पाणपिसू (डॅफ्निया) : (१) शृंगिका (मोठी), (२) हृदय, (३) भ्रूणकोष्ठ, (४) पाद, (५) शृंगिका (लहान), (६) डोळा.पाणपिसू: आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघातील क्रस्टेशिया (कवचधर) वर्गाच्या बॅकिओपोडा उपवर्गातील क्लॅडोसेरा या गणातील लहान प्राणी. पाणपिसवा सर्व जगभर आढळतात, काही जाती स्थानिक आहेत परंतु पुष्कळ पूर्णपणे सार्वत्रिक आहेत. हे प्राणी गोड्या पाण्यात राहणारे आहेत. काही सरोवरांच्या अथवा तलावांच्या उघड्या पाण्यात राहणारे असून सर्वसाधारणपणे पारदर्शक व जवळजवळ रंगहीन असतात पण तलाव, नद्या इत्यादींचे तणयुक्त काठ, डबकी आणि खड्डे यांत राहणाऱ्या जाती बहुधा अपारदर्शक व कमी अधिक प्रमाणात तांबूस, पिवळसर अथवा उदसर रंगाच्या असतात. पाणपिसवांचे कित्येक वंश आणि अनेक जाती आहेत. यांपैकी डॅफ्निया  आणि लेप्टोडोरा विशेष माहीत असलेले वंश होत.

शरीर लहान व आटोपशीर असते. लांबी साधारणपणे १–२ मिमी. असते पण काही जातींच्या प्राण्यांची लांबी केवळ ०·१ मिमी. असते. सगळ्यांत मोठी पाणपिसू लेप्टोडोरा  ही असून हिची लांबी १५–१७ मिमी. असते. खंडीभवन (शरीराचे भाग पडणे) अस्पष्ट असते. शरीर आणि पाद (काही अपवाद सोडून) द्विपुटी कवचाने (दोन शिंपल्यांनी) झाकलेले असतात पण डोके बाहेर असते. कवचाची दोन्ही पुटे बिजागरीने जोडलेली नसून पाठीवर अखंड असतात. डोक्यावर शृंगिकांच्या (सांधेयुक्त स्पर्शेंद्रियांच्या) दोन जोड्या असतात पहिली जोडी फार लहान असते, पण दुसरी मोठी व द्विशाखित असून तिचा उपयोग मुख्यतः वेगाने पोहोण्याकरिता होतो. जंभ मोठे असतात. डोळा एक आणि संयुक्त असून मध्यस्थित असतो. वक्षावर सामान्यतः चापट, पर्णसदृश पादांच्या पाच जोड्या असतात, त्यांच्या हालचालींमुळे पाण्याचे प्रवाह चालू राहून ते कवचाच्या आत अन्न आणि ऑक्सिजन नेतात. उदर लहान व बहुधा वाकून वक्षाखाली आलेले असते. मादीच्या पाठीकडच्या पृष्ठाखाली असणाऱ्या भ्रूणकोष्ठात (विकास पावणारी अंडी अथवा भ्रूण ठेवण्याकरिता प्राण्याच्या शरीरावर असणाऱ्या पिशवीत) अंडी उत्पन्न होऊन तेथेच त्यांची वाढ होते. पिल्ले प्रौढांसारखीच असतात. पृष्ठवर्माच्या (कवचाच्या) मागच्या टोकावर एक पुढे आलेला कंटक (काटा) असतो.

पाणपिसवांमध्ये मुख्यतः अनिषेकजननाने (नर व मादीचा संयोग न होता) प्रजोत्पादन होते. डॅफ्नियासारख्या प्राण्यांच्या माद्या सबंध उन्हाळाभर असंगमक (नराचा संयोग न होता सुद्धा ज्यांचे फलन होऊशकते अशी) ‘उन्हाळी अंडी’ उत्पन्न करून प्रजोत्पादन चालू ठेवतात. या अंड्यांचा भ्रूणकोष्ठामध्ये अतिशय लवकर विकास होतो. माद्यांची संख्या नेहमीच फार मोठी असून नरांची अगदी कमी असते. शरद ऋतूत माद्या विशिष्ट प्रकाराची अंडी अथवा ‘हिवाळी अंडी’ उत्पन्न करतात. ही उन्हाळी अंड्यांपेक्षा जास्त काळी आणि अपारदर्शक असतात. नर या अंड्यांचे निषेचन (फलन) करतात व ती भ्रूणकोष्ठात जातात. याच्या (कोष्ठाच्या) एका भागाच्या परिवर्तनाने पल्याण (संरक्षक कवच) तयार होते. पुढच्या निर्मोचनाच्या (कात टाकण्यासारख्या क्रियेच्या) वेळी पल्याण अलग होते आणि त्याचा एक प्रकारचा द्विपुटी संपुटक तयार होतो आणि त्यात अंडी विश्रामी अवस्थेत हिवाळाभर राहतात आणि पुढच्या वसंत ऋतूत त्यांचा विकास होतो.

गोड्या पाण्यातील पुष्कळ माशांच्या पिल्लांचे पाणपिसवा हे मुख्य भक्ष्य असल्यामुळे आणि लहान माशांच्या बऱ्याच जाती पाणपिसवा खाऊनच जगत असल्यामुळे पाणपिसवा अतिशय महत्त्वाच्या होत. जलजीवालयातील माशांचे अन्न म्हणून जिवंत पाणपिसवांचा उपयोग करतात. माशांना खाऊ घालण्याकारिता डॅफ्नियाचे हौदात पालनपोषण करतात. पाणपिसवा वाळवून माशांचे खाद्य म्हणून त्या बाजारात विकतात. 

सूर्यवंशी, वि. ल.