देवी : तीव्र स्वरूपाच्या पूर्वरूपामध्ये (रोगास प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीच्या अवस्थेमध्ये) अतिज्वर व सर्वांग ठणकणे यांसारखी इन्फ्ल्यूएंझाच वाटावा अशी जोरदार लक्षणे असलेला आणि दोन ते चार दिवसांनंतर परिसरीय उत्स्फोट (पुरळ) दिसू लागणाऱ्या व्हायरसजन्य सांसर्गिक रोगास ‘देवी’ म्हणतात. मरीआई, शितळादेवी यांसारख्या देवतांच्या प्रकोपामुळे हा रोग होतो, या जुन्या व भ्रामक कल्पनांमुळे या रोगास ‘देवी’ हे नाव रूढ झाले असावे.

इतिहास : अतिप्राचीन काळापासून मानवाला हा रोग माहीत असावा. रोगाच्या लक्षणांची अचूक वर्णने भारतीय व चिनी प्राचीन साहित्यात आढळतात. आयुर्वेदात या रोगाचा उल्लेख ‘मसूरिका’ म्हणून केला आहे. प्लेग, पटकी यांसारख्या भयंकर रोगांप्रमाणेच देवीने सुद्धा लक्षावधी मानवांचा बळी घेतला आहे. सर्व जगभर या रोगाचा बहुद्देशीय प्रादुर्भाव वारंवार झाला आहे. रूफर या शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे ईजिप्तमधील विसाव्या राजवंशातील एका ममीच्या (शुष्क प्रेताच्या) शरीरावरील लक्षणांच्या वर्णनावरुन त्याच्या मृत्यूचे कारण देवी हा रोगच असावा. ईजिप्तमधील पाचवे रॅमसीझ (इ. स. पू. १९६०) नावाच्या राजांच्या ममीच्या डोक्यावर देवीच्या तीव्र रोगामुळे उत्पन्न झालेली लक्षणे आढळली आहेत. पण या एक दोन उदाहरणांवरुन इ. स. पू. ११०० च्या समुरास देवी हा रोग अस्तित्वात असावा असे, खात्रीलायक अनुमान करता येत नाही. आदिमानवालाही हा रोग संसर्गजन्य असल्याची कल्पना असावी. कारण तसा एखाद दुसरा रोगी दिसताच सर्व जमात वस्ती सोडून व रोग्यास तसेच टाकून देऊन दूर जंगलात पळून जात असे. केवळ भारतातच हा रोग दैवी प्रकोपामुळे होतो, अशी भ्रामक समजूत नव्हती. बोर्निओतील डाइक आणि पश्चिम आफ्रिकेतील योरुबा जमातींतही हा रोग अनुक्रमे पिशाच्चबाधा व सैतानामुळे होतो, अशी समजूत रूढ होती.

इ. स. ५७० मध्ये स्वित्झर्लंडमधील बिशप ऑफ ॲव्हेन्‌चेस यांनी फ्रान्स व इटलीमधील देवीच्या साथींचा प्रथम उल्लेख केल्याचे आढळते. देवी या रोगास असलेले दुसरे पर्यायी नाव ‘व्हॅरिओला’ हे त्यांनीच प्रथम वापरले. त्यानंतर दहाव्या शतकात पर्शियातील हकीम अबूबाकर मोहमंद इब्न झकेरिया ऊर्फ राझेस यांनी देवी आणि गोवर यांमधील फरक दर्शविणारा निबंध लिहिला.

यूरोपमधील या रोगाच्या सविस्तर नोंदी पंधराव्या शतकापासूनच्या मिळतात. सोळाव्या, सतराव्या व अठराव्या शतकांत या रोगामुळे मानवाच्या एकूण जीवनावर झालेले भयंकर दुष्परिणाम वर्णिलेले सापडतात. गावेच्या गावे ओस पडल्याची, असंख्य लोक विद्रूप झाल्याची, अनेकांना अंधत्व आल्याची पुष्कळ उदाहरणे दिलेली आहेत. अठराव्या शतकात तर केवळ बोटावर मोजता येतील एवढेच लोक या रोगाच्या तडाख्यातून बचावले असावेत. चीनमध्ये तर या रोगाची एवढी जबरदस्त धास्ती वाटे की, कोणतीही माता आपल्या अपत्यास देवी येऊन गेल्याशिवाय ते वाचणारच नाही. अशीच खात्री मनात बाळगून असे.

अमेरिकेचा शोध लागल्यानंतर पंधरा वर्षांनी, १५२० च्या सुमारास, स्पॅनिश लोकांनी देवीचा रोग पश्चिम गोलार्धात प्रथम पोहोचविला. एकूण जवळजवळ ६०,००,००० तद्देशीयांपैकी ३५,००,००० अल्पकाळातच देवीला बळी पडले. यूरोपच्या गोऱ्या लोकांनी वापरलेल्या दारूगोळ्यापेक्षाही हा भूप्रदेश जिंकण्यास त्यांना देवी या रोगाने अधिक मदत केली असावी.


संप्राप्ती : ज्या व्हायरसांपासून हा रोग होतो त्यांना ‘देवीचे व्हायरस’ म्हणतात. या संज्ञेमध्ये तीव्र देवी, सौम्य देवी व व्हक्सिनिया (यामध्ये गोदेवी व मानवाला देवीची लस टोचल्यानंतर कधीकधी उत्पन्न होणाऱ्या प्रतिक्रिया यांचा समावेश असतो) यांना कारणीभूत असणाऱ्या सर्वच व्हायरसांचा समावेश होतो. ते सर्व रचनात्मक दृष्ट्या सारखेच असतात. त्यांचे प्रतिजन (ज्या पदार्थांचा शरीरात प्रवेश झाल्यामुळे रक्तरसामध्ये प्रतिकारक्षमता देणारी ग्लोब्युलिने–एक प्रकारची प्रथिने–तयार होतात असे पदार्थ) सारखेच असल्यामुळे त्यांपैकी कोणत्याही एकाने रोग झाल्यास इतर सर्वांविरुद्ध प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) उत्पन्न होते.

या व्हायरसांचे आकारमान मोठे (२०० ते २५० मायक्रोमायक्रॉन्स १ मायक्रोमायक्रॉन = १०–९ मिमी.) असून साध्या सूक्ष्मदर्शकाखाली देवीच्या रोग्याच्या फोडाच्या पूयिका अवस्थेतील द्रवांत किंवा फोड फोडून त्याखालील त्वचेच्या खरवडलेल्या भागात विशिष्ट अभिरंजन (रंगविण्याच्या) पद्धतीने ते सहज दिसू शकतात. ते त्वचेच्या उपकला कोशिका द्रवात (अस्तराच्या पेशीतील द्रवात) वाढतात. व्हायरस पुंजांना ‘ग्वार्निएरी कण’ (जी. ग्वार्निएरी या इटालियन वैद्यांच्या नावावरून) म्हणतात. प्रत्यक्ष व्हायरसांना ‘पाशेन मूलकण’ (ई. पाशेन या जर्मन विकृतिवैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात. शुष्कावस्थेत हे व्हायरस काही वर्षे टिकू शकतात. इंग्लंडमधील एका खेड्यात स्मशानात प्रेत पुरावयास जागा नसल्यामुळे तीस वर्षांपूर्वी देवीने मेलेल्या एका मृताची शवपेटी काढून टाकून ती जागा वापरावयाचे ठरले. शवपेटी भरभक्कम राहिली होती पण ती फोडताच भयंकर दुर्गंधी जवळपास पसरली. एवढीच नव्हे तर त्या खेड्यातील फक्त दोन व्यक्तींशिवाय इतर सर्वांना ‘सौम्य देवीचा’ रोग उद्‌भवला. ॲबर्डीन येथील देवीचे रोगी अलग ठेवण्याकरिता बांधलेल्या व ते पाच वर्षे वापरात नसताना, एका रुग्णालयाचे बांधकाम पाडून टाकणाऱ्या मजुरास देवी आल्याचेही उदाहरण नमूद करण्यात आले आहे.

संसर्ग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उत्पन्न होऊ शकतो. दुसरा कोणताही प्राणी रोगवाहक नसून हा मानवापासूनच मानवात फैलावतो. तो पूर्वरूपापासूनच सांसर्गिक असून संसर्गोत्पादकता रोग्यामध्ये सतत वाढत जाते व तिचा उच्चबिंदू फोडांवरील खपल्यांमध्ये संपतो. तळहात, तळपाय व डोक्यावरील खपल्या सर्वांत जास्त संसर्गोत्पादक असतात. पूर्वरूपामध्ये रोगाचा फैलाव बिंदुजन्य स्वरूपाचा (बोलताना, शिंकताना व खोकताना उडणारे अतिसूक्ष्म द्रवबिंदू व्हायरसजन्य असण्याचा) असल्यामुळे जवळच्या व्यक्तींमध्ये तो फैलावण्याची शक्यता असते. रोगाचा फैलाव संक्रामणी पदार्थही (रोग्याचे कपडे, भांडी वगैरे) करू शकतात. वायुजन्य फैलावाबद्दल अजून दुमत आहे. काहींच्या मते असा फैलाव १·५ किमी. पर्यंतही शक्य आहे. याउलट मुंबईच्या आर्थर रोड संसर्गजन्य रोगांच्या रुग्णालयातील १० वर्षांच्या पाहणीमध्ये वायुजन्य फैलावास पुरावा मिळालेला नाही. हा रोग एकदा होऊन गेलेल्या रोग्यास तो पुन्हा होत नाही म्हणजेच त्याच्यामध्ये आयुष्यभर पुरेशी प्रतिरक्षा तयार होते. या रोगाविरुद्ध नैसर्गिक प्रतिरक्षा असत नाही. सर्व जाती व वंश तसेच कोणत्याही वयात तो होऊ शकतो. गौरवर्णियांपेक्षा काळ्या रंगाच्या लोकांत तो होण्याचा संभव अधिक असतो.

देवीचे व्हायरस श्वसनमार्गातून आत शिरल्यानंतर बहुधा स्थानीय लसीका (रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ असलेल्या) ऊतकात (वाहिन्या व ग्रंथी यांत) प्रथम प्रवेश करीत असावेत. तेथून ते रक्तप्रवाहात मिसळून यकृत, प्लीहा, मूत्रपिंड, वृषण (पुं–जनन ग्रंथी) इ. अंतस्त्यांत (इंद्रियांत) पोहोचतात. रोगाच्या सुरुवातीपासूनच जोरदार व्हायरसरक्तता (रक्तात व्हायरसांचा प्रादुर्भाव होणे) असूनही बाह्यलक्षणे म्हणण्यासारखी आढळून येत नाहीत. रक्तातील व्हायरस त्वचेतील केशवाहिन्यात पोहोचतात. बाह्यत्वचेचा खालचा थर व अंतस्त्वचा यांमध्ये देवीचे फोड उद्‌भवतात. तोंडातील व इतर श्लेष्मकलांवरही (बुळबुळीत अस्तरांवरही) ते परिणाम करतात. शरीराच्या इतर भागापेक्षा चेहऱ्यावर देवीचे वण अधिक स्पष्ट व खोलवर गेलेले आढळतात. कारण या ठिकाणी त्वक्–स्नेह ग्रंथी (स्निग्ध पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथी) अधिक असून त्यांचा ऊतकमृत्यू (सजीव शरीरात असतानाच ऊतकाच्या–कोशिकासमूहाच्या–काही भागातील कोशिकांचा नाश होणे) होऊन नाश होतो. बहुसंख्य मृत्यू श्वासनलिका व फुफ्फुस यांच्या शोथामुळे (दाहयुक्त सुजेमुळे) होतात.


लक्षणे : परिपाककाल (रोगकारक व्हायरस शरीरात शिरल्यापासून प्रत्यक्ष लक्षणे दिसेपर्यंतचा काळ) सर्वसाधारपणे १० ते १२ दिवसांचा असतो. देवीचा तीव्र प्रकारचा रोग बहुधा द्विदशात्मक (दोन अवस्था असलेला) असतो. पहिल्या अल्पकाल टिकणाऱ्या अवस्थेला विषरक्तता म्हणतात व दुसऱ्या अधिक काळ टिकणाऱ्या अवस्थेला उत्स्फोटक अवस्था म्हणतात.

विषरक्ततेमध्ये अतिज्वर (३८·९° से.), डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व विशेषकरून जोराची पाठदुखी ही लक्षणे आढळतात. हळूहळू वरील लक्षणांचा जोर कमी होत जातो व दुसऱ्या अवस्थेस सुरुवात होते.

आ. १. देवीच्या उत्स्फोटाची स्थाने : X अशा खुणा केलेल्या जागी उत्स्फोट बहुधा प्रथम दिसू लागतात.

उत्स्फोटक अवस्थेस बहुतकरून तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी सुरुवात होते. तोंड, घसा व श्वसनमार्गाचा वरचा भाग येथील श्लेष्मकलांवर उत्स्फोट दिसू लागतात. याला आंतर–उत्स्फोट म्हणतात. या ठिकाणी लाल किंवा गुलाबी रंजिका दिसू लागतात. या रंजिकांचे टाळू, जीभ, घसा इ. ठिकाणी व्रणांत रूपांतर होते. खोकला येऊ लागून आवाज घोगरा बनतो. त्वचेवरील उत्स्फोटांना बाह्योत्स्फोट म्हणतात. चेहरा, मान, कपाळ व पाठीवरील त्वचेवर ते प्रथम दिसू लागतात. त्यानंतर छाती, हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांवर पसरतात. शरीराच्या समीपस्थ भागापेक्षा त्यांचा जोर दूरस्थ भागावर प्रामुख्याने आढळतो उदा., तळहात व तळपाय म्हणजेच उत्स्फोट केंद्रोत्सारी असतो. त्याचे प्रमाण कोपर व गुडघा यांच्या खालच्या शरीरभागावर नेहमी अधिक असते, तसेच ते चेहऱ्याच्या इतर भागांपेक्षा कपाळावर अधिक असते. उत्स्फोटांची केंद्रोत्सारी व समप्रमाणित रचना, तसेच त्यांचे शरीराच्या वस्रविरहित भागांचे आकर्षण ही लक्षणे देवीच्या रोगाची निदानात्मक लक्षणेच असतात.

आ. २. देवीचे फोड : नाभीभवन स्पष्ट दिसत असून सर्व फोड एकाच अवस्थेत आहेत.

हळूहळू रंजिकांच्या पिटिका बनतात. या पिटिका हाताने दाबून पाहिल्यास कठीण लागतात व सर्वसाधारणपणे ४ मिमी. व्यासाच्या असतात. सहाव्या दिवशी पिटिकांमधील धमन्यांतील रक्ताधिक्यामुळे निःस्रवण होऊन आत लसीका जमा होते व पिटिकांच्या जागी पुटिका तयार होतात व त्यांचा व्यास ६ मिमी. बनून भोवतालची त्वचा लाल बनते. सुईने टोकरल्यास या पुटिकांमधून थोडासा द्रव बाहेर पडतो, परंतु त्या पूर्णपणे दबत नाहीत. ⇨ कांजिण्यांचे फोड  असे टोकरल्यास संपूर्ण दबतात. आठव्या दिवशी (सुरुवातीपासूनच्या) पुटिकांच्या पूयिका (पूयुक्त फोड) बनतात. याच सुमारास पूयिकेवर मध्यभागी बारीक खड्डा तयार होतो, याला नाभीभवन म्हणतात. पूयिका फुटतात. काही कोरड्या पडतात व त्यांवर खपल्या तयार होतात. या सुमारास आजाराचा जोर कमी होऊ लागतो. ज्या ठिकाणी उत्स्फोटात प्रथम सुरुवात झाली असेल तेथील खपल्या प्रथम पडू लागतात. तळहात व तळपायाची त्वचा जाड असल्यामुळे तेथील खपल्या लवकर पडत नाहीत. कधीकधी मुद्दाम काढून टाकाव्या लागतात. देवीच्या खपल्या पडल्यानंतर त्वचेवरील खड्डेवजा व्रण कायम राहतात व त्यांना देवीचे वण म्हणतात.


काही प्रकार : तीव्र देवीच्या रोगात काही उपप्रकार आढळतात. संमीलित प्रकारात रोग जोराचा असून उत्स्फोटाचे फोड एकमेकांत मिसळून सबंध चेहरा सुजून विद्रूप बनतो. या प्रकारात मृत्यूचे प्रमाण ३०% ते ५०% असावयाचे परंतु अलीकडे प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा उपयोग करण्यास सुरुवात झाल्यापासून ते १०% ते २०% पर्यंत कमी झाले आहे. विरळ प्रकारात फोड एकमेकांपासून लांब असून त्यांमध्ये चांगली त्वचा विखुरलेली असते. या प्रकारात मृत्यूचे प्रमाण ५% पेक्षाही कमी असते. अर्धसंमीलित प्रकारात फक्त चेहऱ्यावरचे फोडच एकमेकांत मिसळलेले असतात व इतरत्र विरळ असतात. रक्तस्रावी प्रकारात पूर्वरूपापासून किंवा पूयिका अवस्थेत जागजागी रक्तस्राव होतो. त्वचा, श्लेष्मकला, नेत्रश्लेष्म (पापणीच्या आतील भागावरील नाजूक पातळ पटल), फुफ्फुसे, गर्भाशय व मूत्रपिंडे यांमध्ये रक्तस्राव होतो. देवीच्या सर्व प्रकारांत हा प्रकार सर्वात जास्त गंभीर स्वरूपाचा असून यात मृत्यूचे प्रमाण ८०%  ते  १००% असते.

देवीची लस टोचल्यामुळे अर्धवट प्रतिरक्षा उत्पन्न झालेल्या व्यक्तीला रोग झाल्यास तो बहुधा सौम्य प्रकारचा असून त्याला परावर्तित देवी म्हणतात. आफ्रिका आणि द. अमेरिकेच्या काही भागांतून मूळातच हतप्रभ असलेल्या व्हायरसापासून होणाऱ्या देवीच्या प्रकाराला सौम्य देवी म्हणतात. सौम्य देवीच्या साथीचे रूपांतर तीव्र प्रकारात कधीही होत नाही व सौम्य प्रकार तीव्र स्वरूपाची साथ आणू शकत नाही.

उपद्रव : या रोगात होणारे विद्रधी (गळू), आगपैण, कोथ (शरीराच्या एखाद्या भागाचा मृत्यू होऊन तो सडणे), स्वरयंत्रशोथ, श्वासनलिका–फुफ्फुसशोथ, संधिशोथ, अस्थिमज्जाशोथ (हाडाच्या अंतर्भागातील पोकळ जागेतील मज्जेला–एक प्रकारच्या मऊ पदार्थाला–येणारी दाहयुक्त सूज) हे उपद्रव सर्वस्वी स्ट्रेप्टोकोकाय या सूक्ष्मजंतूंमुळे उत्पन्न झालेले असतात. उत्स्फोटातील रंजिका व पुटिका अवस्था केवळ व्हायरसामुळेच होत असल्या, तरी स्ट्रेप्टोकोकायचा संसर्ग होतोच व पुढील सर्व उपद्रव किंबहुना मृत्यूचे कारणही स्ट्रेप्टोकोकायजन्यच असते. प्रतिजैव औषधांच्या वापरापासून ते कमी होत आहेत. डोळ्यामध्ये स्वच्छमंडलशोथ (बुबुळांच्या पुढील पारदर्शक भागाचा शोथ) व नेत्रश्लेष्म व्रण होऊन पूर्ण नेत्रशोथ किंवा नेत्रगोल छिद्रणाने अंधत्व येण्याचा संभव असतो. मध्यकर्णशोथ, रक्तस्रावी प्रकारात हृद् निष्फलता (हृदयक्रिया बंद पडणे) व कधीकधी मस्तिष्कावरण शोथ (मेंदूच्या आवरणाचा शोथ) होण्याचा संभव असतो.

निदान व विभेदात्मक निदान : पूर्वरूपावस्थेत पुष्कळ वेळा देवीऐवजी इन्फ्ल्यूएंझाचे चुकीचे निदान होण्याचा संभव असतो. उत्स्फोटक अवस्थेमध्ये इतर बाह्योत्स्फोटक ज्वरांचा विशेषेकरून कांजिण्यांचा संशय येण्याची शक्यता असते. सूक्ष्मदर्शकीय तपासणीत प्रत्यक्ष व्हायरस दिसणे, हे अचूक निदान होय. देवी व कांजिण्या यांमधील फरक दर्शविणारे कोष्टक खाली दिले आहे.

प्रमुख मुद्दा 

देवी 

कांजिण्या 

वय

कोणतेही वय विशेषेकरून अप्रतिरक्षितामध्ये.

बहुधा बालवयांत

परिपाककाल

८ ते १६ (सर्वसाधारणपणे १२) दिवस.

१४ ते २० (सर्वसाधारणपणे १६) दिवस.

पूर्वरूप अवस्था

३ ते ४ दिवस, विषरक्तता, अतिज्वर.

नसते किंवा फार तर १ किंवा २ दिवस. सार्वदेहिक लक्षणे जोरदार नसतात कारण विषरक्तता नसते.

उत्स्फोटाचा दिवस

तिसरा किंवा चौथा दिवस विषरक्तता व सार्वदेहिक लक्षणांचा जोर कमी होतो.

सुरुवातच उत्स्फोटाने होण्याचा संभव असतो.

उत्स्फोटक स्थाने

सुरुवातीस कपाळ, पाठीची वरची बाजू, भुजा व मनगटे.

सुरुवात धडावर, प्रामुख्याने छातीवर.

वितरण क्षेत्र

केंद्रोत्सारी तळहात व तळपायावर जोरदार असतो.

केंद्राभिसारी तळहातावर अजिबात नसतो किंवा एखाद दुसराच फोड दिसतो, मनगटे आणि पायांवर अत्यल्प प्रमाणात दिसतो.

उत्स्फोटक प्रकार

फोड गोल व सारख्या आकाराचे एकरूपी त्वचेत खोलवर गेलेले व अनेक कप्पे असलेले, नाभीभवन असतेच. फोडांच्या अवस्था हळूहळू बदलतात म्हणजेच पुटिकांच्या पूयिका होण्यास ४८ तास जावे लागतात.

फोड लंबवर्तुळाकार किंवा इतर निरनिराळ्या आकारांचे त्वचेच्या वरच्याच थरात, एकाच कप्प्याचे, नाभीभवन नसते फोडल्यास संपूर्ण फोड दबतो. फोडांच्या अवस्था झपाट्याने बदलतात.

ज्वर

अतिज्वर

सौम्य किंवा नसतोच.

गेल्या दोन वर्षांत देवी लस टोचल्याचा इतिहास

टोचून घेतलेल्या नसतात.

घेतल्या असण्याची शक्यता असते.

देवीच्या रोग्याशी सान्निध्याचा इतिहास

बहुधा संसर्गास दुसरा देवीचा रोगी कारणीभूत असतो.

तसा संबंध आलेला नसतो.

त्वचेवर कायम परिणाम

वण शिल्लक राहतातच.

त्वचा पूर्ववत होते.


प्रतिबंधक इलाज : देवीचा रोगी त्याच्या कुटुंबालाच धोकादायक नसून सबंध समाजालाच धोकादायक असतो. योग्य त्या आरोग्याधिकाऱ्यास देवीचा रोगी आढळल्यास ताबडतोब सूचना देणे सक्तीचे असते. कधीकधी हा रोग राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपही धारण करण्याची भीती असते. आज मानव हजारो किमी. प्रवास काही तासांतच करून एका देशातून दुसऱ्यात सहज जाऊ शकतो. म्हणजेच त्याला संसर्ग झाल्याचे लक्षात येण्यापूर्वीच तो रोगवाहक झाल्यास रोग फैलावण्यास कारणीभूत होऊ शकतो. देशोदेशी प्रवास करणाऱ्याना देवी, पीत ज्वर यांसारख्या सांसर्गिक रोगांची प्रतिबंधात्मक लस टोचून घेणे सक्तीचे असून त्यानंतर त्यासंबंधीचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे जरुर असते. देवीची लस टोचून घेतल्याचे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र तीन वर्षांपर्यंत ग्राह्य मानण्यात येते. रोग फैलावू नये याकरिता रोग्याचे अलगीकरण, दूरावास (क्वारंटाइन), रोग्याच्या सन्निध आलेल्या सर्व व्यक्तींना लस टोचून त्यांच्यावर कमीत कमी १६ दिवस वैद्याने लक्ष ठेवणे, संसर्गजन्य रोगांच्या दवाखान्यातील देवीच्या रोग्यांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकेने इतर रोग्यांजवळ न जाणे, रोग्याने वापरलेल्या सर्व वस्तू निर्जंतुक करणे आणि टाकून देण्यायोग्य असल्यास जाळून टाकणे, रोग्याच्या अंथरुणावरील व इतर कपडे धोब्याकडे देण्यापूर्वी एक तास पाण्यात घालून उकळणे इ. गोष्टी महत्त्वाच्या असतात.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक अर्भकास देवीची लस टोचणे ही असून त्याविषयीची सविस्तर माहिती ‘लस व अंतःक्रामण’ या नोंदीत दिली आहे. अर्भकावस्थेत टोचलेली लस सर्वसाधारणपणे ७ वर्षांपर्यंत संरक्षण देते. पुढे सातव्या, चौदाव्या व एकविसाव्या वर्षी लस टोचून घेणे हितावह असते व त्यानंतर साथ चालू असल्यास देवी टोचून घ्याव्यात. काही देशांतून देवीचे संपूर्ण निर्मूलन झाल्यासारखेच आहे. उदा., ब्रिटनमध्ये १९७१ पासूनच लस टोचण्याची सक्ती नसून टोचणेच बंद करण्यात आले आहे.

अलीकडील संशोधनानुसार ‘रासायनिक प्रतिरक्षा’ उपयुक्त ठरली आहे. मेथिसाझोन (एन–मेथिलिसाटिन बीटा–थायोसेमी कार्‌बॅझोन) नावाचे औषध ३ ते ६ ग्रॅ.पर्यंत दररोज आणि लागोपाठ तीन दिवस तोंडाने दिल्यास देवी येत नाहीत. मात्र या औषधीचा उपयोग लशीऐवजी न करता साथीच्या वेळी एक पूरक औषध म्हणून करतात. कधीकधी या औषधामुळे मळमळ व उलट्या होण्याचा संभव असतो.

जागतिक आरोग्य संघटनेने देवीनिर्मूलनाची जोरदार मोहीम १९६७ मध्ये प्रथम हाती घेतली. १९७१ मध्ये ब्राझील, इंडोनेशियाचा बहुतेक भाग व झाईरे या देशांतून देवीचे संपूर्ण निर्मूलन झाले. अफगाणिस्तान, भारत, नेपाळ, पाकिस्तान, सूदान व इथिओपिया या देशांतून हा रोग प्रदेशनिष्ठ स्वरूपात शिल्लकच होता. सबंध जगातील एकूण ५०,००० रोग्यांपैकी एकट्या इथिओपियातच २५,००० रोगी होते. १९७४ पासून तेथील देवीचे प्रमाण हळूहळू कमी होत जाऊन १९७६ च्या ऑगस्ट महिन्यात ओगाडेन वाळवंट आणि नील नाईल नदीच्या खोऱ्यातील काही खेड्यांमधूनच तो शिल्लक असल्याची नोंद झाली आहे. भारतातील देवी रोगाचे संपूर्णपणे निर्मूलन झालेले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने एप्रिल १९७७ मध्ये प्रशस्तिपत्रक दिले आहे.

परंतु हा रोग एवढा जोरदार सांसर्गिक आहे की, त्याचे संपूर्ण जगातून उच्चाटन होणे जरूरीचे आहे. १९६१–६२ च्या सुमारास पाच पाकिस्तानी प्रवाशांनी देवी ब्रिटनमध्ये पोहोचविल्या. त्या वेळी एकूण ६२ लोकांना लागण होऊन २४ मृत्युमुखी पडले. ब्रिटिश आरोग्याधिकाऱ्यांना ५·५ दशलक्ष लशीच्या मात्रा जनतेस टोचाव्या लागून ११ खास रुग्णालये उघडावी लागली. या सर्व खटाटोपाकरिता जवळजवळ ४० लक्ष डॉलर्स खर्च आला. जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, स्वीडन व इतर देश मिळून देवीनिर्मूलन कार्याकरिता १९६७–७४ या काळात ५ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला आहे. देवीची लस तयार करणे, ती योग्य काळजी घेऊन पुरविणे, टोचण्याकरिता योग्य व पुरेसे कर्मचारी नेमणे इ. कार्यांकरिता होणाऱ्या खर्चात देवीनिर्मूलन कार्यक्रमामुळे एकदमच मोठी बचत होणार आहे.


चिकित्सात्मक इलाज : या रोगावर कोणतेही खास औषध नाही. सल्फा व प्रतिजैव औषधे रंजिका–पिटिका अवस्थेपासूनच सुरू करतात. पूयिका अवस्थेत पेनिसिलिन अतिशय उपयुक्त असते. इतर सर्व इलाज लक्षणानुरूप केले जातात. उत्तम व काळजीपूर्वक केलेली शुश्रुषा, योग्य अन्नपुरवठा, योग्य व भरपूर द्रवांचा पुरवठा या गोष्टी महत्त्वाच्या असतात. फळांचा ताजा रस जरूर पडल्यास त्यात ग्लूकोज घालून सबंध आजार संपेपर्यंत म्हणजे पूर्वरूपापासून ते थेट खपल्या पडून जाईपर्यंत देणे फार उपयुक्त असते. परिचारिकेने रोग्याचे डोळे, कान, घसा, स्वरयंत्र यांकडे विशेष लक्ष पुरविणे आवश्यक असते.

भालेराव, य. त्र्यं. कुलकर्णी, उषा ग.

आयुर्वेदीय चिकित्सा : देवी हा विकार पित्त दोष. रक्त धातू आणि त्वचा ह्यांच्या दुष्टीमुळे उत्पन्न होतो. देवीच्या पुटकुळ्या सर्व शरीरभर उत्पन्न होतात. ह्या पुळ्या मसूरधान्याएवढ्या सर्वसाधारण असतात. केव्हा मूग आणि उडीद ह्यांच्या इतक्या लहान किंवा कित्येक ठिकाणी बोराएवढ्या मोठ्याही असतात. देवीमध्ये ज्वर, दाह आणि वेदना ही मुख्य चिन्हे असतात. शिवाय दोषाप्रमाणे व धातुदुष्टीप्रमाणे निरनिराळी चिन्हे असतात. ह्याला अनुसरून ही चिकित्सा करावी लागते. मुख्यतः प्रारंभी पांढरे चंदन आणि हुरहुर या नावाच्या वनस्पतींचा रस प्यायला द्यावा. पित्त व रक्त दुष्टिनाशक असली पाहिजेत. आमाचा संबंध नसेल तर गुळवेल, ज्येष्ठमध, द्राक्ष, उसाचे मूळ आणि डाळिंब गुळाबरोबर द्यावे. या योगाने देवी पिकतात. ताप जोराचा असेल व देवी पिकतील असे दिसले, तर वरील योग द्यावा. पण पिकण्याच्या अगोदर जेव्हा ताप कमी असतो किंवा नसतो अशा वेळी कुटकीचे रेचक द्यावे. परिपाठादी काढा द्यावा. त्या योगाने पित्त निघून जाऊन देवी पिकत नाहीत. निंब, पित्तपापडा, पहाडमूळ, पडवळ, कुटकी, दोन्ही चंदने, काळा वाळा इ. निंबादी काढा साखर घालून प्यायला द्यावा. या काढ्याने त्रिदोषण देवीसुद्धा कमी होतात. तोंडात व घशात जर देवी आल्या, तर आवळकाठी व ज्येष्ठमध ह्यांचा काढा मध घालून द्यावा. डोळ्यांत आल्या असल्यास त्रिफळा इत्यादिकांचा डोळ्यावर लेप द्यावा. त्यांच्या काढ्याचे थेंब डोळ्यात घालावे. देवी फुटून लस वाहत असेल, तर पंचवल्कल चूर्ण किंवा गायीच्या शेणाची राख त्याच्यावर घालावी. काळ्या जिऱ्याच्या काढ्यात हळदीचे चूर्ण घालून तो काढा द्यावा म्हणजे देवीचा ताप आणि व्रण नाहीसा होतो.

पटवर्धन, शुभदा अ.

पशुंतील देवी : देवी हा रोग कुत्रा व मांजर सोडून सर्व पाळीव प्राण्यांत आढळून येतो. रोगकारक व्हायरसामुळे हा रोग होतो. त्वचेच्या अधिस्तरीय कौशिकांमध्ये व्हायरसाची वाढ होते व त्यामुळे त्वचेवर फोड येतात. काही शास्त्रज्ञांच्या मते रोगकारक व्हायरसाचा मुळात एखाद दुसरा प्रकार अस्तित्वात असावा व कालांतराने ज्या जनावरात त्याचा प्रवेश झाला त्या जनावरात ते अनुयोजित होऊन (परिस्थितीनुरूप बदल घडवून आणून) जनावराच्या जातीप्रमाणे या व्हायरसाचे अनेक प्रकार अस्तित्वात आले. जसे घोड्यांच्या देवीचे रोगकारक व्हायरस, मेंढ्यांच्या देवीचे रोगकारक व्हायरस इत्यादी. माणूस, घोडा व गाय या जनावरांच्या रोगकारक व्हायरसामधील प्रतिजन घटक एकमेकांशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. कोंबड्या, कबुतरे, टर्की व इतर बरेचसे पक्षी यांच्या देवीचे रोगकारक व्हायरस स्तनी प्राण्यांच्या देवीच्या रोगकारक व्हायरसाशी संबंधित नाहीत परंतु एकमेकांशी संबंधित असल्याचे दिसून येते. डुकरातील देवीच्या व्हायरसाचे दोन विभेद आहेत. एक विभेद गायीच्या देवीच्या व्हायरसाशी मिळताजुळता आहे, तर दुसरा वेगळा आहे. मेंढ्यांच्या देवीचे व्हायरस गायीच्या देवीच्या व्हायरसाशी संबंधित आहे. सर्व पक्ष्यांतील व्हायरसांमुळे येणारे देवीचे फोड फारसे पूयिकेसारखे नसून गाठीसारखे असतात व प्रचुरजननीय (एका कोशिकेपासून अनेक कोशिकांची झपाट्याने वाढ होणारे) आहेत. सर्व जातींच्या लहान वयाच्या जनावरांमध्ये व पक्ष्यांमध्ये त्या रोगाची तीव्रता अधिक असते व मृत्यूचे प्रमाणही बरेच असते. माणूस, मेंढ्या व कोंबड्या या प्राण्यांमध्ये देवीमुळे मृत्यूचे प्रमाण बरेच असते. इतर प्राण्यांत रोग सौम्य स्वरूपात होतो. ज्या रोगामध्ये जवळजवळ देवीसारखेच फोड त्वचेवर येतात, असे आणखी काही रोग काही जनावरांत आहेत. उदा., शेळ्यामेंढ्यांना होणारा संसर्गजन्य इक्थायमा, गायींमधील आभासी देवी, शेळ्यांमधील व्हायरसजन्य त्वक्शोथ इत्यादी. या रोगांची व देवीच्या रोगाच्या लक्षणांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन रोगनिदान करणे आवश्यक असते.


गाय, म्हैस, घोडा, मेंढी, शेळी, डुक्कर व उंट या पशूंना देवी येतात. माणसाप्रमाणेच सर्व जनावरांमधील देवीच्या फोडांच्या रंजिका, उत्स्फोटक, पिटिका, पुटिका, पूयिका व खपली या अवस्था कमीअधिक प्रमाणात स्पष्ट दिसतात. फोडाच्या या अवस्था सर्वसाधारणपणे २ ते ४ दिवसांच्या अंतराने बदलत जातात. देवीच्या फोडामधील लसीकेमध्ये तसेच खपल्यांमध्ये रोगकारक व्हायरस विपुल प्रमाणात असतात. खपलीतील व्हायरस हवेतून धुलिकणांद्वारे श्वसनमार्गावाटे दुसऱ्या जनावरामध्ये रोग उत्पन्न करतो व अशा रीतीने रोगाचा प्रसार होतो. घोड्यांना क्वचितच देवी येतात व आल्या तरी त्या सोम्य स्वरूपात येतात. फक्त यूरोपमध्येच त्या आल्याचे आढळून आले आहे. शिंगरांना आल्यास कधीकधी मृत्यू ओढवतो. घोड्याच्या व गायीच्या देवीच्या रोगकारक व्हायरसामध्ये फरक आढळत नाही. खरारा करताना वापरण्यात येणारे सामान, खोगीर व मोतद्दार यांच्यामार्फत रोगप्रसार होतो. एका प्रकारात देवीचे फोड घुटण्याच्या खाली मागील बाजूच्या त्वचेवर दिसून येतात. दुसऱ्या प्रकारात ते ओठांच्या आतील बाजूस, हिरड्यांवर, जिभेच्या खाली व गालाच्या आतील बाजूस दिसतात. रोगाच्या सुरुवातीस ताप येतो व मग फोड दिसू लागतात. रोगाचे संक्रामक स्वरूप लक्षात येता रोगी घोड्यांना अलग ठेवतात. रोगी घोडा २ ते ४ आठवड्यांत बरा होतो. यूरोपमधील काही पशूवैद्यांच्या मते फोडातील लस निरोगी घोड्यांना टोचल्याने साथीस आळा बसण्यास मदत होते.

उंटामध्ये देवी या रोगाची सर्वसाधारण लक्षणे मेंढ्यांच्या देवीप्रमाणे दिसतात. केस नसलेल्या ठिकाणी व तोंडाभोवती देवीचे फोड येतात. 

इतर जनावरांतील देवी रोगासंबंधीची माहिती त्या त्या पशूच्या नावाच्या नोंदीमध्ये दिलेली आहे [→गाय डुक्कर म्हैस मेंढी शेळी कुक्कुटपालन].

निरनिराळ्या पशूंमध्ये देवी काढण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत (लस व अंतःक्रामण). नैसर्गिक रीत्या देवी येऊन गेलेल्या जनावरांना पुन्हा देवी येत नाहीत.

दीक्षित, श्री. गं.

संदर्भ : 1. Achar, S. T. Pediatrics in Developing Tropical Countries, Bombay, 1973.

           2. Atstead, S.  Girwood, R. H. Textbook of Medical Treatment,  Edinburgh, 1974.

           3. Blood. D. C. Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1971.

          4. Hagn, W. A. Bruner, D.W. The Infectious Diseases of Domestic Animals, London, 1957.

           5. Nelson, W. E., Ed. Textbook of Pediatrics, Philadelphia, 1964.

           6. Vakil, R. J., Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.

           7. W. H. O. The Work of The World Health Organisation in 1971, Geneva, 1972.