ट्रिपॅनोसोमा : प्रोटाझोआ (प्रजीव) संघाच्या मॅस्टिगोफोरा वर्गातील ट्रिपॅनोसोमॅटिडी कुलातील ट्रिपॅनोसोमा वंशाचा परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारा) प्राणी. ट्रिपॅनोसोमॅटिडी कुलातील सहा वंशांपैकी ट्रिपॅनोसोमा हा वंश अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे. या वंशात अनेक जाती असून त्या स्तनी, पक्षी, मत्स्य, उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) व सरीसृप (सरपटणारे) या वर्गांतील विविध प्राण्यांच्या रक्तात राहणाऱ्या आहेत. जरी पुष्कळ जाती पोषकांना (ज्यांच्या शरीरात राहून प्राणी संरक्षण व अन्न मिळवितो त्यांना) उपद्रव देणाऱ्या नसल्या तरी कित्येक माणसे, पाळीव जनावरे आणि रानटी प्राणी यांत गंभीर रोग उत्पन्न करतात. ट्रिपॅनोसोमाच्या जाती जवळजवळ सगळ्या जगात आढळतात. 

निरनिराळ्या जातींच्या ट्रिपॅनोसोमांचे आकारमान व आकार वेगवेगळे असतात. शरीराची लांबी

ट्रिपॅनोसोमा ब्रूसिआय : (१) गतिकेंद्रक, (२) आधारकणिका, (३) केंद्रक, (४) आंदोल कला.

१५ μ – ८०μ पर्यंत (μ म्हणजे मायक्रॉन = १०-३ मिमी.) किंवा त्यापेक्षाही थोडी जास्त असते. शरीर किरकोळ किंवा रुंद, वक्र आणि तर्कूच्या आकाराचे (चातीसारखे) असते. सर्वसाधारणपणे केंद्रक (पेशीतील कार्यांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज) शरीराच्या मध्याजवळ असते. शरीरापासून झालरीप्रमाणे एक पातळ कला (नाजूक पटल) निघालेली असते तिला आंदोल कला म्हणतात. चलनाकरिता एक कशाभिका (लांब, निमुळती संरचना) असते ती केंद्रकाच्या मागे असलेल्या शरीराच्या टोकाजवळून निघून आंदोल कलेच्या काठावरून शरीराच्या विरुद्ध टोकापर्यंत जाते आणि तेथे आंदोल कलेपासून मोकळी होऊन शरीराबाहेर पडते. कशाभिका ज्या बारीक कणापासून निघते त्याला आधार कणिका म्हणतात. आधार-कणिकेच्या बुडाशी एक सुक्ष्म संरचना असते तिला गतिकेंद्रक म्हणतात. ट्रिपॅनोसोमांचे जनन अनुदैर्घ्य (उभ्या) द्विभाजनाने होते, परंतु कधीकधी ते बहुविखंडनानेही होते.

ट्रिपॅनोसोमा गँबिएन्स या विकृतिजनक ट्रिपॅनोसोमाच्या जीवनवृत्तावरून सर्वसाधारणपणे सगळ्या परजीवी ट्रिपॅनोसोमांच्या जीवनवृत्ताची कल्पना येईल. ट्रिपॅनोसोमा गॅबिएन्स ही जाती आफ्रिकी हरिणांच्या रक्तात राहणारी असून तिच्यामुळे हरिणाच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा रोग उत्पन्न झाल्याचे दिसून येत नाही. ज्या हरिणाच्या शरीरात हा परजीवी असतो, त्याला त्सेत्से माशी (ग्लॉसिना पल्पॅलिस) चावली म्हणून तिने शोषून घेतलेल्या रक्तातून हे ट्रिपॅनोसोम प्राणी तिच्या आंत्रात (आतड्यात) जातात. तेथे प्रथम त्यांची वाढ होते आणि नंतर त्यांच्यापासून संक्रामी (संसर्गक्षम) रूपे उत्पन्न होतात आणि ही संक्रामी रूपे लाला ग्रंथींत अगर शुंडांत (सोंडांमध्ये) जातात. ही माशी जर एखाद्या माणसाला चावली, तर ही संक्रामी रूपे त्या माणसाच्या रक्तात जातात.

ट्रिपॅनोसोमाच्या जाती व त्यांमुळे होणारे रोग 

ट्रिपॅनोसोमाची जाती 

मुख्य पृष्ठवंशी पोषक 

अपृष्ठवंशी प्रसारक 

रोग 

भौगोलिक विस्तार 

ट्रि. गँबिएन्स 

मनुष्य, पाळीव जनावरे 

त्सेत्से माशी 

आफ्रिकी निद्रारोग 

भूमध्य रेषेजवळची पश्चिम आफ्रिका 

ट्रि. ऱ्होडेसिएन्स 

मनुष्य, रानटी प्राणी 

त्सेत्से माशी 

आफ्रिकी निद्रारोग 

उष्ण कटिबंधीय पूर्व आफ्रिका 

ट्रि. क्रूझाय 

मनुष्य, कुत्रा, आर्मडिलो व इतर प्राणी 

ढेकूण(ट्रायाटोमा) 

शागसरोग 

दक्षिण व मध्य अमेरिका 

ट्रि. ब्रूसिआय 

पाळीव व रानटी सस्तन प्राणी 

त्सेत्से माशी 

नगान 

उष्ण कटिबंधीय आफ्रिका 

ट्रि. ईव्हॅन्साय 

पाळीव व रानटी सस्तन प्राणी 

चावणाऱ्या माश्या (टॅबॅनस, स्टोमॉक्झिस) 

सरा 

आशिया, ऑस्ट्रेलिया, मॅलॅगॅसी 

ट्रि. ईक्विपर्डम 

घोडे, गाढवे 

सामान्यतः नसतात, मैथुनाच्या वेळी संपर्क 

डूरीन (अश्वासिकायजन्य रोग) 

भूमध्य समुद्राजवळील देश 

त्यांच्यामुळे सुरुवातीला त्या माणसाला ताप येतो व नंतर हे परजीवी जेव्हा मस्तिष्क-मेरुद्रवात (मेंदूतील पोकळ्यांत व मज्जारज्जूतील मध्यवर्ती मार्गात असणाऱ्या द्रवात) शिरतात तेव्हा त्याला ⇨ निद्रारोग होऊन तो मरतो. यावरून असे दिसून येईल की, या परजीवींच्या जीवनचक्रात दोन पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) पोषक व एक अपृष्ठीवंशी मध्यस्थ पोषक असतो.

ट्रिपॅनोसोमाच्या काही जाती निरुपद्रवी असतात उदा., गुरात आढळणारी ट्रि. थेइलेराय ही जाती, उंदरात आढळणारी ट्रि. लेविसाय ही जाती इत्यादी. पण ट्रिपॅनोसोमाच्या कित्येक जाती विकृतिजनक असून त्यांच्यामुळे माणसांना, पाळीव जनावरांना किंवा वन्य प्राण्यांना ‘ट्रिपॅनोसोमियासिस’ हा रोग होतो. सोबत दिलेल्या कोष्टकात कोणत्या जातीमुळे कोणत्या प्राण्यांना कोणता रोग होतो व कोणत्या प्रसारक अपृष्ठवंशी प्राण्यामुळे तो होतो, ही माहिती दिली आहे.

कर्वे, ज. नी. डाहाके, ज्ञा. ल.