हर्शेल, सरजॉन (फ्रेडरिक विल्यम) : (७ मार्च १७९२–११ मे १८७१). ब्रिटिश ज्योतिर्विद, गणिती व रसायनशास्त्रज्ञ. दक्षिण खगोलार्धात दिसणाऱ्या ताऱ्यांचे निरीक्षक म्हणून त्यांचा विशेष लौकिक आहे. चांदीची लवणे हायपो विद्रावात (सोडियम थायोसल्फेटात) विरघळतात, हे पाहून त्यांनी १८१९ मध्येच छायाचित्रणात हायपो विद्राव प्रथम उपयोगात आणला. संवेदनशील कागदावर अथवा काचेवर त्यांनी छायाचित्रणाचे मुद्रण प्रथम केले. तसेच त्यासंबंधीचे पॉझिटिव्ह (सम) व निगेटिव्ह (व्यस्त) हे शब्दप्रयोगही प्रथम त्यांनीच प्रचारात आणले.

हर्शेल यांचा जन्म स्लॉव (बकिंगहॅमशर, इंग्लंड) येथे झाला. त्यांना ईटन येथे प्राथमिक व थोडे खासगी शिक्षण मिळाले. सेंट जॉन्स या केंब्रिजच्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन ते १८१३ मध्ये सिनीअर रँग्लर व स्मिथ्स प्राइझ्मन झाले. त्याचवर्षी ते रॉयल सोसायटीचे फेलो झाले. एम्.ए. झाल्यानंतर १८१६ मध्ये त्यांनी केंब्रिज कायमचे सोडले. यूरोप-मधील त्या वेळच्या आधुनिक असणाऱ्या अवकलन व विश्लेषण अशा गणिताच्या शाखांवर मित्रांच्या सहकाऱ्याने त्यांनी क्रमिक पुस्तके लिहून इंग्लंडमधील गणिताचा अभ्यासक्रम अद्ययावत केला. यासाठी त्यांना रॉयल सोसायटीचे कॉप्ली पदक मिळाले होते.

हर्शेल यांनी वकिलीकडे थोडे लक्ष दिले होते परंतु प्रजापती (युरेनस) या ग्रहाचे संशोधक असलेले त्यांचे वडील ⇨ सर विल्यम हर्शेल यांच्यामुळे त्यांनी खगोलशास्त्रात १८१६ पासून विशेष लक्ष घातले. वडिलांच्या मदतीने त्यांनी ४५ सेंमी. व्यासाचा व ६ मी. केंद्रांतराचा परावर्ती दूरदर्शक बनविला होता. वडिलांनी संशोधित केलेले द्वित्त तारे त्यांनी तपासलेच परंतु, तीन हजारांहून अधिक द्वित्त तारे त्यांनी स्वतः शोधून काढले. या शोधाबद्दल त्यांना १८२५ मध्ये फ्रेंच ॲकॅडेमीचे लालांद पारितोषिक व १८२६ मध्ये रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक मिळाले. १८३१ मध्ये त्यांना ‘सर’ (नाइट) हा किताब मिळाला. १८३३ मध्ये त्यांनी द्वित्त ताऱ्यांची यादी तयार केली परंतु ⇨ अभ्रिका-संबंधीचे (तेजोमेघासंबंधीचे) त्यांचे कार्य अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी २,३०७ अभ्रिकांची यादी तयार केली. ते रॉयल सोसायटीचे सचिव (१८२४–२७) व काही काळ अध्यक्षही होते. नंतर ते दक्षिण खगोलार्धा-तून दिसणाऱ्या ताऱ्यांच्या निरीक्षणासाठी मुद्दाम दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनजवळ वास्तव्यास होते. तेथील फेल्डहाउसेन या ठिकाणी त्यांनी मोठा दूरदर्शक बसविला.

हर्शेल यांनी १८३४–३८ या काळात दक्षिण आकाशाचा सर्वंकष अभ्यास केला. त्यांनी त्या खगोलार्धातील १,२०२ द्वित्त तारे व १,७०८ अभ्रिका आणि तारकागुच्छ शोधून काढले परंतु यापेक्षा तारकीय संख्याशास्त्रासंबंधी त्यांचे कार्य अधिक मोलाचे आहे. त्यांनी १८३५ मध्ये पुन्हा आलेल्या हॅले धूमकेतूचा अधिक अभ्यास केला. त्यांनी आकाशातील ३,००० क्षेत्रे निवडून त्यांतील ६८,९४८ ताऱ्यांची स्थाने नोंदविली. कित्येक तारकाक्षेत्रांचे व गांगेयेतर (आकाशगंगेत नसलेल्या) पदार्थांचे नकाशे व रूपरेषा त्यांनी चित्रित केल्या. १८३८ मध्ये इंग्लंडला परत आल्यावर व्हिक्टोरिया राणीने त्यांना बॅरन करून गौरविले. यानंतर त्यांनी आपल्या सर्व वेधांची व संशोधनाची सुसूत्र मांडणी केली. हर्शेल १८५०–५६ दरम्यान टाकसाळीचे मुख्य (मास्टर) होते. १८६४ मध्ये त्यांनी खगोलीय पदार्थांची संग्राहक यादी तयार केली. अलीकडे सुधारित स्वरूपात न्यू जनरल कॅटलॉग (एन्. जी. सी.) ही यादी आजही प्रमाणित म्हणून संदर्भासाठी वापरतात.

हर्शेल यांनी विविध शास्त्रीय विषयांवर पुस्तके लिहिली. आउटलाइन्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमी (१८४९) या त्यांच्या पुस्तकाच्या पुष्कळ आवृत्त्या निघाल्या आणि त्याची चिनी, अरबी इ. अन्य भाषांत भाषांतरे झाली. रिझल्ट्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेशन्स, मेड ड्युरिंग द इयर्स १८३४ – ३८ ॲट द केप ऑफ गुड होप (१८४७) हे त्यांचे दुसरे महत्त्वाचे पुस्तक असून यात दक्षिण खगोलार्धातील अभ्रिका व तारकागुच्छ यांच्या याद्या आणि चार्ट दिले आहेत.

हर्शेल यांचे हॉखर्स्ट (कोलिंगवुड, केंट) येथे निधन झाले.

काजरेकर, स. ग.