दिनीश, झ्यू लिउ : (१४ नोव्हेंबर १८३९–१२ सप्टेंबर १८७१). श्रेष्ठ पोर्तुगिज कादंबरीकार. जन्म आणि शिक्षण ओपोर्तो येथे. वैद्यकाचा पदवीधर झाल्यानंतर त्या विषयाचे अध्यापन केले. ऊ झ्यॉर्नाल दू पोर्तुमधून त्याच्या कथा १८६१ पासून प्रसिद्ध होऊ लागल्या व सॅराँइश दू प्रॉव्हींसिअ (इं. शी. ईव्हनिंग्ज इन द कंट्री) ह्या नावाने त्यांचा संग्रह १८७० मध्ये प्रसिद्ध झाला.

अश् पुपीलश् द् सिन्योर रैतोर (१८६७, इं. शी. फादर रेक्टर्स प्यूपिल्स) आणि ऊमा फामिलिअ इंग्लेझा (१८६८, इं. शी ॲन इंग्लिश फॅमिली) ह्या त्याच्या दोन विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. त्यातही ‘ॲन इंग्लिश फॅमिली’ ही मनोविश्लेषणात्मक कादंबरी समीक्षकांनी विशेष गौरविलेली आहे. कादंबरीकार म्हणून त्याच्या स्वतंत्र प्रतिभेचा ठसा ह्या कादंबरीतून विशेषत्वाने प्रत्ययास येतो. ‘फादर रेक्टर्स प्यूपिल्स’ ह्या त्याच्या ग्रामीण कादंबरीस मिळालेली लोकप्रियता एवढी होती, की १९०० पर्यंत ह्या कादंबरीच्या एकूण १४ आवृत्त्या निघाल्या. अमॉर्गादीन्य दुश कानाव्हिआइश (१८६८, इं. शी. द लेडी ऑफ केन फील्ड्स) आणि उश् फिदाल्गुश द काझा मौरीश्का (१८७१, इं. शी. द लॉर्ड्‌स ऑफ द मूरिश हाउस) ह्या त्याच्या अन्य ग्रामीण कादंबऱ्या.

पोर्तुगीज साहित्यातील स्वच्छंदतावाद व वास्तववाद यांच्यामधील संधिकालाचा दिनीश हा प्रतिनिधी होय. स्वच्छंदतावादी प्रवृत्तींबरोबरच वास्तववादाला साजेसे वस्तुनिष्ठ विश्लेषणही त्याच्या कादंबऱ्यांतून आढळते. सूक्ष्म निरीक्षण साधी, सोपी परिणामकारक भाषा, ग्रामीण जीवनावरील प्रेम इ. विशेष त्याच्या कथा–कादंबऱ्यांतून दिसतात. मादैरा येथे क्षयाच्या विकाराने तो निधन पावला.

रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)