शैवले : (शैवाल लॅ. अल्गी, अल्जी ). अत्यंत साधे शरीर असणाऱ्या, बहुधा गोड्या, मचूळ किंवा खाऱ्या पाण्यात किंवा त्याच्या सान्निध्यात जगणाऱ्या व स्वतंत्रपणे आपले अन्न बनविणाऱ्या हिरव्या वनस्पतींना शैवले म्हणतात. रंगहीन अशा थोड्या वनस्पतींचा अपवाद वगळता शैवलांपैकी कित्येकांचा मूळचा हिरवा रंग इतर रंगद्रव्यांमुळे झाकाळला जातो. इंद्रधनुष्यातील सात रंगांपैकी एखादा रंग दर्शविणाऱ्या काही शैवलांच्या जाती सामान्यपणे समुद्रकिनारी आढळतात. इतर अबीजी वनस्पतींशी तुलना केल्यास, शैवलांची पुनरूत्पादक अंगे अत्यंत साधी व एका कोशिकेची बनलेली असतात.

शैवलांच्या सु. २०,००० जातींची नोंद झालेली आहे. त्यांची शारीरिक संरचना साधी असूनही सर्व सजीवांत आढळणाऱ्या पोषण, वाढ, प्रजोत्पादन प्रक्रिया त्यांच्या जीवद्रव्यामध्येही आढळत असल्यामुळे शरीरक्रियाविज्ञानाच्या दृष्टीने शैवले जटिल ठरतात. ⇨ कवकां मध्ये हरितद्रव्याचा अभाव असल्याने त्यापासून त्यांचा वेगळेपणा सहज ओळखता येतो. पृथ्वीवर फार प्राचीन काळापासून शैवलांचे अस्तित्व असून इतर सर्व  वनस्पती त्यांच्यापासून कमविकासाने निर्माण झाल्या असाव्यात असे मानतात. याला कदाचित काही कवक अपवाद असावेत. जीवशास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर प्रथम फक्त सजीव द्रव्याचे लहानमोठे थेंब निर्माण झाले व पुढे त्यातील काहींचा विकास हळूहळू अत्यंत साध्या शैवलांत, तर काहींचा फार साध्या प्राण्यांत व काहींचा प्रारंभिक कवकांत झाला असावा, त्यानंतर काही साध्या शैवलांचा विकास हरितद्रव्यनाशामुळे काही कवकांत, तर  बहुतेक प्राण्यांचा, वनस्पतींचा व इतर बहुसंख्य कवकांचा विकास स्वतंत्रपणे व जटिल स्वरूपात झाला असणे संभवनीय आहे.

अधिवास, प्रसार व परिस्थितिविज्ञान : शैवले विशेषत: गोड्या व खाऱ्या पाण्यात आणि अंशतः जमिनीवर (किंवा उघडयावरच्या इतर वस्तूंवर) विपुलतेने आढळतात. शरीराच्या विविधतेत फक्त सूक्ष्मजंतूच काही प्रमाणात त्यांची बरोबरी करू शकतील. बहुसंख्य शैवले पाण्यात असल्याने काही ऋतूंत त्यांची संख्या फार मोठी असते. खडक, दगड, काटक्या किंवा वनस्पती व प्राणी यांना चिकटून कित्येक शैवले वाढतात,  तर काही स्वतंत्रपणे मोकळ्या तरंगतात. [→ प्लवक].

काही ठराविक हवामानात असंख्य सूक्ष्म शैवले (उदा., मायक्रोसिस्टिस, नॉस्टॉक, ॲनाबीना, लिंग्बिया, ग्लोओट्रिक्रिया, सीलोस्फेरियम) पाण्यात तरंगत राहिल्याने त्यावर हिरवट झाक मारते ह्याला  जलबहार म्हणतात. यामुळे ते पाणी बिघडते. काही गोड्या पाण्यातील शैवलामुळेही पाण्यास रंग येतो (उदा., क्लॅमिडोमोनस, व्हॉल्व्हॉक्स,  यूग्लीना ). समुद्रात ट्रायकोडेस्मियम च्या जातीमुळे जलबहार बनतो. काही शैवलांचे हिरवे-पिवळे पुंजके संथ पाण्यावर तरंगत असलेले आढळतात.  त्याला पल्वल तरंग म्हणतात. तसेच कधीकधी जलबहारातील काही जातींचा जाड थर तरंगतो. समुद्रात तरंगणाऱ्या किंवा खडकास चिकटून  वाढणाऱ्या मोठया शैवलास ‘ सागरी शैवले ’ ( उदा., फ्यूकस, सरगॅसम, नेरिओसिस्टिस ) म्हणतात.

शैवले पाण्यात किती खोलवर राहू शकतात, हे सूर्यप्रकाश किती खोलवर जाऊ शकतो त्यावर अवलंबून असते. बहुतेक शैवले पाण्याच्या पृष्ठभागाखाली काही सेंमी.पर्यंतच आढळतात तथापि काही हिरवी, पिंगल व लाल शैवले पृष्ठभागाखाली सु. १०० मी.पर्यंत आढळतात. प्रत्येक  जाती खाऱ्या किंवा गोड्या या दोन्हीं पैकी एकाच ठिकाणी सदैव आढळते. बहुधा गोड्या पाण्यातील सर्व जाती लहान किंवा सूक्ष्म असतात. उलट खाऱ्या पाण्यातील जाती आकाराने मोठया व म्हणून सहज ओळखता  येतात. गोड्या पाण्यातील अनेक जाती विषुववृत्तापासून ते ध्रूवीय प्रदेशांपर्यंत सर्वत्र आढळतात. मात्र काही विशिष्ट ठिकाणीच आढळतात. सागरी शैवलातील चिकटून वाढणाऱ्यांपैकी ९५ टक्के जाती पिंगल किंवा लाल गटातील असतात. पिंगल शैवले महासागरातील थंड पाण्यात, तर लाल शैवले सापेक्षतः उष्ण पाण्यात अधिक आढळतात. तसेच तापमान, सूर्यप्रकाशाची तीव्रता व ओहोटीच्या वेळी सुकून जाण्याचा धोका  इत्यादींमुळे सागरी शैवलांची संख्या किनाऱ्यापासून खोल पाण्याकडे क्रमश: वाढत जाते. उष्ण व उपोष्ण कटिबंधातील समुद्रात सूर्यप्रकाश अधिक खोलवर शिरत असल्यामुळे शैवले सु. १०० मी.पेक्षाही अधिक खोलपर्यंत आढळतात. याउलट अधिक वरच्या अक्षांशावरील सागरात  सु. ५० मी. खाली शैवले जवळजवळ नसतात. फक्त तापमानाचा विचार केल्यास काही निळी-हिरवी शैवले ७५º - ८०º से. उष्णतेच्या झऱ्यात वाढतात तर काही बर्फात गोठलेल्या अवस्थेत काही महिने  राहिलेली आढळतात. ‘ लाल बर्फ ’ हे नाव लाल दिसणाऱ्या पण मुळात हिरव्या रंगाच्या (उदा., क्लॅमिडोमोनस निविया ) शैवलामुळे पडले आहे. [→ जीवविज्ञान, सागरी].

ओलसर जमिनीवर काही शैवले वाढतात. भरपूर खतावलेल्या मातीच्या ढेकळांत खूपच शैवले असतात. पृष्ठभागाजवळ अथवा जमिनीवरच्या शैवलांना अन्ननिर्मितीसाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. कमी-अधिक दाट अंधारात वाढणारी शैवले हरितद्रव्यहीन व शवोपजीवी [मृतजीवी → शवोपजीवन] असतात. भूमिगत प्रकारात मुख्यतः निळी-हिरवी व करंडकासारखी [→ डायाटम] शैवले आढळतात. काही स्थळी ती हिरवी, पिवळी व पिवळट तपकिरी रंगांचीही असतात. ‘ तांबडा समुद्र ’ हे  नाव त्यात कधीकधी विपुल प्रमाणात निर्माण होणाऱ्या तांबड्या रंगाच्या  पण निळ्या-हिरव्या (नील-हरित) शैवलामुळे पडले आहे.


आ. १. शैवले (मोठया प्रजाती) : (१) उल्वा, (२) कारा, (३) एक्टोकार्पस,(४) पॉलीसायफोनिया, (५) लॅमिनेरिया, (६) नेमॅलिऑन, (७) फ्यूकस.उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील कित्येक वनस्पती शैवलांना आपल्या शरीराच्या काही भागांवर (पाने, खोडाची साल इ.)किंवा शरीरात आश्रय देतात.उष्ण कटिबंधात आढळणाऱ्या अशा शैवलांना अपिवनस्पती व उपोष्ण  कटिबंधातील शैवलांना अंतर्वनस्पती म्हणतात. उदा., ट्रेंटेपोलिया ही एक अपिवनस्पती असून त्याचे नारिंगी ठिपके जंगलातील काही झाडांच्या  सालीवर दिसतात. ⇨  सायकस च्या पोवळ्यासारख्या मुळांतील व ॲझोला ⇨  जल नेचां च्या पानातील नॉस्टॉक हे निळे-हिरवे शैवल आणि अँथोसिरोस या ⇨  शेवाळी तील ॲनाबीना ही अंतर्वनस्पतींची उदाहरणे  होत. युलोथ्रिक्स इडोगोनियम ही हिरवी शैवले कारा, स्पायरोगायरा या दुसऱ्या मोठया शैवलांवर किंवा पाण्यातील काही फुलझाडांवर  वाढतात. कित्येक शैवले पाण्यातील लहानमोठया प्राण्यांवर (कासवे, खेकडे, मासे, जलमक्षिका इ.) किंवा काहींच्या शरीरात (पॅरामिशियम, जेलिफिश, हायड्रा इ.) वस्ती करतात. चहा, ॲव्होकॅडो, लिंबू वंशातील [→ सिट्रस] वनस्पती इत्यादींच्या पानांवर तांबेरा रोगाचे ठिपके पडतात. ते एका (सिफॅल्यूरस व्हायरेसेंस) शैवलामुळे येतात मात्र ते शैवल अंशतः त्या वनस्पतीपासून अन्न शोषून घेते (अर्धजीवोपजीवी). काही हिरवी व निळी-हिरवी शैवले परस्परांना हितकारक होणाऱ्या ⇨  सहजीवना च्या तत्त्वांवर कवकाशी निकट व कायम शरीरसंबंध  ठेवतात आणि ⇨  शैवाक नावाच्या दगडफुलासारख्या वनस्पती बनतात.

सूर्यप्रकाश, पाणी, खनिजे व कार्बन डाय-ऑक्साइड वायू इ. जीवन-द्रव्यांच्या उपलब्धतेवर शैवलांचा प्रसार अवलंबून असतो. यांपैकी प्रकाश, पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड वायू अन्ननिर्मितीस आवश्यक असतात. वाढीकरिता व प्रजोत्पादनाकरिता पाणी आवश्यक असते. ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइडाचे एखादया जलाशयातील प्रमाण स्थिर नसून बदलत असले, तरी शैवलांना त्या वायूंची संहती पुरेशी असते. काही शैवले उथळ पाण्यातील ऑक्सिजन रात्रभर इतका शोषून घेतात की,  त्यातील लहान माशांवर गुदमरण्याची पाळी येते. उच्च वनस्पतीप्रमाणे शैवलांनाही पाण्यात विरघळलेली नायट्रोजनाची लवणे व वाढीस पोषक इतर खनिजे आवश्यक असतात. सापेक्षतः त्यांची अल्पशी संहती अनेक शैवलांच्या विकासाला पुरेशी ठरते. मात्र एखादया खनिजाच्या पूर्ण अभावामुळे त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. उदा., सिलिकेटाची कमतरता  असलेल्या पाण्यात करंडक शैवलांची वाढ फारच कमी आढळते.

वर्षातील विशिष्ट ऋतूतच ज्यांची वाढ व प्रजोत्पादन होते त्या शैवलांना वर्षायू (एक हंगाम जगणाऱ्या) व अनेक वर्षे वाढत राहून  विशिष्ट काळातच प्रजोत्पादन करणाऱ्यांना बहुवर्षायू म्हणतात. काही एकाकी किंवा समूहाने वाढणारी (उदा., व्हॉल्व्हॉक्स, हायड्रोडिक्टिऑन) शैवले थोड्या दिवसांतच वाढ व प्रजोत्पादन पूर्ण करतात  भिन्न शैवलांतील हा फरक परिस्थिती व वैयक्तिक आनुवंशिकता यांवर अवलंबून असतो.

आ. २. शैवले (सूक्ष्मदर्शकीय दृश्य) : (१) क्लॅमिडोमोनस, (२) युलोथिक्स, (३) हायड्रोडिक्टिऑन, (४) स्पायरोगायरा, (५) स्पायरोगायरा (पुनरूत्पादन), (६) ॲनाबीना, (७) कारा (लैंगिक अवयव), (८) यूग्लीना, (९) ट्रॅकिलोमोनास, (१०) ट्रायबोनेमा, (११) क्लोस्टेरियम, (१२) सिन्यूरा, (१३) डायाटम (वरील व बाजूचे दृश्य), (१४) डायाटम (मध्य), (१५) सिरेशियम, (१६) पॉलीसायफोनिया, (१७) ग्लोइओकॅप्सा.स्वरूप, संरचना, आकार : काही शैवलांचे शरीर फक्त एका कोशिकेचे (उदा., यूग्लीना, क्लॅमिडोमोनस, क्लोरेला, डायाटम ), काहींचे एकसारख्या पण अनेक कोशिकांच्या विरळ समूहाने (उदा., मायक्रो-सिस्टिस, ग्लीओकॅप्सा, क्लोरोकॉकम) बनलेले, तर काहींचे सामूहिक  पण निश्चित व कायम स्वरूपाचे (उदा., व्हॉल्व्हॉक्स, पेडिॲस्ट्म, सेनेडेस्मस) असते. अनेक शैवले अनेक कोशिक असतात (उदा., फ्यूकस, गेलॅडियम, उल्वा ). कोशिका परस्परांच्या टोकास चिकटून सलग साखळीप्रमाणे (उदा., ॲनाबीना, नॉस्टॉक) किंवा तंतूप्रमाणे आणि शाखायुक्त (उदा., एक्टोकार्पस, क्लॅडोफोरा ) किंवा शाखाहीन  (उदा., स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, इडोगोनियम) असतात. आकाराने शैवले नळीसारखी (उदा., एंटेरोमॉर्फा ), छत्रीसारखी (उदा., ॲसिटॅब्यु-लॅरिया), सपाट पानांप्रमाणे (उदा., लॅमिनेरिया), पातळ कागदाप्रमाणे (उदा., उल्वा), पंख्याप्रमाणे (उदा., पॅडिना ), वेलीप्रमाणे (उदा., सरगॅसम), विभागलेल्या सपाट पट्टीप्रमाणे (उदा., डिक्टिओटा, फ्यूकस, काँड्रस ) यांसारख्या अनेक प्रकारची असतात. काहींत कोशिकावरणावर बाहेरच्या बाजूस काटे, खाचा, छिद्रे, उंचवटे, रेषा, कंगोरे इत्यादींनी साधलेले शिल्पांकनही असते (उदा., डायाटम, डेस्मिड ). फक्त सूक्ष्मदर्शकातून दिसणाऱ्या व एक सहस्रांश सेंमी. व्यासाच्या कोशिकेपासून  ते सु. ६०-१०० मी. लांबीच्या विस्तृत सागरी शैवलांपर्यंत अनेक  चित्रविचित्र आकारप्रकार शैवलांत आढळतात. बाह्यत: काहीशी मुळासारखी, खोडासारखी व पानासारखी इंद्रिये आणि संरचनेत विविध ऊतकांचा (समान स्वरूप व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांचा)  समावेश असलेली काही शैवले (उदा., पॉस्टेल्शिया, मॅक्रोसिस्टिस, बेरिओसिस्टिस, सरगॅसम) आढळतात. तथापि, त्यांतील साधेपणा सहज लक्षात येतो.


शैवलांच्या शरीरातील मूलभूत घटकांची म्हणजे कोशिकांची संरचना व स्वरूप सामान्यपणे उच्च वनस्पतींतील हिरव्या कोशिकेपेक्षा भिन्न नसते. सेल्युलोजाचे (तूलिराचे) कोशिकावरण, प्राकल (सजीव द्रव्य), प्रकल, प्राकल कणू (जिवंत कोशिकेतील भिन्न घटक) आणि त्यांपैकी महत्त्वाचे म्हणजे हरितकणू आणि विरघळलेले वायू , खनिजे व अन्नपदार्थांनी भरलेल्या रिक्तिका इ. सर्वच शैवलांत असतात मात्र हे संरचनात्मक प्रभेदन सर्वच शैवलांत एकसारखे नसते. निळ्या-हिरव्या शैवलांच्या कोशिकेत हरितकणू , सुस्पष्ट प्रकल व अनेकदा रिक्तिका नसतात. करंडक वनस्पतींच्या (डायाटमांच्या) कोशिकावरणात सिलिकेटाचा अंतर्भाव झाल्याने प्राकलाला जणू ‘ काचेच्या भिंतीआड ’ दिवस काढावे लागतात.यूग्लिनासारख्यांना कोशिकावरण नसते. काहींत  (उदा., व्हाऊचेरिया, कॉलेर्पा, बॉट्रिडियम) प्राकलामध्ये अनेक प्रकल (केंद्रक) असून सर्व शरीर एकाच शाखायुक्त कोशिकेचे बनलेले असते. रंगद्रव्यामुळे अनेक प्राकल कणू नजरेआड होतात. हरितकणू विविध प्रकारचे असून त्यामध्ये प्रकणू बहुधा असतात. हालचाल करणाऱ्या स्वतंत्र कोशिकांत प्रकाश-संवेदनक्षम लाल कण (नेत्रबिंदू) असतात  (उदा., क्लॅमिडोमोनस, यूग्लीना).

वनस्पतींना स्थलांतर करता येत नाही. तथापि काही शैवले याला अपवाद आहेत. काहींच्या शाकीय अवस्थेतील कोशिका (उदा., क्लॅमिडोमोनस, यूग्लीना ), कोशिकासमूह (उदा., व्हॉल्व्हॉक्स, सेनेडेस्मस, यूडोरिना ) व कित्येकांच्या प्रजोत्पादक कोशिका (चर-बीजुके, गंतुके व रेतुके) कमीअधिक गतीने स्थलांतर करतात. हे स्थलांतर अनेकदा एक, दोन किंवा अनेक सूक्ष्म किंवा मोठया केसलांच्या (प्राकलांच्या कोशिकावरणाबाहेर आलेल्या धाग्यांच्या) मदतीने घडून येते. मोठया केसलांना प्रकेसले म्हणतात व त्यांपैकी काहींवर पुन्हा केसले असतात (उदा., यूग्लीना). ⇨ डायाटमां च्या कोशिकांची हालचाल (मागे, पुढे किंवा नागमोडी) त्यातील परिकलाचा (कोशिकेच्या जीवद्रव्यातील फक्त पातळ भागाचा), फटी व छिद्रे यांतून, पाण्याशी होणारा संघर्ष यामुळेहोते. तसेच एकाच जागी स्थिरावलेल्या शैवलांच्या तंतूंचे घसरणे, सरकणे व डुलणे यांसारख्या हालचाली (उदा., काही निळी-हिरवी शैवले) त्यांच्या शरीराबाहेर स्रवणाऱ्या श्लेष्म्यामुळे (बुळबुळीत स्रावामुळे)होतात.नग्न कोशिकांची (उदा., क्रिसॅमीबा) हालचाल अमीबासारख्या अतिसूक्ष्म व साध्या सजीवाच्या सरपटणे किंवा वाहणे या प्रकियांप्रमाणे चालते. निळ्या-हिरव्या व लाल शैवलांमध्ये प्रकेसलांचा संपूर्ण अभाव असतो. प्रकेसलांची संख्या, प्रकार व कोशिकेवरचे उगमस्थान यांवर शैवलांचे वर्गीकरण काही अंशी  अवलंबून असते.

अन्न : सर्वच शैवले (जीवोपजीवींचा अपवाद वगळून) प्रकाश-संश्लेषणाने आपले अन्न बनवितात. या प्रक्रियेत पहिल्या काही अवस्थेत त्यांचे उच्च वनस्पतींशी साम्य असते. सर्व शैवलांत या प्रक्रियेतील पहिले उत्पादित पदार्थ सारखेच असतात परंतु त्यांच्या कोशिकांत दीर्घकाळ साचून राहणाऱ्या अविद्राव्य पदार्थांच्या बाबतीत शैवलांत विविधता आढळते व त्यांच्या वर्गीकरणात या लक्षणांचाही उपयोग केला जातो.हे पदार्थ विविध बहुशर्करा (पॉलिसॅकॅराइड) आहेत उदा., स्टार्च, लॅमिनॅरिन, पॅरॅमीलम, ल्युकोसिन, सायनोफायसिन, मॅनिटॉल इत्यादी. शैवलांत मेद व तत्सम पदार्थ वेगवेगळ्या परिस्थितीच्या संदर्भांत व वेगवेगळ्या प्रमाणांत आढळतात (नोंदीतील विभागदर्शक सारणी पहा).

रंगद्रव्ये : (पिंजके). अनेक प्रकारच्या शैवलांत सुसंगतपणे आढळणाऱ्या काही रंगद्रव्यांमुळे शैवलांच्या वर्गीकरणात बरीच मदत झाली आहे. रंगद्रव्यातील फरक परिस्थितिसापेक्ष असल्याने शैवलांचे अचूक वर्गीकरण प्रकाशसंश्लेषणाला जबाबदार असलेल्या रंगद्रव्यांच्या रासायनिक विश्लेषणावर अवलंबून असते. या रंगद्रव्यांचे तीन प्रकार आहेत क्लोरोफिले (हरितद्रव्ये), कॅरोटिनॉइडे (लाल व पीतद्रव्ये) व बिलोप्रोटिने (नील व रक्तद्रव्ये). भिन्न शैवलांमध्ये त्यांचे प्रमाण भिन्न असते. हरितद्रव्यांचे क्लोरोफिल ए, बी, सी, डी व ई असे पाच प्रकार आढळतात (नोंदीतील विभागदर्शक सारणी पहा). कॅरोटीन (लाल  द्रव्य) व झँथोफिल (पीतद्रव्य) या दोन प्रकारच्या कॅरोटिनॉइड रंगद्रव्यांचेही प्रमाण भिन्न असते. झँथोफिले अनेक असून त्यांचीही वाटणी भिन्न शैवलांत निश्चित असते. फायकोसायनीन (नीलद्रव्य) व फायको-एरिथ्रीन (रक्त  लालद्रव्य) ही दोन बिलोप्रोटिने प्राण्यांच्या पित्तातील रंगद्रव्यासारखी असतात. ती काही शैवलांत (निळी-हिरवी व लाल इ.) आढळतात. कोणत्याही शैवलात हरितद्रव्यांचे प्रमाण जास्त झाल्यास ते हिरवे दिसते, तसेच निळे, पिवळे किंवा लाल द्रव्य अधिक असल्यासतेते रंग ठळकपणे दिसतात. रंग परिस्थितिसापेक्ष असल्याने नैसर्गिक वर्गीकरणात त्यांना कितपत प्राधान्य द्यावे याबद्दल मतभेद आहेत.[→रंगद्रव्ये].

प्रजोत्पादन : शाकीय पद्धती : बहुतेक सर्व एककोशिक शैवलांच्या कोशिका समविभाजनाने [→ कोशिका ] संख्यावाढ करतात. डायाटमे व डेस्मिडे ह्या शैवलांत कोशिकेच्या विभागणीनंतर प्रत्येक नव्या कोशिकेला कोशिकावरणाचा एक भाग नवा व एक भाग जुना असतो. तंतुयुक्त शैवलांपैकी काहींचे प्रजोत्पादन तंतूंचे लहान मोठे तुकडे पडून घडते. प्रत्येक तुकडा पुढे स्वतंत्रपणे वाढून जीवनचकास आरंभ करतो (उदा., स्पायरोगायरा, इडोगोनियम). निळ्या-हिरव्या शैवलांत अशा खंडन  प्रक्रियेत तंतूंचे तुकडे आखूड व चलनशील असून ते तंतूतील विशिष्ट  ठिकाणी स्वतंत्र होतात. या तुकडयंना ‘ मालांश ’ आणि ते कोशिकांच्या माळेत जेथे अलग होतात त्या विशिष्ट कोशिकेस ‘ असमकोष्ठ ’ (उदा., ॲनाबीना नॉस्टॉक ) म्हणतात. तंतूच्या ह्या विशिष्ट भागास ‘ विभाजक बिंब ’ (उदा., ॲसिलॅरिया) म्हणतात. काही सामूहिक शैवलांचे एक किंवा अनेक लहानमोठे खंड पडून त्यांचे स्वतंत्र समूह बनतात (उदा., नॉस्टॉक, मायकोसिस्टिस, रिव्ह्युलॅरिया ). व्हॉल्व्हॉक्स या शैवलाच्या शरीरातील विशिष्ट कोशिकांमध्ये अनेकदा समविभाजन होऊन कोशिकांचा लहानसा गोळा बनतो व जनक वनस्पतीच्या सामूहिक शरीरातून बाहेर पडून तो स्वतंत्र सामूहिक जीवन जगू लागतो.

बहुतेक शैवलांत शाकीय पद्धतीखेरीज लिंगभेदाचा संबंध असलेली (लैंगिक) किंवा नसलेली (अलैंगिक) पद्धती आढळते.


अलैंगिक पद्धती : यामध्ये शरीरापासून अनेक एककोशिक सूक्ष्म  घटक (बीजुके) निर्माण होऊन त्यांच्याकरवी नवीन वनस्पतींची उत्पत्ती होते व त्यांचा प्रसारही होतो. बीजुके विविध प्रकारांची असतात. बहुतेक शैवलांत ती चर (हालचाल करणारी) असतात (उदा., क्लॅमिडोमोनस, युलोथ्रिक्स ) पण इतर काहींत (निळ्या-हिरव्या व लाल शैवलांत) ती अचर (स्थिर) असतात. कोशिकावरण जाड असल्यास बीजुकाला ‘ विश्रामी ’ (उदा., ॲनाबीना ) म्हणतात. ती विश्रांतिकालानंतर रूजून नवीन वनस्पती निर्माण करतात. शरीराच्या कोणत्याही कोशिकेपासून (उदा., युलोथ्रिक्स&lt, पेडिॲस्ट्म) किंवा विशिष्ट भागातील कोशिकेपासून (उदा., एक्टोकार्पस) बीजुके तयार होतात. अशी बीजुके किमान एक  किंवा त्याहून अधिक असतात. क्लॅमिडोमोनस व इतर अनेक एककोशिक प्रजातीत कोशिकेतील सर्व जीवद्रव्याचे (प्राकलाचे) रूपांतर २  ८ स्वतंत्र कोशिकांत होऊन कोशिकावरण श्लेष्मल होते व पुढे ते निकामी होऊन सर्व कोशिका स्वतंत्र होतात. काही तंतुयुक्त निळ्या-हिरव्या शैवलांत  (उदा., नॉस्टॉक) मोठया व जाड आवरणांच्या विश्रामी कोशिका बनतात त्यांना ‘ निश्चेष्ट बीजुके ’ म्हणतात. कमी-अधिक विश्रांतीनंतर ही बीजुके रूजून नवीन तंतू वाढतात.

लैंगिक पद्धती : या प्रकारात पुं (नर) व स्त्री अशा दोन प्रजोत्पादक कोशिकांचा (गंतुकांचा) संयोग होऊन एक संयुक्त कोशिका (रंदुक)  बनते व तिच्यापासून पुढे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे नवीन पिढी निर्माण होते. दोन सारख्या गंतुकांच्या संयोगास ‘ समयुती ’ (उदा., एंटेरोमॉर्फा, क्लॅमिडोमोनस ) म्हणतात व सारख्या नसणाऱ्या गंतुकांच्या संयोगास ‘ असमयुती ’ (उदा., क्लॅमिडोमोनस) म्हणतात. स्पायरोगायरा या सामान्यपणे गोड्या पाण्यात आढळणाऱ्या शैवलांमध्ये गंतुकातील फरक फक्त त्यांच्या वर्तनातच दिसून येतो. एक गंतुक अधिक क्रियाशीलतेमुळे  नर व दुसरे निष्कियतेमुळे स्त्री-गंतुक ठरते. याला शरीरक्रियावैज्ञानिक ‘ असमयुती ’ म्हणतात. अशा प्रकारच्या संयोगाने बनलेल्या अंतिम कोशिकेस ‘ गंतुबीजुक ’ म्हणतात. काही शैवलांत (उदा., फ्यूकस, व्हॉल्व्हॉक्स, कारा, इडोगोनियम ) स्त्री-गंतुके अचर असून त्यांचे फलन जलप्रवाहाबरोबर पोहत येणाऱ्या चर नर-गंतुकाकडून होते. याला अंदुकयुती व त्यामुळे बनलेल्या संयुक्त कोशिकेस रंदुक म्हणतात. सलिंग  पद्धतीचा अवलंब शैवले बहुधा प्रतिकूल परिस्थितीत करतात आणि निर्माण झालेले रंदुक किंवा गंतुबीजुक अनुकूल परिस्थिती येईपर्यंत सुप्तावस्थेत राहते. त्यानंतर ते रूजून त्यापासून अनेक बीजुके किंवा प्रत्यक्ष नवीन पिढी जन्मास येते. बीजुके निर्माण झाल्यास मूळ वनस्पतीचा प्रसार साहजिकच  जलद होतो.

फ्यूकससरगॅसम यांसारख्या पिंगल शैवलांत शाखांच्या टोकास किंवा स्वतंत्र लहान शाखांवर अनेक सूक्ष्म छिद्रे असून त्याखाली लहान  पोकळ्या असतात, त्यांना कुहर म्हणतात. त्यांना धारण करणाऱ्या भागाला कुहराधानी म्हणतात. ह्या कुहरांत अंदुके (स्त्री-जनन कोशिका) अथवा रेतुके (नर-कोशिका) निर्मिणारी अंदुकाशये वा रेतुकाशये आणि  कधीकधी दोन्हीही असतात. यांच्या साहाय्याने प्रजोत्पादन घडून येते. प्रजोत्पादन कोशिकांचा बाहेरील पाण्यात परस्परांशी संयोग होऊन रंदुक बनते व त्याची प्रत्यक्ष वाढ होऊन मूळची द्विगुणित वनस्पती बनते. [ → प्रजोत्पादन ].

शैवलाच्या जीवनात शाकीय, बीजुक, गंतुक, रंदुक इ. अनेक अवस्था आढळतात. त्यांच्या कोशिकेतील रंगसूत्रांच्या संदर्भात त्या एकगुणित  किंवा द्विगुणित म्हणून ओळखल्या जातात. शाकीय अवस्था बीजुके  निर्माण करणारी किंवा गंतुके प्रसवणारी असू शकते. सर्व अवस्थांचा अंतर्भाव एका जीवनचकात होतो. त्या जीवनचकात फक्त रंदुकच (किंवा गंतुबीजुक) द्विगुणित (रंगसूत्रांचे दोन संघ असणारे) असून त्याच्या न्यूनीकरण विभाजनामुळे पुढे सर्व शाकीय अवस्था एकगुणित (रंगसूत्रांचा  एकच संघ असणारी) ठरते (उदा., स्पायरोगायरा, कारा, युलोथिक्स, क्लॅमिडोमोनस). असे जीवनचक प्रारंभिक मानतात. उलट फक्त गंतुकेच एकगुणित असून बाकीच्या अवस्था द्विगुणित असतात, असे जीवनचक अधिक प्रगत समजतात (उदा., फ्यूकस, सरगॅसम). या दोन प्रकारांच्या मर्यादेत इतरत्रही काही प्रकार आढळतात. सामान्यपणे अनेक शैवलांत एकगुणित व द्विगुणित अशा दोन शाकीय अवस्था असून त्यांचे एकांतरण असते व एक किंवा दोन्ही अवस्था बीजुकांचे साहाय्याने प्रजोत्पादन करतात. दोन्ही अवस्था सारख्या दिसत असल्यास एकांतरण‘ समरूपी ’  (उदा., एक्टोकार्पस, डिक्टिओटा) व नसल्यास ‘ विषमरूपी ’ (उदा., लॅमिनेरिया, मॅकोसिस्टिस) म्हणतात. या बाबींचा उपयोग काही शैवलांच्या वर्गीकरणात केला जातो.

दुष्परिणाम : काही शैवले उपद्रवकारक असतात. त्यांपैकी काहींचा लोकवस्तीच्या पाणीपुरवठ्याशी संसर्ग होऊन पाण्याला थोडीफार दुर्गंधी येते व चवही बदलते. विशिष्ट वासावरून त्यातली काही शैवले ओळखता येतात.मोरचूद, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड, क्लोरीनयांसारख्या शैवलनाशक द्रव्यांचा उपयोग करून हा उपद्रव कमी करणे शक्य असते.

काही शैवले प्राण्यांनी खाल्ली असता विषबाधा झाल्याचे नमूद आहे. जिम्नोडिनियमा ने माशांना रोग होऊन ते मोठया प्रमाणावर मरतात. काही जलबहार किंवा पल्वल तरंग पाण्याला विषारी बनवितात व त्यापासून मासे व इतर प्राणी मरतात. विशेषत: जलबहाराचे रूपांतर पल्वल तरंगात होते, तेव्हा हा धोका संभवतो. ज्या बाह्य परिस्थितीमुळे (प्रकाश, तापमान, ऑक्सिजन, वारा इ.) हे घडून येते, ती पूर्णपणे समजून घेतल्यास मासे  वाचविता येतील. मोरचुदाचा प्रमाणशीर उपयोग करून पल्वलास विरळपणा आणता येतो व धोका कमी होतो, त्याचप्रमाणे सुपरफॉस्फेट वापरून व त्यायोगे प्रकाशसंश्लेषण वाढवून धोका टाळता येतो. शैवल कुजून हायड्रॉक्सिल अमाइन बनते, तेव्हा ते माशांना विषबाधा करते. पिण्याचे  पाणी वालुका गाळणीतून जाताना त्यात झालेल्या शैवलांच्या वाढीमुळे  अवरोध होतो आणि पाणी तुंबते त्यामुळेही प्राण्यांना धोका संभवतो. विषारी शैवलांमुळे (उदा., ॲफॅनिझोमेनॉन ) माणसांना पचनाच्या, डोळ्यांच्या, श्वसनाच्या लहानमोठया तक्रारींना तोंड द्यावे लागते. परागज्वराची बाधा काहींना जलबहार असलेल्या पाण्यात पोहल्यामुळे होते.  ज्या पाण्यात मायक्रोसिस्टिस, ॲनाबीना, ॲफॅनिझोमेनॉन इ. शैवलांचा  जलबहार असतो, त्या पाण्यात पोहण्यामुळे डोकेदुखी, शिसारी, मळमळ,  वांत्या, अतिसार इ. विकार झाल्याचे आढळले आहे.


व्यावहारिक महत्त्व : शैवलांचे अनेक उपयोग आहेत. काही अपवाद वगळल्यास बहुतेक सर्व शैवलांत हरितद्रव्य असते त्याच्या साहाय्याने ते अन्न बनवितात व त्यामुळे सर्व जलचरांना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अन्नपुरवठा होतो. पाण्यातल्या अन्नशृंखलेचा आरंभच त्यांच्यापासून होतो. समुद्रातील ⇨ प्लवक शैवलांचे प्रकाशसंश्लेषण पृथ्वीवरील एकूण प्रकाशसंश्लेषणाच्या [ → परिस्थितिविज्ञान ] ९०% असते. अनेक पौर्वात्य देशांतील लोक (चिनी, जपानी व मलायी) मोठया शैवलांचा अन्नासाठी बराच उपयोग करतात. तसेच निळ्या-हिरव्या शैवलांच्या जलबहारामुळे पाण्यात डासांची उत्पत्ती होत नाही. अमेरिकेत काँड्रस क्रिस्पस या  शैवलाचा उपयोग मुखशुद्घीसाठी व मिठाईच्या पदार्थांकरिता करतात.  काही शैवलांचे अन्नमूल्य त्यातील प्रथिनांमुळे बरेच असल्याचे अलीकडे आढळून आले आहे. अ, ब, क, ड आणि ई या जीवनसत्त्वांच्या दृष्टीने  अनेक शैवले महत्त्वाची ठरली आहेत. काहींत खनिज पदार्थ व कार्बोहायड्रेट भरपूर असतात. पॉर्फिरा, लॅमिनेरिया, ॲलारिया व इतर मोठया शैवलांपासून बनविलेला ‘ कोंबू ’ नावाचा खाद्यपदार्थ जपानमध्ये लोकप्रिय आहे. भारतात राजपुतान्यातील सांभर सरोवरानजीकचे लोक उल्वा या शैवलाचा लेट्यूसप्रमाणे[→सालीट] खाण्यात उपयोग करतात. इतरत्र पॉर्फिरा, ऱ्होडिमेनिया, इडोगोनियम, स्पायरोगायरा, कीटोफोरा,काँड्रस यांसारखी अनेक शैवले खाण्यासाठी वापरतात. शैवले खाऊन  वाढणारे अनेक जलचर माणसांच्या खाण्यात आहेत. सरगॅसम, ऱ्होडिमेनिया, लॅमिनेरिया, फ्यूकस इ. शैवले मेंढ्या व दुभती जनावरे यांचा चारा म्हणून वापरतात. ती सुकवून त्यांचे पीठ उपलब्ध करून देणारे व्यापारी कारखाने आहेत. हिवाळी पशुखाद्यांकरिता सुके गवत, भुसकट व ओटचे चोडे यांवर फ्यूकसॲस्कोफायलम यांचा अर्क ओतून ती वापरतात.  विशिष्ट शैवलाचे पीठ जननक्षम कोंबड्यांना देणे उपयुक्त असते. मलेरियाचे डास कारा हे शैवल असलेल्या पाण्यात वाढत नसल्याने ते शैवल त्यांना प्रतिबंधक ठरले आहे. खताकरिता शैवलांचा उपयोग दीर्घकाळ केला जात असून तो अधिक शास्त्रशुद्घ करण्याकडे लक्ष दिले जात आहे. जमिनीतील निळ्या-हिरव्या शैवलांतील श्लेष्मल द्रव्यामुळे  नायट्रोजन शोषून साठविणाऱ्या सूक्ष्मजंतूंना पोषण मिळते. शिवाय कित्येक निळी-हिरवी शैवले (ॲनाबीना, ऑलोसिरा ) स्वतःच नायट्रोजन आत्मसात करून जमिनीची सुपीकता वाढवितात. आयोडीन, पोटॅश, सोडियम कार्बोनेट व सिलिका यांसारखी खनिजे काही शैवलांपासून मिळवितात. चीनमध्ये समुद्री शैवले जाळून त्यांची राख खतासारखी उपयोगात आणतात. समुद्री शैवलांत शेणखतासारखेच भरपूर नायट्रोजन व कार्बनी पदार्थ असून पोटॅश दुप्पट, परंतु फॉस्फेट फार कमी व मीठ जास्त असते लेश मूलद्रव्येही असतात. अमोनियम सल्फेट व सुपर फॉस्फेट यांसह शैवलांचे खत दिल्याने तणांचे बी येऊ शकत नाही. पारदर्शक कागद (सेलोफेन) व विणकामाचे धागे वगैरेंकरिता लागणारे ॲल्गिनिक अम्ल काही शैवलांपासून (ॲस्कोफायलम, मॅकोसिस्टिस लॅमिनेरिया) काढतात तसेच या अम्लापासून ॲल्गिनेट औषधी लवणे बनवितात.

चायना गास, आयसिंग ग्लास या नावाने बाजारात मिळणारा  ⇨ आगर (आगार) हा साधारण पारदर्शक व बुळबुळीत पदार्थ हहल्ली अनेक उपयुक्त पदार्थांत (दंतधावने, औषधी गोळ्या, सुगंधी सौंदर्यप्रसाधने, चीज, आइस्कीम, पाव, केक, बिस्किटे, साबण, जेली, कागद, रेशीम, बिअर इ.) वापरतात व तो काँड्रस, जेलिडियम, गॅसिलॅरिया, युक्यूमा, जायगरटिनाइरिडिओफायकस यांसारख्या लाल शैवलांपासून मोठया प्रमाणावर बनवितात.

काही लाल शैवलांच्या जाती (काँड्रस, जेलिडियम, गॅसिलॅरिया ) भारताच्या किनाऱ्याजवळ आढळतात व त्यांचे औषधी उपयोग आहेत. सागरी शैवलांपैकी ॲकॅन्थोफोरा, स्पेसिफेरापॅडिना टेट्रॅस्टोमॅटिका यांच्या अर्काचा उपयोग जननक्षमता नाहीशी करण्यात होतो, असे उंदरांवर केलेल्या प्रयोगांवरून आढळले आहे. चीन, जपान व इतर आशियाई देशांत समुद्री शैवलांचा औषधांकरिता वापर फार पूर्वीपासून होत आला आहे. इ. स. पू. आठव्या शतकात आतड्यांच्या विकारांवर सागरी व इतर शैवलांचा वापर केला जात असे. जलसंचय, आर्तवदोष (स्त्रियांच्या मासिक पाळीतील अडचणी), जठरांत्रीय (पोट, आतडे  इत्यादींसंबंधी) दोष, गळवे आणि कर्करोग इ. अनेक विकारांवर सागरी शैवलांचा उपयोग करीत. चीनमध्ये चौदाव्या शतकात गलगंडावर शैवलांचा उपयोग केल्याचा उल्लेख आढळतो. आयोडीन असलेल्या शैवलांचा उपयोग  जपानच्या समुद्रकिनाऱ्यावरील लोक खाद्यांत करीत असल्याने त्यांना हा विकार होत नाही असा अनुभव आहे. कोर्सिकाच्या किनाऱ्यावरच्या ॲल्सिडियम हेल्मिंथोकोर्‌थॉन या शैवलात कृमिनाशक गुण आढळला आहे. चीन व जपान येथे याचकरिता डायजेनिया सिंप्लेक्स हे शैवल वापरतात. उल्वाफ्यूकस या जातींचा उपयोग पोटाच्या तकारीवर व भाजण्याच्या दुखापतीवर होतो. मूत्रपिंड व मूत्राशय यांच्या विकारांवर ॲसिटॅब्यूलॅरिया मेजर हे गुणकारी असते. काँड्रस क्रिस्पस (आयरिश  मॉस) आणि जायगरटिना, स्टेल्लटा यांचा उपयोग गेट बिटनमधील  समुद्रकाठचे लोक छाती व जठर यांच्या विकारांवर करतात. वनस्पती-प्लवक व मोठी शैवले यांच्यापासून मिळालेल्या अनेक पदार्थांचा वापर प्रतिजीवी क्रियाशीलतेकरिता होऊ शकतो, असे आढळून आले आहे. समुद्री शैवले औषधांपेक्षा इतर भिन्न उदयोगांत अधिकाधिक उपयोगात येत आहेत. लॅमिनॅरिन आणि मॅनिटॉल हे काही शैवलांपासून (पिंगल व  लाल शैवलांपासून) काढलेले अर्क औषधनिर्मितीत वापरतात अवटू  गंथी व गलगंड यांच्या विकारांवर तो अर्क वापरतात. मॅनिटॉलाचा उपयोग रेझीन (राळ), कागद, रंग, रोगणे व आगपेट्या इत्यादींकरिता केला जातो. ॲल्गिनिक अम्ल रक्त साकळण्याकरिता उपयुक्त असून त्या अम्लाची लवणे ॲल्गिनेटे काही औषधे, सौंदर्यप्रसाधने, रंगोद्योग व वस्त्रोद्योग इत्यादींत वापरली जातात. ॲल्गिन, आगर व कॅरागीनिन (काँड्रस क्रिस्पसजायगरटिना, स्टेल्लाटा ) हे समुद्री शैवलांपासून काढलेल्या अर्कातून मिळविलेले व्यापारी उपयोगाचे पदार्थ आहेत. मूळची कॅरागीनिनाची शैवले सुकवून नंतर वापरतात त्यांचे लज्जतदार सार करतात शिवाय त्यांचा अर्क आइस्क्रीम व चॉकोलेट दूध यांकरिताही वापरतात त्यातील जिलेटीन हा श्लेष्मल पदार्थ विविध प्रकारे वापरात आहे. पूर्व आशियात पॉर्फिरा हे लाल शैवल पिकवून खातात.

डायाटमी [करंडक वनस्पती → डायाटम ] नावाच्या अतिसूक्ष्म  शैवलांच्या मृत देहांच्या सिलिकायुक्त कोशिकावरणांना ⇨  डायाटमी माती म्हणतात. झिलईकरिता तसेच दंतधावनाकरिता पूड व लेप, उष्णतारोधक आच्छादन आणि स्फोटक पदार्थ इत्यादींत तिचा उपयोग करतात.

शहरातील वाहितमलाची (सांडपाण्याची) विल्हेवाट लावण्याच्या आधुनिक शास्त्रीय पद्धतीत क्लोरेला, क्लॅमिडोमोनस सेनेडेस्मस शैवलांची व सूक्ष्मजंतूंची मुद्दाम वाढ करतात, कारण या दोन्ही सजीवांच्या परस्परपूरक क्रियाशीलतेमुळे योग्य असे अपघटन जलद होऊन पाण्यातील वाहितमलाचे दोष कमी होत जातात ते पाणी स्वच्छ झाल्यानंतर शेतीकरिता उपयुक्त होते अधिक स्वच्छता केल्यानंतर पिण्यासही वापरता येते. त्यातील शैवलांचा उपयोग खताकरिता होतो.


शैवल संवर्धन  : आज  अनेक  वर्षे  जीवशास्त्रज्ञ  प्रयोगशाळेत  शैवलांचे कृत्रिम संवर्धन करीत आहेत. विशिष्ट संवर्धक पदार्थ (उदा., खनिज लवणे व विकासाला पोषक अशी इतर द्रव्ये) व  नियंत्रित कृत्रिम प्रकाश यांच्या सान्निध्यात शैवलांच्या विकासाचे निरीक्षण करण्यात येते. त्यातून विशिष्ट परिस्थितीतच शैवलांचा कमाल विकास होतो असे दिसून आले आहे. ह्या प्रयोगात दर एकरी शैवलाचे सुके वजन त्यात काढत असलेल्या धान्याच्या पिकापेक्षा अनेक पटींनी अधिक असल्याचे आढळूनआले आहे. काही शैवलांपासून (विशेषत: एककोशिक साधे हिरवे शैवल-क्लोरेला ) मनुष्याच्या अन्नाच्या दृष्टीने अधिक मौल्यवान असे ५० टक्के प्रथिन असलेला पदार्थ मिळू शकेल, असे आढळले आहे. अवकाशयानातील प्रवाशांकरिता ऑक्सिजनाचे व अन्नाचे सतत उत्पादन चालू  ठेवण्यास क्लोरेलां चा उपयोग होण्याची शक्यता दिसून आली आहे.  पाणबुड्यांत त्याचा उपयोग करून त्या अधिक काळ पाण्याखाली राहू  शकतात, हेही सिद्घ झाले आहे. कृत्रिम रीत्या पिकविलेली शैवले म्हणजे पुरेसे अन्न देणारे एक साधन म्हणून वरदान ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातो. तथापि, आर्थिक व व्यावहारिक दृष्ट्या हे शक्य होण्यास अनेक अडचणी आहेत. त्या दूर झाल्याशिवाय शैवलांचा प्रत्यक्ष उपयोग होण्यास वाट पहावी लागेल. काही शैवलांचा उपयोग प्रतिजैव औषधनिर्मितीकरिता होतो. त्यासंबंधी संशोधन चालू आहे. ⇨ प्रकाशसंश्लेषणा सारख्या महत्त्वाच्या विषयांत चालू असलेल्या प्रयोगशाळेतील संशोधनात शैवलांचा बराच वापर करतात कारण ती हाताळण्यास सोपी व उपलब्धतेच्या दृष्टीने सोयीची असतात. शिवाय त्यांतील हरितद्रव्ये इतर उच्च दर्जाच्या वनस्पतींतील हरितद्रव्यांसारखीच असतात.

टेक्सस (अमेरिका) येथील माइक लीस्ले ह्या शास्त्रज्ञांनी स्पायरूलिना प्लॅटेन्सिस हे निळे-हिरवे शैवल सुयोग्य परिस्थितीत दर २४ तासांत  आपल्या वजनाच्या व व्यापाच्या बारा पटीने वाढू शकते असे सिद्घ केले. उष्णकटिबंधातील परिस्थिती ह्याच्या लागवडीस अनुकूल असून त्यापासून मिळणारे प्रथिन भरपूर व कमी खर्चात उपलब्ध होण्यासारखे आहे. समशीतोष्ण प्रदेशांतही यांची लागवड इतर प्रकारे केलेल्या प्रथिननिर्मितीपेक्षा बरीच कमी खर्चाची होईल. हे प्रथिन काहीसे खारट असून त्याला मांसासारखा स्वाद असतो. तथापि, संस्करण प्रक्रियेने त्यापासून रूचिहीन, पांढरी पिठासारखी पूड बनविता येते. मध्य आफ्रिकेतील चाड नावाच्या तळ्यात हे शैवल वाढते व त्यापासून बनविलेले पीठ तेथील बाजारात मिळते. स्थानिक लोक त्याची कढी करतात अथवा मक्यावर शिंपडून खातात.  प्राचीन ⇨ ॲझटेक  लोक हे खात असत आणि आजही मेक्सिकोतील  लोक याची लागवड करतात. लीस्ले यांच्या संशोधनानुसार ह्या शैवलाची कृत्रिम लागवड केल्यास सु. ४,१०० हेक्टर क्षेत्रातून दरवर्षी एक लक्ष टन प्रथिन मिळू शकेल व ते २० लक्ष लोकांना पुरेल त्याच क्षेत्रातील सोयाबीन लागवडीपासून फक्त १,६०० टन प्रथिन दरवर्षी मिळेल. पूर्ण विकसित देशांत त्यापासून पशुखाद्य बनविता येईल परंतु उपासमार होणाऱ्या देशांत माणसे अन्नाकरिता त्याचा वापर करतील. लीस्ले ह्या शैवलाची मोठया प्रमाणावर लागवड करून प्रथिननिर्मिती करण्याची योजना करीत  आहेत. ती पूर्ण झाल्यानंतरच हे ‘ प्रथिनस्वप्न ’ खरे ठरेल !

वैदिक वाङ्‌मयात ‘ अवका ’ ह्या नावाने अथर्वसंहिते त व तैतिरीय संहिते त आलेला उल्लेख शैवालवाचक असून गंधर्व ते खातात असे म्हटले आहे. ‘ शैवाल ’ हे वेदोत्तर नाव असून ‘ शीपाल ’ (शेवाळे) ह्या नावाने ऋक्‌संहितेतील निर्देश त्यासंबंधीच असावा असे मत व्यक्त केलेले  आढळते. कौटिलीय अर्थशास्त्रा त अद्भुत उत्पादनाच्या प्रयोगाकरिता दिलेल्या वनस्पतींत शैवालाचा उल्लेख आहे. सुश्रूत चिकित्सेत पोटात घेण्यास व भाजल्यावर बाह्यलेपनास शैवालाचा (शेवाळ्याचा) उपयोग करण्यास सांगितले आहे. संस्कृत काव्यात ‘सरसिजमनुविद्घं शैवलेनापि  रम्यम् ।’ असा उल्लेख आहे यावरून शैवल, शैवाल, शीपाल व शेवाळे  या संज्ञा समानार्थी वापरल्या जात असे दिसते.

वर्गीकरण : स्वीडिश जीवशास्त्रज्ञ ⇨ कार्ल लिनीअस यांनी  १७५४ च्या सुमारास शैवले हा गट इतरांपासून वेगळा करून त्याला गणाचा दर्जा दिला. त्यांनी ह्या गटात काही दगडफुले व शेवाळींचाही अंतर्भाव केला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस शैवले हा एक वर्ग  मानला जाऊन त्यात निळी-हिरवी शैवले (सायनोफायसी), हरित शैवले  (क्लोरोफायसी), पिंगल शैवले (फीओफायसी), लाल शैवले (ऱ्होडोफायसी) व करंडक शैवले (डायाटमी) अशा पाच कुलांचा आधुनिक वर्गीकरणानुसार  शैवलांचे  विभाग  व  त्यांची  विशिष्ट  लक्षणे  दर्शविणारी  सारणी

विभाग सामान्य नाव रंगद्रव्ये संचित

अन्न

कोशिकावरण प्रकेसलांची संख्या व उगमस्थान अधिवास उदाहरणे
क्लोरोफायटा हिरवी – शैवले क्लोरोफिल ए व बी स्टार्च सेल्युलोज २ -८, सारखी व टोकास गो. म. खा. क्लॅमिडोमोनस, क्लोरेला, युलोथ्रिक्स, स्पायरोगायरा, व्हॉल्व्हॉक्स, उल्वा.
कॅरोफायटा इं. स्टोनर्वट्स

(कांड-शरीरिका)

क्लोरोफिल ए व बी स्टार्च सेल्युलोज व पेक्टिन २, सारखी  व टोकास गो. म. नायटेला, कारा.
यूग्लिनोफायटा यूग्लिनॉइड्स क्लोरोफिल ए व  बी पॅरॅमीलम नाही १ - ३, टोकास किंवा टोकामागे गो. म. खा यूग्लीना 
कायसोफायटा

(डायाटमीसह)

सोनेरी शैवले

(करंडक शैवलासह)

क्लोरोफिल ए,

काहींत सी, काहींत ई.

तेल,

ल्युको-सिन

पेक्टिन व सिलिकॉन  डाय-ऑक्साइड १ -२, सारखी किंवा भिन्न व टोकांस गो. म. खा. कि सॅमीबा, पिन्युलॅरिया,  नॅविक्युला. 
फीओफायटा पिंगल शैवले क्लोरोफिल ए व  सी. मॅनिटॉल,  लॅमिनॅरिन सेल्युलोज व ॲल्गिन २, भिन्न व बाजूस गो.

(क्वचित) म. खा.

सरगॅसम, फ्यूकस, एक्टोकार्पस,  डिक्टिओटा,  लॅमिनेरिया, पॅदीना. 
पायरोफायटा अंशतः डिनो-फ्लॅजेलेट्स क्लोरोफिल ए व  सी. स्टार्च सेल्युलोज अगर नाही २,१ सरपटणारे व १ वेढणारे गो. म. खा. जम्नोडिनियम,  पेरिडिनियम,  सेरॅशियम. 
ऱ्होडोफायटा लाल शैवले क्लोरोफिल ए व डी, फायको

सायनीन,

फायकोएरिथ्रीन

फ्लोरिडीयन, स्टार्च सेल्युलोज नाही गो. (काहीसे)  म. खा. (बहुतेक) पॉर्फिरा,  पॉलीसाय फोनिया,  जेलिडियम,

काँड्रस, कॉरॅलिना, गिगर्टिना. 

सायनोफायटा निळी-हिरवी शैवले क्लोरोफिल ए,

फायकोसायनीन,

फायकोएरिथ्रीन

सायनो-फायसीन, स्टार्च सेल्युलोज वपेक्टिन नाही गो. म. खा. नॉस्टॉक, ॲनाबीना, ग्लीओ कॅप्सा,  मायकोसिस्टिस.  
[ गो. = गोडे पाणी. म. = मचूळ पाणी, खा. = खारे पाणी.]

समावेश करण्यात आला. त्यानंतर शेवाळी विभागातील व त्यापेक्षा उच्चतर वनस्पतीमधील शारीरिक प्रभेदन (यामध्ये अनेककोशिक पुनरूत्पादक  अंगे व बीजुकाशये यांचा समावेश होतो) ज्यामध्ये आढळत नाही अशा साध्या कायम स्वयंजीवी (व त्यापासून निघालेल्या परोपजीवी) वनस्पतीच फक्त शैवले ह्या विभागात समाविष्ट कराव्यात असे लंडन विदयापीठातील शैवलविज्ञ एफ्. ई. फिट्श यांनी सुचविले. तसेच शैवलांतील विविध रंगद्रव्यांनुसार त्यांचे पुढीलप्रमाणे अकरा वर्ग केले : (१) क्लोरोफायसी, (२) झँथोफायसी, (३) क्रायसोफायसी, (४) बॅसिलॅरिओफायसी, (५) किप्टोफायसी, (६) क्लोरोमोनॅदिनी, (७) यूग्लिनिनी, (८) फीओफायसी, (९) ऱ्होडोफायसी, (१०) मिक्सोफायसी, (११) डिनोफायसी. ह्या वर्गीकरणाला कोशिकेतील संचित अन्नपदार्थ व प्रजोत्पादन यासंबंधीच्या संशोधनाने आधार मिळाल्याने ती मान्य झालेली आहे. ए. पॅस्कर व जी. एम्. स्मिथ इत्यादींनी थोडेफार फरक करून त्यास मान्यता दिली. पॅस्कर यांनी त्यांतील काही वर्गांना विभागाचा दर्जा देऊन झँथोफायसी, कायसोफायसी व बॅसिलॅरिओफायसी यांचा एकच विभाग (क्रायसोफायटा) केला. ओ. टिप्पो (१९४२) व एच्. सी. बोल्ड (१९५६) यांच्या मताप्रमाणे ‘ शैवले ’ ही संज्ञा वर्गीकरणाच्या योजनेत वापरू नये  कारण सर्व शैवलांचा उगम एकाच पूर्वजापासून झालेला नाही. शैवले (ॲल्गी) म्हणून सामान्यपणे ओळखल्या जाणाऱ्या सर्व वनस्पतींचे एच्. सी. बोल्ड यांनी आठ विभाग केले आहेत (विभागदर्शक सारणी  पहा). तसे करताना शैवलातील रंगद्रव्यांचा तपशील, संचित अन्न, कोशिकावरणाचा प्रकार, प्रकेसलांची संख्या व प्रकार इ. लक्षणांना  प्राधान्य दिलेले आहे. तसेच शैवलाची उत्क्रांती त्यांच्या अनेक समान पूर्वजांपासून पण स्वतंत्रपणे झाली असावी, असे त्यांचे मत आहे.


शैवलातील पूर्वजांपासून शेवाळी व वाहिनीवंत वनस्पती उत्क्रांत झाल्या असाव्यात कारण हरितद्रव्य आणि स्टार्च हे घटक सुसंगतपणे त्या सर्वांत आढळतात. सारांश, शैवलांच्या नैसर्गिक वर्गीकरणाबद्दल  एकवाक्यता नाही.

सजीवांच्या वर्गीकरणात प्रमाणभूत तत्त्वांमध्ये बदल होत गेला  कारण जीवशास्त्रातील प्रगतीमुळे नवे विचारप्रवाह येत राहिले. त्यानुसार आता सर्व सजीवांचा अंतर्भाव तीन प्रमुख गटांत करतात : (१) प्रोकॅरिओटा, (२) मेसोकॅरिओटा आणि (३) यूकॅरिओटा. प्ल्यूरोन्यूमोनियाबद्दल जबाबदार असलेल्या सूक्ष्मजीवासारखे सजीव (सु. ०.१ मायकॉन व्यास असलेले), सूक्ष्मजंतू (बॅक्टिरिया) आणि निळी-हिरवी शैवले यांचा अंतर्भाव प्रोकॅरिओटात करतात. डिनोफायसी या शैवलांपैकी सजीवात पहिल्या आणि तिसऱ्या गटातील काही लक्षणांचे मिश्रण आढळते, म्हणून त्यांना मेसोकॅरिओटात घातले आहे. याखेरीज सर्व सजीवांना (प्राणी व वनस्पती यांना) यूकॅरिओटात समाविष्ट केलेले आढळते.

शैवलांच्या प्राथमिक वर्गीकरणात प्रमाणभूत मानलेली प्रमुख लक्षणे विभागदर्शक सारणीमध्ये दर्शविली आहेत. तथापि स्थूलमानाने त्यांचे पुढील चार प्रमुख विभाग मानतात : (१) निळी-हिरवी शैवले (सायनोफायटा), (२) हरित शैवले (क्लोरोफायटा), (३) पिंगल शैवले (फीओफायटा) व (४) लाल शैवले (ऱ्होडोफायटा) बाकीचे गट लहान असून त्यांतील अनेक शैवले उपयुक्त व वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाची आहेत. या गटातील फरक ढोबळपणे पुढे दिलेले आहेत.

सायनोफायटा : नावाप्रमाणे याचा रंग निळा-हिरवा असला, तरी त्याला काही अपवाद असतात. ती गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात व जमिनीवर किंवा जमिनीत आढळतात. शरीर एककोशिक (ग्लीओकॅप्सा, क्रूकॉकस, मायक्रोसिस्टिस इ.) आणि सामूहिक व तंतुयुक्त (ॲनाबीना, नॉस्टॉक, ॲसिलॅरिया इ.) असते. कोशिकेत प्रारंभिक प्रकल व रंगद्रव्यमिश्रित  परिकल असून बिंदुकांचा अभाव असतो. लैंगिक प्रजोत्पादन नसते. प्रजाती सु. १५० व जाती सु. १,५००.

क्लोरोफायटा : उच्च वनस्पतीशी तुलना करता येण्यासारखी काही  लक्षणे यांमध्ये आढळतात (विभागदर्शक सारणी पहा). निळ्या-हिरव्या शैवलाप्रमाणे प्रसार सर्वत्र असला तरी गोड्या पाण्यात तो अधिक असून समुद्रातील जाती अधिक जटिल असतात (उदा., कॉलेर्पा, एंटेरोमॉर्फा, उल्वा ). शारीरिक संरचनेचे भिन्न प्रकार आढळतात. एककोशिक (क्लोरेला, क्लॅमिडोमोनस, प्रोटोकॉकस ), सामूहिक (व्हॉल्व्हॉक्स, पेडिॲस्ट्रम, पँडोरीना ) व तंतुयुक्त (युलोथ्रिक्स, स्पायरोगायरा, इडोगोनियम, क्लॅडोफोरा ), मृदूतियुक्त (उल्वा, एंटेरोमॉर्फा), लैंगिक प्रजोत्पादनाचे समयुती (क्लॅमिडोमोनस, उल्वा, युलोथिक्स), असमयुती (क्लॅमिडोमोनस, स्पायरोगायरा, उल्वा) व अंदुकयुती (इडोगोनियम, व्हॉल्व्हॉक्स) हे  प्रकार आढळतात. प्रजाती सु. ४२५ व जाती सु. ६,५००.

फीओफायटा : ही सर्व समुद्रात आढळतात. हा एककोशिक असून त्यात सामूहिक शारीरिक रचनेचा अभाव असतो. सर्वांत साधे शैवल, शाखायुक्त तंतूंचे (एक्टोकार्पस) असते. कित्येक शैवले मोठी व जटिल असून काहींची रचना इतर कोणत्याही शैवलांपेक्षा (उदा., डिक्टिओटा,  फ्यूकस, लॅमिनेरिया) किंवा काही स्थलवासी वनस्पतींपेक्षा अधिक प्रभेदित व गुंतागुंतीची असते (उदा., पॉस्टेल्शिया, नेरिओसिस्टिस, मॅक्रोसिस्टिस). प्रजोत्पादनाचे सर्व प्रकार असतात व काहींत पिढ्यांचे  एकांतरण असते. प्रजाती सु. १९५ व जाती सु. १,०००.

ऱ्होडोफायटा : पिंगल शैवलाप्रमाणे ही शैवलेही मोठी व समुद्रवासी असून फारच थोडी गोड्या पाण्यात आढळतात (उदा., बॅट्रॅकोस्पर्मम) यातील काही जीवोपजीवी, काही अपिवनस्पती व काही अंतर्वनस्पती आहेत. फक्त दोन एककोशिक प्रजाती वगळल्यास इतर सर्व जाती बहुकोशिक व विविध शारीरिक संरचनेच्या शाखायुक्त अथवा शाखाविहीन तंतूंची किंवा सपाट पट्टीप्रमाणे असतात. शाकीय प्रजोत्पादन क्वचित प्रजोत्पादक कोशिका अचर आणि अलैंगिक प्रजोत्पादन विविध प्रकारच्या  बीजुकांकडून  होते.  लैंगिक  पद्धतीत  अंदुकयुती  आढळते.  स्त्री-जननेंद्रियांच्या बाबतीत असलेल्या साम्यावरून काही उच्च्तर कवके लाल शैवलांपासून विकास पावली असावीत असे काहीजण मानतात. बीजुकधारी व गंतुकधारी स्वतंत्र असून जीवनचकात कधी तीन अवस्थांचा  अनुकम आढळतो (उदा., जेलीडियम, पॉलीसायफोनिया). बीजुकधारी व गंतुकधारी यांची निर्मिती एकाआड एक होते. पिढ्यांचे एकांतरण बहुधा आढळते. प्रजाती सु. ४०० व जाती सु. २,५००.

यूग्लिनोफायटा : यांमध्ये एककोशिक, सकेसल शैवलांचा (उदा., यूग्लीना, फ्यूकस) अंतर्भाव होतो. कोशिकांच्या पृष्ठभागी संकोचनशील धागे, खाचा व रिक्तिका आणि आकारात बदल करण्याचे सामर्थ्य इ. प्राण्यांसारखी काही लक्षणे असतात. कोशिकेतील संचित अन्न, सेल्युलोजाचा अभाव व सर्वसाधारण संरचना इ. लक्षणांबाबत ही शैवले  इतरांपासून भिन्न असून सलिंग प्रजोत्पादनाचा त्यात पूर्ण अभाव असतो. प्रजाती सु. २५ व जाती सु. ४५०.

डायाटमी : ह्यांच्या कोशिकावरणात सिलिकॉन डाय-ऑक्साइड असून कोशिका दोन सुट्या पण परस्परांवर डबीप्रमाणे बसणाऱ्या असतात. शरीर एककोशिक तथापि यात सामूहिक प्रकारही आढळतात. मृत कोशिकांचे थरावर थर बसून उपयुक्त डायाटमी (करंडकीय) मृदा बनते. केसले नसतानाही काही जाती चर असतात. पिन्युलॅरिया, नॅव्हिक्यूला ही सामान्य उदाहरणे आहेत [→ डायाटम]. ह्यांचा अंतर्भाव विभागदर्शक सारणीत दर्शविल्याप्रमाणे कायसोफायटात (सोनेरी शैवलात) केला जातो. प्रजाती  सु. १७० व जाती सु. ५,५००.

कॅरोफायटा : (कांड-शरीरिका विभाग). या काहीशा उच्च प्रकारच्या शैवलांचा अंतर्भाव पूर्वीपासून हरित-शैवलात केला जात असे. त्यांचा आता स्वतंत्र विभाग करण्याची कारणे अशी : शरीर अनेककोशिक, उभे व शाखायुक्त असून त्यावरील पेरी व कांडी स्पष्ट असतात. पेऱ्यापासून अनेक मर्यादित व थोड्या अमर्यादित वाढीच्या शाखा येतात. तळाशी साधी (मूलकल्प) मुळासारखी इंद्रिये असतात. बीजुके नसतात. काही जातींत कोशिकावरण चुनामिश्रित असते. लैंगिक प्रजोत्पादनाची मूलत: एककोशिक इंद्रिये वंध्य कोशिकांच्या थराने वेष्टिलेली असतात. शाकीय  प्रजोत्पादन कंदिका व मुकुलिकाव्दारे होते. कारानायटेला सामान्यत: पाण्याच्या डबक्यात सापडतात. एकूण प्रजाती ६ व जाती सु. २५०.

पुरातनत्व : शैवलांच्या काही जाती फार प्राचीन काळापासून  पृथ्वीवर असाव्यात. त्यांच्या मऊ शरीरांमुळे त्यांचे जीवाश्म बनणे कठीण असल्यामुळे ते क्वचितच आढळतात. सुमारे एक अब्ज वर्षांपूर्वीच्या  (कँब्रियनपूर्व) खडकात निळ्या-हिरव्या शैवलासारखे काही (विशेषत:  चुन्याचा स्राव करणाऱ्यांचे) जीवाश्म आढळले आहेत. आरंभीच्या सागरी प्राण्यांना अन्नपुरवठा करणाऱ्या शैवलांचे अस्तित्व गृहीत धरणे तर्कशुद्घ ठरते [→ पुरावनस्पतिविज्ञान ]. अशा प्रारंभिक शैवल पूर्वजांपासून वनस्पतिसृष्टीचा उगम व विकास झाला आहे याची पूर्ण कल्पना येण्यास शैवलांचा अभ्यास आवश्यक ठरतो [→ क्रमविकास ]. शैवलांच्या विविध गटांचा विकास प्रारंभिक सजीवांपासून स्वतंत्रपणे झाला असावा. हे प्रारंभिक सजीव अतिसूक्ष्म, प्राणी वा वनस्पती असे प्रभेदन न झालेले फ्लॅजेलेटा [→ प्रोटोझोआ ] गटातील असणे शक्य आहे. करंडकीय मृदेचा उगम सागरात किंवा गोड्या पाण्यात असतो. कधी काळी विपुल असलेली काही शैवले नंतर आढळत नाहीत. उच्च वनस्पतींच्या भूशास्त्रीय  इतिहासात जाती व विपुलता यात वेळोवेळी फरक पडलेले आहेत, तसे  फरक शैवलांच्या बाबतीत जवळजवळ नाहीतच. त्यांच्यापैकी काहींपासून  (उदा., हरित शैवलांपासून पहिल्या स्थलवासी शेवाळी वगैरे) वनस्पती अवतरल्या असल्या तरी त्यांचे स्वतःचे पाण्यातील जीवन लाखो वर्षांत बदलले नाही. काही सामान्य शैवल-जीवाश्मांची वर्णने पुढे दिली आहेत.


गिर्वानेला : पुराजीव महाकल्पातील (सु. ६० ते २५ कोटी वर्षां-  पूर्वीच्या) चुनखडकात आढळणाऱ्या व गंथिल (गाठदार), संधित राशी बनविणाऱ्या चूर्णीय लाल शैवलात चार प्रजातींचा संबंध येतो त्यांपैकी ही एक असून गॅर्वूडिया, मिचेल्डीनियाऑर्टोनेला या इतर तीन आहेत. गिर्वानेलां च्या (कँब्रियन ते क्रिटेशस सु. ६० ते ९ कोटी वर्षांपूर्वी) गुलिकासारख्या जीवाश्मात सूक्ष्म, शाखाहीन व सरासरी ८- २० मायको-मिमी. व्यासाच्या नलिका अनियमितपणे एकत्र पिळवटलेल्या असतात. उत्तर कँब्रियन काळात (सु. ५१ कोटी वर्षांपूर्वी) गिर्वानेला चुनखडक जवळजवळ जगभर पसरलेले होते. स्कॉटलंडच्या गिर्वान जिल्ह्यातील ऑर्डोव्हिसियन (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षांपूर्वी) चुनखडकात हे शैवल (काहींच्या मते निळे-हिरवे) सापडल्याने त्यावरून गिर्वानेला हे नाव पडले आहे. ‘ कुंचनाल ’ हे संस्कृत नाव या जीवाश्माला त्याच्या संरचनेवरून सुचविलेले आढळते. गॅर्वूडिया चे जीवाश्म फक्त कार्‌बॉनिफेरस  कल्पात (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वी) आढळतात. त्यामध्ये तशाच पण मोठया शाखायुक्त आणि सु. ०.०५-०.०७ मिमी. व्यासाच्या नलिका असून त्यांची मांडणी अरीय (त्रिज्येच्या दिशांप्रमाणे) असते. मिचेल्डीनिया त (कार्‌बॉनिफेरस ते ट्रायासिक सु. ३५ ते २० कोटी वर्षांपूर्वी) नलिकांचा व्यास लहान (०.०२ मिमी.) असतो. ऑर्टोनेला त ०.०१-०.०३ मिमी. व्यासाच्या नलिका परस्परांशी निकटवर्ती असून ३०-४५° च्या कोनात विभागलेल्या असतात. फक्त कार्बॉनिफेरस कल्पात हे जीवाश्म आढळतात.

पॅचिथीका : सिल्युरियन कल्पाचा वरचा व डेव्होनियन कल्पाचा खालचा थर यांमध्ये (सु. ४२ ते ४० कोटी वर्षांपूर्वी) आढळणाऱ्या  निळ्या-हिरव्या शैवलांच्या गोळीसारख्या जीवाश्माला हे नाव दिले आहे. त्याचा व्यास दोन-तीन मिमी. असून मध्यभाग लहान नलिकांच्या गुंडाळीने बनलेला असतो व त्याबाहेरच्या थरात अनेक नलिकांची अरीय मांडणी असते. ह्या बाह्यनलिकांमध्ये सूक्ष्म कोशिकायुक्त तंतू असून त्यांच्या  बाहेरच्या टोकांभोवती बहुधा श्लेष्मल आवरण असावे. हे शैवल अचूर्णीय असावे त्यात वाहक घटक आढळले नाहीत. नेदर्लंड्सच्या आग्नेय  कोपऱ्यातील लिंबर्गमधील कोळशाच्या क्षेत्रात आढळलेल्या न्यूरॉप्टेरिस श्लेहानी च्या [→ बीजी नेचे ] पानांना चिकटलेल्या बीजासारख्या अवयवांचे जीवाश्म आढळलेले आहेत ह्यासारख्या बीजींना पॅचिथीका वेरा हे नाव आहे.

पार्का : हे अचूर्णीय शैवलाचे जीवाश्म ग्रेट ब्रिटनच्या डेव्होनियन कल्पाच्या खालच्या थरातील (सु. ४० कोटी वर्षांपूर्वी) आहे. हे सपाट चकतीसारखे साधारणत: एक सेंमी. व्यासाचे व कायकाभ (खोड, पान,  मूळ इ. प्रभेदन न दर्शविणारे) असून त्यावर षट्‌कोनी कोशिकांच्या थरांचे आवरण होते. बहुधा त्याला खाली दांड्यासारखा आधार असावा. कायकाभ शरीराच्या पोकळ्यांत असंख्य बीजुके निर्माण होत असून त्यावर उपत्वचा आढळते. त्यावरून वायवी परिस्थितीस अनुरूप अशा स्थित्यंतराचा हा आरंभ होता असे मानले जाते. इतर बीजुकांवर सामान्यत: आढळणारा त्रिअरीय (तीन त्रिज्यांप्रमाणे रेषांचा) कंगोरा ह्या बीजुकांवर आढळत नाही. तसेच या जीवाश्मात वाहक घटक आढळले नाहीत.

लिथोथॅम्निऑन : ह्या चूर्णीय लाल शैवलाचे जीवाश्म ट्रायासिक कल्पापासून (सु. २० ते १८.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळापासून) अलीकडे पृथ्वीच्या कवचात सर्वत्र आढळतात. ऑस्टि्यातील व्हिएन्ना खोऱ्यातील खडक निर्मितीत ह्यांचा वाटा आहे. पाण्याखाली असलेल्या सागरी खडकांवर या शैवलांपासून कठीण थर बनतो. त्याच्या उघडया भागावर बारीक गाठी असतात किंवा तो खरबरीत असतो. कायकाभ शरीराच्या छेदात दोन कोशिका थर असतात. वरच्या थरातील कोशिका आडव्या व उभ्या रांगांत असून खालच्या थरातील कोशिका बाहेरच्या बाजूस त्रिज्येप्रमाणे पसरलेल्या असतात. लिथोथॅम्निऑनलिथोफिलम या चूर्णीय शैवलांपासून उष्णकटिबंधातील सागरात शेकडो मी. उंचीचे चूर्णीय खडक (भिंती) बनतात.

सोलेनोपोरा : हे लाल शैवलाचे एक चूर्णीय जीवाश्म असून सु. ४९ ते १५.५ कोटी वर्षांपूर्वी बनलेल्या खडकांत आढळतात. हे शैवल व तशीच इतर शैवले पुराजीव महाकल्पापासून खडकनिर्मितीत भर टाकीत आली आहेत. सोलेनोपोरा पासून बिस्किटासारखे वा डोक्यासारखे चुनखडींचे समूह बनतात व त्यांचा पृष्ठभाग खंडयुक्त असतो. त्यांच्या उभ्या छेदांत दिसून येणाऱ्या फिकट अरीय रेषा शैवलतंतू आहेत, शिवाय अनेक समकेंद्र तरंगित पट्टही असतात. ते बहुधा ऋत्चिक अभिवृद्घीचे (बाहेरून ऋतुमानानुसार जमणाऱ्या पदार्थांमुळे होणाऱ्या वाढीचे) असावेत. ब्रिटिश पुराजीव महाकल्पातील चुनखडकात या जीवाश्मांचा मोठा भरणा आहे. ह्या जीवाश्माला ‘नालरंध्र ’ असे संस्कृत नाव सुचविलेले आढळते.

ओव्ह्यूलाइट्स : हे नाव प्राणिशास्त्रज्ञ ⇨झां बातीस्त लामार्क यांनी पॅरिसमधील तृतीय कल्पाच्या इओसीन काळातील (सु. ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकातील काही लहान अंडाकृती शैवल जीवाश्मांना दिले होते. १८७८ मध्ये म्यूनियम चाल्मस यांनी हे हरित-शैवल चूर्णीय व  शैवलांपैकी सायफोनेलीझ गणातील (हल्ली काहींच्या मते डॅसिक्लॅडिएलीझ ह्या गणातील) व डॅसिक्लॅडिएसी कुलातील असल्याचे दाखविले. हे जीवाश्म बियांप्रमाणे, २-६ मिमी. लांब व पोकळ असून त्यावर सूक्ष्म व गोल छिद्रे असतात व ती आतील पोकळीची किंवा नळीची बाहेर फुटलेली तोंडे असतात. कधीकधी दोन-तीन जीवाश्मे टोकांशी परपस्परांना जोडल्याने माळेप्रमाणे दिसतात. त्यामुळे जीवाश्मांच्या टोकांची मोठी छिद्रे चूर्णीय भाग अचूर्णीय भागापासून तुटल्यामुळे पडलेली असावीत साहजिकच जेथे अशी दोन मोठी छिद्रे आढळतात तेथे दोन फांद्या फुटलेल्या असाव्यात असे मानतात.

हे शैवल पुन:स्थापित जीवाश्मांवरून ऑस्ट्रेलियात सापडणाऱ्या पेनिसिलस सारखे दिसते. ह्या प्रकारची शैवले इंग्लंड, फ्रान्स, इटली व बेल्जियम ह्या देशांतील मध्यपूर्व इओसीन काळातील समुद्रात चांगलीच वाढत असल्याचे दिसते.

गायरोपोरेला : हे नाव गुंबेल यांनी डॅसिक्लॅडिएसी ह्या हिरव्या शैवलांच्या कुलात अंतर्भूत होणाऱ्या काही शैवल-जीवाश्मांना दिले. ही जीवाश्मे पर्मियन ते ट्रायासिक (सु. २७.५ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील चूर्णीय खडकांत सापडतात. अल्पाइन डोलोमाइट्स बनविण्यात त्यांचा व डिप्लोपोरेला या शैवलाचा मोठा वाटा आहे कारण ही दोन्ही शैवले चूर्णीय कोशिकावरणाची असतात. गायरोपोरेला ची जीवाश्मे एखादया नळीसारखी  असून नळीचे एक तोंड बंद व गोलाकार आणि दुसरे उघडलेले असते.  नळीच्या भिंतीत लहान नाल्यांचे फेर असून तिच्या पृष्ठभागावर नाल्यांना  छिद्रे नसतात. ट्रायासिक कल्पात हे शैवल समुद्रात वाढत होते.

डिप्लोपोरेला : ह्या शैवलाच्या जीवाश्माला १८६३ मध्ये हे नाव शॅफँटी यांनी दिले. गायरोपोरेलाच्याच कुलातील हे शैवल ट्रायासिक कल्पातील समुद्रातच वाढत होते त्याचे जीवाश्म सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या खडकांत आढळतात. प्रत्येक जीवाश्म सु. ४ मिमी. रूंद व सु. ६ सेंमी. लांब व पोकळ नळीसारखे असून चूर्णीय कोशिकावरणाने बनलेल्या  नळीच्या भिंतीत नाल्यांचे घेर पृष्ठभागावर उघडे असतात म्हणजे छिद्रे  बंद नसतात.

पहा : आगर एकांतरण, पिढ्यांचे कवक कायक वनस्पति क्रमविकास डायाटम पुरावनस्पतिविज्ञान प्रजोत्पादन प्लवक वनस्पति, अबीजी विभाग वनस्पतींचे वर्गीकरण शेवाळी शैवाक.

संदर्भ :  1. Bold, Harold C. Wynne, Michael J. Introduction to the Algae: Structure and Reproduction, 1985.

2. Doyle, W. T. Non-Vascular Plants: Form and Function, London, 1964.

3. Fritch, F. E. Structure and Reproduction of Algae, Vol. I-II (1935, 1945), Cambridge.

4. Lewin, Ralph A. (Ed.) The Genetics of Algae, 1976.

5. Morris, Ian, An Introduction to Algae, London, 1967.

6. Pickettheaps, Jermy D. Green Algae: Structure, Reproduction and Evolution in Selected Genera, 1975.

7. Round, F. F. The Ecology of Algae, 1981.

8. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. I, Tokyo, 1955.

9. Stewart, W. D. P. (Ed.) Algal Physiology and Biochemistry, 1974.

10. Stubblefield, C. J. An Introduction to Palaeontology, London, 1961.

११. South, Robin G. Whittick, Alan, Introduction to Phycology, 1987.

परांडेकर, शं. आ. चितळे, श्यामला


 फ्युकस सेरॅटस ॲसिटॅब्यूलॅरिया डायाटम शैवले : समुद्रातील पाण्यावर तरंगणारी (सुंदर रंग व आकारामुळे समुद्रातील रत्ने म्हणतात).