बेडूक : हा चतुष्पाद प्राणी उभयचर वर्गातील (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या वर्गातील) सलाएन्शिया किंवा ॲन्यूरा या गणात आढळतो. या गणातील रॅनिडी या कुलात आढळणारे उभयचर खरे बेडूक होत पण इतर काही कुलांतील उभयचरांसही सर्वसाधारणपणे बेडूक असेच संबोधितात. या वर्गात ⇨ सॅलॅमॅंडर, ⇨ न्यूट, ⇨ सिसिलियन व ⇨ मॅक यांचाही समावेश आहे. रॅनिडी या कुलात सु. ३० वंशांचे आणि ५०० जातींचे बेडूक आहेत. यांचा प्रसार जगात सर्वत्र झाला आहे. यांपैकी एकट्या राना या वंशातच २०० जाती आहेत. रॅनिडी कुलातील फक्त राना हाच वंश उत्तर अमेरिकेत आढळतो. राना वंशातील बेडूक यूरोप आणि आशिया खंडांतही आढळतात.ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागात हे आढळत नाहीत. भारतात रॅनिडी या कुलातील अंदाजे ५० जाती आहेत. यांपैकी राना टायग्रिना, रा. सायनोफ्लीक्टीस व रा. हेक्झॅडंक्टिला या सर्वसाधारण आढळणाऱ्या जाती होत.

आ. १. प्रौढ बेडूक

बेडकांच्या पुष्कळशा जातींचा रंग पिंगट हिरवा किंवा तपकिरी असतो. काही जातींचे रंग भडक असतात, तर कही जाती आपले रंग बदलू शकतात. बेडकांची त्वचा मऊ व ओलसर असते. काही बेडकांच्या पाठीवरील त्वचेत विषारी ग्रंथी असतात. बेडकांचे पाय लांब असतात व त्यामुळे त्यांना पोहण्यास व लांब उड्या मारण्यास मदत होते. काही आफ्रिकन बेडून २.४ मी. लांब उडी मारू शकतात. काही बेडकांच्या पायात बोटांमध्ये कातडे असते. यामुळे त्यांना पोहणे सुलभ होते. जास्त वेळ जमिनीवर राहणारे बेडूक वरून भेकाप्रमाणे दिसतात. त्यांच्या बोटावर एक गाठ असते. तिच्यामुळे त्यांना जमीन खणणे सुलभ जाते. काहींच्या बोटांची टोके चकतीसारखी असतात. त्यांचा उपयोग झाडावर चढण्यासाठी होतो.

 पूर्ण वाढ झालेल्या बेडकाची लांबी काही जातींत २.५ सेंमी. पेक्षा कमी असते, तर काहींत ती २५ सेंमी. पर्यंत असते. रा. गोलियाथ हा पश्चिम आफ्रिकेतील बेडूक सर्वात मोठा गणला जातो. याची लांबी २५ सेंमी. असते. सर्व बेडकांत मादी ही नरापेक्षा आकारमानाने मोठी असते.

 नराचे ध्वनिकोश विणीच्या हंगामात प्रसरण पावतात व तो मोठ्याने डरांव डरांव असे ओरडू लागतो. हे ओरडणे मादीला बोलाविण्याकरिता असते. मादीला ध्वनिकोश नसतो व ती आवाजही काढीत नाही. पाण्यातच नर मादीच्या पाठीवर चढून बसतो व पुढच्या पायांनी तिला घट्ट धरून ठेवतो. नराच्या पुढच्या पायाच्या अंगठ्याजवळील भाग जाड असतो. विणीच्या हंगामात हा प्रामुख्याने आढळतो. नर या अंगठ्याजवळील जाड भागाने मादीवरील आपली पकड घट्ट करतो. या परिस्थितीत मादी अंडी बाहेर टाकते व नर त्यावर आपले शुक्राणू (पुं-जनन कोशिका म्हणजेच पेशी) सोडतो. अशा रीतीने शरीराबाहेर पाण्यात अंड्यांचे बाह्य निषेचन (फलन) होते. प्रत्येक अंड्याला एक प्रकारचे जेलीचे आवरण असते. याचा रंग काळा असतो. अंडी पाण्यात घातल्यावर हे आवरण फुगते. ही सर्व अंडी एकमेकांना आवरणाच्या साह्याने चिकटतात. एका वेळी घातल्या जाणाऱ्या अंड्यांची संख्या बेडकाच्या जातीवर अवलंबून असते. काही बेडक्या शेदोनशे तर काही जातीच्या बेडक्या ३०,००० पर्यंत अंडी घालतात. हे अंड्यांचे समूह पाण्यातील एखाद्या वनस्पतीस चिकटतात. अस्काफस ट्रई या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या उत्तर-पश्चिम भागातील बेडकाच्या नरास शेपटीच्या भागात एक प्रवेशी अंग असते व त्याच्या साह्याने तो आपले शुक्राणू मादीच्या अवस्करात (ज्यात आतडे, युग्मक-स्त्रीजनन कोशिका-वाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात अशा शरीराच्या मागील टोकाकडे असणाऱ्या सामाईक कोष्ठात) घालतो.

अंड्याचा व्यास जरी २.५ मिमी. असला, तरी त्याच्या भोवतालचे जेलीचे आवरण पाण्यात फुगल्यावर तोच व्यास १२ मिमी. पर्यंत होतो. निषेचनानंतर ताबडतोब विदलन [अंड्याचे बहुकोशिक-अनेक कोशिकांनी युक्त अशा-भ्रूणात रूपांतर करणारी सूत्री विभाजनाची क्रिया ⟶ अंडे कोशिका]सुरू होते आणि जातीनुसार व तापमान परिस्थितीनुसार काही दिवसांत किंवा एक आठवड्यात डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील असलेली पूर्व अवस्था) बाहेर पडतो, याला ⇨ भैकेर म्हणतात. भैकेराचे ⇨ रूपांतरण बेडकात होण्यास काही जातींत २ महिने लागतात, तर काहींत हा अवधी ३ वर्षांचा असतो. राना वंशाचा प्रारूपिक (नमुनेदार) भैकेर वरवर पाहता लहानशा, हिरवट रंगाच्या आणि मोठ्या डोक्याच्या, फक्त पुच्छपक्ष (शेपटीचे पेर) असलेल्या माशासारखा दिसतो. तो पाण्यात वळवळत हिंडतो. याला कल्ल्यांच्या तीन जोड्या असतात व त्यांच्या साह्याने याचे श्वसन चालते.


आ. २ बेडकाचा विकास : (१) अंडी, (२) भैकेर (डिंभ), (३) प्रौढ.

भैकेर पाण्यातील वनस्पती खातो. या कुरतडण्यासाठी त्याचा वरचा व खालचा जबडा कठीण पदार्थाचा बनलेला असतो. भैकेर जसजसा वाढतो तसतसे कल्ले एका आवरणाने झाकले जातात. भैकेराचे बेडकात रूपांतरण होताना पुढील फरक होतात: फुफ्फुसे व अवयव (पाद व बाहू) तयार होतात. पुच्छाचे (शेपटीचे) शोषण होते. अन्ननलिकेची लांबी कमी होते व डोक्याची रचना बदलते. पाश्चात्त्य प्रदेशांतील जंगलात जमिनीवर राहणाऱ्या कॉर्न्युफर या वंशातील बेडक्या अंडी घालतात व या अंड्यांपासून भैकेर निर्माण न होता लहान बेडूकच बाहेर येतात. ऑस्ट्रेलियातील ऱ्हिओबॅट्रॅकस सायलस या जातीच्या बेडकाची मादी निषेचित अंडी गिळते आणि तिच्या पोटात अंड्याचे पचन न होता अंडी उबून भैकेर तयार होतात. या काळात तिच्या पोटातील पाचक रसांची निर्मिती थांबते. हे भैकेर पोटातच वाढून त्यांचे बेडकांत रूपांतर होते व योग्य वाढ झाल्यानंतर ते मादीच्या तोंडातून बाहेर पडून जन्म पावतात. बेडकाच्या काही जातीतील नर आपल्या पाठीवर भैकेर बाळगतात. काही आपल्या ध्वनिकोशात ठेवतात, तर काही आपल्या मागील पायांवर गुंडाळलेल्या स्थितीत ठेवतात.

 बेडूक हे रात्रिंचर प्राणी आहेत. थंड प्रदेशात व खूप थंडीत ते स्वतःला पाण्याखाली अगर जमिनीत किंवा लाकडाच्या ओंडक्याखाली पुरून घेतात. या स्थितीस शीतनिष्क्रियता म्हणतात. थंडी कमी झाली की, ते पुन्हा बाहेर येतात. उन्हाळ्यात ते थंड जागी सुप्तावस्थेत राहतात.

 समुद्राचे खारे पाणी त्यांना अपायकारक असल्यामुळे बेडूक समुद्रात सापडत नाहीत. यांचे भक्ष्य गांडुळे, लहानमोठे किडे, गोगलगाई व कोळी हे असते. बेडकाच्या जिभेचे अग्र टोक खालच्या जबड्याच्या अग्र टोकाला चिकटलेले असते. तिचे पश्च (मागचे) टोक मोकळे द्विशाखित (दोन भाग झालेले) असते. एखादा कीटक दृष्टीस पडताच बेडूक आपली जीभ द्रुत गतीने त्याच्याकडे फेकतो. जिभेत श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ स्त्रवणाऱ्या) ग्रंथी असल्यामुळे ती चिकट असते. कीटक जिभेला चिकटतो व लगेच बेडूक आपली जीभ आत ओढून घेतो. ह्या सर्व क्रिया अतिशय त्वरेने होतात. भक्ष्य तोंडात आल्यावर बेडून ते न चावताच गिळून टाकतो. बेडकाच्या तोंडात असलेल्या दातांचा उपयोग भक्ष्य चर्वणासाठी नसून तोंडात घेतलेले भक्ष्य निसटून जाऊ नये एवढेच त्याचे कार्य असते. बेडूक सहसा तोंडाने पाणी पीत नाहीत. तहान लागल्यावर ते पाण्यात उड्या मारतात व त्यांच्या त्वचेतून पाणी आत शिरते.


बेडूकाच्या शरीरात व शरीरावर काही परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे) प्राणी आढळून येतात. ओपॅलायना व बॅलॅंटिडियम हे प्रोटोझोआ (आदिजीव) प्राणी असे आढळतात पण हे बेडकाला कोणताही अपाय करत नाहीत. काही वेळा शरीरातील काही भागांवर कृमी आढळतात. कधीकधी शरीरावर जळवा चिकटलेल्या असतात. बेडूक हा अत्यंत निरुपद्रवी प्राणी आहे. ⇨वर्णकीलवकांखेरीज (त्वचेतील विशिष्ट रंगयुक्तद्रव्य कोशिकांखेरीज) त्याला दुसरे स्वसंरक्षणाचे साधन नाही. ह्या कोशिकांमध्ये एक प्रकारचे रंगीत द्रव्य असते त्यामुळे त्यांचा रंग बदलू शकतो. शत्रूची चाहूल लागताच वर्णकीलवकांचा रंग बदलून तो आजूबाजूच्या पार्श्वभूमीसारखा होतो. शत्रूला त्या पार्श्वभूमीपासून बेडूक ओळखणे कठीण होते. यास अनुहरण असे म्हणतात. ह्याखेरीज दुसरे कोणतेच स्वसंरक्षणाचे साधन नसल्यामुळे बेडकास अनेक शत्रू आहेत. बेडकाला व त्याच्या डिंभाला खाणारे प्राणी म्हणजे मासे, साप, कावळे व ससाणा हे होत. स्थलचर शत्रूंपासून आपला बचाव करण्यासाठी बेडूक पाण्यात पळून जातो.

 यूरोप, अमेरिका व आशियातील काही देशांत बेडकांचा खाण्यासाठी उपयोग करतात. यूरोप व अमेरिकेत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे बेडूक खाद्यपदार्थ म्हणून विकले जातात. भारत, चीन व जपान या देशांतही बरेच बेडूक खाण्यासाठी पकडले जातात. बेडकाचे मांस कोंबडीच्या मांसासारखे दिसण्यात पांढुरके व त्यासारखीच चव असलेले असते. बेडकांच्या पायांचे मांस विशेष पसंत केले जाते. यात १६.४% प्रथिने असतात. यातील चरबी जलचर प्राण्यांच्या चरबीसारखी असते.बेडकांचा उपयोग कीटकांचा नाश करण्याकरताही केला जातो. चीन व जपान या देशांत भाताच्या शेतात पुष्कळ बेडूक सोडले जातात. यामुळे कीटकांवर नियंत्रण राहते. जपामध्ये बेडकांचे कातडे कमावण्यात येते. रा. लिबिगी या जातीच्या वाळवलेल्या बेडकाचे सार औषधी समजण्यात येते. प्रायोगिक शरीरक्रियाविज्ञानात व प्राणिविज्ञानात अभ्यासासाठी बेडकांचा पुष्कळ उपयोग केला जातो. या प्राण्याचे हे महत्त्व विचारात घेऊन त्याच्या शारीराची (शरीररचनेची) व तंत्रांची (संस्थांची) माहिती असणे आवश्यक आहे.

 बाह्य शारीर : बेडकाच्या शरीराचे डोके व धड असे दोन भाग पडतात. धड हे डोक्याशी सांधलेले असते. बेडकास मान नसते. धडास प्रत्येक बाजूस दोन असे चार पाद जोडलेले असतात. यांपैकी दोन अग्रपाद (पुढील पाय) लहान असतात व दोन पश्चपाद (मागील पाय) लांब असतात. डोक्याच्या अग्रभागी मुख असते, तर धडाच्या पश्चभागी गुदद्वार असते. प्रौढ प्राण्यास पुच्छ नसते. मुखाच्या उत्तर भागावर दोन नासाद्वारे (नाकाची छिद्रे) असतात. डोक्याच्या पृष्ठीय भागावर उजव्या व डाव्या बाजूंस पापण्या असलेले डोळे असतात.प्रत्येक डोळ्यावर दोन पापण्यांशिवाय एक निमिषक पटल (तिसरी पापणी) असते. प्रत्येक डोळ्याच्या मागील बाजूस एक कर्णपटल असते.

 दोन जबड्यांमध्ये मुखगुहा (तोंडाची पोकळी) असते. या मुखगुहेच्या पश्चभागापासून ग्रसनी (घसा) सुरू होते. 

 

आ. ३. बेडकाची मुखगुहा : (१)उत्तर हन्वस्थि-दंत, (२) हलास्थि-दंत, (३) नाकपुडीचे अंतर्च्छिद्र, (४) नेत्रकोटर, (५) ग्रसनी-कर्णनलिका, (६) ध्वनिकोश, (७) ग्रसिका, (८) स्वरद्वार, (९) जीभ. आ. ४. बेडकाचे कंकाल तंत्र : (१)कवटी, (२) शिरोधऱ कशेरुक (मणका), (३) अंगुलास्थी, (४) करभास्थी, (५) मणिबंधास्थी, (६) पुच्छदंड, (७) श्रोणिफलक, (८) अनुगुल्फास्थी, (९) प्रगुल्फास्थी, (१०) आसनास्थी, (११) अंतर्जंघास्थी, (१२) गुल्फ, (१३) पादास्थी, (१४) ऊर्वस्थी, (१५) प्रबाहु-अंतरास्थी, (१६) त्रिकास्थी कशेरुक, (१७) भुजास्थी, (१८) स्कंधास्थी.

या मुखगुहेतच नासाद्वारांचे छिद्र असते. मुखगुहेत ग्रसनी-कर्णनलिकेची छिद्रेही आढळतात. टाळूवर हलास्थिदंत असतात. वरील जबड्यावर उत्तर इन्वस्थि-दंत असतात.  या दोन्ही प्रकारच्या दातांचा उपयोग फक्त पकडलेले भक्ष्य निसटून जाऊ नये याकरिता होतो. मुखगुहेत अग्रभागास चिकटलेली मांसल जिव्हा (जीभ) असते. ग्रसनीतील छिद्र स्वरयंत्राशी जोडलेले असते. या स्वरयंत्रातील ध्वनितंतूंच्या साहाय्याने आवाजाची निर्मिती होते.

 बेडकाची त्वचा इतर पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्यात त्वचेसारखी खालील ऊतकास (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहास) चिकटलेली नसते. ती पातळ असून तिच्यात पुष्कळ रक्तवाहिन्या असतात. यामुळे त्वचेद्वारे श्वसन होते. त्वचेचे बाह्यत्वचा व अंतस्त्वचा असे दोन स्तर असतात. बाह्यत्वचेच्या कोशिका अविरत नाश पावत असतात व त्यांच्या जागी नवीन कोशिका तयार होतात. त्वचेत असणाऱ्या श्लेष्मल ग्रंथींच्या स्त्रावामुळे त्वचा नेहमी ओली राहते. त्वचेतच काही विष ग्रंथी असतात व त्यांमुळे बेडकास शत्रूपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. त्वचेत काही रंगद्रव्ये असतात. ती ज्या कोशिकांत असतात त्या कोशिका आकुंचन किंवा प्रसरण पावू शकतात आणि त्यामुळे त्वचेच्या रंगाचा आकृतिबंध बदलण्यास मदत होते.

बेडकाच्या शरीरातील कंकाल (सांगाडा) इतर पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणेच असतो. अक्षीय कंकालात कवटी, पृष्ठवंश (पाठीच्या मणक्यांची मालिका) व उरोस्थी (छातीच्या मध्यावरील हाड) यांचा समावेश होतो, तर उपांगी (अथवा शाखीय) कंकालात मेखला (अग्रपादांना व पश्चपादांना आधार देणारी हाडांनी बनलेली वलये) व त्यांची उपांगे यांचा समावेश होतो. कवटी मेंदू व इतर ज्ञानेंद्रियांचे रक्षण करते. कवटीच्या मुख्य भागात मेंदू असतो. कवटीच्या बाजूस नेत्रकोटर (डोळ्याच्या खोबणी) व कर्णकोश असतात. कवटीच्या अग्रभागी घाणेंद्रियांचे कोश असतात. कवटीच्या अधर भागावर आणि वरील जबड्याच्या हन्वस्थीवर दात असतात. कवटीच्या पश्चभागी पश्चकपालास्थि-कंद असतो. हा पहिल्या मणक्याशी जुळला म्हणजे बेडकास डोके फिरविणे सोपे जाते. यावर असलेल्या बृहद्रंध्रातून मेंदूचा मेरुरज्जूशी (मणक्यातून जाणाऱ्या तंत्रिका तंतूंच्या – मज्जातंतूंच्या – दोरीसारख्या भागाशी) संपर्क होतो. बेडकाचे जबडे हा त्याच्या कवटीचाच एक भाग असतो. पृष्ठवंशात एकंदर नऊ मणके असतात. शेवटच्या मणक्यानंतर पुच्छदंड असतो. या मणक्यांच्या मालिकेतून मेंदूपासून निघालेला मेरूरज्जू पश्च भागात जातो .

उपांगि कंकालात दोन मेखला असतात. यांपैकी वक्षीय मेखला ही अग्रस्थित असते व पृष्ठवंशाय स्नायूने जोडलेली असते. या मेखलेस अग्र-उपांगांची हाडे जोडलेली असतात. या हाडांची मालिका भुजास्थी, अरास्थी-अंतरास्थी, मणिबंधास्थी, करभास्थी व अंगुलास्थी अशी असते [⟶ कंकाल तंत्र]. श्रोणीय (धडाच्या तळातील) मेखला ही पश्चस्थित असते व तिचा पृष्ठवंशाशी जास्त निकट संबंध येतो. प्राण्याच्या शरीराचे सर्व वजन या मेखलेस पेलावे लागते. या मेखलेस जोडलेल्या पश्च उपांगांच्या हाडांची मालिका ऊर्वस्थी, अंतर्जंघास्थी-अनुजंघास्थी, गुल्फास्थी, पादास्थी व अंगुलास्थी अशी असते.

स्नायू तीन प्रकारचे असतात : (१) हृदीय (२) अरेखित व (३) रेखांकित. हृदीय स्नायू हृदयाच्या चलनवलनाचे नियंत्रण करतात. या स्नायूंचे तंतू शाखायुक्त असतात. अरेखित स्नायू शरीरात व त्यातल्या त्यात अंतस्त्यसंबंधी (शरीरातील पोकळ्यांत, विशेषतः उदरातील पोकळीत, असलेल्या) इंद्रियांत आढळतात. त्यांच्या चलनवलनावर मेंदूंचे नियंत्रण नसते. अन्नाचे पचन तंत्रातील चलनवलन या प्रकारात मोडते. रेखांकित स्नायूंचे चलनवलन मेंदूच्या नियंत्रणाखाली असते. हातापायाचे चलनवलन, उड्या मारणे वगैरे या प्रकारात मोडते. निरनिराळ्या प्रकारच्या कोशिकापासून तयार झालेले स्नायू शरीराचे निरनिराळे चलनवलन घडवून आणतात.

अंतःशारीर : बेडकाच्या अधर भागाची त्वचा बाजूस केली म्हणजे आतील इंद्रियांची रचना व परस्पर संबंध दृग्गोचर होतात (आ. ५).

आ. ५. बेडकाची इंद्रिये (१)जीभ, (२) मेरुरज्जू, (३) स्वरयंत्र, (४) हृदय, (५) यकृत, (६) पित्ताशय, (७) जठर, (८) अग्निपिंड, (९) लहान आतडे, (१०) प्लीहा, (११) मोठे आतडे, (१२) मूत्राशय, (१३) श्रोणिसंधी, (१४) अवस्कर छिद्र, (१५) रेताशय, (१६) ऊर्वस्थी, (१७) मूत्रवाहिनी, (१८) वृक्क, (१९) वृषण, (२०) वसापिंड, (२१) फुफ्फुस.

पचन तंत्र : याची सुरुवात मुखापासून होते. मुखगुहेत जीभ व दात असतात. जिभेचा उपयोग लहान कीटक किंवा तत्सम अन्नकण पकडण्यास व ते मुखगुहेत ढकलण्यास होतो. दात फक्त अन्नकण निसटून जाऊ नयेत यासाठी उपयोगी पडतात. चर्वणास त्यांचा उपयोग होत नाही. मुखगुहेतील अन्न ग्रासिकेद्वारे (ग्रसनीपासून जठरापर्यंतच्या नलिकेद्वारे) उदरात ढकलले जाते. उदराच्या अग्रभागास हृदीय उदर व पश्चभागास जठरनिर्गमद्वार म्हणतात. उदरात काही प्रमाणात पचन झालेले अन्न आतड्यात जाते. आतड्याच्या पहिल्या भागास ग्रहणी म्हणतात. बाकीच्या भागास शेषांत्र म्हणतात. ग्रहणी व शेषांत्रातून अन्न जात असताना त्यात निरनिराळे अन्नरस मिसळले जातात व अन्नाचे पचन होते. या पचविलेल्या अन्नाचे आतड्याच्या भित्तीतून शोषण होते. न पचलेले व निरुपयोगी अन्न गुदांत्रात जाते व शेवटी अवस्करातून बाहेर टाकले जाते. अन्ननलिकेतून अन्न जात असताना त्यावर निरनिराळ्या एंझाइमांची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांची) विक्रिया होत असते. तसेच यकृत व अग्निपिंड (उदराच्या वरच्या भागात असलेली ग्रंथी) यांचे स्त्रावही समाईक नलिकेद्वारे ग्रहणीत शिरतात व त्यांचीही विक्रिया अन्नावर होते.

श्वसन तंत्र : प्रौढ बेडकाचे श्वसन फुफ्फुस व आर्द्र त्वचेद्वारे होते. पिशवीच्या आकाराच्या फुफ्फुसास आतील बाजूस दुमडी असतात त्यामुळे आतील पृष्ठभागाच्या क्षेत्रफळात बरीच वाढ होते. या दुमडीत बऱ्याच रक्तवाहिन्या असल्यामुळे रक्ताचा पुरवठा भरपूर होतो. फुफ्फुसात हवा घेण्यासाठी बेडकास सस्तन प्राण्यासारखे विशिष्ट स्नायू नसतात. नासाद्वारांमधून हवा आत घेतली जाते. स्वरद्वार बंद करून मुखाचा तळ खाली केला म्हणजे मुखगुहेचे आकारमान वाढते व जास्त हवा आत येते. त्यानंतर नासाद्वारे बंद करून स्वरद्वार उघडले व मुखाचा तळ वर केला म्हणजे मुखगुहेतील हवा फुफ्फुसात जाते. हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळतो व कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर येतो. ही कार्बन डाय-ऑक्साइडयुक्त अशुद्ध हवा याच मार्गाने शरीराच्या स्नायूंच्या आकुंचनाने बाहेर फेकली जाते. बेडकाची फुफ्फुसे आदिम स्थितीत असल्यामुळे श्वसनक्रियेस अपुरी पडतात. त्यांना जोड म्हणून पातळ व आर्द्र त्वचेद्वारेही ऑक्सिजनाची देवाणघेवाण होते. जेव्हा स्वरयंत्रातून हवा बाहेर जाते तेव्हा स्वरतंतूंचे कंपन होते व बेडकाच्या ओरडण्याचा आवाज निर्माण होतो. नर बेडकात विशिष्ट ध्वनिकोशांच्या साह्याने जास्त ⇨ अनुस्पंदन होते व आवाज वाढतो. बेडकाच्या मुखगुहेत येणारी सर्वच हवा फुफ्फुसांत जात नाही. यापैकी काही हवा मुखगुहेच्या अस्तराद्वारे ऑक्सिजनाची देवाणघेवाण करण्यास उपयोगी पडते.

 रक्ताभिसरण तंत्र : या तंत्राद्वारे रक्तातून ऑक्सिजन व अन्न सर्व शरीरास पुरविले जाते. या तंत्राचे तीन मुख्य भाग आहेत : (१) हृदय, (२) रोहिणी तंत्र व (३) नीला तंत्र.

 हृदय: देहगुहेच्या अग्रभागात परिहृद्द या पातळ पटलाने वेष्टिलेले हे इंद्रिय आहे. यात तीन कप्पे असतात. हृदयाच्या पृष्ठभागावर पातळी भित्ती असलेले त्रिकोनी नीला कोटर असते. हृदयाच्या प्रत्येक बाजूस एक अलिंद असून दोन्ही बाजूंची अलिंदे एकमेकांपासून पातळ पटलाने विभक्त असतात. हृदयाचा ठळक भाग म्हणजे निलय हा होय. यातूनच निर्माण झालेल्या रोहिणी शंकू या भागापासून प्रमुख रक्तवाहिन्यांचा उगम होतो. हृदयाच्या निरनिराळ्या कप्प्यांत व प्रमुख रक्तवाहिन्यांत झडपा असल्यामुळे रक्ताचा प्रवाह एका ठरीव दिशेने वाहतो. हृदयाकडे येणारे रक्त प्रथम नीला कोटरात जमा होते. तेथून ते उजव्या अलिंदात व नंतर निलयात जाते. निलयातून ते रोहिणी शंकूत जाते. या शंकूतून निघणाऱ्या फुफ्फुस-त्वचीय रोहिणीद्वारे हे रक्त फुफ्फुसांकडे व त्वचेकडे जाते. तेथे श्वसन क्रियेद्वारे रक्तास ऑक्सिजनाचा पुरवठा होतो. हे ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त फुफ्फुसाच्या नीलांमार्गे परत डाव्या अलिंदात येते आणि त्वचेच्या नीलांमार्गे नील कोटरात येते. निलयात आलेले रक्त रोहिणी शंकूद्वारे शरीरातील सर्व भागांस पोहोचविले जाते.

आ. ६. बेडकाचे हृदय: (अ) पृष्ठीय दृश्य: (आ) अधर दृश्य: (१) ग्रीवा रोहिणी, (२) दैहिक रोहिणी, (३) फुफ्फुस-त्वचीय रोहिणी, (४) महारोहिणी, (५) अग्र महानीला, (६) उजवे अलिंद, (७)फुफ्फुस नीला, (८) नीला कोटर, (९) पश्च महानीला, (१०) अर्धचंद्राकार त्रिदली झडप, (११) फुफ्फुस नीलेचा प्रवेश, (१२) कोटराचा प्रवेश, (१३) डावे अलिंद, (१४) सर्पिल झडप, (१५) अलिंदनिलय झडपा. (बाण रक्तप्रवाहाची दिशा दाखवितात).

रोहिणी तंत्र: हृदयापासून निघाल्यावर रोहिणी शंकूच्या दोन शाखा होतात. यांपैकी प्रत्येक शाखेस तीन उपशाखा निर्माण होतात. यांतील सर्वात पश्च शाखा फुफ्फुस-त्वचीय रोहिणी होय. मध्यशाखेस दैहिक रोहिणी म्हणतात व अग्रशाखेस ग्रीवा रोहिणी म्हणतात. दैहिग रोहिणी व ग्रीवा रोहिणी यांतील रक्त ऑक्सिजनमिश्रित व शुद्ध असते आणि ते सर्व शरीरस पुरविले जाते. फुफ्फुस-त्वचीय रोहिणीतील रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. यातील रक्त फुफ्फुस व त्वचा यांकडे शुद्धीकरणाकरिता पाठविले जाते. हृदयात येणाऱ्या रक्ताचा विचार केल्यास असे आढळून येईल की, निलयात शुद्ध (ऑक्सिजनमिश्रित) व अशुद्ध (ऑक्सिजनरहित) असे दोनही प्रकारचे रक्त येते, तर निलयाच्या अंतर्रचनेमुळे या दोन्ही रक्तांचे मिश्रण होत नाही किंवा झालेच, तर अत्यल्प प्रमाणात होते. डाव्या अलिंदात जमा झालेले शुद्ध रक्त निलयात आल्यावर दैहिक रोहिणीतून महारोहिणीत व तेथून सर्व इंद्रियाकडे जाते आणि काही शुद्ध रक्त ग्रीवा रोहिणीतून डोके व मेंदू याना जाते. रोहिणीच्या शाखा व उपशाखा विभागून त्यांचा शेवट केशवाहिन्यांत(अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यात) होतो. रोहिणीच्या नलिकेच्या भित्ती जाड स्नायूयुक्त असतात, तर केशवाहिन्यांच्या भित्ती पातळ असतात आणि त्यांतून अन्नद्रव्य व इतर द्रव्यांचे अभिसरण होऊन ही द्रव्ये रक्तात मिसळतात. शेवटी या केशवाहिन्यांचे संयोजन होऊन त्यातूनच नीलांची उत्पत्ती होते.

आ. ७. बेडकाचे रोहिणी तंत्र : (१)बाह्य ग्रीवा रोहिणी, (२) ग्रीवा रोहिणी, (३) उजवे अलिंद, (४) त्वचीय रोहिणी, (५) रोहिणी शंकू, (६) फुफ्फुस, (७) निलय, (८) उदर-गुहीय-मध्यांत्रीय रोहिणी, (९) वृषण, (१०)जनन रोहिणी, (११) वृक्क, (१२) वृक्क रोहिणी, (१३) महा रोहिणी, (१४) श्रोणी रोहिणी, (१५) अंतर्गीवा रोहिणी, (१६) ग्रीवा पिंड, (१७) महारोहिणी चाप, (१८) फुफ्फुस-त्वचीय रोहिणी, (१९) डावे अलिंद, (२०) फुफ्फुस महारोहिणी, (२१) यकृत, (२२) यकृत रोहिणी, (२३) जठर, (२४) अग्निपिंड, (२५) प्लीहा रोहिणी, (२६) प्लीहा, (२७) लहान आतडे, (२८) मोठे आतडे.

नीला तंत्र : सर्व शरीरातील रक्त हदयाकडे नेणे हे नीलांचे कार्य होय. फुस्फुस नीला आणि त्वचा नीला यांतील रक्त सोडून इतर सर्व नीलांतील रक्त ऑक्सिजनरहित असते. फुस्फुस नीला ऑक्सिजनयुक्त रक्त फुस्फुसाकडून डाव्या अलिंदात ओतते, तर त्वचीय नीला ऑक्सिजनयुक्त रक्त त्वचेकडून आणून नीला कोटरात ओतते, बेडकात दोन प्रकारची प्रवेशिका नीला तंत्रे असतात. एक यकृत प्रवेशिका नीला तंत्र व दुसरे वृक्कीय प्रवेशिका नीला तंत्र. या तंत्रांत रक्तवाहिंन्याचा उगम व अंत केशवाहिन्यातून होतो. नीला कोटरात तीन मुख्य नीला रक्त आणतात. अग्रभागातून उजवी व डावी मुख्य नीला व पश्च भागातून पश्च मुख्य नीला या त्या नीला होत. अग्र मुख्य नीलेत तोंड, जीभ, खांदे, डोके,उंपागे वगैरे भागांतून रक्त जमा केले जाते, तर पश्च मुख्य नीलेत शरीराचा पश्च भाग, वृक्क (मूत्रपिंड), जननेंद्रिय व पश्च उपांगे या भागांतून रक्त जमा केले जाते.

आ. ८. बेडकाचे नीला तंत्र :(१)बाह्य कंठ नीला, (२) अग्र महानीला, (३) फुफ्फुस नीला, (४) फुफ्फुस, (५) (६) त्वचीय नीला, (७) जनन नीला, (८)जनन ग्रंथी,(९) वृक्क, (१०) वृक्क नीला, (११) पश्च महानीला, (१२) अधर उदर नीला, (१३) वृक्क प्रवेशिका नीला, (१४) ऊरू नीला, (१५) श्रोणी नीला, (१६) अनामिका नीला, (१७) अधोजत्रू नीला, (१८) नीला कोटर, (१९) यकृत, (२०) यकृत प्रवेशिका नीला, (२१) जठर नीला, (२२) जठर, (२३) प्लीहा नीला, (२४) प्लीहा, (२५) लहान आतडे, (२६)मोठे आतडे, (२७) श्रोणिसंधी नीला.

रक्त: हे रक्तद्रव व कोशिका यांचे बनलेले असते. या कोशिकात तांबड्या कोशिका, बिंबाणू (रक्त साखळण्याच्या क्रियेशी संबंधित असलेल्या वर्तुळाकार वा अंडाकार तबकड्यांच्या रूपातील कोशिका)आणि श्वेतकोशिका या प्रकारच्या कोशिका सर्वसाधारणपणे आढळतात. ताबंड्या कोशिंकात ऑक्सिजन धारण करणारे हीमोग्लोबिन असते. यांचे प्रमाण दर घ.मिमी.ला ४,००,००० इतके असते. यांचा आकार दीर्घवर्तुळाकार असतो व त्यांत केंद्रक(कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा मध्यवर्ती गोलसर पुंज) असते. श्वेतकोशिकांचे प्रमाण दर घ. मिमी.ला ७,००० इतके असते. यांच्यात केंद्रक असते. यांचे निरनिराळे प्रकार असतात. काही श्वेतकोशिका बाहेरुन रक्तात येणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा तर काही निर्जीव कोशिकांचा नाश करतात. बिंबाणू कोशिका जखमेवर रक्ताची खपली धरण्यास मदत करतात.


लसीका तंत्र:  रक्तातील द्रव्य पदार्थात कोशिकंस लागणारे अन्न, खनिजे वगैरे द्रव्ये असतात आणि या रक्तद्रवातूनच ती ऊतकातील कोशिकापर्यंत पोहोचविली जातात. ऊतकाजवळ असलेल्या या द्रव पदार्थास ऊतकद्रव म्हणतात. यातून कोशिकांस लागणारे पदार्थ कोशिकांनी घेतल्यानंतर जो द्रव बाकी राहतो, त्याला लसीका म्हणतात. निरनिराळ्या नलिकांद्वारे आणि गुहाद्वारे ह्या लसीकेचे सर्व शरीरभर अभिसरण केले जाते व शेवटी हा द्रव पदार्थ रक्तात मिसळतो.

अंतःस्त्रावी तंत्र: शरीरक्रियेत रासायनिक एकसूत्रता आणणे हे या तंत्राचे कार्य आहे. या तंत्रातील ग्रंथी आपला स्त्राव सरळ रक्तात मिसळतात व यामुळे त्याचा परिणाम सर्व शरीरावर होतो. या स्त्रावास हॉर्मोन असे म्हणतात. या ग्रंथीपैकी पोष ग्रंथी ही मध्य मेंदूच्या अधर भागावर अधिष्ठित असते. ही तीन खंडात विभागलेली असते. अग्रखंडाच्या स्त्रावाच्या परिणाम प्राण्याच्या वाढीवर,तसेच इतर अंतःस्त्रावी ग्रंथीवर होतो. मध्यखंडाच्या स्त्रावाचा परिणाम त्वचेतील वर्णकीलवकांवर होतो.  अत्यंखंडाचा परिणम कात टाकणे व त्वचेतून पाणी शरीरात घेणे या क्रियांवर होतो. अवटूग्रंथी ही घशाजवळ असते. हिच्या स्त्रावाचे चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक आणि भौतिक घडामोंडीच्या) क्रियेवर व बेडकांच्या रुपांतरणावर नियंत्रण असते. वृक्काच्या अधर भागावर अधिवृक्क ग्रंथी असतात. यांचे नियंत्रण रक्तदाब व त्वचेतील रंगाच्या गाढतेवर असते. अग्निपिंड हा पचनक्रियेस लागणारी एंझाइमेनिर्माण करीत असला, तरी त्यातील लांगरहान्स (पाउल लांगरहान्स या जर्मन विकृतिवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारी) द्वीपके ह्या कोशिकांचा अंतःस्त्राव (इन्शुलीन) शर्करेच्या चयापचयावर नियंत्रण ठेवतो. [⟶ अंतःस्त्रावी ग्रंथि].

  तंत्रिका तंत्र : प्राण्याच्या शरीरात सर्व क्रियांत, तंत्रांत व वर्तणुकीत एकसूत्रता आणणे हे या तंत्राचे कार्य असते. या तंत्राचे केंद्रीय, परिसरीय व स्वायत्त असे तीन विभाग पाडता येतील.

केंद्रीय तंत्रिका तंत्र : केंद्रीय तंत्रिका तंत्राचे शरीरावर मुख्य निंयत्रण असते. यात मेंदू व मेरुरज्जू यांचा समावेश होतो. बेडकाचा मेंदू लहान असून तो कवटीत सुरक्षितपणे असलेला आढळतो. मेंदूच्या अग्रभागी गंध खंड असून त्यांचा संबंध घ्राणेंद्रियाशी असतो. गंध खंडांच्या पश्च भागी प्रमस्तिष्क गोधार्ध असतात. दोन्ही गोलार्ध मिळून प्रमस्तिष्क बनतो. बेडकात हा भाग लांबट व सापेक्षतेने लहान असतो. बुद्धिपुरस्सर होणाऱ्या हालचाली या भागाच्या प्रेरणेने होत असतात आणि त्यांवर या भागाचे नियंत्रण असते. प्रमस्तिष्काच्या पश्च भागात पारमस्तिष्क हा भाग असतो. या भागात मेंदूचा अग्र व पश्च भाग जोडणारे तंतू असतात. पारमस्तिष्काच्या पृष्ठभागावर ⇨ तृतीय नेत्र पिंड असतो. पारमस्तिष्काच्या अधर बाजूस दृक्‌ फुली असते. या ठिकाणी दोन्ही बाजूंच्या दृक तंत्रिका विरुद्ध बाजूंस जाऊन डोळ्यात शिरतात. पारमस्तिष्काच्या अधराच्या पश्च बाजूस नरसाळ्याच्या आकारासारखी रचना असते व त्याच्या शेवटी पोषद ग्रंथी असते. या महत्त्वाच्या ग्रंथीपासून उत्पन्न होणाऱ्या हॉर्मोनांचे शरीरातील अनेक चयापचयी क्रियावर नियंत्रण असते. पारमस्तिष्काच्या पश्च भागी, प्रत्येक बाजूस एक असे दोन दृक खंड असतात. डोळे व दृष्टी यावर त्यांचे नियंत्रण असते. हे मध्य मेंदूवर आधारित असतात. मध्य मेंदूच्या पश्च भागी निमस्तिष्क असतो. याचे कार्य स्नायूंच्या हालचालीत एकसूत्रता ठेवणे हे होय. मेंदूचा पश्च भाग म्हणजे लंबमज्जा हा कवटीच्या वृहद्रधांतून बाहेर पडून मेरुरज्जू म्हणून मणक्यातून शरीराच्या पश्च भागांपर्यत जातो. लंबमज्जेमध्ये शरीराच्या पुष्कळ जैव प्रक्रिया नियंत्रित करणारी केंद्रे असतात.

मेंदू व मेरुरज्जू आतून पोकळ असून या पोकळ्या एकमेकींशी संलग्न आहेत. यांतील द्रवास मस्तिष्क-मेरुद्रव म्हणतात. मेंदू व मेरुरज्जू यांवरील आवरणांना मस्तिष्कावरण म्हणतात. यांपैकी बाहेरील आवरणास दृढतानिका व आतील आवरणास मृदुतानिका म्हणतात. या आवरणामुळे तंत्रिकांचे व मेंदूचे संरक्षण होते.

आ.९ . बेडकाचा मेंदू : (अ) पृष्ठीय दृश्य (आ) अधर दृश्य: (१) गंध तंत्रिका, (२) गंध खंड, (३) प्रमस्तिष्क गोलार्ध, (४) तृतीय नेत्र पिंड, (५) पारमस्तिष्क, (६) दृक् खंड, (७) निमस्तिष्क, (८) त्रिमूल तंत्रिका, (९) आनन तंत्रिका, (१०) श्रवण तंत्रिका, (११) लंबमज्जा, (१२) प्राणेशा तंत्रिका, (१३) मेरुरज्जू, (१४) गंध क्षेत्र, (१५) दृक् तंत्रिका, (१६)दृक् फुली, (१७) नसराळे, (१८) नेत्रप्रेरक तंत्रिका, (१९) पोष ग्रंथी, (२०) अपवर्तनी तंत्रिका.

परिसरीय तंत्रिका तंत्र: मेंदूपासून उगम पावणाऱ्या एकूण दहा मस्तिष्क तंत्रिका आहेत. त्या I ते X या रोमन क्रमांकांनी ओळखण्यात येतात आणि त्या अनुक्रमे कोष्टकात दर्शविल्याप्रमाणे त्या त्या इंद्रियाशी संबंधित असतात.

मस्तिष्क तंत्रिका

क्रमांक 

नाव 

आवेग दिशा 

संबंधित इंद्रिय 

Ⅰ 

Ⅱ 

Ⅲ 

Ⅳ 

Ⅴ 

Ⅵ 

Ⅶ 

Ⅷ 

Ⅸ 

Ⅹ 

गंध तंत्रिका 

दृक् तंत्रिका 

नेत्र प्रेरक तंत्रिका 

कप्पी तंत्रिका 

त्रिमूल तंत्रिका 

अपवर्तनी तंत्रिका 

आनन तंत्रिका 

कर्ण तंत्रिका 

जिव्हा ग्रसनी तंत्रिका 

प्राणेशा तंत्रिका

अभिवाही 

अभिवाही 

अपवाही 

अपवाही 

मिश्र 

अपवाही 

मिश्र

अभिवाही

मिश्र

मिश्र

घ्राणेंद्रिय

डोळे

डोळ्याचे स्नायू

डोळ्याचे स्नायू

त्वचा, जबडे

डोळे

जीभ, लाला ग्रंथी, चेहरा, जबडे

कान

जीभ, घसा, अनुकर्ण ग्रंथी

अंतस्त्ये

[अभिवाही म्हणजे मेंदूतील संबंधित केंद्राकडे संदेश नेणारी अपवाही म्हणजे मेंदूकडून संबंधित इंद्रियाकडे संदेश नेणारी अनुकर्ण ग्रंथी म्हणजे कानापुढील लाला ग्रंथी].

याशिवाय मेंदूच्या अग्र भागापासून निघणारी एक लहान तंत्रिका असते व तिला अतिंम तंत्रिका असे म्हणतात. ही घ्राणेद्रिंयाच्या श्लेष्मकलेच्या (बुळबुळीत अस्तराच्या) क्षेत्रात जाते. मेरुरज्जूपासून दहा तंत्रिका निघतात व त्या शरीराच्या निरनिराळ्या इंद्रियाकडे जातात. यांपैकी काही अभिवाही, काही अपवाही, तर काही दोनही प्रकारच्या असतात.

स्वायत्त तंत्रिका तंत्र : अंतस्त्याच्या कार्यातील एकसूत्रता या तंत्रिका तंत्रावर अवलंबून असते. पृष्ठ महारोहिणीच्या दोन्ही बाजूस या तंत्रिका आढळतात. प्रत्येक बाजूचया तंत्रिकेवर दहा गुच्छिका असतात. या गुच्छिकापासून तंत्रिका निघून त्या अंतस्त्याकडे जातात व अनैच्छिक रीतीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात. नंतर या तंत्रिका केंद्रीय तंत्रिका तंत्रात विलीन होतात अशा तंत्रिका तंत्र.


ज्ञानेद्रिंये : तंत्रिका तंत्राशी निगडित असलेल्या व बाहेरच्या परिस्थितीची प्राण्यास जाणीव करून देणाऱ्या इंद्रियाना ज्ञानेंद्रिये म्हणतात. यांच्याद्वारे स्पर्श, रुची, वास, आवाज व दृष्टी या संवेदनाचे ज्ञान होते. त्वचेत वेदना, दाब, उष्णता, शीतलता व स्पर्श यांचे ज्ञान करून देणारे आकलक असतात. हे शरीरावरील सर्व त्वचेवर असले, तरी काही विशिष्ट ठिकाणी त्याचें स्थानिकरण झालेले असते उदा., उष्णता अजमावण्याची क्षमता ओठात इतर त्वचेपेक्षा जास्त असते.  एकाच उद्दीपकामुळे एकापेक्षा जास्त आकलक उत्तेजित होऊ शकतात. शरीराच्या अंतस्त्य गुहेतील काही इंद्रियावर आकलक असतात व त्यामुळे वेदनांचे आकलन होते. वास व रुची यांच्या आकलकांना रासायनिक आकलक म्हणतात. हे नाक व जीभ या इंद्रियात आढळतात. जिभेत आढळणाऱ्या या आकलंकाना रुचिकलिका म्हणतात. वासाचे आकलक नाकात असतात आणि त्याच्या कोशिका सदैव द्रव पदार्थाने आच्छादलिल्या असतात. सर्व ज्ञानेद्रिंयात डोळा हे इंद्रिय फार महत्त्वाचे आहे. बेडकाच्या डोळ्याची सर्वसाधारण रचना इतर पृष्ठवंशी प्राण्याप्रमाणेच असते. प्रकाशाचे आकलक डोळ्यात सामावलेले असतात. हे आकलन उत्तम व्हावे म्हणून त्याची योजना कवटीच्या खोबणीत केलेली असते. डोळ्याचे संरक्षण व कार्य योग्य रीतीने व्हावे म्हणून त्याच्या रचनेत पापण्या, कनीनिका (बुबुळ), भिंग, दृक पटल यांची योजना केलेली असते. प्रत्येक उपांगाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. रंग, अंतर, आकार इ. घटकांचा समन्वय साधून दृक पटलातील आकलकांच्या (दंडाकार तंत्रिका कोशिकांच्या) साहायाने, तर रंगीत प्रतिमा शंकूच्या साह्याने होते. सर्वसाधारणपणे डोळ्याची कार्यपद्धती कॅमेऱ्याच्या कार्यपद्धतीप्रमाणे असते.

बेडकाचे डोळे त्याच्या सवयींना अनुकूल असेच आहेत. मोठे भिंग असलेले व डोक्यावर उंच अशा जागी हे डोळे असल्याने त्यांच्या दृष्टीचे क्षेत्र मोठे असते. त्यांच्या दृक्‌ पटलातील कोशिका हालणाऱ्या वस्तूंना फार संवेदनाक्षम असतात. जर एखादा कीटक स्थिर (हालचाल न करता) समोर असला, तर बेडूक त्याची दखल घेत नाही पण तोच जर हलला, तर लगेच जीभ बाहेर टाकून त्याला गिळून टाकतो.

आ.१०. बेडकाचा डोळा : (१)वरची पापणी, (२) भिंगाचे स्नायू, (३) बाहुली ग्रंथिका, (४) भिंग, (५) निमेषक पटल, (६) खालची पापणी.

आ. ११. बेडकाचा कान: (१) अंतर्कर्ण, (२) श्रवण संपुट, (३) कर्णपटल, (४) लांबट गवाक्ष, (५) स्थापन्यस्थिका, (६) मध्यकर्ण पोकळी, (७) ग्रसनी-कर्णनलिका,(८) कवटी, (९) श्रवण तंत्रिका, (१०) लंबमज्जा.

कानाची सर्वसाधारण रचना इतर पृष्ठवंशी प्राण्यांच्या कानासारखीच असते. शरीराचा समतोल राखणे व बाहेरील आवाजाचे अभिज्ञान करणे (अस्तित्व ओळखणे) हे कानाचे मुख्य कार्य आहे. बेडकास बाह्यकर्ण नसतो. डोळ्याच्या मागील बाजूच्या गोल आकाराच्या त्वचेस कर्णपटल म्हणतात. कर्णपटल व कर्णकोश यांच्या दरम्यान असलेल्या पोकळीस कर्णपोकळी म्हणतात. या पोकळीत कर्णपटलास चिकटलेले स्थापन्यस्थिका हे हाड असते. बाहेरच्या आवाजाने कर्णपटल कंप पावते व हे कंप स्थापन्यस्थिकेच्या साह्याने अंतकर्णास पोहोचविले जातात. अंतकर्णात गोणिका व अर्धवलयाकृती नलिका आणि लघुकोश व त्याचा अंधवर्ध (पिशवीसारखी रचना) ह्या रचना असतात [⟶ कान ] अर्धवलयाकृती नलिकांचे कार्य गतिवर्धनातील बदलांचे आकलन करणे हे आहे. बाकीच्या रंचनाचे कार्य ध्वनीचे आकलन करणे हे आहे. या सर्व रचनेत ध्वनीचे आकलक असतात.


उत्सर्जन तंत्र : उत्सर्जनाचे कार्य मुख्यतः वृक्काकडून होते. हे लांबट व तपकिरी रंगाचे असून उदरगुहेत पश्च भागात ऊर्ध्वस्थ (उभ्या दिशेत) असतात. या गंरथीत सूक्ष्म नलिकापुंज असतो. व त्यात रक्तात असलेली अनावश्यक द्रव्ये गाळली जातात. या नलिकापासूनच मूत्रवाहिनी तयार होते. प्रत्येक वृक्कापसून निघणारी मूत्रवाहिनी शेवटी अवस्करास मिळते. या मूत्रवाहिन्यांतून येणारे मूत्र बाहेर टाकले जाते किंवा काही काळ मूत्राशयात साचून ठराविक काळाने ते अवस्करातून उत्सर्जित केले जाते.

जनन तंत्र : मादीच्या जनन तंत्रात अंडकोशाचा समावेश असतो. जेव्हा अंडी तयार होतात तेव्हा अंडकोशाचे आकारमान खूपच मोठे होते व तो सर्व शरीरगुहा व्यापतो. परिपक्व झालेली अंडी अंडकोशापासून सुटून शरीरगुहेतील द्रवात तरंगू लागतात आणि स्नायूंच्या व पक्ष्माभिकीय (सूक्ष्म केसासारख्या उपांगांच्या कंपनांमुळे निर्माण होणाऱ्या) हालचालीमुळे ती अंडवाहिनीत शिरतात. अंडवाहिनीतून ही अंडी अवस्करात पोहोचतात. अंडवाहिनीच्या अस्तरावर पुष्कळ पक्ष्माभिका असतात व यांच्या साहायाने अंड्याचा प्रवास सुलभ होतो. अंडवाहिनीच्या अवस्कराजवळील भागाचा व्यास मोठा असतो. या भागास गर्भाशय असेही म्हणतात. पक्व अंडी बाहेर पडण्याच्या अगोदर काही काळ गर्भाशयात स्थिरावतात.

नराच्या शरीरात वृक्वाजवळ दोन्ही बाजूंस पिवळट रंगाच्या ग्रंथी असतात, त्यांना वृषण म्हणतात. या ग्रंथीत असलेल्या लघुनलिकांतशुक्राणु तयार होतात व येथून ते शुक्रवाहक नलिकांत जातात. या शुक्रवाहक नलिका मूत्रवाहिनीत शुक्राणू नेऊन सोडतात. मूत्रवाहिनीचा पश्च भाग स्नायुयुक्त असतो. या भागास रेताशय म्हणतात. काही काल रेताशयात शुक्राणूंचा साठा केला जातो. समागमाच्या वेळी शुक्राणू अवस्करात सोडले जातात व तेथून त्यांचे सिंचन मादीच्या अवस्करातून बाहेर पडणाऱ्या अंड्यांवर होते. समागम काळात वृषण व अंडकोश यांत काही हॉर्मोने तयार होतात व त्यांचाही नरमादीच्या वर्तनावर परिणाम होतो. जनन ग्रंथीजवळ वसापिंड आढळतात. बेडूक शीत निष्क्रियतेत जाण्यापूर्वी हे वसापिंड मोठे होतात व शीतनिष्क्रियतेच्या काळात यांचा अन्न म्हणून उपयोग होतो. समागम काळात नर बाहेरील अन्न न घेता या वसापिंडावर जगतो, तर मादी या वसापिंडाच्यासाह्याने अंड्यात पीतकाचा (पोषक द्रव्याचा) साठा करते. समागम काळ संपल्यावर हे वसापिंड अंत्यत लघुरूपाने अस्तित्वात राहतात.

आ. १२. बेडकाचे जनन तंत्र : (अ) मादीचे जनन तंत्र (आ) नराचे जनन तंत्र : (१) रंध्र, (२) वसापिंड, (३) अंडाशय, (४) अंडवाहिनी, (५) वृषण, (६) वृक्क, (७) अधिवृक्क ग्रंथी, (८) मूत्रवाहिनी, (९) मोठे आतडे, (१०) गर्भाशय, (११) मूत्राशय, (१२) अवस्कर छिद्र.

बेडकाच्या शरीरातील विविध तंत्राचे वर्णन वर दिलेले आहे. या प्रत्येक तंत्रावर तसेच प्रत्येक ज्ञानेंद्रियावर स्वंतत्र नोंदी असून त्यांत अधिक तपशीलवार वर्णन दिलेले आहे.

पहा : उभयचर वर्ग भेक वृक्षमंडूक.

 संदर्भ : 1. Goodnight, C. J. Goodnight M. L. Gray, P. General Zoology, New York, 1964.

             2. Parker, T. J. Haswell, W. A. A Textbook of Zoology, London, 1963.

 इनामदार, ना. भा. जोशी, मीनाक्षी.