आ. १. धगवीर : सिगॅनस मार्मोरेटा

धगवीर : (थाऊस). पर्सिफॉर्मीस गणाच्या सिगॅनिडी कुलातील मासा. धगवीर व थाऊस ही नावे समानार्थी वापरली जातात, असे  आढळते. तथापि सामान्यतः सिगॅनस व्हर्मिक्युलेटसला इंग्रजीत जीगसॉ पझल फिश आणि मराठीत थावस किंवा थाऊस म्हणतात, तर सि. मार्गारिटीफेरा आणि सि. मार्गारेटा ह्या माशांस इंग्रजीत रॅबिट फिश व मराठीत धगवीर म्हणतात.

आ. २. थाऊस : सि. व्हर्मिक्युलेटस

सि. व्हर्मिक्युलेटसला पूर्वी ट्यूथीस व्हर्मिक्युलेटस असे म्हणत. हा किनाऱ्याजवळच्या खाऱ्या पाण्यात किंवा खाडीत आढळतो. तो खाण्यास उत्तम तर असतोच, परंतु त्याचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे अंगावरचे नक्षीकामासारखे सुंदर रंगचित्रण हे होय. तो इतर माशांसारखा लांबट गोलसर नसून उभट स्वरूपाचा, भोपळ्याच्या बियांच्या आकाराचा, परंतु चांगला ०·५ मी. लांब होणारा असतो. सर्वसाधारण रंग किरमीजी (थोडा हिरवट) असून त्यावर पांढऱ्या रंगाच्या नागमोडी  वळणाच्या पट्ट्यांचे सुंदर चित्रण असते. त्यामुळेच त्याला इंग्रजीमध्ये ‘जिगसॉ, पझल फिश’ व लॅटिनमध्ये व्हर्मिक्युलेटस हे नाव मिळाले. खाऱ्या पाण्याच्या मत्स्यालयात ठेवण्यास तो एक शोभिवंत मासा म्हणून गणला जातो. त्याचे नैसर्गिक खाद्य कालवे, तिसऱ्या, खुब्या यांतील जीव व काही शेवाळ हे होय परंतु मत्स्यालयात मात्र त्याच्या आवडीनिवडी फारच कमी असलेल्या आढळतात.

त्याच्या पाठीवरच्या आणि इतर परांमधल्या तीक्ष्ण कंटकांमुळे (काट्यांमुळे) मच्छीमार लोक त्याला हाताने पकडण्यास घाबरतात. या कंटकांच्या व्रणापासून तीव्र वेदना होतात. तो थव्याथव्याने न राहता एकाकीच असतो व त्याची प्रजनन शक्तीही कमी असते. त्यामुळे त्याचे व्यापारी उत्पादनही कमीच होते.

कुलकर्णी, चं.  वि.