वरडोळ्या वरडोळ्या : या माशाचा समावेश लॅब्रिडी (युरॅनोस्कोपिडी) कुलात होत असून याचे शास्त्रीय नाव इक्थिस्कोपस लेबेक (इ. इनर्मिस) व इंग्रजी नाव स्टार गेझर असे आहे. याचा प्रसार अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर ते जपानपर्यंत आहे. तसेच तो ग्रेट वॅरिअर रीफ परिसरातही आढळतो. तो समुद्रतळाशी चिखलात राहतो. त्याचा रंग कॅनरी पिवळा असून दोन्ही बाजूंवर भुऱ्या तपकिरी खुणा असतात. या खुणांनी पांढरे शुभ्र गोल किंवा अंडाकृती ठिपके वेढलेले असतात. असेच पांढऱ्या रंगाचे ठिपके छातीवरील व पाठीवरील परांवर असतात. डोक्याची वरची बाजू तपकिरी असते. शेपटीचा पर तपकिरी पिवळा व त्यांच्या कडा गर्द आणि छातीवरील व शेपटीच्या परांवर एक गर्द आडवा पट्टा असतो. याचे डोळे डोक्याच्या मध्याच्या पुढच्या भागात असतात म्हणून याला वरडोळ्या हे नाव पडले असावे. याची लांबी ६२ सेंमी. पर्यंत व डोक्याची सर्वात जास्त रुंदी त्याच्या एकूण लांबीच्या / असते. तोंडाची फट जवळजवळ उभी असते. याचे ओठ असंख्य शाखायुक्त अंकुरांनी आच्छादिलेले असतात. पुढची नाकपुडी गोल व डोळ्याच्या मघ्याच्या समोर असते. ती ओठांवरील अंकुरांनी वेढलेली असते. मागची मोठी, अंडाकृती नाकपुडी अशाच प्रकारच्या अंकुरांनी वेढलेली असते. वरच्या जबड्यात अणकुचीदार दातांच्या ओळी असतात. खालच्या जबड्यात कोनाकार दातांची मोठ्या फटी असलेली एक ओळ असते. पाठीवरच्या परातील काटे कमकुवत असतात. शेपटीचा पर साधारण गोलसर असतो. पार्श्वक रेखा खांद्यापासून सुरु होऊन पाठीवरील तिसऱ्या काट्याच्या बुडापर्यंत जाते व संपूर्ण लांबीनंतर ती त्या पराच्या तळाजवळून जाते. त्याला एक विष उपकरण असते. ते छातीवरील दोन काट्यांचे बनलेले असून काट्यांना विष ग्रंथी जोडलेल्या असतात. याशिवाय याला एक विद्युत् अंग असते. ते डोळ्याच्या मागे असते. त्याची रचना गुंतागुंतीची असून ते विद्युत् पट्टिकांच्या अनेक थरांचे बनलेले असते. त्याच्या अंगी तीव्र वेदना होतील एवढा विजेचा धक्का देण्याची क्षमता असते.  

जमदाडे, ज. वि.