वोल्व्हरिनवोल्व्हरिन : एक मांसाहारी सस्तन प्राणी. ग्लटन, कार्कझू अशीही त्याची अन्य नावे आहेत. त्याचे शास्त्रीय नाव ग्युलो ग्युलो असून त्याचा समावेश मुस्टेलिडी कुलात होतो. त्याचा प्रसार उत्तर आशिया व उत्तर अमेरिकेत सर्वत्र असून हिवाळ्यात तो सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलांत व उन्हाळ्यात टंड्रा प्रदेशात आढळतो. उकिडव्या बसणाऱ्या लहान, पण थोराड दिसणाऱ्या अस्वलासारखा तो दिसतो. त्याची लांबी ६५-९० सेंमी. असते. त्याची गोंडेदार शेपटी १३-२६ सेंमी. लांब असते, तर खांद्याजवळ त्याची उंची ३६-४५ सेंमी. व त्याचे वजन ९ ते ३० किग्रॅ. असते. त्याचे पाय आखूड, काहीसे फेगडे असतात व तळवे केसाळ असतात. त्याच्या नख्या अर्ध-प्रतिकर्षी (आत ओढून घेता येणाऱ्या), लांब व तीक्ष्ण असतात. त्याचे कान आखूड व दात बळकट असतात. त्याचे भरड, लांब केस काळपट तपकिरी असून त्यावर मानेच्या दोन्ही बाजूंवरून निघून शरीरभर गेलेले, तसेच शेपटीच्या तळापर्यंत गेलेले फिकट तपकिरी पट्टे असतात. त्याच्या दातांची संख्या ३८ असून दंतसूत्र कृंतक(कुरतडणारे) ३/३, रदनक (सुळे) १/१, उपदाढा ४/४ व दाढा १/२ असे आहे.

वोल्व्हरिन हा फडशा पाडण्याची वृत्ती, ताकद, लबाडपणा, निर्भय वृत्ती व खादाडपणा यांबद्दल प्रसिद्ध आहे. तो उत्तम पोहणारा व झाडावर चढण्यात पटाईत आहे. तो जमिनीवर हळू चालतो व बेढब दिसतो. तो शिकारीसाठी रात्री बाहेर पडतो. तो शेळी, हरिण व लहान अस्वलावर हल्ला करतो. उन्हाळ्यात तो लहान व मध्यम आकाराचे स्तनी प्राणी, पक्षी व वनस्पती यांवर उपजीविका करतो. हिवाळ्यात तो रेनडियर, कॅरिबू यांची शिकार करतो. मोठ्या प्राण्यावर तो पाठीमागून हल्ला करतो व मानेस चावा घेतो. त्याचा जबडा हाडांचे तुकडे करण्याइतका मजबूत असतो. शिकार केलेल्या प्राण्याचे मांस तो भूक नसल्यास लपवून ठेवतो. त्याचा उपयोग मादी व पिलांसाठी केला जातो. शिकार न मिळाल्यास दुसऱ्या प्राण्याने मारलेले रेनडियर व कॅरिबूसारखे प्राणी तो खातो. तो गुहेत किंवा बिळात राहतो. तो शीतनिष्क्रियतेत (हिवाळ्यात सुप्तीच्या अवस्थेत) जात नाही.

माणसाखेरीज इतर कोणताही प्राणी वोल्व्हरिनाची शिकार करीत नाही. मऊ केसांवरून हिमतुषार पुसून निघत असल्यामुळे तसेच थंडीपासून उत्तम संरक्षण मिळत असल्यामुळे त्याच्या फरला मागणी असते. मादीचा वावर ५० ते ३५० चौ. किमी. परिसरात असतो व नराचा वावर ६०० ते १,००० चौ. किमी. परिसरात असतो. प्रियाराधनाच्या काळातच नर व मादी एकत्र राहतात. फेब्रुवारी-मार्च हा समागमाचाकाळ असतो. मादी दुसऱ्या वर्षापासून प्रजोत्पादनास सुरुवात करते. तिचा गर्भावधी सु. नऊ महिन्यांचा असतो. एका वेळी मादीला १ ते ५ पिले होतात. पुरेसे अन्न उपलब्ध नसल्यास वीण होत नाही. मादी पिलांची काळजी घेते. नर व पिले लवकरच स्वतंत्र राहतात.

जमदाडे, ज. वि. पाटील, चंद्रकांत