व्ह्यूर्ट्‌झाइट : जस्ताचे खनिज. स्फटिक षट्कोणी अर्धाकृती प्रसूच्याकार स्फटिक आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान]. अरीय (त्रिज्यीय मांडणीचे) तंतुमय वा स्तंभाकार पुंज किंवा पट्टित लेपांच्या रूपातही हे आढळते. प्रचिनाला समांतर ⇨पाटन चांगले. चमक राळेसारखी. रंग तपकिरी काळा. कठिनता ३·५ –४· वि. गु. ४ –४·१·रा. सं. ZnS (जास्तीचे सल्फाइड). यात बहुधा थोडे लोह वा कॅडमियम असते. १,०२० अंश से. तापमानाखाली हे अस्थिर असते. स्फॅलेराइट हे खनिज या तापमानापासून जलदपणे थंड केल्यास व्ह्युर्टझाइट कृत्रिम रीतीने तयार करता येते. स्फॅलेराइट हा कमी तापमानाला स्थिर असणारा प्रकार आहे. मात्र हे स्फॅलेराइटच्या मानाने विरळा आढळते. अमेरिका (माँटॅना, मिसूरी, नेव्हाडा), ब्रिटन (कार्नवॉल), बोहीमिया, चेकोस्लोव्हाकिया व फ्रान्स येथे व्ह्यूर्टझाइट आढळते. शार्ल आदोल्फ व्ह्यूर्त्स (१८१७ – ८४) या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञांच्या नावावरून या खनिजाचे नाव पडले आहे.

पाहा: स्फॅलेराइट.

ठाकूर, अ. ना.