चंबा रुमाल : भरतकामाचा एक लोककला प्रकार. मर्यादित रंगातील ⇨कांग्रा चित्रशैलीचाच परंतु वेगळ्या माध्यमातील हा एक आविष्कार होय. चंबा रुमालाची निर्मिती बसोली प्रदेशात १७८२—१८२८ या दरम्यान सुरू झाल्याचा उल्लेख मिळतो. तथापि या भरतकामाचा विकास पुढे चंबा प्रदेशात झाला आणि त्याच नावाने ही कला पुढे प्रसिद्धीस आली. चंबाप्रमाणेच कांग्रा, मंडी, कुलू, जम्मू व बिलासपूर इ. प्रदेशांतही चंबा रुमालाची निर्मिती होत होती. चंबा येथील भुरिसिंह संग्रहालय आणि मंडी येथील लोकसंस्कृती संस्थान

चंबा रुमालाचा नमुना

संग्रहालय येथे चंबा रुमालाचे अनेकविध आकर्षक नमुने पहावयास मिळतात.

चंबा रुमालासाठी विशेषतः पांढरे किंवा लाल रंगाचे रेशमी व सुती कापड आणि रंगीत धागे वापरतात. पूर्वी हे सर्व साहित्य स्त्रिया घरीच तयार करीत. लाल व निळ्या कापडाचा उपयोग अस्तरासाठी करण्यात येई. धागे रंगविण्यासाठी लाल, पिवळा, काळा व निळा इ. प्राथमिक रंगांच्या वेगवेगळ्या मिश्रणाने विविध रंगांच्या छटा निर्माण करीत असत. हे रंग अत्यंत चमकदार असून फिकट वा मळकट होत नसत. आजही चंबा रुमालाच्या जुन्या नमुन्यांतील रंग उठावदार व सतेज दिसतात.

हे सर्व रंग बहुधा वनस्पतीपासून तयार करण्यात येत असत. उदा., ‘तुन्ही’ म्हणजे कुसुंबा याचे फूल आणि बी यांपासून लाल रंग तयार करीत. कुसुंबाचा हा लाल रंग लोकप्रिय होता. त्याची अग्नीप्रमाणे प्रज्वलित वाटणारी तांबडी छटा माहेरचे प्रतीक मानण्यात येई. पिवळ्या रंगासाठी काजूची फुले, निळ्या रंगासाठी नीळ, हिरव्या रंगासाठी शेवाळ व काळ्या रंगासाठी डाळिंब किंवा अक्रोडाच्या सालीचा वा काजळीचा उपयोग करीत.

पांढऱ्या वा पिंगट रंगाच्या पार्श्वभूमीवर बहुविध रंगांच्या धाग्यांनी केलेले हे भरतकाम दोन्ही बाजूंनी सारखेच असते. त्यात बाह्यरेषा काळ्या रंगाच्या असून धावदोऱ्याच्या टाक्यांनी ते केले जाते. त्यात प्रामुख्याने वेली, फुलेफळे, वास्तुशिल्पे, मानवाकृती व नर्तक-नर्तकी इत्यादींची चित्रे असतात. नित्याच्या जीवनाशी निगडित अशी व नर्तक-नर्तकींची चित्रे ही चंबा रुमालाची वैशिष्ट्ये होत. यांखेरीज मोर, चिमणी, पोपट, फुलपाखरू यांसारखे लहान लहान पक्षीही भरण्यात येतात. पूर्वी मात्र पौराणिक कथाप्रसंगावर विशेष भर असे त्यात रागरागिणी, कृष्णलीला, रासलीला, रामायणमहाभारतातील प्रसंगदृश्ये, विवाहविधी इत्यादींचे मनोरम चित्रण करण्यात येई. रासलीलेच्या आकृतिबंधाचा वापर तर सर्रास व सर्वत्र केल्याचे दिसून येते.

चंबा रुमालाचा उपयोग पूर्वी वाङ्‌निश्चय, विवाहप्रसंग, सणसमारंभ इ. मंगलप्रसंगी नजराणा म्हणून देण्यासाठी होई. तसेच देवदेवतांचे आसन शृंगारणे, पूजास्थानी वा लग्नवेदीवर टांगण्यासाठी वापरणे, भेटवस्तूच्या वा पूजासामग्रीच्या तबकावर आच्छादन घालणे इत्यादींसाठी त्यांचा उपयोग होई. अलीकडे हिमाचल आणि उत्तर प्रदेशात स्त्रिया दुपट्ट्याऐवजी चंबा रुमालाचा वापर करतात. मात्र त्याचा आकार लहान शालीएवढा असतो. याखेरीज चौकोनी व आयताकृती असेही चंबा रुमाल असतात. ते डोक्याला बांधतात. त्याला ‘ढाठू’ म्हणतात. त्याचा रंग पिवळा, काळा, लाल व केशरी असतो. काळ्या रंगाचा ढाठू प्रतिष्ठेचे लक्षण मानतात.

अलीकडे चंबा रुमालावरील भरतकाम यांत्रिक पद्धतीने केले जाते, परंतु पूर्वीच्या विणकामातील व्यक्तिगत कल्पकता त्यात जाणवत नाही.

पहा : भरतकाम.

जोशी, चंद्रहास