भाजणे व पोळणे : त्वचा व श्लेष्मकला (शरीरातील निरनिराळ्या नलिकाकार पोकळ्यांना, उदा., आतडयाला, असलेले बुळबुळीत अस्तर) यांतील ऊतकांवर (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांवर) शुष्क व आर्द्र उष्णतेमुळे होणाऱ्या परिणामांना अनुक्रमे भाजणे आणि पोळणे म्हणतात. शुष्क व आर्द्र उष्णतेशिवाय रासायनिक विक्रियाशील किरण (उदा., सूर्यकिरण), किरणीयन (गॅमा किरण व इतर आयनीकारक-विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट यांत रूपांतर करणारे-किरण शरीरावर पडणे), रासायनिक पदार्थ घर्षण व विद्युत् यांमुळेही त्वचा भाजते. आर्द्र उष्णतेमुळे (वाफेमुळे किंवा उष्ण द्रवामुळे) होणाऱ्या इजेला ‘पोळणे’ म्हणण्याची पद्धत १९६० सालापासून बंद झालेली असून ‘भोजणे’ या एकाच संज्ञेत या सर्व प्रकाराच्या इजांचा समावेश केला जातो.

अमेरिकेत प्रतिवर्षी २० लक्ष लोकांवर भाजण्यावर उपचार कराव लागतात. त्यांपैकी जवळजवळ ८०,००० ते १,२०,००० रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागते. सु. १२,००० लोक भाजण्यामुळे मरण पावतात. प्रतिवर्षी भाजलेल्या रुग्णांची देखभाल व इलाज करण्याकरिता अमेरिकेत ६०,००,००० डॉलर खर्ची पडतात. एका अंदाजाप्रमाणे भारतातील एकटया मुंबई शहरातच प्रतिवर्षी १२,००० ते १३,००० भाजलेल्या रूग्णांवर इलाज केला जातो. भारतात प्रतिवर्षी ६,००,००० भाजलेले रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात येतात व त्यांतील सु. १,००,००० मृत्युमुखी पडतात.

इतिहास : अतिप्राचीन काळापासून मानवाचे लक्ष अग्नीमुळे झालेल्या शारीरिक इजांकडे गेले असावे. हिपॉक्राटीझ (इ. स. पू. ४६०-३७७) या ग्रीक वैद्यांनी भाजण्याच्या वेदना शमविण्याकरिता भाजलेल्या जागी गरम शिर्क्यामध्ये (व्हिनेगारमध्ये) भिजवलेली पट्टी लावण्याचा उपाय सुचविला होता. ओक वृक्षाच्या सालीपासून बनविलेले द्रावण त्या ठिकाणी लावण्याचा उपायही त्यांनी सुचविला होता. इ. स. १६०७ मध्ये जर्मन शस्त्रक्रियाविशारद फाब्रिशिअस हिल्डेनस यांनी भाजण्याचे उपचारासहित सखोल वर्णन करणारा De Combuslionbus हा पहिला छापील ग्रंथ स्वित्झर्लडमध्ये प्रसिद्ध केला होता. १८६३ मध्ये बाराडूक या शास्त्रज्ञांनी रक्ताभिसरणातील एकूण रक्तातील घट व रक्ताच्या सांद्रतेतील वाढ ही भाजलेल्या रुग्णाच्या मृत्यूची कारणे असतात, असा सिद्धांत मांडला होता. भाजलेल्या रुग्णाच्या द्रव पदार्थाच्या गरजेचा अभ्यास अंडरहिल यांनी १९२३ मध्ये केला. त्यांनी भाजलेल्या पृष्ठभागाचे आकारमान, रुग्णाची सर्वसाधारण अवस्था आणि वय यांची सांगड घालून प्रतिष्ठापना करावयाच्या द्रवासंबंधी सूचना मांडल्या होत्या.

अमेरिकेत १९४२ मध्ये बोस्टनमधील एका भयंकर आगीतील मनुष्यहानीमुळे कोप व मूर या शास्त्रज्ञांनी भाजण्यामुळे होणाऱ्या शरीरातील द्रवनाशाचा सखोल अभ्यास केला आणि द्रवनाश जसा बाह्य जखमांतून होतो तसाच शरीरांतर्गतही होतो, हे दाखवून दिले. अनेक वर्षे किती द्रवपुरवठा करावयाचा हे ठरविण्याकरिता रक्तातील तांबडया कोशिकांचे प्रमाण काढण्यासाठी उपयोगी असणारे केंद्रोत्सारक उपकरण (फिरत्या गतीचा उपयोग करून द्रव व घन भाग वेगळे करणारे उपकरण) वापरात होते परंतु केवळ त्यावरच अवलंबून राहिल्यामुळे अपुरा द्रवपुरवठा होऊन मृत्युसंख्या वाढलेली होती. १९५१ मध्ये रोग्यांच्या शरीराचे आकारमान आणि भाजलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्र यांवर आधारलेले द्रवपुरवठयासंबंधी सूत्र एव्हान्झ यांनी शोधून काढले. यात पुढे सुधारणा होत गेल्या आणि आज आय्. एफ्. के. म्यूर व टी. एल्. बार्कले यांचे सूत्र वापरात आहे.

स्थानिक उपचारांच्या निरनिराळ्या पद्धती पूर्वी उपयोगात होत्या. १९४२ मध्ये ॲलेन व कॉख यांनी व्हॅसलीन (पेट्रोलॅटम) लावलेले जाळीदार कापड जखमेवर ठेवून सूक्ष्मजंतूचा शिरकाव होऊ न देणारी पट्टी बांधण्याचा आधुनिक उपचार सुरू केला. हा उपचार १९४९ मध्ये इंग्लडमध्ये ए. बी. वॉलिस यांनी पट्टी न बांधता जखमा उघडया ठेवण्याचा उपचार अमलात आणेपर्यत लोकप्रिय ठरला होता. वॉलिस यांच्या पद्धतीला ‘अनाच्छादित उपचार पद्धत’ म्हणतात.इ. स. १९५४ नंतर भाजण्याच्या जखमांतील सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणाचा विशेष अभ्यास केला गेला व ते नियंत्रित करण्याकरिता नवीन उपाय शोधण्यात आले आणि १९६४ पर्यत त्यात सतत प्रगती होत गेली.

वर्गीकरण : भाजण्याचे वर्गीकरण निरनिरळ्या प्रकारांनी करता येते: (१) इजेची खोली, (२) इजा झालेला पृष्ठभाग आणि (३) कारणानुसार

इजेची खोली : झालेली इजा शरीरपृष्ठभागापासून किती खोल गेली आहे त्यावरून वर्गीकरणाची पद्धत अमेरिका आणि राष्ट्रकुलातील देशांतून रूढ आहे. या पद्धतीत तीन श्रेणींत विभागणी करतात.

                     इजेच्या खोलीनुसार भाजण्याची श्रेणी व भाजलेला शरीरभाग

भाजण्याची श्रेणी

भाजलेला शरीरभाग

प्रथम श्रेणी

बाह्यत्वचा

द्वितीय श्रेणी

 

(अ)पृष्ठस्थ

त्वचा जाडीचा अल्पभाग,बाह्यत्वचा व पृष्ठस्थ अंतस्त्वचा.

(आ)खोल

बाह्यत्वचा व खोल अंतस्त्वचा.

तृतीय श्रेणी

 

(अ)पृष्ठस्थ

त्वचेची संपूर्ण जाडी, संपूर्ण त्वचा.

(आ)खोल

त्वचा व अघस्त्वचीय ऊतक,स्नायू व अस्थी.


प्रथम श्रेणी : फक्त त्वचा लाल होणे. यात बाह्य त्वचेवरच परिणाम झालेला असतो. 

द्वितीय श्रेणी : यात बाह्यत्वचा आणि अंतस्त्वचेचा पृष्ठस्थ थर यांवर परिणाम आढळतो. अंतस्त्वचेच्या इजेप्रमाणे याचे (अ) पृष्ठस्थ व (आ) खोल असे उपविभाग करता येतात.

तृतीय श्रेणी : यात त्वचेच्या संपूर्ण जाडीला म्हणजे बाह्य आणि अंतस्त्वचा यांच्या संपूर्ण भागाला इजा

आ.१ त्वचा : भाजण्याची श्रेणी : (१) बाह्यत्वचा, (२) अंतस्त्वचा, (३) वसा (स्निग्ध पदार्थ) व इतर अधस्त्वतीय ऊतके, (४) प्रथम श्रेणी, (५) द्वितीय श्रेणी(पृष्ठस्थ), (६) द्वितीय श्रेणी (खोल), (७) तृतीय श्रेणी.

झालेली असते. यातही (अ)पृष्ठस्थ व (आ) खोल असे उपविभाग पाडता येतात. पृष्ठस्थ इजेत संपूर्ण त्वचेला आणि खोल इजेत त्या शिवाय अघस्त्वचीय भागांनाही इजा झालेली असते.

इजा झालेला पृष्ठभाग : शरीराच्या एकूण पृष्ठभागापैकी किती पृष्ठभाग भाजला आहे त्यानुसार भाजण्याचे वर्गीकरण करता येते. याकरिता पुलास्की व टेनिसन यांचा ‘नवांक नियम’ उपयुक्त आहे व त्यावरून भाजण्याची पृष्ठभाग-व्याप्ती चटकन समजते. शरीरपृष्ठभागाची टक्केवार विभागणी पुढीलप्रमाणे केलेली आहे : डोके आणि चेहरा ९%, खांद्यापासूनचा प्रत्येक हात ९%, धड ३६%, जांधेपासून खाली प्रत्येक पाय १८% व विटप [पुरुषातील गुदद्वार व मुष्क (जनन ग्रंथी ज्यात असतात अशी पिशवी) यांमधील क्षेत्र किंवा स्त्रीतीलगुदद्वार व भाग (बाह्य जननेंद्रिय) यांमधील क्षेत्र] १% सर्व मिळून९+१८+३६+३६+१=१००%. एकूण किती पृष्ठभाग भाजण्याने व्यापिला आहे त्यावर अवसादाची (आघातानंतर-येथे भाजल्यानंतर-आढळून येणाऱ्या सार्वदेहिक प्रतिक्षोभाची) तीव्रता अवलंबून असल्यामुळे उपाय योजनेकरिता या नियमाचा मोठा उपयोग होतो. अर्भाकात ८% पेक्षा जास्त किंवा तरुणात १५% पेक्षा जास्त पृष्ठभाग भाजला असल्यास गंभीर अवसादाची नेहमी शक्यता असते.

आ. नवांक नियम (आकडे टक्केवारी दर्शवितात).

नवांक नियमात अधिक सुधारणा करून लंड आणि ब्रौडर यांनी वयानुसार पृष्ठभाग दर्शविणारा अधिक अचूक तक्ता बनविला आहे.

 कारण : कारणपरत्वे भाजण्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते :

उष्ण द्रव : अंगावर उष्ण द्रव पडून किंवा त्याचे शिंतोडे उघडया शरीरभागावर पडून किंवा शरीरभाग उष्ण द्रवात बुडून भाजले जाते. पूर्वी अशा भाजण्याचा पोळणे असा स्वतंत्र उल्लेख करीत. येथे त्वचेचा व उष्णतेचा संपर्क अल्पकालीन आणि तोही पृष्ठभागाशी येत असल्यामुळे यात फक्त त्वचांशावर परिणाम होतो. भाजलेल्या जागी फोड येणे हे प्रमुख लक्षण असते.

ज्वाला : अंगातील कपडे पेटल्याने उदभवणाऱ्या ज्वाला या प्रकारच्या भाजण्यात बहुधा कारणीभूत असतात. या प्रकारात संपूर्ण त्वचानाश (त्वचेच्या संपूर्ण जाडीचा नाश) आढळतो. हा प्रकार नेहमी गंभीर प्रकारात मोडतो व भाजण्यामुळे होणाऱ्या मृत्यूत या प्रकारामुळे होणारे मृत्यू सर्वाधिक असतात.

विद्युत् : विद्युत् ठिणगीमुळे किंवा अशा ठिणगीने कपडे पेटून शरीर भाजते. विद्युत् भारित वस्तूला स्पर्श झाल्यासही भाजते. विद्युत् ठिणगीने कपडे पेटून भाजण्यात व ज्वालेमुळे भाजण्यात फरक नसतो. विद्युत् प्रवाह त्वचेतून किंवा इतर ऊतकातून जाताना भाजण्यासारखे दुष्परिणाम होतात. वरपांगी क्षुल्लक वाटणारी इजा अंतःस्थ भागांना गंभीर इजा करते. विजेमुळे झालेल्या भाजण्याच्या जखमांवर कणोतक (नवीनच तयार होणारे तंतुमय ऊतक) लवकर तयार होत नाही. प्रत्यक्ष अपघातानंतर काही दिवसांनी मृत ऊतक दिसू लागते.

रसायने : तीव्र अम्ले, तीव्र क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारे पदार्थ, अल्कली) व इतर काही (उदा., ब्रोमीन) रासायनिक पदार्थ अंगावर पडल्यामुळे किंवा त्यांचे शिंतोडे उडाल्यामुळे त्यांचा त्वचेशी संपर्क येऊन भाजते. रासायनिक पदार्थाचा जोपर्यत संपर्क चालू असतो तोपर्यत भाजण्याची क्रिया (ऊतकनाश) चालूच असते. याकरिता अंगावरील कपडे काढून टाकून संपर्कित भाग पाण्याने चकटन धुणे महत्त्वाचे असते. रासायनिक पदार्थामुळे, विशेषेकरून क्षारामुळे होणारी डोळ्यांची इजा गंभीर असते. याकरिता डोळे पाण्याने सतत तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ धुणे जरूर असेत.

प्रारणजन्य : (तरंगरूपी ऊर्जेमुळे उद्भतवणारे). क्ष-किरण किंवा रेडियमासारख्या पदार्थापासून होणारा किरणोत्सर्ग (भेदक कण वा किरण बाहेर पडणे) यांच्या अती उदभासनामुळे (अंगावर पडण्यामुळे) त्वचा भाजते. भाजल्याचे परिणाम मात्र नकळत व आठवडयानंतरच दिसू लागतात. एकाच मात्रेचे परिणाम तिसऱ्या आठवडयात दिसतात. इजा बहुधा खोलवर झालेली असते. आणि ती भरून येण्यास बराच विलंब लागतो. मृत ऊतक काढून टाकून मग त्वचारोपण (दुसरी त्वचा बसविण्याची क्रिया) करावे लागते. कधीकधी अशा भाजलेल्या जागी त्वचाकर्कही उद्भ)वतो.

अपघाताने अणुकेंद्रीय विक्रियकातील (अणुभट्टीतील) किरणोत्सर्गी इंधनद्रव्यामुळे किंवा द्रव पदार्थामुळे होणारे भाजण्याचे परिणाम वरीलप्रमाणेच असतात. किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या किरणोत्सर्गी प्रकारांचा) उपयोग करताना अतिशय काळजी घ्यावी लागते. अपघातजन्य अती उदभासनामुळे मृत्यू ओढवल्याचीही उदाहरणे आहेत. अणुबाँबच्या स्फोटातून अनेक प्रकारची ऊर्जा मुक्त होते आणि या उदभासनातून जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरण, गॅमा किरण वा किरणोत्सर्गी पदार्थांचा संपर्क येऊन भाजण्याची शक्यता असते. प्रारणे शरीरात खोलवर शिरुन हाडांच्या पोकळीतील ऊतकाला गंभीर इजा करतात. १५० राँटगेन उदभासन अती गंभीर परिणाम करते आणि ते ३०० पेक्षा जास्त असल्यास काही आठवडयांतच मृत्यू संभवतो. [⟶ किरणोत्सर्गी अवपात प्रारण जीवविज्ञान]


विकृतिविज्ञान : शरीरातील ऊतकांवरील उष्णतेचे दुष्परिणाम भाजण्यामध्ये दिसतात. उष्णता प्रत्यक्ष संपर्कामुळे किंवा अप्रत्यक्ष रीत्या प्रारित रुपाने हे परिणाम करते आणि ते अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. यांमध्ये उष्णतेचे मान (तापमान), संपर्क काल, ऊतकाची औष्णिक संवाहकता वगैरेंचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे ४५० से. पेक्षा कमी मानाची उष्णता २० मिनिटांपेक्षा अधिक काल संपर्कात राहूनही अत्यल्प इजा करते, तर ६०० से. पेक्षा जास्त मानाची उष्णता केवळ १ मिनिटाच्या संपर्कात खोलवर इजा करते.

 त्वचेशी उष्णतेचा संपर्क आल्यामुळे अंतस्त्वचेचे व अधस्त्वचीय ऊतकातील केशवाहिन्यांचे (सूक्ष्मतम रक्तवाहिन्यांचे) विस्फारण होते. केशवाहिन्यांच्या भित्तीस इजा झाल्यामुळे रक्तस्त्राव होऊन तो ऊतकात पसरतो. पुष्कळ वेळा या वाहिन्यांतील रक्ताचे अंतर्क्लथन (रक्त साखळून त्याची बनलेली गुठळी वाहिनीत अडकून रक्तप्रवाह बंद पडणे) होते. विस्फारणामुळे आतील द्रव (विशेषेकरुन रक्तरस) त्वचेत पसरतो व अशा प्रकारे फोड तयार होतात. याशिवाय जखमी पृष्ठभागातूनही पुष्कळ द्रव पदार्थ वाहू लागतो. परिणामी रक्तभिसरणातील एकूण द्रवापैकी बराचसा नाश पावतो. हा द्रवनाश (१) एकूण भाजलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्र आणि (२) भाजण्याची खोली यांवर अवलंबून असतो. द्रवनाशाचे प्रमाण १०% क्षेत्र भाजलेले असल्यास जास्त असते आणि द्रवनाश भाजल्यानंतरच्या पहिल्या काही तासांतच जलद व अधिक प्रमाणात होतो. ४८ तासांनंतर हा द्रवनाश जवळजवळ थांबतो. रक्तातील तांबडया कोशिकांच्या नाशामुळे व द्रवनाशामुळे रक्ताचे सांद्रण होते अल्पमूत्रता, प्रथिनन्यूनता व निर्जलीभवन उत्पन्न होतात आणि अवसादाची लक्षणे दिसू लागतात.

 उपद्रव : सूक्ष्मजंतू, संक्रामण, टी. बी. कर्लिग या इंग्रज वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा जठरातील किंवा ग्रहणीतील (लहान आतडयाच्या पहिल्या भागातील) व्रण आणि अयोग्य उपचार झालेल्या दुर्लक्षित रुग्णामध्ये अक्षम बनविणारी विद्रूपता यांचा समावेश काही उपद्रवांत होतो.

सूक्ष्मजंतू संक्रामण : सूक्ष्मजंतूंचे संक्रामण हे भाजण्यातील मृत्यूकारणांतील प्रमुख कारण आहे. सूक्ष्मजंतू संक्रामण पुढील भागांत उदभवू शकते : (१) भाजलेल्या त्वचा पृष्ठभागात, (२) कायम ठेवलेल्या मूत्रसुषिरीमुळे (मूत्राशयातील मूत्र काढून टाकण्यासाठी मूत्रमार्गातून बसविलेल्या नळीमुळे) मूत्राशयात, (३) नीलावेध केलेल्या ठिकाणी, (४) फुप्फुसात.

कर्लिंग जठर किंवा ग्रहणी व्रण : गंभीर व शरीराचे बरेचसे क्षेत्र व्यापलेल्या भाजलेल्या रुग्णामध्ये (विशेषेकरुन सूक्ष्मजंतू संक्रामण झालेल्या रुग्णात) जठरात किंवा ग्रहणीमध्ये व्रण उत्पन्न होतो.

विद्रुपता : संपूर्ण त्वचेला हानी झालेल्या रुग्णाच्या जखमा भरुन येताना, विशेषेकरुन दुर्लक्ष झालेल्या रुग्णांच्या जखमा भरुन येताना पुष्कळ वेळा शरीरभाग अक्षम बनून विद्रूपता आणणारी आकुंचने तयार होतात. योग्य वेळी त्वचारोपण केल्यास ही विद्रूपता टाळता येते.

आ. ३. अक्षम विद्रूपता : चर्मसूत्रामुळे (त्वचेखाली संयोजी ऊतकाची अती तंतुमय वाढ झाल्यामुळे) बाहूंची हालचाल मर्यादित झाली आहे.

फलानुमान : कोणत्याही विशिष्ट भाजलेल्या रोग्याबद्दलचे फलानुमान (लक्षणांवरून रुग्ण बरा होण्यासंबंधीचे करण्यात येणारे अनुमान)ठरवणे कठीण असते. भाजण्याचे गांभीर्य व वाढते वय यांमुळे मृत्यु प्रमाण वाढते. पूर्वी शरीराच्या पृष्ठभागाचा एक तृतीयांश भाग भाजलेलारोगी निश्चीत मृत्युमुखी पडे. आज ५० ते ६० % पृष्ठभाग भाजलेले रोगी वाचू शकतात, तरीही ४० % भाग भाजलेल्या रुग्णाचे फलानुमान अनिश्चितच असते. ८५ % भाजलेला रुग्ण सहसा जिवंत राहत नाही. चार वर्षे वयाखालील मुले व पासष्ठीच्या वरील वृध्द यांमध्ये भाजण्याची सहनशीलता पुष्कळच कमी असते. इतर रोगाने ग्रासलेल्या रुग्णातील भाजण्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांनी फलानुमान गंभीर बनते.

उपचार : भाजण्यावरील उपचारासंबंधीचे विचार तीन सदरांत मांडता येतात : (१) प्रतिबांधात्मक उपाय, (२) प्रथमोपचार आणि (३) रुग्णोपचार.


प्रतिबंधात्मक उपाय : यांमध्ये काही सोप्या उपायांचा समावेश होतो. उदा., कपडे पेटलेल्या व्यक्तीने पळू नये कारण तसे केल्याने ज्वाला अधिक भडकून जादा शरीरहानीच संभवते. तसेच उभे न राहता जमिनीवर आडवे पडणे उत्तम. त्यामुळे ज्वालांनी श्वसन मार्गाची होणारी इजा कमी होते व केस पेटत नाहीत. अग्निशामक उपकरणे नेहमी सुसज्ज ठेवण्याने मानवी प्राणहानी मोठया प्रमाणावर टळण्याची शक्यता असते [⟶ आगनिवारण]. अलीकडे पाश्चात्य देशांतून व ऑस्ट्रेलियात अग्निशामक दलातील सेवकांना विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या घोंगडया संरक्षणार्थ देण्यात येत आहेत. या घोंगडया ‘वॉटर जेल’ नावाच्या पदार्थाने संपृक्त केलेल्या (जास्तीत जास्त प्रमाणात शोषविलेल्या) असतात. ७५ सेंमी. × ९० सेंमी. आणि १५० सेंमी × १९० सेंमी या आकारमानाच्या अशा घोंगडया बंदिस्त डब्यातून मिळतात व त्या आग लागलेल्या ठिकाणी सहज नेता येतात. ही घोंगडी डोक्यावरुन पांघरून घेऊन अग्निशामक दलाचा सेवक प्रत्यक्ष ज्वालांमधून इजा न होता सहज जाऊ शकतो. जमिनीवरील ज्वालांवर घोंगडी पसरल्यास त्याखालील आग विझून अडकलेली माणसे चालत बाहेर पडू शकतात.

प्रथमोपचार : एके काळी कपडे पेटलेल्या व्यक्तीच्या अंगावर पाण्याचा थेंबही टाकू नये, अशी कल्पना रूढ होती. आज हात, बाहू व पाय या भांगाच्या भाजण्यावर थंड पाण्याचा उपचार मान्य झाला आहे. भाजलेला भाग सु. १५० से. तापमानाच्या (नळातून येणाऱ्या) पाण्याखाली दोन मिनिटापर्यंत धरून ठेवावा. यामुळे वेदना शमतात आणि निःस्त्राव कमी होतो. भाजलेल्या जागी बर्फ केव्हाही लावू नये. भाजलेला भाग पाण्याखाली धरण्यामध्ये सूक्ष्मजंतू संक्रामणाचा धोका आहे पण जेव्हा रुग्णास रुग्णालयात पोहोचविण्यात विलंब लागणार असेल तेव्हा हा उपाय उपयुक्तच ठरतो.

शरीरावरील त्वचेचा अल्पांश भाजणे एकूण पृष्ठभागाच्या १० %पेक्षा कमी किंवा संपूर्ण त्वचा भाजणे २ % पेक्षा कमी असेल, तर अशा भाजण्याला ‘क्षुल्लक भाजणे’ म्हणतात. क्षुल्लक भाजण्यावर जागा स्वच्छ केल्यानंतर साधी पट्टी बांधणे पुरेसे असते. कधीकधी बाजारात तयार मिळणारी बरनॉल, प्रोपामिडीन यांसारखी वरुन लावण्याची औषधे उपयुक्त असतात.

गंभीर प्रकारात प्रथम जखमा आच्छादित करण्याकडे लक्ष द्यावे लागते. बर्फाच्या पाण्यात भिजवलेला स्वच्छ टॉवेल गुंडाळण्याने वेदना थांबतात. ५ % पेक्षा जास्त पृष्ठभाग भाजलेल्या रुग्णास वैद्याने तपासणे जरूर असते. घरगुती उपाय म्हणून शाई, लोणी यांसारखे पदार्थ भाजलेल्या जागी लावणे कटाक्षाने टाळावे. बर्फाच्या पाण्याचा वरील उपचार अर्ध्या तासाच्या आत केल्यास उपयुक्त ठरला आहे. रासायनिक पदार्थाने भाजलेला भाग नळाखाली धरण्यास योग्य असल्यास १५ ते ३० मिनिटांपर्यंत धुवून टाकावा. विजेमुळे भाजलेल्या रुग्णाला वैद्यानेच तपासणे जरूरीचेअसते, सर्व प्रकारच्या भाजण्यावर विशेषेकरून उघडी जखम होण्याची शक्यता असते. तेव्हा धनुर्वात प्रतिबंधक लस टोचणे आवश्यक असते.

अलीकडेच बर्मिंगहॅम व दिल्ली येथे एकाच वेळी केलेल्या प्रयोगांती असे आढळले आहे की, भाजण्याच्या जखमांतील सूक्ष्मजंतू संक्रमणास प्रामुख्याने कारणीभूत असलेले ‘स्यूडोमोना’ प्रकारचे सूक्ष्मजंतू मृत्यूचे प्रमुख कारण असतात. बर्मिंगहॅम येथील अपघात रुग्णालयातील रॉडरिक जोन्स यांनी सूक्ष्मजंतूंना प्रतिरोध करु शकणारी व तोंडाने देता येण्याजोगी लस शोधून काढली आहे. दिल्लीत ही लस वापरली असता भाजलेल्या रुग्णांतील मृत्युप्रमाण एक तृतीयांशापेक्षा अधिक घटल्याचे आढळले आहे.  


रुग्णोपचार : या सदरात रुग्णालयातील उपचारांसंबंधी थोडक्यात माहिती दिली आहे.

रुग्णालयात येणारा भाजलेला प्रत्येक रोगी तातडीच्या उपचार विभागात ठेवणे जरूर असते. शक्य असल्यास रुग्णास अलग ठेवून रोधशुश्रूषा (सूक्ष्मजंतू संक्रमणास प्रतिरोध करणारी विशेष काळजी घेणारी शुश्रूषा) करणे उत्तम. रुग्णाच्या श्वसनमार्गांकडे ताबडतोब लक्ष देणे जरूरीचे असते. ऑक्सिजन-पुरवठा व जरूर असल्यास श्वासनालभेद शस्त्रक्रिया (कंठापासून फुप्फुसापर्यंत जाणाऱ्या कूर्चामय व पटलमय नळीला छिद्र पाडण्याची शस्त्रक्रिया) करावी लागते. वेदना कमी करण्याकरिता १० ते २० मिग्रॅ. मॉर्फिन अंतर्नीला अंतःक्षेपणाने (शिरेत द्यावयाच्या इंजेक्शनाने) किंवा द्रव-चिकित्सेतील द्रवात मिसळून देतात. नवांक नियमाचा उपयोग करुन एकूण किती त्वचा पृष्ठभाग भाजलेला आहे हे ठरवावे व त्यानुसार एकूण द्रवपुरवठा किती करावयाचा हे ठरवता येते. १५% पेक्षा अधिक पृष्ठभाग भाजलेल्या सर्व प्रौढ रुग्णांना तसेच १०% पेक्षा जास्त भाजलेल्या सर्व लहान मुलांना ताबडतोब डेक्स्ट्रान (अधिक रेणुभार असल्यामुळे रक्तरसदृश असलेले साखरेचे द्रावण) किंवा रक्तरस अंतर्नीला अंतःक्षेपणाने देतात. एकूण ठऱवलेला द्रवपुरवठा सहा भागांत विभागून देतात. पहिल्या बारा तासांत तीन भाग, दुसऱ्या बारा तासांत दोन भाग आणि तिसऱ्या या बार तासांत उरलेला एक भाग वापरतात. एकूण द्रव किती द्यावयाचा हे चटकन ठरविण्याकरिता म्यूर व बार्कले या रोपशस्त्रक्रियातज्ञांनी शोधलेले पुढील सूत्र उपयुक्त असते.

एक भाग = एकूण भाजलेले प्रतिशत क्षेत्र × रुग्णाचे वजन (किग्रॅ.)

 (मिली.मध्ये)                           २

 उदा., एकूण भाजलेले क्षेत्र ३०% व रुग्णाचे वजन ५० किग्रॅ. असेल,

 तर एक भाग      = ३० × ५०  = ७५० मिलि.

                                   २

 भाजलेल्या रुग्णातील नीला अंतःक्षेपणाकरिता सापडणे पुष्कळ वेळा कठीण असते. नीला चटकन सापडण्याकरिता नीलावेध शस्त्रक्रिया (योग्य त्या नीलेवरील ऊतक कापून प्रत्यक्ष नीलेतच सुई घालण्याची शस्त्रक्रिया) करतात.

रुग्णाच्या सुधारणेतील प्रगतीचा अंदाज पुढील गोष्टींवर लक्ष ठेवून करता येतो : (१) रक्तदाब व नाडीची गती, (२) अस्वस्थता, (३) रक्तातील तांबड्या कोशिकांचे प्रमाण, (४) मूत्राची घनता, (५) उलटीतील किंवा जठरातून नळीवाटे काढलेल्या द्रवाची प्रयोगशालेय तपासणी व (६) मध्यवर्ती नीला दाब (विशिष्ट उपकरणाव्दारे नीलेतील रक्तादाब तपासणी). मूत्राची घनता मोजण्याकरिता ३५% पेक्षा जास्त पृष्ठभाग भाजलेल्या प्रत्येक रुग्णात मूत्रसुषिरी बसवून ठेवून मूत्र बाटलीत गोळा करतात.

वरील उपचार प्रामुख्याने रुग्णास अवसादाची गंभीर अवस्था टाळण्याकरिता किंवा त्या अवस्थेतून रुग्णास वाचविण्याकरिता असतात. त्यानंतरच म्हणजे धोका टळल्यानंतरच स्थानीय (भाजलेल्या भागावरील) इलाजांचा विचार करणे योग्य असते.


स्थानीय उपचारात सर्वप्रथम सूक्ष्मजंतू संक्रामण न होऊ देण्याकडे लक्ष द्यावयास हवे. त्याकरिता मिठाचे द्रावण आणि १% सीटॅव्हिलॉन (सेट्रिमाइड) यांच्या पूतिरोधक (सूक्ष्मजंतूंचा नाश करणाऱ्या किंवा त्यांची वाढ रोखणाऱ्या) मिश्रणाने जखमा स्वच्छ कराव्यात. याच वेळी तळहात व तळपाय सोडून इतरत्र असलेले द्रवयुक्त फोड फोडावे. जखमांना प्रत्यक्ष स्पर्श करणे टाळावे. निरनिराळ्या रुग्णालयांतून जखमांवर उपचार करण्याच्या निरनिराळ्या पध्दती उपयोगात आहेत. याशिवाय विशिष्ट भागानुरुप वेगवेगळे उपचार करतात. या उपचारपध्दती पुढे थोडक्यात दिल्या आहेत : (अ) अनाच्छादित उपचार, (आ) आच्छादित उपचार, (इ) सल्फामायलॉन अथवा १०% मॅफेनाइड हायड्रोक्लोराइडाचे द्रावण जखमांवर लावणे, (ई) सिल्व्हर नायट्रेटाचे ०.५% संहतीचे द्रावण.(१०० ग्रॅ. द्रावणात ५ ग्रॅ. सिल्व्हर नायट्रेट असलेले द्रावण) लावणे, (उ) पहिल्या अठ्ठेचाळीस तासांतच भाजलेला भाग कापून काढून टाकणे (फक्त १५% पेक्षा कमी भाजलेल्या रुग्णांतच) व पुढील चार दिवसांत त्वचारोपण करणे, (ऊ) उशिरा म्हणजे जखमांवर कणोतक तयार होईपर्यंत थांबून नंतर त्वचारोपण करणे.

आ.४. अनाच्छादित उपचार : (अ) पेट्रोलाच्या ज्वालांमुळे भाजलेला चेहरा (आ) तीन आठवड्यांच्या अनाच्छादित उपचारानंतर पूर्ण बरा झालेला तोच चेहरा.(अ) अनाच्छादित उपचार : यामध्ये जखमा उघड्या ठेवून शुंश्रूषा करतात. चेहरा, नितंब, विटप आणि पाठ या शरीरभागांवरील भाजलेले क्षेत्र हवेवर उघडे टाकतात. जखमेवर हळूहळू कोरड्या मृत ऊतकाचा थर जमतो व त्याच्या खाली कणोतक तयार होते. योग्य वेळी हा थर काढून टाकून त्वचारोपण करतात. व्दितीय श्रेणीतील पृष्ठस्थ भाजलेला भाग या पध्दतीने त्वचारोपणाशिवाय बरा होतो.

या पध्दतीत कधीकधी पॉलिमिक्सीन, निओमायसीन, बॅसिट्रॅसीन यांसारख्या पूतिरोधक औषधांचा फवारा जखमांवर मारणे हितावह असते.

(आ) आच्छादित उपचार : यांमध्ये जखमांवरचा पहिला थर न चिकटेल असा व पूतिरोधकाचा दुसरा थऱ जाळीदार सुती कापडाचा आणि या दोहोंवर तिसरा थर शोषक लोकरीचा असावा. हा तिसरा थर जखमेतून होणारा सर्व निःस्त्राव शोषून घेईल एवढा जाड असावा. हा थर व एकूण पट्टी तिसऱ्या आणि नंतर दहाव्या दिवशी बदलतात.

(इ) सल्फामायलॉन लावणे : हे औषध भाजल्यानंतर ताबडतोब लावल्यास सूक्ष्मजंतूंची संख्या बरीच कमी होते, असे आढळले आहे. वर बसणाऱ्या खपलीसारख्या थरातून त्याचे क्रीम खोलवर जाऊन जंतुनाश करते. काहीसा जाड थर लावल्यानंतर १५ ते २० मिनिटे आग होते. क्रीम दररोज लावतात.

 (ई) सिल्व्हर नायट्रेटाच्या द्रावणात भिजवलेल्या पट्टयांनी भाजलेले क्षेत्र आच्छादणे : या उपचाराचा प्रमुख फायदा म्हणजे सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली जाते हा आहे. या उपचारात पट्टया दररोज बदलाव्या लागत असल्यामुळे रूग्णाचे, परिचारिकांचे व वैद्यांचे कपडेखराब होतात. याशिवाय जखमांतील निःस्त्रावाद्वारे शरीरातील खनिजे नाश पावतात.

(उ) फक्त १५% पेक्षा कमी भाजलेल्या रुग्णातच ही उपचार पद्धत वापरता येत असल्यामुळे ती मर्यादित प्रमाणातच वापरणे शक्य असते.

(ऊ) बहुतेक सर्व तृतीय श्रेणीतील भाजण्यावर त्वचारोपण करावे लागते.

आ. ५. पाठीवरील भाजलेले क्षेत्र : अनाच्छादित उपचाराखाली शुश्रूषा करताना विशिष्ट अंगस्थिती ठेवावी लागते.

वरील सर्व उपचारांचा प्रमुख उद्देश सूक्ष्मजंतू संक्रामण थोपविण्याचाच असतो. त्यामुळेच त्वचारोपणास योग्य कणोतक तयार होते. यास पुष्कळ वेळा विलंब लागतो. डोळ्याभोवतालची जागा, गुडघे, कोपर व काख या ठिकाणच्या त्वचारोपणास इतर भागांपेक्षा अग्रक्रम देतात. आकुंचनामुळे विद्रूपता येणार नाही अशा रीतीने योजनाबद्ध त्वचारोपण करतात. अलीकडील नव्या शोधामुळे त्वचारोपण अधिक सुलभ झाले आहे. एखाद्या अन्य व्यक्तीच्या त्वचेचे रुग्णाच्या भाजलेल्या जागी रोपण करणे, रुग्णाच्या स्वतःच्या शरीराच्या अन्य भागावरील त्वचेचे भाजलेल्या जागी रोपण करणे यांशिवाय त्वचारोपणासाठी प्लॅस्टिकची कृत्रिम त्वचाही उपलब्ध झाली आहे.या सर्वांचा निदान ‘जैव’ पट्टीसारखा जखमांवर निश्चित उपयोग होतो, हे सिद्ध झाले आहे. 

 कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन : भाजण्याचे चार प्रकार होतातः (१) पोळणे, होरपळणे (२) फोड, लाली, आग, पिकणे (३) ताडाच्या झाडाच्या रंगासारखा व्रणाचा रंग दिसणे (४) मांसाचे तुकडे लोंबकळल्यासारखे दिसणे. ताप, तहान, मूर्च्छा इ. उपद्रव असणे.

उपचार : होरपळले गेले असेल, तर तेथे शेकावे आणि तगर, देवदार इ. औषधे उगाळून त्यांचा लेप करावा. ह्या अवस्थेत थंड पाणी ओतणे किंवा चंदन, वाळा इ. थंड लेप ह्यांचा उपयोग मुळीच करू नये. केल्यास लाली, आग व वेदना वाढतात. दुसऱ्या प्रकारात सर्व थंड चिकित्सा करावी. चंदन, वाळा इ. औषधांचा तुपामधून लेप करावा किंवा वाळा, चंदन ह्यांचे पाणी शिंपडावे. तिसऱ्या प्रकारात वंशलोचन, चंदन आणि गेरू व गुळवेल तुपातून लावावे. तसेच बैल इ. गावातल्या, डुक्कर इ. आनुप प्राण्याच्या आणि कासव इ. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचे मांस वाटून त्याचा लेप करावा. पित्तविद्रधीसारखी चिकित्सा करावी. चवथ्या प्रकारात लोंबकळणारे मांसाचे भाग कातरीने कातरून काढावे. ह्यावर सर्व थंड चिकित्सा करावी. शाली जातीच्या भाताच्या कण्या, टेंबुर्णीची साल व तिच्या फळाची साल तुपामध्ये मिसळून लेप करावा आणि व्रणावर निरनिराळया कमळांची पाने पसरावीत. भाजलेला व्रण कधीही बांधू नये. इतर चिकित्सा पित्त विसर्पाची करावी. जर उकळलेले तेल वा तूप अंगावर पडून भाजले गेले असेल, तर वरील स्निग्ध उपचार करू नये रूक्ष उपचार करावेत. चंदन, गेरू, वंशलोचन इ. तुपाबरोबर न लावता पाण्याबरोबरच लावावीत.

पटवर्धन, शुभदा अ.


पशूंतील भाजणे व पोळणे : मनुष्यमात्राप्रमाणे शुष्क उष्णता (आग, ज्योत-भाजणे) व आर्द्र उष्णता (वाफ, गरम पाणी-पोळणे) या दोन्ही प्रकारांनी पाळीव जनावरांमध्ये अपघाती इजा क्वचित आढळून येतात. कुत्री व मांजरे यांच्या अंगावर गरम द्रव पदार्थ पडल्यामुळे, केसाळ कुत्र्यांच्या केसांना शेकोटीमधील जाळाचा स्पर्श होऊन भाजल्यामुळे व गोठयाला लागलेल्या आगीत मोठया प्रमाणावर भाजल्यामुळे गाईगुरांना अशा इजा संभवतात. भाजल्यामुळे झालेल्या जनावरातील जखमा त्वचेवरील केस जळून गेल्यामुळे चटकन लक्षात येतात पण पोळण्यामुळे झालेली जखम क्वचित त्या ठिकाणी तयार होणाऱ्या खपलीखाली झाकून गेल्यामुळे काही दिवसही लक्षात येत नाही. दाहक क्षार व रसायने, क्ष-किरण, रेडियम इ. कारणांनी भाजल्यामुळे होणाऱ्या जखमा जनावरांमध्ये सहसा आढळून येत नाहीत. भाजण्याचे-पोळण्याचे प्रमाण बरेच असेल, तर तीव्र वेदना होऊन अवसाद होण्याचा संभव असतो तथापि त्याचे प्रमाण मनुष्य मात्रापेक्षा पुष्कळच कमी असते. अंगाला कंप सुटणे, अंत्यावयव थंड पडणे, नाडी कमजोर होणे, श्वासोच्छवासाला कष्ट पडणे आणि शेवटी मूर्च्छा व मृत्यू ही अवसादाची लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. जळालेल्या ऊतकामध्ये काही तासांतच तयार होणारी विषे शोषून घेतली गेल्यामुळे विषरक्तता (सूक्ष्मजंतू एका ठिकाणी गोळा होऊन त्यांच्यापासून तयार झालेली विषे रक्तात मिसळली जाऊन रक्तपरिवहनाबरोबर शरीराच्या सर्व भागांत पसरल्याने निर्माण होणारी अवस्था) होते. जनावरामध्ये जखम जंतुरहित ठेवणे कठीण जाते व भाजल्यामुळे झालेल्या जखमेशेजारील ऊतकामधील प्रतिरोधशक्ती कमी झाल्यामुळे रोगकारक जंतूंचा शरीरात प्रवेश सुलभ होऊन जंतुरक्तता (सूक्ष्मजंतूंचा रक्तात प्रवेश होऊन ते रक्तपरिवहनाबरोबर सर्व शरीरात पसरल्यामुळे उद्भ वणारी अवस्था) होते.

उष्णतेच्या कमीअधिक तीव्रतेमुळे त्वचा व तिच्याखाली ऊतकाला किती खोलवर इजा पोहोचली आहे त्यानुसार मनुष्यातील या जखमांच्या वर्गीकरणाप्रमाणे पशूंमधील जखमांचे वर्गीकरण करतात. भाजलेल्या जागेची त्वचा लाल होणे, बाह्य त्वचा गळून पडणे, द्रवयुक्त फोड येणे, त्वचेचा थर पूर्णपणे जळून जाणे किंवा त्याहीपेक्षा खोलवर स्नायू व हाडापर्यंत इजा पोहोचणे अशी क्रमशः वर्गवारी करण्यात येते. शरीराच्या आकारमानाच्या १/३ भाग पेक्षा अधिक भाग भाजलेला असल्यास अवसाद, विषरक्तता अगर जंतुरक्तता यांमुळे जनावर मृत्यू पावतो.

घोडयांना नाल मारण्याच्या पद्धतीतील नाल गरम करून मारण्याच्या प्रकारामध्ये केव्हा केव्हा खुराच्या तळव्याच्या शृंगी (शिंगासारख्या द्रवाने बनलेल्या) भागाखआलील संवेदनाक्षम भाग जळून दुखापत होते व तळव्याचा शृंगी भाग अलग होतो. भाजल्यामुळे आजारी झालेले जनावर खाणे बंद करते. तापमान वाढणे, तहान व अतिसार ही लक्षणे दिसून येतात.

प्रत्यक्ष भाजलेल्या भागावरील, तसेच सर्वसाधारण उपचार मनुष्य मात्राप्रमाणे केले जातात. यामध्ये पूतिरोधक व प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा पेस्ट, जेली इ. स्वरूपांत समावेश असतो. वेदना कमी करण्यासाठी भाजलेल्या भागावर चिनी माती, अंडयातील पांढरा बलक, स्टार्चाची पेस्ट लावतात. यांशिवाय चुन्याची निवळी, निवळी व अळशीचे तेल यांचे पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांचे मिश्रण), पित्रिक अम्लाचे १ ते २% संहतीचे द्रावण इ. औषधांचा वापर करतात. मोठया प्रमाणावर जनावरांचे अंग भाजले असल्यास भाजलेल्या भागावर उपचार करण्याआधी शुद्धिहारके देतात. त्यामुळे वेदना कमी होऊन अवसादाचे प्रमाण कमी होते. उपचारांचा उद्देश जळालेल्या त्वचेच्या पृष्ठभागाखाली प्रथिनांचे किलाटन करणे (द्रावणात लोंबकळत्या स्थितीत असलेल्या कणांचे न विरघळणाऱ्या साक्यात रूपांतर करणे) हा असतो. त्यामुळे तेथे तयार झालेल्या विषांचे शोषण होण्यामध्ये अडथळा उत्पन्न होतो. टॅनिक अम्लामुळे ही क्रिया होऊ शकते म्हणून प्रथमोपचार म्हणून भरपूर उकळलेल्या चहाच्या पाण्यामध्ये बुडविलेला कापूस भाजलेल्या जागेवर लावून ठेवतात. औषधे लावलेल्या जखमा जनावरांनी चाटू नये याकरिता उपाययोजना करणे जरूर असते. भाजण्यामुळे झालेल्या जखमांच्या उपचाराशिवाय काही वेळा प्रतिजैव औषधे व लवण द्रावण यांची अंतःक्षेपणे देणे व रक्ताधान (बाहेरून रक्त देण्याची क्रिया) करणेही जरूरीचे असते.

दीक्षित, श्री.गं.

संदर्भ : 1. Artz, C. P. Monceief, J. A. The Treatement of Burns, Philadelphia, 1969.

            2. Crews, E. R. Practical Manual for the Treatment of Burns, Springfield, 1964.

            3. Lal, Sangham and others, Ed., Textbook of Surgery, New Delhi, 1975.

            4. Miller, W.C. West G.P., Ed., Black’s Veterinary Dictionary, London, 1962.

            5. Rains, A. J. H. Ritchie, H. D. Bailey and Love’s Short Practice of Surgery, London, 1977.

            6. Sabiston, D. C. Ed., Davis-Christopher Textbook of Surgery, Tokyo, 1972.