टेरेडो : ह्या सागरी शिंपाधारी प्राण्यांचा समावेश मॉलस्का (मृदूकाय) संघाच्या द्विपुट वर्गातील (बायव्हाल्व्हिया) यूलॅमेलिब्रँकिएटा गणातल्या टेरेडीनिडी कुलात होतो. टेरेडो व बँकिया हे या कुलातील दोन प्रमुख प्राणी होत. हे प्राणी जगातील सर्व समुद्रांत व नदी मुखांत आढळतात.

टेरेडो नेव्हॅलिस (एका लाकडाच्या तुकड्यात असलेला) : (१) कवचाची पुटे, (२) नळी, (३) निनालांना आधार देणारी लहान कॅल्शियममय तकटे, (४) निनाल.

टेरेडो हा एक अतिशय विध्वंसक प्राणी आहे. वाळवी ज्याप्रमाणे जमिनीवरील घरांच्या वगैरे लाकूडकामाचा पोखरून नाश करते त्याप्रमाणेच टेरोडो जहाजे, बंदरांतील व गोद्यांतील लाकूडकाम यांचा पोखरून नाश करतो म्हणून याला कधीकधी ‘समुद्रातील वाळवी’ म्हणतात. या प्राण्यामुळे जहाजांना अतिशय नुकसान पोहोचते. तो लाकडात खोल  पोखरत जाऊन नळीसारखी लांब बिळे तयार करतो.

टेरेडोची सर्वसाधारण लांबी २५ सेंमी.पर्यंत आणि व्यास सु. ८ मिमि. असतो. परंतु टेरेडो नेव्हॅलिस या जातीच्या प्राण्याच्या शरीराची लांबी ९०–१२० सेंमी. पर्यंत असल्याचे आढळून आले आहे. शरीराचा पुढचा थोडासाच भाग शिंपांनी झाकलेला असतो. शरीर कृमिसदृश असते. निनाल (पाणी आत घेण्यासाठी आणि बाहेर टाकण्यासाठी असलेली नळीसारखी इंद्रीये) दोन असून त्यांची टोके बिळाच्या सूक्ष्म छिद्रातून बाहेर आलेली असतात. निनाल पक्ष्माभिकायुक्त (हालचालींना उपयुक्त अशा केसांसारख्या वाढींनी युक्त) असतात. अंतर्वाही निनालातून पाणी आणि त्याबरोबरच अन्न आत जाते आणि बहिर्वाही निनालातून पाणी व त्याबरोबर क्षेप्य द्रव्ये (निरुपयोगी पदार्थ) बाहेर  पडतात. शिपल्यांची पुटे जवळजवळ अर्धगोलाकार असतात दोन्ही पुटांच्या मधील फटीतून पुढच्या बाजूला स्नायुमय पाद (उपांग) बाहेर आलेला असतो. पुटांच्या पुढच्या काठाजवळील बाह्यपृष्ठावर दंतिकांच्या (दातांसारख्या सूक्ष्म संरचनांच्या) कित्येक ओळी असतात. या दंतिकांनी हा प्राणी लाकूड किसतो. पादाच्या पृष्ठावर आणि प्रावाराच्या (कवचाच्या लगेच खाली असणाऱ्‍या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीच्या) काठावर असणाऱ्‍या पक्ष्माभिकांच्यामुळे लाकडाचे सूक्ष्म कण प्रावारगुहेत आणि तेथून मुखात जातात.

जठराच्या मागच्या टोकाशी एक मोठा कोश अथवा उंडुक (अन्नमार्गापासून निघालेली व बाहेरचे तोंड बंद असलेली पिशवी) असतो आणि तो लाकडाच्या सूक्ष्म कणांनी भरलेला असतो. जठर व उंडुक यांतील पाचक एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रियांना मदत करणाऱ्‍या प्रथिनयुक्त पदार्थांच्या) रासायनिक क्रियेने या कणांचे पचन होते. अंतर्वाही निनालातून पाण्याबरोबर प्रावारगुहेत येणाऱ्‍या सूक्ष्म वनस्पती आणि प्राणी यांवरही टेरेडो उदरनिर्वाह करतो.

सामान्यतः निनालाची टोके लाकडाच्या पृष्ठावर असलेल्या बिळाच्या छिद्रातून बाहेर आलेली असून पाण्यात पुढे-मागे हालत असतात. परंतु प्रतिकूल परिस्थितीत किंवा काही धोका आहे असे वाटल्यास हा प्राणी निनाल बिळात आखूडन घेऊन कलथ्यासारख्या दोन तकटांनी छिद्र बंद करतो. निष्क्रिय टेरेडो अशा प्रकारे बीळ बंद करून बराच काळ आत राहतात.

या प्राण्यांच्या काही जाती अंडी व शुक्राणू पाण्यात सोडतात आणि तेथे अंड्यांचे निषेचन (फलन) होते. इतर काही जातींत अंड्यांचे निषेचन आंतरिक असते, पण निषेचित अंड्यांच्या विकासाच्या प्राथमिक अवस्थेत ती पाण्यात सोडली जातात. डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्वावस्था) काही काळ मुक्तप्लावी (स्वतंत्रपणे पोहणारा) असतो. या स्थितीत त्याला स्थिर होण्याकरिता जर लाकूड मिळाले नाही, तर तो मरतो. लाकूड मिळाल्यावर तो त्यावर स्थिरावतो आणि नंतर त्याचे प्रौढ प्राण्यात रूपांतर होते.

पूर्वी या प्राण्यांपासून जहाजांचे रक्षण करण्याकरिता त्यांच्यावर बाहेरून शिशाचा पत्रा बसवीत असत. यानंतर ब्रिटिशांनी १७५८ मध्ये प्रथम तांब्याच्या पत्र्याचा या कामी उपयोग करायला सुरुवात केली. पण तांब्याचा पत्रा लवकर झिजत असल्यामुळे नवे पत्रे वरचेवर बसवावे लागत आणि त्यामुळे हे काम फार खर्चाचे होऊ लागले. जहाजांच्या आणि धक्क्यांच्या लाकडाच्या रक्षणाकरिता एक जुनाच पण फायदेशीर उपाय हल्लीसुद्धा वापरतात. क्रिओसोटामध्ये (दगडी कोळशांपासून मिळणाऱ्‍या डांबराच्या एका घटकात) डांबर विरघळवून हे मिश्रण लाकडांना लावतात व त्याचा चांगला उपयोग होता.

कुलकर्णी, सतीश वि.