कला-१ : स्वयंप्रकाशित नसलेल्या आकाशस्थ गोलाच्या दृश्य प्रकाशित पृष्ठभागाच्या बदलत्या आकाराला कला म्हणतात. पृथ्वी, सूर्य आणि प्रकाशित गोल यांच्या सापेक्ष स्थितींमुळे कलेमध्ये बदल होतात. आकाशस्थ गोल आणि पृथ्वी यांना जोडणार्‍या रेषेशी, तो गोल आणि सूर्य यांना जोडणार्‍या रेषेने गोलापाशी केलेल्या कोनाला कला कोन म्हणतात. याला१८० ते भागल्यास गोलाचा अंधारी भाग कळतो. चंद्र तसेच बुध व शुक्र हे अंतर्ग्रह यांच्या कला दिसू शकतात. बुध आणि शुक्र यांच्या कला मात्र फक्त दूरदर्शकाने (दुर्बिणीने) दिसू शकतात.

चंद्राची कला

तार्‍यांच्या पार्श्वभूमीवर आकाशामध्ये चंद्र हा सूर्यापेक्षा अधिक झपाट्याने पूर्वे-पूर्वेकडे सरकतो असे दिसते. अमावस्येस सूर्याच्याच बाजूला पण अलीकडे चंद्र असल्यामुळे चंद्रगोलाची अंधारी बाजू पृथ्वीकडे असते.अमावस्येनंतर चंद्र सूर्यामधील कोनीय अंतर वाढत जाते, तसतशी चंद्राच्या कलेची वृद्धी होते. सूर्यापासून चंद्र पूर्वेकडे ९०गेला म्हणजे शुद्ध अष्टमीस चंद्राचे अर्धवर्तुळाकार बिंब दिसते व पूर्वेकडे १८० अंश गेला म्हणजे पौर्णिमेस पूर्ण बिंबउजळलेले दिसते. नंतर अमावस्येपर्यंत बिंबाचा कलेकलेन क्षय होत जातो.

कगख हा पृथ्वीवरून दृश्य असलेला चंद्राचा अर्ध गोल असून गकच हा सूर्यकिरणांनी प्रकाशित असलेला अर्धगोल (पहा: आकृती). कख आणि गच या बृहत्‌ वृत्तांचा (गोलाच्या मध्यातून ज्यांची पातळी जाते अशा वर्तुळाचा) समाईक व्यास यर हा असून यकरगय हा चांद्रपृष्ठाचा प्रकाशित अर्धातील पृथ्वीकडील निरीक्षकास दिसणारा वक्र पृष्ठभाग आहे. गग हा कख बृहत्‌ वृत्त पातळीवर लंब आहे. म्हणजेच यकरग हा त्याच पातळीवर यकरगय ह्या वक्राचा लंब प्रक्षेप (पातळीवर टाकलेल्या लंबरेषांच्या पायांच्या बिंदूंनी तयार झालेला वक्र) आहे. म्हणून यकरगही निरीक्षकास दिसणारी चंद्रकोर होय.

बुध व शुक्र या ग्रहांची सूर्याबरोबर अंतयुती (सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये ग्रह असण्याची स्थिती) होण्यापूर्वी पश्चिमेस सूर्यास्तानंतर आणि अंतर्युतीनंतर पण परम इनापगमापूर्वी (सूर्यापासून ग्रहाचे क्रांतिवृत्तावर म्हणजे सूर्याच्या वार्षिक भासमान गतिमार्गावर मोजलेले कोनीय अंतर जास्तीत जास्त होण्यापूर्वी) पूर्वेस सूर्योदयापूर्वी त्यांच्या कोरी दुर्बिणीतून दिसतात. अंतर्युतीपूर्वी कलाक्षय आणि अंतर्युतीनंतर कलावृद्धी होते. हे ग्रह सूर्यापासून कोनात्मक दृष्ट्या दूरात दूर असतात तेव्हा त्यांची बिंबे परम इनापगमी अष्टमीच्या चंद्राप्रमाणे दिसतात. बहिर्युतीपूर्वी (ग्रह आणि पृथ्वी यांच्यामध्ये सूर्य असण्याची स्थिती होण्यापूर्वी) कला वाढते आणि नंतर कमी होते. 

बहिर्ग्रहांच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षेबाहेरून, दूर अंतरावर असल्यामुळे त्यांच्या पूर्ण बिंबाचा क्षय फारच अल्पांशाने होतो आणि कला विशेषत्वाने दिसत नाहीत. 

गोखले, मो.ना.

चंद्राच्या कला : डावीकडे तृतीयेची, उजवीकडे पंचमीची
शुक्राच्या कला