खस्वस्तिक दूरदर्शक : पृथ्वीवरील कोठल्याही स्थळाचे अक्षांश अचूक रीतीने निश्चित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एक प्रकारच्या दूरदर्शकाचे (दुर्बिणीचे) नाव. याकरिता खस्वस्तिकाजवळील ताऱ्यांचे वेध घ्यावे लागतात, म्हणून या दूरदर्शकाला खस्वस्तिक दूरदर्शक म्हणतात. अशा प्रकारचा दूरदर्शक हूक यांनी १६६९ साली गॅमा ड्रा ताऱ्याची वार्षिक स्थानच्युती मोजण्यासाठी वापरला होता. मोलिनूक्स व ब्रॅड्‌ली या ज्योतिर्विदांसाठी जॉर्ज ग्रेअम यांनी असे दोन दूरदर्शक तयार केले होते. ब्रॅड्‌ली यांनी वॉनस्टिड येथे तो दूरदर्शक १७२७ साली बसविला होता. नंतर तो १७४९ मध्ये रॉयल ग्रिनिच वेधशाळेने विकत घेतला. १९०० साली ब्रायन कूकस‌न यांनी या दूरदर्शकात पुष्कळच सुधारणा केल्या. आता याऐवजी छायाचित्रीय खस्वस्तिक नलिका वापरतात. या उपकरणात एक उभ्या दिशेत स्थिर ठेवलेला दूरदर्शक असून त्याच्या साहाय्याने खस्वस्तिक ओलांडणाऱ्या ताऱ्यांची छायाचित्रे काढतात. हे उपकरण पूर्णपणे स्वयंचलित अस‌ल्यामुळे निरीक्षणात चूक होत नाही.

खस्वस्तिक दूरदर्शकाची नलिका कोणत्याही ऊर्ध्ववृत्तात (उभ्या पातळीतील वर्तुळात) फिरविता येते. तसेच ऊर्ध्वरेषेभोवती म्हणजेच क्षितिजस‌मांतर १८० अंशांतून ही वळविता येते. यामुळे हा दूरदर्शक कोठल्याही खस्वस्तिकीय ऊर्ध्ववृत्तात बसविता येतो. याच्या नेत्रिकेजवळ (डोळ्याकडील भिंगाजवळ) एक हालता सूक्ष्ममापक बस‌विलेला असतो. त्याच्या साहाय्याने खस्वस्तिकापासून साधारणत: स‌मान अंतरावर असलेल्या दोन ताऱ्यांचे वेध घेतात. पैकी एक खस्वस्तिकाच्या उत्तरेकडून व दुसरा दक्षिणेकडून याम्योत्तर वृत्त (खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक यांतून जाणारे वर्तुळ) ओलांडणारा असावा लागतो. सूक्ष्ममापकाची तार अशा रीतीने वरखाली केली जाते की, याम्योत्तर वृत्तावर तारकाबिंब येताच या क्षितिजसमांतर तारेने बिंबाचे दोन स‌मान अर्धे भाग व्हावेत. एका ताऱ्याचे नतांश अशा रीतीने मोजल्यावर दूरदर्शक १८० अंशांतून फिरवून दुस‌ऱ्या ताऱ्याचे नतांश अशाच तऱ्हेने मोजतात. ताऱ्यांच्या क्रांती (खगोलीय विषुववृत्तापासूनचे अंशात्मक अंतर) ठाऊक असतात. अशा रीतीने स्थळाचे अक्षांश अचूक मोजता येतात. अँड्रू टॅलकॉट यांनी सीमा स‌र्वेक्षणासाठी ही पद्धती वापरली होती. म्हणून सामान्यत: त्या पद्धतीला त्यांचे नाव देतात. पृथ्वीचा उत्तर ध्रुवबिंदू हा चल (बदलता) असला, तरी या दूरदर्शकाने कोणत्याही वेळी अक्षांश मोजता येतात हा याचा विशेष फायदा आहे.

या दूरदर्शकात काही फरक करून रॉयल ग्रिनिच वेधशाळा आणि वॉशिंग्टनची नाविक वेधशाळा यांनी नवे दूरदर्शक बनविले आहेत. त्यांत वेधनलिका ऊर्ध्वपातळीत पक्की केलेली अस‌ते. नलिकेच्या तळाशी पारा भरलेले एक छोटे पात्र असते. बिंबिकेतून (ताऱ्याकडील भिंगातून) आलेले किरण पाऱ्याच्या पृष्ठभागावर पडून बिंबिकेच्या खाली एका बिंदूत केंद्रित होतात. या ठिकाणी बिंबधारी तबकडी ठेवलेली असते व ती पुढे मागे हलविता येते. त्याच्या योगाने ताऱ्याचे याम्योत्तर वृत्तीय संक्रमण फारच अचूक मोजता येते. कालमापनासाठीही याचा उपयोग होतो. प्रमाणवेळेशी तुलना करण्यासाठी कालपट्टिका तयार करण्यातही याचा उपयोग होतो. प्रमाणित घड्याळे तपासण्यासाठीही हा दूरदर्शक वापरतात. तसेच भूगणितीय स‌र्वेक्षणामध्ये (ज्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वक्रतेचा विचार करणे आवश्यक असते अशा मोठ्या भूपृष्ठाच्या पाहणीमध्ये) व अक्षांशांतील बदल मोजण्यासाठी हा दूरदर्शक वापरतात. 

फडके, ना. ह.