विभाग पाडतात. अनुसंधानाच्या पद्धतीऐवजी अभ्यासाच्या समस्येच्या स्वरूपानुसार विभाग पाडणे अधिक चांगले असते आणि त्यानुसार सामान्यत: पुढील विभाग पाडले जातात.

सौरभौतिकी : सूर्य हा पृथ्वीच्या सर्वांत जवळचा तारा असल्याने त्याचे अनुसंधान करणे सोयीचे आहे. यामध्ये सूर्याच्या वातावरणाची व अंतरंगाची संरचना, त्याच्या पृष्ठावरील आणि आतील अणुकेंद्रीय विक्रिया, चुंबकत्व, सौरक्रिया इ. आविष्कारांचे अध्ययन होते. सूर्य व पृथ्वी यांच्यातील नाते लक्षात घेता सौरभौतिकी व भूभौतिकी यांची सांगड घालतात. ध्रुवीय प्रकाश (पृथ्वीच्या ध्रुव प्रदेशांत आढळणारा विविध रंगी आविष्कार), चुंबकीय वादळे, आयनांबरातील खळबळ व सौरक्रिया यांच्यातील संबंधांचेही यात अध्ययन होते. सूर्याच्या वातावरणात दिसणारे कणमय समुदाय, गडद रेखायुक्त वर्णपटांच्या समस्या, दीप्तिमंडल, वर्णमंडल इ. अक्षुब्ध (शांत) तर सौरडाग, २२·५ वर्षांचे चुंबकीय चक्र, तेज:शिखा, तेज:शृंग, किरीट, अतप्त रेडिओ प्रारण वगैरे क्रियाशील आविष्कारांचेही अध्ययन होते [→ सूर्य].

पृथ्वी जवळ असल्यामुळे सूर्याचे बिंब ३२ मिनिटे व्यासाचे दिसते. छायाचित्रात सूर्यबिंब केंद्राशी सर्वांत जास्त प्रकाशमान व कडेजवळ मंद झालेले दिसते. प्रारण संक्रमण समीकरणाच्या साहाय्याने याचे स्पष्टीकरण मिळते. बिंबकेंद्राच्या ठिकाणी आपण जास्त खोलवर पाहू शकतो आणि तापमान खोलीबरोबर वाढत असल्यामुळे तो भाग अधिक प्रकाशमान भासतो. कडेजवळ तिरप्या दिशेत पहात असल्यामुळे केवळ वरच्या थरातील थंड भाग दिसतो म्हणून कडा मंद भासते. निरनिराळ्या तरंगलांब्याच्या प्रकाशात हे मंदीभवन मोजले असता सूर्याच्या वातावरणाची संरचना पुष्कळ अचूकपणे ठरविता येते. अशा वेधांवरून सूर्याच्या वातावरणातील प्रकाशाचे शोषण बहुश: ऋण विद्युत् भारयुक्त हायड्रोजन अणूंमुळे होते असे आढळले आहे.

सूर्यबिंबाच्या छायाचित्रात तांदळासारखे शेकडो उजळ कण दिसतात व त्यांच्यामध्ये काळसर भाग आहे असे वाटते. हे कण एकसारखे बदलत असतात त्यांचा सरासरी आकार १,००० किमी. व कालमान २-३ मिनिटे असते. यावरून सूर्याच्या पृष्ठभागाच्या खालील थरांत संनयन होत असावे असे सिद्ध होते. तेथे हायड्रोजनाचे आयनीभवन होत असताना असे संनयन शक्य होते, म्हणून त्याला हायड्रोजनाचा संनयन स्तर म्हणतात. पुष्कळ वेळा संनयनाने तयार झालेले बुडबुडे पृष्ठभागातून बाहेर पडतात. त्यामुळे वर्णमंडलात व त्यापुढील किरिटात आघात तरंगांच्या रूपात गतिज ऊर्जा सोडली जाते आणि किरिटाचे ऊर्जानुसारी तापमान १० लाख अंश के. पर्यत वाढते.

सूर्यबिंबावर विषुववृत्तापासून ३०-३५ अक्षांशांपर्यंत दिसणारे सौरडाग, कॅल्शियम (II) च्या (३,९३३ Ao) रेखाप्रकाशात घेतलेल्या छायाचित्रात दिसणारे पांढरे डाग, हायड्रोजनाच्या Hα (६,५६२ Ao) रेखाप्रकाशात दिसणारे काळसर तंतू, तसेच कडेजवळ दिसणारr तेज:शृंगे आणि जंबुपार व हायड्रोजन वर्णपटांमधील Hα या रेखेचा प्रकाश फेकणाऱ्या सौर तेज:शिखा या नेहमी बदलत्या घटनांवरून सूर्याच्या पृष्ठभागावर प्रचंड प्रमाणात उलथापालथ होत असते हे स्पष्ट दिसते. सौरडागांची संख्या १०-११ वर्षांच्या आवर्तकालाने कमीजास्त होते व त्याबरोबर किरिटाची आकार बदलतो. परंतु सौरडागातील चुंबकीय क्षेत्राची दिशा लक्षात घेतली, तर खरा आवर्तकाल याच्या दुप्पट म्हणजे सु. २२ वर्षे आहे असे समजते. सूर्याच्या अंतर्भागातील चुंबकीय क्षेत्र पृष्ठभागातून फुटून बाहेर पडते तेथे सौरडाग दिसतात. पूर्ण सूर्यबिंबावर सरासरी १ गौस एवढेच चुंबकीय क्षेत्र आढळते, परंतु आतील चुंबकीय क्षेत्र बरेच जास्त असावे कारण सौरडागात २,००० ते ३,००० गौस चुंबकीय क्षेत्र आढळते. सूर्यावरील सर्व परिवर्तने त्याच्या चुंबकीय क्षेत्रावरच अवलंबून असतात व त्यांचा परिणाम पृथ्वीवरही होतो. झाडांच्या बुंध्यात आढळणारी वार्षिक वलये कमीजास्त जाड होतात व त्यांचा आवर्तकाल सौरडागासारखाच ११ वर्षांचा असतो. सौर तेज:शिखांमुळे पृथ्वीवर चुंबकीय वादळे, रेडिओ तरंगांना होणारा प्रतिबंध व त्यांचे क्षीणीभवन, विश्वकिरणांची वाढ इ. परिणाम होतात. सौर तेज:शिखेच्या वेळी सूर्यातून बाहेर फेकलेले प्रोटॉन पृथ्वीच्या वातावरणात शिरले म्हणजे ध्रुवीय प्रकाश या नावाने ओळखले जाणारे प्रकाशझोत उत्पन्न होतात.

प्रकाशकिरणांप्रमाणेच सूर्यापासून रेडिओ तरंग निघत असतात व त्यांचा रेडिओ दूरदर्शकाने अभ्यास करता येतो. सूर्याच्या रेडिओ तरंगांची तीव्रता कडेजवळ व किरीटभागात सर्वांत जास्त असते. त्यावरून किरिटाचे तापमान १० लाख अंश के. आहे असे समजते. किरिटात उत्पन्न होणाऱ्या अतिआयनीभूत अणूंच्या रेखा त्याचमुळे उत्सर्जित होतात. सूर्य शांत अवस्थेत असताना उत्पन्न होणाऱ्या या नेहमाच्या रेडिओ प्रारणांशिवाय सौर तेज:शिखांच्या वेळी उत्पन्न होणारे रेडिओ स्फोट आणि उत्स्फोटही पहावयास मिळतात. त्यांच्या अभ्यासावरून सौर तेज:शिखांच्या क्रियेची बरीच माहिती होते. [→ सूर्य].

सूर्यकुल भौतिकी : यामध्ये ग्रहांच्या वातावरणाचे व अंतरंगाचे स्वरूप, तसेच उल्काभ (अवकाशातील उल्का कण), आंतरग्रहीय वायू इत्यादींच्या घटक कणांच्या भौतिक गुणधर्मांचा व रासायनिक संघटनाचा अभ्यास केला जातो. शिवाय आंतरग्रहीय आयनद्रायू (सौरवात), चुंबकत्व तसेच पृथ्वी व गुरू यांचे चुंबकांबर यांचाही बराच अभ्यास सूर्यकुल भौतिकीमध्ये करतात.

तारकीय भौतिकी : यामध्ये तारकीय वातावरण, अंतरंग, चुंबकत्व, अक्षीय परिभ्रमण, मूलद्रव्यांची बांधणी व विपुलता, ताऱ्यांची उत्पत्ती व उत्क्रांती इत्यादींचा अभ्यास करतात. सौरवातावरणासंबंधीच्या गोष्टी, युग्मतारे व चलतारे यांची आवरणे, आंतरतारकीय माध्यम वगैरेंचा ह्यात समावेश करतात. तसेच ताऱ्यांचे गतिकीय गुणधर्म, तारकागुच्छ व ताऱ्यांच्या सामूहिक प्रकारांतील भिन्नता, तारे व आंतरतारकीय द्रव्य यांच्यातील आंतरक्रिया, निर्विद्युत् हायड्रोजनाची वाटणी यांचेही तारकीय भौतिकीमध्ये अध्ययन केले जाते.

ताऱ्यांच्या सर्वसाधारण गुणांचे विवरण मागे आलेच आहे. येथे फक्त काही असाधारण ताऱ्यांचा विचार केलेला आहे.


(अ) उत्सर्जन रेखांकित वर्णपटांचे तारे : दीप्तिमंडलातून निघणारे अखंड वर्णपटाचे प्रारण कमी तापमानाच्या वर्णमंडलातून बाहेर पडते, तेव्हा त्याच्या वर्णपटावर शोषणरेखा अध्यारोपित होतात. उत्सर्जनरेखा उत्पन्न होण्यासाठी अतिविरल वातावरणाची गरज असते. अशी परिस्थिती सूर्याच्या किरिटात सापडते. तेथे अणु-अणूंमधील अंतर खूप असल्याने त्यांच्यात टक्कर होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे प्रारणाने किंवा आघात तरंगांमुळे आयनीभूत व उत्तेजित झालेले अणू तसेच राहतात आणि त्यातून निषिद्ध रेखांचे [सामान्यत: असंभवनीय मानल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या संक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या रेखांचे → वर्णपटविज्ञान] उत्सर्जन होते. काही महत्तम ताऱ्यांच्या वर्णपटांत अशा निषिद्ध उत्सर्जन रेखा सापडतात तेव्हा त्यांनाही बरेच विस्तृत किरीट भाग असले पाहिजेत असे दिसते.

बहुतेक तारे अक्षीय परिभ्रमण करतात. अशा परिभ्रमणाचा वेग O प्रकारच्या ताऱ्यांत सर्वांत जास्त (३५० किमी./से.) असून तो O, B, A, F… या वर्णपट विभागानुक्रमानुसार कमी होत जातो. अक्षीय परिभ्रमणाचा वेग B ताऱ्यात २००–३०० किमी./ से., A ताऱ्यात १००–१५० किमी./से., F ताऱ्यात २०–७५ किमी./से. आणि सूर्यासारख्या G व K आणि M ताऱ्यात तो केवळ २-३ किमी./से. असतो. काही O व B तारे इतक्या जोरात अक्षीय परिभ्रमण करीत असतात की, अपमध्य (मध्यापासून दूर जाणाऱ्या ) प्रेरणेमुळे त्यांच्या विषुववृत्ताजवळील काही पदार्थ बाहेर फेकला जाऊन त्याचे वलय किंवा कवच बनते. त्यात विरलता अधिक असल्यामुळे उत्सर्जनरेखा उत्पन्न होतात. त्यांपैकी Be ताऱ्यांच्या वर्णपटरेखालेखात दोन उंचवटे व मध्ये एक खोल भाग दिसतो. निरीक्षकांच्या बाजूस असलेल्या कवचभागात शोषण झाल्यामुळे उत्सर्जन रेखेचा मध्य भाग खोलावतो. कवच प्रसरण पावत असेल, तर ही शोषणरेखा वर्णपटाच्या नीलभागाकडे सरकलेली दिसते असे वर्णपटरेखालेख P सिग्नी तारे, व्होल्फ-राये (W) तारे व नवतारे यांच्या वर्णपटांत सापडतात. W ताऱ्यांच्या उत्सर्जनरेखा इतक्या रुंद असतात की, कवचाचा प्रसरण वेग १,००० किमी./से. असला पाहिजे. नवताऱ्यांच्या स्फोटामुळे बाहेर फेकलेल्या पदार्थांचे प्रसरण होऊन त्यांच्याभोवती बिंबाभ्रिका तयार होतात. बिंबाभ्रिकांच्या वर्णपटांतही उत्सर्जनरेखा प्रामुख्याने सापडतात [→ अभ्रिका].

युग्मताऱ्यातील तारे बीटा लायरीच्या घटकांसारखे अत्यंत जवळ असल्यास त्यांच्यातील पदार्थांची देवाणधेवाण होते तसेच काही पदार्थ युग्ममालेच्या बाहेर फेकला जातो. अशा रीतीने उत्पन्न होणाऱ्या वायुप्रवाहांमध्येही उत्सर्जनरेखा उत्पन्न होतात. अशा निकटवर्ती युग्मताऱ्यांच्या अभ्यासाने ताऱ्यांच्या उत्क्रांतीसंबंधी बरीच माहिती मिळते.

(आ) स्पंदमान तारे : ताऱ्याच्या उत्क्रांतीत काही वेळा त्याची आंतरिक रचना अस्थायी होते, त्यामुळे तो तारा एकापाठोपाठ आकुंचन-प्रसरण पावून स्पंदमान होतो. अशा स्पंदमान ताऱ्याची दीप्ती तसेच त्याच्या वर्णपटरेखांची तरंगलांबी आवर्ती होतात. तारकीय भौतिकीच्या दृष्टीने स्पंदमान ताऱ्यांचे बरेच महत्त्व आहे. त्यांचा आवर्तकाल P व सरासरी घनता ρ या राशी P√ ρ = Q (एक स्थिरांक), या समीकरणाप्रमाणे संबंधित असल्याने, त्यांपासून ताऱ्यांच्या अंतर्रचनेचे ज्ञान होते. तसेच स्पंदमान ताऱ्यांचा आवर्तकाल P व निरपेक्षदीप्ती L सहसंबंधित असून दोन्ही बरोबर वाढतात म्हणून त्यांचा आवर्तकाल व दृश्य प्रत m मोजून त्याचे अंतर d काढता येते. RR लायरी जातीच्या ताऱ्यांची निरपेक्ष प्रत +०·५ आहे. या गोष्टीचा गोलाकार तारकागुच्छांचे अंतर व आकाशगंगेचा आकार यांची माहिती मिळविण्यास उपयोग झाला. त्याचप्रमाणे सेफीड जातीच्या रूपविकारी ताऱ्यांच्या P-L संबंध सूत्रावरून देवयानीतील अभ्रिका (दीर्घिका) व इतर दीर्घिकांची अंतरे आणि विश्वाचे आकारमान यांचा अंदाज करता आला.

(इ) असाधारण रासायनिक संघटन दाखविणारे तारे : बहुतेक ताऱ्यांत मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रमाण सूर्यासारखे आढळते. परंतु काही ताऱ्यांत ते वेगळे आहे, असे त्यांच्या वर्णपटांवरून समजते. त्यांच्या अभ्यासाने ताऱ्याच्या अंतर्भागात व पृष्ठभागावर मूलद्रव्यांच्या अणूंचे परिवर्तन कसे होते याची माहिती मिळते. सुरुवातीस सर्व अणू हायड्रोजनाचे होते व ताऱ्यांच्या अंतर्भागात औष्णिक अणुकेंद्रीय विक्रियांमुळे यांचे हीलियम वगैरे भारी अणूंत रूपांतर झाले. धातूंसारख्या अतिभारी अणूंचे प्रमाण (Z) हे, RR लायरीसारख्या अतिवेगवान ताऱ्यांत व गोलाकार तारकागुच्छांत कमी (Z = ०·३ ते ०·१ टक्का) असल्याचे आढळते. तेव्हा या ताऱ्यांचे वयोमान सर्वांत अधिक, सूर्यासारख्या (Z = २·० टक्के असलेल्या) ताऱ्यांचे वयोमान मध्यम व अतिदीप्तिमान नील ताऱ्यांचे (Z = ४·० टक्के) वयोमान सर्वांत कमी आहे असे दिसते.

अति-उत्क्रांत अवस्थेत असलेल्या S जातीच्या लाल महत्तम ताऱ्यांच्या वर्णपटात झिर्कोनियमासारख्या महामारी मूलद्रव्यांच्या अणूंच्या रेखा वाजवीपेक्षा तीव्र असल्याचे आढळते. तसेच नवनिर्मित पण उत्क्रांत अवस्थेतील व्होल्फ-राये (W) ताऱ्यात कार्बन (C) व नायट्रोजन (N) यांच्याच वर्णपटरेखा प्रामुख्याने दिसतात. या दोन्ही गोष्टींमुळे ताऱ्यांच्या केंद्रभागी भारी मूलद्रव्यांचे अणू उत्पन्न होतात, या विधानाला पुष्टी मिळते. याउलट असाधारण A ताऱ्यांत काही मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रमाण वेगळेच आणि बदलणारे आढळते. हे तारे इतर दृष्टींनीही रूपविकारी असतात. त्यांच्या वर्णपट, वर्णपटरेखास्थान, चुंबकीय क्षेत्र या राशी आवर्ती (ठराविक कालाने) परिवर्तन दाखवितात. हे अक्षीय परिभ्रमण करणारे चुंबकीय तारे असून त्यांच्या बाह्य वातावरणात मोठ्या चुंबकीय क्षेत्रामुळे सायक्लोट्रॉन क्रिया [कणांना अतिशय उच्च वेग देणाऱ्या सायक्लोट्रॉन नावाच्या उपकणातील क्रियेसारखी क्रिया → कणवेगवर्धक] होते व मूलद्रव्याच्या अणूंचे प्रमाण बदलते असा सिद्धांत आहे. टी-टौरी गटातील नव्याने आकुंचन पावलेल्या ताऱ्यांतही चुंबकीय क्षेत्र आढळते व त्यामुळे त्यांच्या वातावरणात लिथियम व बेरिलियम या मूलद्रव्यांचे अणू तयार होतात.

(ई) तारका गुच्छ : अर्ध्यापेक्षा जास्त तारे युग्मतारे, तारकात्रिकूटे किंवा तारकाबहुकूटे या स्वरूपांत आढळतात. कारण बहुतेक तारे शंभर ते लाखांच्या गुच्छातच अस्तित्वात येतात. पुष्कळशा कारणांनी हे गुच्छ हळूहळू फुटत जातात व त्यांतील तारे मोकळे होतात. आकाशगंगेतील बहुतेक ताऱ्यांची उत्पत्ती १० अब्ज वर्षांपूर्वी झाली असली, तरी आपल्या आकाशगंगेत अजूनही तारकागुच्छ आढळतात. तारकीय उत्क्रांतीच्या अभ्यासात त्याचे फार महत्त्व आहे.

तारकागुच्छांचे दोन प्रकार आहेत : (१) १०० ते १,००० ताऱ्यांचे कृत्तिकापुंज, पुष्यपुंज यांसारखे तुलनेने विरल असे तारकागुच्छ आकाशगंगेच्या मध्य पातळीत  सापडतात. त्यांत उष्ण निळ्या दीप्तिमान ताऱ्यांचा भरणा असल्याने हे तारकागुच्छ गेल्या १० लाख ते १० कोटी वर्षांच्या अवधीत उत्पन्न झाले असावेत. (२) लाखापर्यंत तारे असणारे गोलाकार तारकागुच्छ आकाशगंगेच्या पातळीबाहेर आढळतात. त्यांतील सर्वांत दीप्तिमान तारे लाल महाताऱ्यांच्या गटातले असून त्यांच्या प्रमुख श्रेणीत G वर्णपटाच्या अगोदरचे तारे नाहीत. म्हणून तारकीय उत्क्रांतीच्या सिद्धांतावरून हे तारकागुच्छ ६ ते १० अब्ज वर्षे वयोमानाचे असावेत. तारकागुच्छांच्या विघटनाचा सिद्धांतरूपाने अभ्यास केल्यास विरल व गोलाकार तारकागुच्छांची वर दिलेली वयोमाने निघतात. याशिवाय भारी मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रमाण विरल तारकागुच्छात जास्त आणि गोलाकार तारकागुच्छात कमी आढळते त्यामुळे या अनुमानास पुष्टी मिळते.

नव्याने उत्पन्न झालेले तारकागुच्छ आणि जुने गोलाकार तारकागुच्छ यांच्यावरून ताऱ्यांचे दोन प्रमुख प्रकार केले आहेत. नव्या पिढीचा सामुहिक ताराप्रकार-१ आणि जुन्या पिढीचा सामुहिक ताराप्रकार -२ असे त्यांचे नामाभिधान आहे. RR लायरी गटातील तारे गोलाकार तारकागुच्छात सापडतात म्हणून त्यांचा ताराप्रकार-२ व सेफीड रूपविकारी तारे विरल तारकागुच्छात आढळतात म्हणून त्यांचा ताराप्रकार-१ आहे.


आकाशगंगा : आकाशगंगेचा पांढरा पट्टा म्हणजे एक प्रचंड दीर्घिका असून बहुतेक दृश्य तारे व तारकागुच्छ आणि सूर्य या सर्वांचा तीत समावेश होतो. ही दीर्घिका म्हणजे बहिर्गोल भिंगाच्या आकाराची मध्यभागी फुगलेली एक तबकडी आहे. सूर्य तिच्या मध्यपातळीत असून तो मध्यापासून सु. १०,००० पार्सेक अंतरावर आहे. आकाशगंगेत एकंदर १०११ तारे आहेत. त्यांपैकी सर्वांत जास्त तारे मध्यभागी एकत्रित झाल्याने बाहेरील भागातील ताऱ्यांवर त्यांचे गुरुत्वाकर्षण पडते. त्यामुळे ते तारे मध्याभोवती वर्तुळाकृती कक्षांत फिरत असतात, यालाच आकाशगंगेचे अक्षीय परिभ्रमण म्हणतात. अक्षीय परिभ्रमणाचा वेग मध्यापासूनच्या अंतराबरोबर बदलत जातो. सूर्याचा वेग २०० किमी./से. असून त्याला मध्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास २० कोटी वर्षे लागतात. आकाशातील निरनिराळ्या भागांमधील ताऱ्यांचा अरीय वेग व विशिष्ट गती मोजून आकाशगंगेच्या परिभ्रमणाबद्दलची माहिती मिळते. शिवाय खगोल भौतिकीमध्ये आकाशगंगेच्या सर्पिल भुजेतील ताऱ्यांचे वितरण, मध्य फुगवट्यापासून बाहेर पडणारा निर्विद्युत् हायड्रोजनाचा प्रवाह तसेच आकाशगंगेची संरचना व उत्क्रांती यांचाही अभ्यास करण्यात येतो [→ आकाशगंगा].

आंतरतारकीय द्रव्य : आकाशगंगेतील तारे एकमेकांपासून सरासरी १ पार्सेक एवढ्या अंतरावर असून त्यांच्यामधील अवकाश अत्यंत विरलावस्थेत असलेल्या द्रव्याने भरलेले आहे. या द्रव्याला आंतरतारकीय द्रव्य म्हणतात. हे द्रव्य विशेषेकरून आकाशगंगेच्या मध्यपातळीत एकत्र झाले आहे. त्यात वायू व धूलिकण असे दोन घटक आहेत. वायूमुळे दूरच्या ताऱ्यांच्या वर्णपटात अत्यंत रेखीव शोषणरेखा अध्यारोपित होतात. आंतरतारकीय धूलिकणांमुळे दूरच्या ताऱ्यांचा प्रकाश शोषित व प्रकीर्णित होतो म्हणून दूरचे तारे वाजवीपेक्षा जास्त मंद व लाल झालेले दिसतात. तसेच त्यांच्या प्रकाशाचे ध्रुवणही होते, ते मोजून आंतरतारकीय अवकाशातील चुंबकीय क्षेत्राची माहिती मिळते. त्यावरून चुंबकीय क्षेत्ररेषा आकाशगंगेच्या सर्पिल भुजांना समांतर आहेत असे समजते आणि आंतरतारकीय धूलिकण असंवाहक द्रव्याचे बनले असून लांबट आकाराचे आहेत, असा निष्कर्ष निघतो. विश्वाची रासायनिक संरचना लक्षात घेता, ते पृथ्वीवरील हिमकणांसारखे असावे असा अंदाज करता येतो.

अतिशय विरल वायू व धूलिकण यांचे मोठमोठे मेघ तयार झाले असल्यास ते पाठीमागच्या सर्व ताऱ्यांचा प्रकाश अडवितात. त्यामुळे आकाशाचा तो भाग काळा दिसतो याच कृष्णाभ्रिका होत. परंतु आंतरतारकीय द्रव्याचे मेघ एखाद्या उष्ण दीप्तिमान ताऱ्याजवळ किंवा तारकागुच्छाजवळ असल्यास त्यांच्या प्रकाशाच्या परावर्तनाने किंवा अनुस्फुरणाने (विशिष्ट तरंगलांबीच्या प्रारणाचे शोषण करून जास्त तरंगलांबीच्या प्रारणाचे उत्सर्जन करण्याने) मेघ तळपू लागतो याच तेजोमय अभ्रिका होत या अभ्रिकांचे ऊर्जानुसारी तापमान १०,००० अंश के. असून त्यांच्या वर्णपटात आयनीभूत ऑक्सिजन व नायट्रोजन यांच्या निषिद्ध रेखा व हायड्रोजनाची Hα रेखा उत्सर्जित झालेल्या दिसतात. या भागातील बहुतेक हायड्रोजन अणू आयनीभूत झालेले असतात म्हणून आंतरतारकीय अवकाशाच्या या भागांना H-II क्षेत्रे म्हणतात. त्यांचे ६,५६२ Ao या तरंगलांबीच्या Hα रेखा प्रकाशात छायाचित्रण करता येते.

आंतरतारकीय द्रव्यात शेकडा ९० अणू हायड्रोजनाचे असतात आणि सर्वसाधारणपणे त्यांचे ऊर्जानुसारी तापमान १०० के. असते. उष्ण ताऱ्यांपासून दूर असल्यामुळे येथील हायड्रोजन अनायनीभूत राहतो म्हणून या भागांना H-I क्षेत्रे म्हणतात. त्यांत हायड्रोजनाची २१ सेंमी. तरंगलांबीची उत्सर्जनरेखा उत्पन्न होते. रेडिओ दूरदर्शकांच्या साहाय्याने तिचे अवलोकन करता येते. या तरंगलांबीचे प्रारण आंतरतारकीय द्रव्यात शोषणे जात नाही म्हणून या २१ सेंमी. रेषेचे वेध घेऊन आकाशगंगेच्या दूरच्या भागांची माहिती करून घेता येते. अशा रीतीने आकाशगंगेच्या सर्पिल भुजीय रचनेची माहिती मिळाली आहे. देवयानी नक्षत्रातील दीर्घिका आणि आकाशगंगा यांचे साम्य यावरून स्पष्ट दिसून येते. सर्पिल भुजांत विशेषेकरून आंतरतारकीय मेघ, नवनिर्मित निळे दीप्तिमान तारे, विरल तारकागुच्छ व तेजोमय अभ्रिका या प्रकार – १ च्या ज्योती एकत्र सापडतात. तेव्हा सर्पिल भुजांत आंतरतारकीय द्रव्याचे गुरुत्वाकर्षणाने आकुंचन होऊन तेथे नवीन तारे निर्माण होत असल्याचा पुरावा मिळतो.

आंतरतारकीय द्रव्यातील आणि वायुरूप अभ्रिकांतील वायू तेथील परिस्थितीमध्ये कसे वागतात, त्यांच्यातील घन कण व हायड्रॉक्सिलासारख्या मूलकांच्या अणुगटांची निर्मिती आणि आंतरक्रिया यांचेही यात अध्ययन होते [→ आंतरतारकीय द्रव्य].

दीर्घिका आणि विश्व : आकाशगंगा व इतर दीर्घिका यांची संरचना आणि उत्क्रांती, अगदी जवळच्या दोन दीर्घिकांतील आंतरक्रिया व एकमेकींवर आदळणाऱ्या दीर्घिकांमधील प्रक्रिया, आंतरदीर्घिकीय द्रव्य, सर्पिल भुजेची निर्मिती, विश्वातील अंतरासंबंधीचा मापक्रम, विश्वाचे वय, वैश्चिक स्थिरांक व प्रसरण इ. गोष्टींचे अध्ययन यां विभागात केले जाते.

आकाशगंगा, देवयानी नक्षत्रातील दीर्घिका, दक्षिण खगोलार्धातील मागेलनी अभ्रिका यांसारख्या कोटिकोटी ताऱ्यांच्या दीर्घिका म्हणजे विश्वाचे मूलघटक होत. मोठ्या परावर्तक दूरदर्शकांनी घेतलेल्या छायाचित्रांत आणि रेडिओ दूरदर्शकांच्या वेधांत लाखो दीर्घिका सापडल्या आहेत. त्यांत सर्पिल भुजीय रचनेची दीर्घिका, विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) दीर्घिका आणि असंबद्ध रचनेची दीर्घिका असे तीन मुख्य प्रकार आहेत. त्यांच्या वर्णपटांवरून त्यांतील ताऱ्यांची माहिती मिळते. सर्व विश्वात आकाशगंगेतील ताऱ्यांसारखेच तारे असून त्यांतील मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रमाणही सर्वसाधारणपणे सारखेच आहे.

मागेलनी अभ्रिकेसारख्या असंबद्ध रचनेच्या दीर्घिकांमध्ये आंतरतारकीय वायू वा धूलिकण तसेच दीप्तिमान निळ्या ताऱ्यांचा भरणा दिसतो. तेव्हा अशा दीर्घिकांत अजून ताऱ्यांची उत्पत्ती थांबलेली नाही. याच्या उलट विवृत्ताकार दीर्घिकांत वायू आणि धूलिकण यांचा अभाव असल्याने तेथे ताऱ्यांची उत्पत्ती मागेच थांबली असे समजतात. सर्पिल भुजीय दीर्घिका या दोन प्रकारांमधल्या आहेत. त्यांच्या मध्यभागात जुने तारे असून बाहेरील सर्पिल भुजेत वायू, धूलिकण व नवनिर्मित O, B तारे सापडतात. आकाशगंगा व देवयानीतील अभ्रिका या अशा दीर्घिका होत.

ताऱ्यांप्रमाणेच दीर्घिकांचेही समूह सापडतात. आकाशगंगा, देवयानीतील दीर्घिका, मागेलनी अभ्रिका इ. तेवीस दीर्घिकांचा एक स्थानीय समूह आहे. व्हर्गो (कन्या) नक्षत्रात असलेल्या मोठ्या समूहात जवळजवळ १,००० दीर्घिका आहेत. अशा समूहातील घटक एकमेकांना गुरुत्वाकर्षणाने खेचून एकत्र ठेवतात. दीर्घिकांचे समूह अतिदूर अंतरापर्यंत सापडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा नियम विश्वाच्या सर्व भागात लागू पडतो हे सिद्ध होते.


सर्व दीर्घिका आपल्यापासून दूर जात असून, त्यांचा दूर जाण्याचा वेग त्यांच्या मधील अंतरांच्या समप्रमाणात वाढत जातो, असा शोध हबल यांनी १९२९ मध्ये लावला. दर १० लाख पार्सेक अंतराप्रमाणे १०० किमी./से. इतका अरीय वेग वाढतो. यावरून संपूर्ण विश्वाचे प्रसरण होत आहे असा निष्कर्ष निघतो. या विश्वगुणाचे स्पष्टीकरण आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षता सिद्धांतात सापडते. विश्वाचे प्रसरण दहा अब्ज वर्षांपूर्वी सुरू झाले. त्यावेळी विश्वातील सर्व द्रव्य ‘यीलम’ नावाच्या अति-अतिघन स्वरूपात एके ठिकाणी केंद्रित झाले होते असे मानतात. त्याचा स्फोट होऊन विश्वाचे प्रसरण सुरू झाले आणि प्रसरण पावणाऱ्या द्रव्यात दीर्घिका व त्यांच्यात तारे उत्पन्न झाले. विश्वाचे प्रसरण आता हळूहळू कमी प्रमाणात होत आहे व ३०-४० अब्ज वर्षांनी ते पूर्णत: थांबून विश्व पुन्हा आकुंचन पावू लागेल, असे सध्याचे मत आहे. त्यानंतर आणखी चाळीस अब्ज वर्षांनी विश्वातील सर्व पदार्थ एकत्र येऊन दुसरा स्फोट होऊन पुन्हा प्रसरण सुरु होईल. अशा रीतीने विश्व स्पंदमान असावे असा निष्कर्ष [→ दीर्घिका विश्वस्थितिशास्त्र].

उच्च ऊर्जा उद्‌गम : क्वासार, इतर रेडिओ उद्‌गम, क्ष-किरण उद्‍गम इत्यादींच्या भौतिकीय स्वरूपाचा आणि रासायनिक संघटनांचा अभ्यास यात होत असतो. प्रवेगामुळे भारित कणांचे विश्वकिरणात कसे रूपांतर होते, रेडिओ दीर्घिका, क्वासार आणि इतर उच्च ऊर्जा उद्‌गमांत ऊर्जा कशी उत्पन्न होते इ. प्रश्नांचे यात अनुसंधान करण्यात येते.

स्पंदमान विश्वाच्या बाबतीत क्वासार नावाच्या रेडिओ-शांत उद्‌गमांच्या वेधांचे बरेच महत्त्व आहे. हे अतिदीप्तिमान उद्‌गम अतिदूर अंतरावर असल्याने आणि त्यांच्यापासून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यास ४-५ अब्जापेक्षा जास्त वर्षे लागत असल्याने त्यांच्या अभ्यासाने विश्वाच्या पूर्वस्थितीची माहिती मिळण्याची शक्यता आहे. क्वासारांच्या अतिदीप्तीचे कारण काय, हेही खगोल भौतिकीतील एक कोडे आहे. साधारणपणे एक कोटी ताऱ्यांच्या दाट समूहात होणाऱ्या ताऱ्यांच्या संयुतीमुळे एका पाठोपाठ कित्येक महास्फोट होतात आणि त्यामुळे प्रारण उत्पन्न होते, अशी एक कल्पना आहे. क्वासार ही समस्या पुढील काही वर्षे खगोल भौतिकीची प्रमुख समस्या राहील असे दिसते.

भावी विकास : रेडिओ ज्योतिषशास्त्राच्या विकासामुळे खगोल भौतिकीचीही पुष्कळ प्रगती झाली आहे. वातावरणाच्या बाहेरून केल्या जाणाऱ्या निरीक्षणांमुळे यापेक्षाही अधिक विलक्षण प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकेल. विद्युत् चुंबकीय वर्णपटाचा प्रकाशीय व रेडिओ क्षेत्रांतील काही भाग वगळल्यास इतर सर्व विद्युत् चुंबकीय प्रारणे वातावरणात शोषिली जातात. त्यामुळे वातावरणाबाहेरच्या निरीक्षणांमुळे संपूर्ण विद्युत्-चुंबकीय वर्णपटाचे अध्ययन करणे शक्य होईल. अवकाशयुगात अशा प्रकारे आकाशगंगेतील क्ष-किरण उद्‌गम प्रथम आढळले. ते खगोल भौतिकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरले आहेत. त्यांच्याबद्दल अनेक तर्क मांडण्यात आल्याने खगोल भौतिकीचे कार्यक्षेत्र पुष्कळच वाढले आहे. अवकाशविज्ञानीय अभ्यासाचा सूर्यकुलाच्या अध्ययनास उपयोग होईल. मानव चंद्रावर प्रत्यक्ष जाऊन आला असून मंगळ व शुक्र यांच्याकडे अन्वेषक याने पाठविण्यात आली आहेत. इतर ग्रहांवर माणसे पाठविणे व धूमकेतूचे जवळून प्रत्यक्ष निरीक्षण करणे, हा आता काही वर्षांचाच प्रश्न आहे.

खगोल भौतिकीतील सैद्धांतिक व मूलभूत प्रायोगिक स्वरूपाच्या प्रमुख समस्या अजून अनुत्तरित राहिल्या आहेत. त्यांचेही अध्ययन होणे आवश्यक आहे. सौर वातावरणाच्या संरचनेसंबंधीच्या सैद्धांतिक व आंतरतारकीय माध्यमाच्या मूलभूत भौतिक समस्या अजून चांगल्या समजावयाच्या आहेत. आंतरतारकीय माध्यमापासून तारा कसा बनतो? ताऱ्याच्या आयुष्यातील महाताऱ्याच्या अवस्थेपासून श्वेतवर्णी लघुतम ताऱ्यापर्यंत सविस्तर संक्रमण प्रक्रिया कशी होते? यांसारख्या तारकीय उत्क्रांतीच्या समस्याही अनुत्तरित राहिल्या आहेत.

रेडिओ दीर्घिका, दीर्घिकेच्या केंद्रामधील तीव्र स्वरूपाच्या घटना, पल्सार, क्वासार इत्यादींची उच्च ऊर्जा या खगोल भौतिकीच्या समस्याही उल्लेखनीय आहेत. द्रव्याच्या अखंड निर्मितीचा आविष्कार असणारा व हॉईल वगैरेंनी मांडलेला नियम, तसेच दीर्घिकेच्या सर्पिल भुजेसारख्या स्थानिक परिसराचा या प्रक्रियेवर कसा परिणाम होतो ते भावी निरीक्षणांनी कळू शकेल. कोट्यावधी दीर्घिकांमधील अब्जावधी ताऱ्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांचे अंतिम भवितव्य काय? ती नष्ट होतील काय? आणि विश्वातील मूलाणूंच्या पक्वीभवनाची प्रक्रिया अव्युत्क्रमी (उलट न होणारी) आहे काय? इ. प्रश्नांची उत्तरे खगोल भौतिकीच्या साहाय्याने मिळवावयाची आहेत. एकट्या पृथ्वीचे अध्ययन करणे हेच एक प्रचंड काम आहे हे लक्षात घेतल्यास चंद्र, ग्रह, उपग्रह, उल्काभ, लघुग्रह, धूमकेतू, आंतरग्रहीय माध्यम वगैरे सूर्यकुलातील असंख्य पदार्थांबद्दल आपल्याला अगदी पुसटच माहिती आहे असे म्हणावे लागते. त्यावरून एकूण विश्वातील पदार्थांसंबंधी माहिती होणे हे केवढे प्रचंड काम आहे हे दिसून येईल.

पहा : अभ्रिका अवकाश अवकाशाविज्ञान क्वासार ग्रह ज्योतिषशास्त्र नवतारा व अतिदीप्त नवतारा रेडिओ ज्योतिषशास्त्र विश्वस्थिशास्त्र विश्वोत्पत्तिशास्त्र.

संदर्भ : 1. Abell, G. Exploration of the Universe, New York, 1964.

2. Aller, L. A. Astrophysics: The Atmospheres of the Sun and Stars, New York, 1963.

3. Baade, W. Evolution of Stars and Galaxies, Cambridge, 1963.

4. Brandt, J.C. Paul, W. H. Solar System Astrophysics, New York, 1964.

5. Chandrashekhar, S. The Present Revolution in Astrophysics, Chicago, 1966.

6. Dufay, J. (Tr.) Gingerich, O. Introduction to Astrophysics : The Stars, London, 1964.

7. Liller, W. Space Astrophysics, New York, 1961.

8. Podobed, V. V. Fundamental Astrometry : Determination of Stellar  Co-ordinates,

           Chicago, 1965.

9. Schwarzchild, M. Structure and Evolution of Stars, Princeton, 1968.

10. Singh, Jagjit, Great Ideas and Theories of Modern Cosmology, London, 1963.

11. Struve, O. Zeberges, V. Astronomy of the 20th Century, New York, 1962.

अभ्यंकर, कृ. दा. ठाकूर, अ. ना.

= –