स्लॉथ : हा वृक्षवासी सस्तन प्राणी त्याच्या हळुवार हालचालींसाठी ओळखला जातो. दक्षिण व मध्य अमेरिकेतील उष्णकटिबंधीय जंगलांत याच्या पाच जाती आढळतात. याचे मुख्यत्वे दोन-पादांगुष्टे असलेला स्लॉथ व तीन-पादांगुष्टे असलेला स्लॉथ असे दोन प्रकार पडतात. दोन ( द्वि ) पादांगुष्टे असलेला स्लॉथ (कुल-मेगॅलोनिचिडी ) झाडावर चढू शकतो वा उभ्या स्थितीत राहू शकतो. मात्र, जवळपास सर्व वेळ ते वटवाघळाप्रमाणे उलटे आडवे लटकूनच घालवितात. त्यासाठी ते आपल्या मोठ्या आकड्यासारख्या अंत्यावयवांचा ( पादांगुष्टांचा ) किंवा अंकुशासारख्या लांब नखरांचा फांदी घट्ट पकडण्यासाठी वापर करतात. तीन-पादांगुष्टे असलेला स्लॉथ (कुल-ब्रॅडिपोडिडी ) देखील याच पद्धतींनी हालचाल करतो. मात्र, तो बर्‍याचदा लटकण्यापेक्षा फांद्यांच्या बेचक्यांमध्ये बसतो.

स्लॉथचे पाय लांब, शेपटी खुंट्यासारखी, डोके गोलाकार असून कान अतिशय लहान असतात. स्लॉथला दिसत असले, तरी त्याची दृष्टी व ऐकण्याची क्षमता तीव्र नसते. दिशानिश्चिती मुख्यतः स्पर्शाद्वारे केली जाते. अवयवांची रचना शरीराला आधार देण्याऐवजी त्याला लोंबते ठेवण्यासाठीच झालेली असते, त्यामुळे स्लॉथ जमिनीवर पूर्णतः असहाय्य असतात. जर काही धरून ठेवण्यासाठी मिळाले, तरी ते स्वतःला फक्त नखरांद्वारे थोडेफार ओढू शकतात. मात्र, स्लॉथ हे उत्कृष्ट पोहणारे असतात. ते सामान्यतः निशाचर आणि एकाकी असतात. जोडीदाराबाबत इतर समलिंगीसोबत ते आक्रमकपणे वागतात.

सुरुवातीला सर्व स्लॉथ एकाच कुलात ( ब्रॅडिपोडिडीमध्ये ) वर्गीकृत केलेले होते. मात्र द्वि-पादांगुष्टे असलेला स्लॉथ तीन-पादांगुष्टे असलेल्या स्लॉथपेक्षा खूपच वेगळा आढळल्याने त्यांना वेगळ्या कुलात ( मेगॅलोनिचिडीमध्ये ) समाविष्ट करण्यात आले.

द्वि-पादांगुष्टीय स्लॉथ : याला ‘ उनाउस ’ देखील म्हणतात. याच्या कोलोपस प्रजातीत दोन जाती समाविष्ट आहेत. लिनीअस द्वि-पादांगुष्टीय स्लॉथ ( को. डायडॅक्टिलस ) ही जाती दक्षिण अमेरिकेत आणि ॲमेझॉनच्या मध्य खोर्‍यात आढळते, तर हॉफमन्स द्वि-पादांगुष्टीय स्लॉथ ( को.हॉफमनी ) ही जाती मध्य व दक्षिण अमेरिकेत निकाराग्वा ते पेरू आणि पश्चिम ब्राझील येथे आढळते. गळ्यावरील फरच्या रंगावरून या दोहोंतील भेद ओळखला जातो. लिनीअस स्लॉथच्या गळ्यावर ठळक रंगाची, तर हॉफमन्स स्लॉथच्या गळ्यावर फिकट रंगाची फर असते.

द्वि-पादांगुष्टीय स्लॉथच्या शरीरावर लांब व करड्या तपकिरी रंगाचे केस असतात आतील केसांवर शैवाल वाढलेले असते व पोटावरील बाह्य केस विलग झालेले असून ते शरीराच्या बाजूंवर लोंबकळत असतात. याची डोक्यासहित शरीराची लांबी ६०—७० सेंमी. असून वजन सु. ८ किग्रॅ. असते, तर मानेत ६-७ कशेरुक ( मणके ) असतात. शक्यतो शांत व गरीब असलेल्या या प्राण्याला डिवचले असता तो गुरगुरतो व फिस्कारतो. तसेच प्रसंगी क्रूरपणे चावतो व तीक्ष्ण नखरांनी ओरबाडतो. याचा गर्भधारणेचा काळ १२ महिन्यांचा असतो. प्रसूतीच्या वेळी मादी लटकलेली असताना पिलाचे डोके प्रथम बाहेर येते, अर्भकाचे पुढील बाहू बाहेर येताच ते मादीच्या पोटावरील केसांना पकडून तिच्या छातीपर्यंत स्वतःला वर ओढून घेते. कधीकधी मादी अर्भकास ओढून वर येण्यास मदत करते. अर्भक साधारण पाच आठवडे मादीला चिकटून राहते. २-३ वर्षांत अर्भक प्रौढ होते. बंदीवासात ( पाळीव स्थितीत ) द्वि-पादांगुष्टीय स्लॉथ २० वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकतो. त्याचा जास्तीत जास्त जीवनकाळ ३० वर्षांपर्यंत मानतात.

त्रि-पादांगुष्टीय स्लॉथ : लॅटिन अमेरिकेत याला ‘ अइ ’ म्हणतात. कारण क्षुब्ध झाल्यावर तो उच्च रवात ओरडतो. याच्या सर्व जाती ब्रॅडिपस या प्रजातीच्या आहेत. त्यांच्या चेहर्‍यावर असणार्‍या केसांच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीमुळे त्याचा चेहरा हसरा दिसतो. तपकिरी गळ्याचा त्रि-पादांगुष्टीय स्लॉथ (ब्रॅ. व्हॅरिगॅटस) मध्य आणि उत्तर अमेरिकेत तसेच हाँडुरस ते उत्तर अर्जेंटिनापर्यंत आढळतात. फिकट (पांढुरका) गळ्याचा त्रि-पादांगुष्टीय स्लॉथ (ब्रॅ.ट्रायडॅक्टिलस) दक्षिण-उत्तर अमेरिकेत आढळतो. आयाळ असलेला स्लॉथ (ब्रॅ. टॉर्क्वाटस) दक्षिण-पूर्व ब्राझीलच्या अटलांटिक जंगलांपुरता मर्यादित आहे, तर पिग्मी (छोटा) स्लॉथ (ब्रॅ. पिग्मियस) इस्ला एस्क्यूडो डी व्हेरगुआस या लहान कॅरिबियन बेटावर व पनामाच्या उत्तर-पश्चिम किनार्‍यावर आढळतो.

त्रि-पादांगुष्टीय स्लॉथ (ब्रॅडिपस व्हॅरिगॅटस)अनेक सस्तन प्राण्यांमध्ये मानेतील क शे रु क सातच असतात मात्र, त्रि-पादांगुष्टीय स्लॉथमध्ये आठ किंवा नऊ असतात. त्यामुळे ते आपली मान २७० अंशांत फिरवू शकतात. दात साधे असून वरच्या जबड्यातील पुढील दातांची जोडी इतरांपेक्षा लहान असते. पटाशीचे दात व सुळे नसतात. प्रौढांचे वजन सु. ४ किग्रॅ. एवढे असते. डोक्यासहित शरीराची लांबी सरासरी ५८ सेंमी. असते. शेपूट लहान, गोलाकार व हलविता येणारे असते. अग्रपाद पश्चपादांपेक्षा जवळपास ५० टक्क्यांहून अधिक लांब असतात. चारही पायांना तीन लांब, वक्राकृती व तीक्ष्ण नखरे असतात. रंगसंगतीमुळे स्लॉथला ओळखणे कठीण असते. लांब केसांचे बाह्य आवरण फिकट तपकिरी ते करड्या रंगाचे, तर आतील फर काळ्या आणि पांढर्‍या रंगाची असते. बाह्यावरणावरील केसांमध्ये वाढणार्‍या शैवालामुळे या प्राण्यांवर ( विशेषतः पावसाळ्यात ) हिरव्या रंगाची छटा दिसते. आयाळ असलेल्या स्लॉथमधील नर व मादी दिसायला सारखे असतात. इतर जातींत नराच्या पाठीवर एक मोठा पट्टा असतो, त्यावर बाह्य आवरणाचे केस नसतात. त्यामुळे केसांची काळी पट्टी व आतील पांढरी फर दिसते, जी कधीकधी पिवळी ते नारंगी देखील आढळते.

त्रि-पादांगुष्टीय स्लॉथ मुख्यतः निशाचर असले, तरी ते दिवसा देखील सक्रिय राहू शकतात. आपल्या एकूण आयुष्याचा १०% एवढाच काळ ते हालचालींत घालवितात. ते फांद्यांच्या बेचक्यांमध्ये चारही पाय एकत्र गोळा करून डोके छातीवर टेकवून झोप घेतात. स्लॉथ स्पर्श व गंधाद्वारे अन्न ओळखतात. ते विविध वनस्पतींची कोवळी पाने व वेली खातात. ते नखरांनी फांदीला धरून आपल्या तोंडापर्यंत फांदी ताणतात. निशाचर असल्याने आणि अत्यंत धिम्या हालचालींमुळे स्लॉथकडे शिकारी प्राण्यांचे ( उदा., चित्ता, बहिरी ससाणा इत्यादींचे ) लक्ष वेधले जात नाही. सामान्यतः त्रि-पादांगुष्टीय स्लॉथ शांत व गरीब असतात परंतु विचलित झाल्यास ते पुढच्या तीक्ष्ण नखरांनी हल्ला करू शकतात.

तपकिरी गळ्याच्या व फिकट गळ्याच्या त्रि-पादांगुष्टीय स्लॉथमध्ये प्रजनन ऋतुमानानुसार असते. आयाळ असणार्‍या स्लॉथमध्ये वर्षभर प्रजनन सुरू असते. पिग्मी स्लॉथमधील प्रजननाबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. याचा गर्भावधी काळ सु. ६ महिन्यांचा असून एका वेळी एकच पिलू जन्मास येते. नवजात अर्भक मादीच्या पोटास साधारण पाच महिन्यांचे होईपर्यंत चिकटून राहते. त्रि-पादांगुष्टीय स्लॉथला बंदीवासात ठेवणे अवघड असते. त्याच्या प्रजनन वर्तणुकीविषयी तसेच जगण्याच्या इतर गोष्टींविषयी खूपच थोडी माहिती उपलब्ध आहे.

वर्गीकरण आणि पुराजीवविज्ञान : मेगॅलोनिचिडी कुलातील निर्वंश झालेले जमिनीवरील स्लॉथ उत्तर अमेरिका खंडात अलास्का आणि दक्षिण कॅनडापर्यंत राहत होते. जमिनीवरील स्लॉथच्या विविध जातींत आकारमानांमध्ये भिन्नता होती. बहुतेक आकारमानाने लहान होते, मात्र काही हत्तीच्या आकारमानाचे स्लॉथ (मेगॅथेरियम अमेरिकॅनम) होते, तर काहींची उंची सध्याच्या जिराफाएवढी होती. जमिनीवरील स्लॉथ नामशेष व्हायचा कालावधी अंतिम हिमयुगाचा शेवटचा टप्पा आणि उत्तर अमेरिकेत मनुष्याचा प्रवेश होण्याचा काळ हा मानला जातो.

कुलकर्णी, सतीश वि. वाघ, नितिन भ.