वंस (वत्स) : भारतातील एक प्राचीन जनपद. बौद्धकालीन उत्तर भारतातील प्रसिद्ध सोळा महाजनपदांपैकी (इ. स. पू. सहावे शतक) हे एक महत्त्वाचे मानले जात होते. याच्या नावाच्या व्युत्पत्तीविषयी अनेक मते प्रचलित आहेत. या भागात वंश लोकांची वस्ती होती, म्हणून याचे ‘वंस’ हे नाव रूढ झाले असे म्हटले जाते, तर काही तज्ञांच्या मते काशीचा राजा दिवोदास याचा नातू वत्स याने आपल्या राज्याचा विस्तार या प्रदेशात केल्याने त्याला ‘वlत्सभूमी’ हे नाव पडले. बौद्ध वाङ्मयात याचा प्रामुख्याने ‘वंस’ अथवा ‘वंसदेश’ असा, तर रामायण,महायभारतादी ग्रंथांत याचा ‘वत्स’अथवा ‘वत्सदेश’ असा उल्लेख आढळतो. वनवासकाळात राम वत्सदेशातून गेल्याचे, तर भीम व कर्ण यांनी हा देश जिंकून घेतल्याचे उल्लेख अनुक्रमे रामायणमहाभारतात (सभापर्वात व वनपर्वात) आहेत. जैन साहित्यात भगवती-सूत्रात यालाच ‘वच्छ’ असे संबोधिले आहे.

प्रयागच्या पश्चिमेस गंगा व यमुना नद्यांदरम्यान याचा विस्तार होता. उत्तरेस कोसल देश, दक्षिणेस चेदि, पश्चिमेस व वायव्येस अनुक्रमे शूरसेन व पंचाल तसेच पूर्वेस मगध, काशी या जनपदांनी वंसदेश वेढलेला होता. 

कौशाम्बी (कोसाम) ही बंसची राजधानी होती. तलम सुती वस्त्रांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला हा देश रत्ने व धनधान्यांनी समृद्ध होता, असा अंगुत्तरनिकायमध्ये उल्लेख आढळतो. बुद्धकाळात कुरुवंशीय उदयन (वत्सराज) हा या देशाचा राजा होता. बाजूच्या बलाढ्य राज्यांशी वैवाहिक संबंध जोडून त्याने त्यांपासून संरक्षण मिळविले होते. अवंती नरेश चण्ड प्रद्योत (चण्ड पज्ज्योत) याच्याशी संघर्ष होऊनही त्याने त्याच्या वासवदत्ता (वासुलदत्ता) मुलीशी लग्न केले. यांच्या प्रणयकथेवर अनेक संस्कृत नाटके लिहिली गेली आहेत. शूरसेन जनपदावर अवंतीचा प्रभाव होता, त्यामुळे पर्यायाने त्या जनपदापासूनही उदयन राजाला संरक्षण मिळाले होते. पुढे उदयनाने अंग व मगध देशांतील राजकन्यांशीही विवाह केल्याचा स्वप्नवासवदत्तामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे वंसदेशाचे स्वातंत्र्य काही काळ अबाधित राहिले होते. अवंती तसेच दक्षिण पंचाल यांच्या काही भांगांचाही समावेश वंसदेशात करण्यातआला होता, असा उल्लेख कथासरित्सागर ह्या ग्रंथात मिळतो. पुढे वंसदेश मगध साम्राज्यात विलीन करण्यात आला. 

पहा: कौशाम्बी जनपद महाजनपद.  

चौसे, मा. ल.