ओलिव्हैरा मार्तौश : (३० एप्रिल १८४५ — २४ ऑगस्ट १८९४). पोर्तुगीज साहित्यक्षेत्रात क्वचितच आढळणाऱ्या चतुरस्त्र लेखकांपैकी एक. इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र ह्या विषयांपासून कादंबरी, कविता, नाटक ह्या साहित्यप्रकारांपर्यंत त्यांच्या लेखणीची धाव होती. लिस्बनमध्ये तो जन्मला. वयाच्या पंधराव्या वर्षीच तो पोरका झाल्याने शिक्षण सोडून त्याने एका व्यापारी संस्थेत नोकरी पतकरली. त्यानंतर स्पेनमधील एका खाण-उद्योगाचा व्यवस्थापक, ओपोर्तो येथे रेल्वे संचालक, संसदेचा सभासद आणि महसूलमंत्री अशा विविध उच्च पदांवर त्याने कामे केली. फेबुश मोनीज (१८६६) ही ऐतिहासिक कादंबरी म्हणजे वाङ्‍मयक्षेत्रातील त्याचा ओनामा. 

त्याची ग्रंथनिर्मिती प्रचंड आहे. त्याच्या विशेष उल्लेखनीय ग्रंथांपैकी पोर्तुगाल काँतेंपोरानिऊ (१८८१, इं., शी. कंटेंपररी पोर्तुगाली) हा त्याचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ. एकोणिसाव्या शतकातील श्रेष्ठ इतिहासग्रंथांपैकी तो एक होय. इश्तोरिअ द पोर्तुगाल (१८७९, इं. शी. हिस्टरी ऑफ पोर्तुगाल ) ह्या ग्रंथात आर्थिक, राजकीय, सामाजिक  तसेच सांस्कृतिक व कलाविषयक विचारांचे त्याने संश्लेषण केले आहे. इश्तोरिअ द सिव्हिलिझासांऊ इबेरिकामध्ये (१८७९, इं. शी. हिस्टरी ऑफ द आयबेरियन सिव्हिलिझेशन) आयबेरियन द्वीपकल्पातील स्पेन आणि पोर्तुगाल ह्या दोन देशांच्या समान ध्येयांचे उपपादन केले आहे.

स्वयंसिद्ध विद्वान असलेला ओलिव्हैरा हा पोर्तुगालच्या वास्तववादी पिढीतील नाव घेण्याजोगा एकमेव इतिहासकार होय. इतिहासाबद्दलची त्याची धारणा जर्मन परंपरेतील होती. समाजवाद म्हणजे उत्क्रांतीचीच एक प्रणाली असून तिची परिणती वर्गविहीन समाजात होते. त्याच्या साऱ्या इतिहासग्रंथांचे वाङ्‍मयीन व कलात्मक मोलही  मोठे आहे. लिस्बनमध्ये तो निधन पावला. 

रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)