बानगु : (इ.स. ३२-९२). चिनी इतिहासकार. जन्म चांगान शहरी. त्याचे वडील बान बीआव् (इ.स. ३ – ५४) हेही इतिहासकार होते. इ.स.पू. दुसऱ्या शतकात ⇨स्स-मा-चन (सू-मा’ चिएन्) ह्याने रचिलेल्या षृ जि (इं.श रेकॉर्ड्स ऑफ द ग्रँड हिस्टॉरिअन) ह्या चीनच्या इतिहासाचा पुढील भाग ज्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला, अशा विद्वानांत बान बीआव् ह्यांची गणना होते. हान् राजवंशाच्या साम्राज्याच्या प्रथमार्धाच्या (इ.स.पू. २॰२ ते इ.स.९) इतिहासाची सामग्री त्यांनी गोळा केली होती व त्या साम्राज्याच्या इतिहासाचे लेखनही सुरू केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर बान गू’ने हे काम हाती घेतले. बान गू’ ने लिहिलेला इतिहासग्रंथ शंभर प्रकरणांचा असून त्याचे नाव हान् शू (इं.शी हिस्टरी ऑफ द फॉर्मर हान्) असे आहे.बान गू’ चे इतिहासलेखन स्स-मा चनसारख्या त्याच्या पूर्वसरींच्या तुलनेने बरेच नेटके असून त्याची विश्वासार्हताही अधि आहे. आपले इतिहासलेखन केवळ एकाच राजवंशाच्या इतिहासापुरते मर्यादित ठेवल्याबद्दल बान गू’ वर टीका झालेली असली, तरी राजवंशाच्या इतिहासलेखनाचा एक आदर्शच त्याने निर्माण केला. तो आजतागायत पाळला जात आहे.राजद्रोहाचा आरोप असलेल्या एका सेनानीबरोबर संबंध असल्यामुळे बान गू’ ला चौकशीसाठी तुरुंगात डांबले असता तेथेच त्याचा मृत्यू झाला.बान गू’ची बहीण बान जाव् (सु. ४५ – सु ११६) ही एक व्यासंगी स्त्री होती. बान गू’च्या इतिहासातील अपूर्ण राहिलेला काही भाग पूर्ण करण्याची राजाज्ञा तिला झाली आणि तो तिने पूर्ण केला, असे म्हटले जाते.एच्.एच्. डब्ज ह्यांनी बान गू’च्या इतिहासग्रंथाच्या काही भागांचे इंग्रजी भाषांतर हिस्टरी ऑफ द फॉर्मर हान् डिनॅस्टी ह्या नावाने केले आहे (३ खंड, १९३८-५५).

संदर्भ : Waston, Burton, Early Chinese Literature, New York, London, 1962.

कुलकर्णी, अ. र.