अक्कमहादेवी:(बारावे शतक). वीरशैव पंथातील एक थोर शिवभक्त स्त्री आणि आद्य कन्नड कवयित्री. कर्नाटक राज्यात शिमोगा जिल्ह्यातील उडुतडी (सध्याचे उडिताणी) या गावी तिचा जन्म झाला. तिच्या जीवनाबाबत अनेक आख्यायिका रूढ आहेत पण अधिकृत स्वरुपाची माहिती मिळत नाही.⇨चामरस(सु.१४३०) ह्या कन्नड कवीनेभूलिंगलीले  ह्या काव्यग्रंथात अक्कमहीदेवीचीही माहिती दिली आहे. हरिहर व राचय्या या अन्य प्राचीन कन्नड कवींनीही तिच्यासंबंधी काही माहिती दिलेली आहे. त्यानुसार ती सुस्वरूप व तेजस्वी होती तसेच विद्यासंपन्न व शिवभक्तही होती. तिच्यावर मोहित होऊन उडुतडीच्या जैनधर्मीय कौकशिराजाने तिला मागणी घातली. राजाने वीरशैव पंथाची दीक्षा घ्यावी या अटीवर तिने त्याच्याशी लग्न केले परंतु राजाने लग्नानंतर अट मोडली. तेव्हा तिने राजाचा त्याग केला व ती चेन्न मल्लिकार्जुनाचे ध्यान करीत व चेन्न मल्लिकार्जुनच आपला खरा पती आहे असे म्हणत कल्याणला (सध्याचे बसवकल्याण)⇨बसवेश्वरांच्या(सु. ११६०) घरी गेली. तेथे शिवशरणांच्या (भक्तांच्या ) मेळाव्यात काही दिवस राहून नंतर आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् येथे गेली व तेथेच समाधिस्थ झाली.

अक्कमहादेवीचा आध्यात्मिक अधिकार मोठा होता व तिला पंथात आदराचे स्थान होते. कन्नड साहित्यातही एक श्रेष्ठ कवयित्री म्हणून तिला मानाचे स्थान आहे. तिची सुबोध, उत्कट व उपदेशपर‘वचने’ कर्नाटकात घरोघर आवडीने म्हटली जातात.योगांगत्रिविधि  नावाचा ६२‘त्रिपदी’(ओवीसारखी रचना) असलेला तिचा एक लहान ग्रंथ उपलब्ध झाला असून त्यात तिचे आध्यात्मिक अनुभव व्यक्त झाले आहेत.

        

पहा : वीरशैव पंथ.

संदर्भ: सार्दळ शं. धों., संपा.कविब्रह्मदासकृत लीलाविश्वंभर,बेळगाव, १९६४.

पाटील, म. पु.