शिर-ह्‌वां ग-टी (शृ-ह्‌वां ग-डि) : (इ. स. पू. २५९–२१०) चीनचा पहिला सार्वभौम सम्राट आणि एकसंध चीनचा शिल्पकार. त्याचे मूळ नाव जाऊ जंग. वायव्य चीनमधील च्यीन येथे जन्म. वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या तेराव्या वर्षी तो च्यीनच्या गादीवर आला. त्याच्या कारकिर्दीचे तीन भाग पडतात : इ. स. पू. २४७–२३४, इ. स. पू. २३४–२२१ आणि इ. स. पू. २२१–२१०. सुरुवातीस त्याच्या अल्पवयाचा फायदा घेऊन ल्यू बू-वे हा त्याच्या आईचा प्रियकर सर्वसत्ताधारी बनला. ल्यू बू-वेने नोकरशाहीची सुसूत्र रचना केली व सुसज्ज लष्कर उभारले. वयाच्या एकविसाव्या वर्षी शिर–ह्‌वांग-टीने ल्यू बू-वेचे वर्चस्व झुगारून दिले व ली-स्स यास पंतप्रधानपदी नेमले.

पुढे चीनमधील अन्य सहा राज्ये पादाक्रांत करून च्यीनचे सार्वभौम साम्राज्य स्थापन केले व एकछत्री चीनचा पहिला सम्राट (शिर-ह्‌वांग-टी) म्हणून स्वतःस घोषित केले (इ. स. पू. २२१). ‘च्यीन’ या शब्दावरूनच चीन हे नाव या देशास मिळाले असावे. यानंतरही त्याने आसपासची सेचवान, शान्सी, फूक्येन, ग्वांगटुंग, ग्वांगसे, टाँकिन वगैरे छोटी राज्ये जिंकून आपल्या साम्राज्यास जोडली. कोरिया व जपान येथे वसाहती स्थापन करण्यासाठी त्याने आरमारही उभारले.

आपल्या कारकिर्दीत त्याने सरंजामदारांच्या जमिनी जप्त करून कसणाऱ्याना व शेतकऱ्यांना शेतकीचे मालकी हक्क बहाल केले. त्याने सरंजामदारांची शस्त्रास्त्रेही जप्त केली. त्याच्या राजवटीत धान्याची व शस्त्रास्त्रांची प्रचंड कोठारे बांधण्यात आली. जहागीरदार-सरंजामदार यांनी श्येन्यांग या राजधानीतच राहावे, असा निर्बंध घालण्यात आला. आपल्या साम्राज्याचे ३६ लष्करी प्रांत (ज्युन) आणि त्या प्रांतांचे पुन्हा जिल्ह्यांत (स्यन) विभाजन केले. त्या प्रत्येकावर केंद्रसत्तेला जबाबदार असलेला विविध श्रेणींचा अंमलदारवर्ग प्रशासक म्हणून नेमण्यात आला. केंद्रीय प्रशासनाचीही खातेवार विभागणी करून प्रत्येक खात्यावर जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. व्यापारव्यवहारावर कडक नियंत्रणे ठेवून त्याने उत्पादनसाधने शासकीय मालकीची केली व बाजारभाव स्थिर ठेवण्याची खबरदारी घेतली. शेतीसाठी कालवे खणण्यात आले. तसेच राजधानीला जोडणाऱ्या पक्क्या सडका बांधल्या.

सर्वत्र संरक्षक तट, इमारती, राजवाडे इत्यादी वास्तू सर्वत्र बांधण्यात आल्या. या योजनांना लागणारा मजूरवर्ग उपलब्ध व्हावा, म्हणून प्रांताप्रांतांतून नागरिकांचे जबरदस्तीने स्थलांतर करण्यात आले. या विकासयोजनांवर कमी वेतनावर काम करण्याची सक्ती करण्यात आली. देशाचे एकत्रीकरण घडवून आणण्यासाठी सर्वत्र एकाच प्रकारच्या सांस्कृतिक संस्था असाव्यात, देशभर समान कायदेकानू, सर्वमान्य चलनातच आर्थिक व्यवहार व्हावेत, सर्वत्र एकाच प्रकारची वजने, मापे, शेतीची अवजारे असावीत. एवढेच नव्हे तर गाडीच्या चाकांचे आसही सर्वत्र एकाच मापाचे असावेत, असे ठरविण्यात आले.

महामंत्री ली-स्सच्या मदतीने शिर-ह्‌वांग-टीने चिनी लिपीचे सुलभीकरण करून ती सुटसुटीत केली व तीमध्ये लेखन व्हावे, असा कायदा केला. बांबूच्या लगद्याचा कागद बनवून व केसांच्या छोट्या कुंचल्यांच्या लेखण्या बनवून त्यांचा उपयोग लेखनासाठी होऊ लागला. चीनची सु. २,२५३ किमी. लांबीची प्रचंड भिंत त्यानेच बांधली (इ. स. पू. २१४). शिर-ह्‌वांग-टीने कन्फ्यूशसवादी विद्वानांना धडा शिकविण्यासाठी कृषी, वैद्यक, ज्योतिष, वनस्पतिशास्त्र इ. विषयांवरील ग्रंथ व मध्यवर्ती ग्रंथालयातील ग्रंथ सोडून इतर सर्व विषयांवरील ग्रंथ नष्ट करण्याचा हुकूम दिला आणि त्याची कडकपणे अंमलबजावणी केली. एवढेच नव्हे, तर त्याच्या मतास विरोध करणाऱ्या ४६० विद्वानांची हत्या केली. अमरत्वाचे रसायन मिळविण्यासाठी साम्राज्याच्या प्रत्येक भागांतून त्याने तपासणी-दौरे काढले. अशाच एका दौऱ्यात तो मरण पावला परंतु त्याच्या मृत्यूची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. त्याचे दफन च्यीन टूम या ठिकाणी करण्यात आले.

शिर-ह्‌वांग-टीने चीनमध्ये समान कायदेकानू, चलनव्यवस्था आणि एक भाषा व एक लिपी सुरू केली. देशातील सरंजामशाही नष्ट करून सामान्य शेतकऱ्याला कसण्यास जमीन दिली. त्यामुळे साम्यवादी विचारसरणीचे इतिहासकार त्यास श्रमजीवी जनतेचा तारणकर्ता मानतात. याउलट चिनी बुद्धिजीवीवर्गाने त्याला बडा खलनायक मानले आहे.

शिर-ह्‌वांग-टीने बांधलेली अजस्र भिंत, त्याचा प्रशस्त राजवाडा (४५० चौ. मी.) आणि त्याचे थडगे यांचे अवशेष आज उपलब्ध आहेत. शेन्सी प्रांतातील च्यीन टूम या स्थळी त्याच्या थडग्याच्या शोधार्थ मार्च १९७४ मध्ये विस्तृत उत्खनन हाती घेण्यात आले. या उत्खननांत सु. ६,००० शिपायांचे पूर्णाकृती पुतळे आढळले असून अगदी सुस्थितीत असलेली शस्त्रास्त्रे मिळाली आहेत मात्र राजाचे मूळ थडगे सापडले नाही.

पहा: चीन (इतिहास) चीनची भिंत.

संदर्भ : 1. Bodde, Derk, China’s First Unifier, New York, 1967.

           2. Gernet, Jacques Trans. Rudroff, Raymond, Ancient China, London, 1968.

देशपांडे, सु. र.