न्यिझीन्स्कई, व्हत्सलाव्ह : (२८ फेब्रुवारी १८९० – ८ एप्रिल १९५०). प्रख्यात रशियन नर्तक. कीव्ह येथे एका नर्तक कुटुंबात जन्म. वयाच्या नवव्या वर्षी सेंट पीटर्झबर्गमधील ‘रशियन इंपीरिअल बॅले स्कूल’मध्ये नृत्यशिक्षणासाठी प्रवेश घेतला. १९०७ मध्ये विद्यार्थिदशेतच डॉन जूआन या बॅलेमध्ये त्याने नृत्यमय भूमिका केली. पुढे तो प्रथम मारिन्स्की थिएटरमध्ये व नंतर द्यागिल्येफ याच्या नृत्यसंघामध्ये दाखल झाला. द्यागिल्येफच्या नृत्यसंघाबरोबर १९०९ पासून पॅरिस, लंडन या शहरांत तसेच अमेरिका, स्पेन इ. देशांतून त्याने नृत्यांचे कार्यक्रम सादर केले. १९१३ मध्ये रोमोला दे पुल्‌स्की हिच्याशी त्याने विवाह केला, पुढे १९१७ पासून मानसिक व्यथेमुळे त्याच्या मेंदूवर परिणाम झाला. त्यामुळे त्याचे नृत्यजीवन संपुष्टात आले व लौकिक जीवन दुःखी बनले. त्यातच लंडन येथे तो मृत्यू पावला.

यूरोपात न्यिझीन्स्कईला उत्कृष्ट बॅले नर्तक म्हणून मोठी मान्यता लाभली. भूमिकेशी तादात्म्य पावण्याची वृत्ती, नृत्यातील चापल्य आणि सहजता आदी गुणांमुळे त्याची नृत्ये लोकप्रिय ठरली. Petrouchka, Scheherazade, Le Spectre de la Roseया फॉकीननिर्मित बॅलेंतील त्याच्या नृत्यमय भूमिका विशेष गाजल्या. त्याने स्वतः काही बॅलेंचे नृत्यालेखनही केले. त्यांतील L’ Apres-midi d’un Faune (१९१२), Le Sacre du printemps (१९१३) ही उल्लेखनीय होत. Le Sacre du printemps या बॅलेतील त्याचे नृत्यालेखन, स्ट्राव्हिन्स्कीच्या संगीतासह, अत्यंत वादग्रस्त ठरले. त्याची पत्‍नी रोमोला न्यिझीन्स्कईने त्याची संपादित व भाषांतरित केलेली डायरी (१९३६) प्रसिद्ध आहे.

संदर्भ : Nijinsky, Romola, Nijinskym New York, 1934.

 

दिवाकर, प्र. वि.