चिचुंदरी

चिचुंदरी  :  हा इन्सेक्टिव्होरा गणातील सोरीसिडी कुलातील प्राणी होय. त्याचे शास्त्रीय नाव संकस म्यूरिनस  आहे. संकस  वंशात वेगवेगळ्या २० जाती आहेत.

यूरोप, आशिया, आफ्रिका व उत्तर अमेरिका यांच्या उष्ण आणि समशीतोष्ण भागांत हे आढळतात. भारतात याच्या अनेक जाती आहेत. काही डोंगराळ भागात, काही सपाट प्रदेशात, तर काही घरांजवळ बिळे करून राहतात.

याच्या शरीराची लांबी सु. १५ सेंमी. असते आणि शेपूट ८ सेंमी. असते. मुस्कट लांब व निमुळते असते. कान गोल व डोळे बारीक असतात. अंगावर मऊ फर असते, पण पाय व शेपटी यांवर तुरळक केस असतात. वरच्या व खालच्या जबड्यांतील समोरचे दोन दात इतर दातांपेक्षा वेगळे असतात. वरच्या जबड्यातील समोरचे दोन दात वाकडे असतात. खालच्या जबड्यातील समोरचे दोन दात लांब, पुढे आलेले व आडवे असून त्यांची टोके थोडी वरती वळलेली असतात.

 टोकदार मुस्कट, दबलेले कान आणि समोरचे दात यांमुळे चिचुंदरी उंदराहून वेगळी दिसते. नर चिचुंदरीला पार्श्वभागावर दोन ग्रंथी असतात व त्यांच्या स्रावाला कस्तुरीसारखा पण उग्र वास येतो. विशेषतः प्रजोत्पादन काळात हा वास अधिक असतो, म्हणून याला ‘कस्तुरी उंदीर’ असेही म्हणतात. चिचुंदरीचा रंग सामान्यतः करडा असतो, पण काहींचा रंग फिका किंवा गडद तपकिरी असतो.

खरी मोठी चिचुंदरी ही संकस  वंशातील आहे. जगातील सर्वांत लहान सस्तन प्राणी संकस एट्रुस्कस हाही संकस  वंशाचाच आहे. चिचुंदरी दिवसभर बिळात राहते व संध्याकाळी दिवेलागणीनंतर भक्ष्याच्या शोधात इकडे तिकडे चूं चूं असा आवाज करीत भटकते. ती घरात शिरून भक्ष्य शोधण्याकरिता सगळीकडे हिंडते. त्रासदायक कीटक, झुरळे हे हिचे मुख्य अन्न होय आणि म्हणून चिचुंदरी उपयुक्त आहे. उंदरासारखे रूप व कस्तुरीसारखा उग्र वास यांमुळे हा प्राणी दिसल्याबरोबर मारावासा वाटतो, पण तो निरुपद्रवी आहे.

चिचुंदरीला उंदीर जवळपास आलेला सहन होत नाही, म्हणून ती उंदराला आपल्या जवळपास फिरकू देत नाही. तिच्या ह्या सवयीकडे प्लेग कमिशनने लोकांचे लक्ष वेधले. कस्तुरीसारख्या वासाने चिचुंदरी पदार्थ दूषित करते अशी समजूत आहे, पण कस्तुरीसारख्या वासाने पदार्थ दूषित होत नाही. हा वास त्यांच्या निवाऱ्याच्या जागा, बिळे येथे जास्त असतो.

चिचुंदरीचे घरटे गवत, वाळलेली पाने व इतर काडीकचऱ्याचे बनविलेले असून ओबडधोबड असते. तिला एकावेळी दोन ते तीन पिल्ले होतात. पिल्ले चपळ असतात. आई बाहेर पडली की, पिल्लेही बाहेर पडतात. प्रत्येक पिल्लू तोंडाने पुढच्या पिल्लाची शेपटी पकडते व सर्वांत पुढचे पिल्लू आईची शेपटी पकडते. अशा तऱ्हेने ही माळ फरपटत चाललेली असते.

 जोशी, मीनाक्षी