घाटगे, विष्णु माधव : (२४ ऑक्टोबर १९०८—     ). भारतीय विमानविषयक संशोधक. कोल्हापूर जिल्ह्यातील हसूर या गावी जन्म. त्यांनी १९३२ साली मुंबई विद्यापीठाची एम्. एस्‌सी. पदवी संपादन केली. त्यांनी विशिष्ट वायुगतिकीय (वायूंच्या गतीसंबंधीच्या शास्त्रानुसार असणाऱ्या) परिस्थितीमधील द्रायूच्या (वायू 

विष्णु माधव घाटगे

वा द्रव यांच्या) गतीसंबंधी संशोधन केले. वायुगतिकी आणि विमाने बांधण्याचे तंत्र या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून १९३६ साली त्यांनी गटिंगेन  विद्यापीठाची डी. फिल्. ही बहुमानाची पदवी मिळविली. १९३६—४१ या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात भौतिकीचे व गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. १९४१ साली त्यांची बंगलोरच्या हिंदुस्थान एअरक्राफ्ट लि. या संस्थेत अभिकल्पक म्हणून नियुक्ती झाली. १९४२—४७ पर्यंत बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ते वैमानिकी अभियांत्रिकी या वैमानिकी अभियांत्रिकी या विषयाचे प्राध्यापक होते. १९४७ पासून हिंदुस्थान एअरक्राफ्ट लि., बंगलोर या संस्थेचे ते प्रमुख अभिकल्पक व उपमुख्य व्यवस्थापक आहेत. त्यानंतर १९७० पर्यंत ते बंगलोरच्या हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लि. या संस्थेचे प्रमुख व्यवस्थापक होते. त्यानंतर बंगलोरच्याच प्रॉडक्ट डिझायनर्स प्रा. लि. या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया रॉयल एरॉनॉटिकल सोसायटी, लंडन इन्स्टिट्यूट ऑफ एरॉनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्स, अमेरिका इ. विविध ख्यातनाम संस्थांचे ते सदस्य आहेत.

सैनिकांची ने-आण करणाऱ्या ग्लायडरचा अभिकल्प सुधारणा व चाचणी घेणे (१९४२), एच्.टी–२ या शिकाऊ विमानाचा आराखडा व सुधारणा (१९५३), विमान उड्डाण संस्थांना आणि वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे ‘पुष्पक’ हे दोन माणसे नेणारे अत्यंत हलके विमान, शेतीतील विविध कामांस उपयुक्त असे कृषक विमान, जेट इंजिनाने चालणाऱ्या शिक्षणास उपयुक्त असणारे ‘किरण’ हे विमान, १,१४० किग्रॅ. चा रेटा देणारे जेट एंजिन अशा विविध विमानांच्या अभिकल्पाचे व विकासाचे बहुमोल कार्य त्यांनी केले.

भारत सरकारने त्यांच्या या संशोधनकार्याचा १९६५ साली ‘पद्मश्री’हा बहुमानाचा किताब देऊन गौरव केला.

कुलकर्णी, सतीश वि.