रॉबिन्स, लायोनेल चार्ल्स रॉबिन्स : (२२ नोव्हेंबर १८९८−१५ मे १९८४). सुप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ व शिक्षणवेत्ते. जन्म मिडलसेक्स परगण्यातील सिप्सन या गावी. आई वडिलांची नावे रोझा मॅरिअन व रोलँड रिचर्ड. वयाच्या आठव्या वर्षी लायोनेल पूर्वाध्ययन शाळेत दाखल झाला. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लायोनेल लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजात प्रविष्ट झाला. पुढे लंडन अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेमध्ये ह्यू डॉल्टन, एडविन कॅनन, लूटव्हिक फोन मीझेस यांसारख्या नामवंत अर्थशास्त्रज्ञांचे सम्यक् मार्गदर्शन लायोनेलला लाभले आणि त्याने १९२३ मध्ये बी. एस्‌सी. ही अर्थशास्त्रातील पदवी संपादिली.

लायोनेल ह्यांनी कामगार चळवळीमध्ये एक कामगार म्हणून आपल्या आयुष्याच्या कारकीर्दीस प्रारंभ केला. पहिल्या तोफखाना अधिकारी म्हणूनच त्यांनी काही काळ काम केले. १९२० पासून पुढे ते लंडन अर्थशास्त्रज्ञ संस्थेत प्रथम अधिव्याख्याता म्हणून (१९२५−२७) लागले नंतर न्यू कॉलेज, ऑक्सफर्ड येथेही अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले (१९२४ १९२७−२९) पुढे लंडन अर्थशास्त्र संस्थेत त्यांना अर्थशास्त्राचे अध्यासन मिळाले. या पदावर ते तिसांहून अधिक वर्षे होते. १९३०−३५ या काळात लंडन अर्थशास्त्र संस्थेच्या आर्थिक सिद्धांतांच्या चर्चासत्रांचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले या चर्चासत्रांनी तत्कालीन उदयोन्मुख अर्थशास्त्रज्ञांवर कमालीचा प्रभाव पडला होता. ब्रेटनवुड्स परिषदेत (१९४४) ब्रिटिश शिष्टमंडळातील एक प्रतिनिधी या नात्याने लायोनेल रॉबिन्स यांनी लॉर्ड केन्स यांच्याबरोबर प्रशंसनीय कामगिरी केली. १९५९ मध्ये रॉबिन्स यांना आजीव उमराव पद देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. ग्रेट ब्रिटनच्या वरिष्ठ सभागृहात त्यांनी क्रियाशील भाग घेतला. फायनॅन्शिअल टाइम्स या वृत्तपत्राचे अध्यक्ष म्हणून (१९६१−७०), तर द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकांचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले (१९६०−७५). याशिवाय लंडन अर्थशास्त्र संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले (१९६८−८०). रॉबिन्स यांचा रॉयल अकॅडेमी, रॉयल ऑपेरा हाउस, नॅशनल गॅलरी, टेट गॅलरी, टेट गॅलरी इ. महत्त्वाच्या संस्थांच्या प्रगतीमध्ये मोठा सहभाग होता. स्टर्लिंग विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते (१९६८-७८).

कला-वाङ्‌मय तसेच शिक्षण या क्षेत्रांमध्ये एक अत्यंत कुशल प्रशासक म्हणून रॉबिन्स यांनी लक्षणीय कार्य केले. १९६० पासूनच्या पुढील काळात ग्रेट ब्रिटनमधील विद्यापीठीय शिक्षणामध्ये सुधारणा व विस्तार करण्याच्या संदर्भात ब्रिटिश शासनाने नियुक्त केलेल्या उच्च शिक्षण समितीचे अध्यक्ष (प्राइम मिनिस्टर्स कमिटी ऑन हायर एज्युकेशन) म्हणून रॉबिन्स यांची नियुक्ती करण्यात आली (१९६१−६३). ‘रॉबिन्सन समिती’चे अध्यक्ष म्हणून बजाविलेल्या कामगिरीबद्दल रॉबिन्स हे प्रदीर्घ काळ लक्षात राहतील. १९६३ मध्ये शासनाला सादर केलेल्या या अहवालामुळे ग्रेट ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणाचा विस्तार होणे अतिशय सुकर झाले. कोणतीही व्यक्ती १८ वर्षांची झाल्यावर तिने आवश्यक ती अर्हता प्राप्त केली असल्यास त्या व्यक्तीस उच्च शिक्षण उपलब्ध करण्यात आले पाहिजे, हे तत्त्व या अहवालामुळे प्रस्थापित झाले.

रॉबिन्स यांचे महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : (१) ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स (१९३२), (२) ग्रेट डिप्रेशन (१९३४), (३) इकॉनॉमिक प्लॅनिंग अँड इंटरनॅशनल ऑर्डर (१९३७), (४) द इकॉनॉमिक प्रॉब्लेम इन पीस अँड वॉर (१९५०), (५) द इकॉनॉमिस्ट इन द ट्वेंटिएथ सेंचरी (१९५४), (६) रॉबर्ट टॉरेन्स अँड ईव्हलूशन ऑफ क्लासिकल इकॉनॉमिक्स (१९५१), (७) द युनिव्हर्सिटी इन द मॉडर्न वर्ल्ड, (८) द थिअरी ऑफ इकॉनॉमिक डिव्हलरमेंट इन द हिस्टरी ऑफ इकॉनॉमिक थॉट, (९) द ईव्हलूशन ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक थिअरी, (१०) ऑटोबायॉग्रफी ऑफ ॲन इकॉनॉमिस्ट (१९७१).

वरील ग्रंथांपैकी रॉबिन्स यांचा ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हा ग्रंथ म्हणजे सर्वोत्कृष्ट जागतिक साहित्यापैकी एक समजण्यात येतो. हा पद्धतिमीमांसात्मक अभिजात ग्रंथ मानला जातो. १९३२ मध्ये ॲल्फ्रेड मार्शल यांच्या कल्याणाधिष्ठित अर्थशास्त्राच्या व्याख्येऐवजी दुर्मिळताधिष्ठित अर्थशास्त्राची क्रांतिकारी व्याख्या रॉबिन्स यांनी पुढे मांडली : ‘अर्थशास्त्र हे साध्ये (गरजा) व दुर्मिळ (मर्यादित) परंतु पर्यायी उपयोगाची साधने या दोहोंचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या (मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे’. रॉबिन्स यांच्या या व्याख्येमुळे आर्थिक क्रिया व अन्य क्रियांमधील फरक (भेद) प्रथमतः स्पष्ट झाला.

रॉबिन्स यांच्या मते अर्थशास्त्र हे निगामी (आकारिक) शास्त्र आहे ते आदर्शी नसून वास्तविक शास्त्र असल्याचा दावा करून रॉबिन्स यांनी अर्थशास्त्र हे साध्यांबाबत (गरजांबाबत) तटस्थ राहत असल्याचे प्रतिपादिले आहे. १९३२ पूर्वी अर्थशास्त्र व तंत्रविद्या या दोन्ही एकच समजल्या जात. त्यांच्या व्याख्येमुळे त्यांमधील फरक स्पष्ट झाला. व्यक्तिव्यक्तींच्या संदर्भातील उपयोगितेची तुलना त्यांना अमान्य होती. अर्थशास्त्रज्ञ हा उपदेशक नसून अभ्यासक असल्याचे त्यांचे मत होते. अर्थशास्त्र एखाद्या प्रश्नावर प्रकाश टाकते, एखाद्या प्रश्नाचा सांगोपांग विचार करते, समस्येवर तोडगा सुचवित नाही, असे रॉबिन्स यांचे स्पष्ट मत होते. ‘काय असावे’ व ‘काय नाही’ यांपेक्षा ‘काय आहे’ व ‘काय नाही’ यांच्याशी अर्थशास्त्राला कर्तव्य असते, ते म्हणत. भांडवलशाहीचे ते पुरस्कर्ते होते. स्थिर विनिमय दर व मुक्त व्यापार त्यांना मान्य होता.

रॉबिन्स यांचे आर्थिक विचारांच्या इतिहासासंबंधीचे थिअरी ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी (१९५२) व रॉबर्ट टॉरेन्स अँड द ईव्हलूशन ऑफ क्लासिकल इकॉनॉमिक्स (१९५८) हे दोन ग्रंथ बरेच गाजले. इन हायर एज्युकेशन रिव्हिजिटेड (१९८०) या ग्रंथात ‘रॉबिन्स अहवाला’च्या परिणामांचा ऊहापोह करण्यात आलेला आहे.

लॉर्ड रॉबिन्स हे अष्टपैलू अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात असून पद्धतिमीमांसा, सार्वजनिक धोरण, कल्याणकारी अर्थशास्त्र, आर्थिक विकास, आर्थिक विचार इत्यादींबाबत त्यांचा मोठा अधिकार होता. नवकल्याणकारी अर्थशास्त्रज्ञांमध्येही त्यांना मोठे स्थान होते. नियोजनबद्ध अर्थव्यवस्था ही केवळ सैद्धांतिक आहे, ती प्रत्यक्ष व्यवहारात उतरविणे अवघड असल्याचे त्यांचे मत होते.

रॉबिन्स यांचे हृदयविकाराच्या आघाताने लंडन येथे निधन झाले.

गद्रे , वि. रा.