धानीमूषक : (ऑस्ट्रेलियन बँडिकूट). हा एक शिशुधानस्तनी प्राणी (पिल्लू बाळगण्याकरिता पोटावर पिशवी असलेला सस्तन प्राणी) असून तो ऑस्ट्रेलिया व त्याच्या लगतच्या बेटांत राहतो. हे प्राणी पेरॅमेलिडी कुलातील असून त्यांचे सात वंश आणि वीस जाती आहेत. ते उंदरापासून तो सशापर्यंतच्या आकारमानाचे असतात.

धानीमूषक (पेरॅमेलिस नॅसूटा)

त्यांच्या लांब व निमुळत्या नाकाडावरून हे सहज ओळखता येतात. त्यांचे केस टोकदार आणि राठ असतात. शेपटी उंदरासारखीच पण आखूड किंवा मध्यम लांबीची असते. काही जातींचा रंग पूर्णपणे करडा किंवा पिवळसर असतो पण काहींच्या ढुंगणावर आडव्या काळ्या शलाका असतात. धानीमूषक सर्वभक्षी आहेत. विविध प्रकारच्या वनस्पती, कीटक आणि प्राणी ते खातात पण काही केवळ शाकाहारी आहेत. हे रात्रिंचर असल्यामुळे यांचे सर्व उद्योग रात्री चालू असतात. ते निमुळत्या खाचा खणून त्यात मुस्कट खुपसतात व भक्ष्य शोधतात.

धानीमूषक छपविलेल्या खळग्यात किंवा पोकळ ओंडक्यात सबंध दिवस घालवितात. फक्त थायलॅकोमिस  वंशाचे धानीमूषक राहण्याकरिता बिळे करतात. हे प्राणी भांडकुदळ असून एकमेकांशी सारखे झगडत असतात.

यांची पिशवी (शिशुधानी) मागच्या बाजूकडे उघडते. मादीला ६–८ स्तनाग्रे असतात. तिच्या पिशवीत चार ते पाच पिल्ले आढळतात.

कानिटकर, बा. मो.