प्लव्हर : कॅरॅड्रीइडी या पक्षिकुलात प्लव्हरचा समावेश केलेला आहे. भारतात आढळणाऱ्या यांच्या जातीपैकी कित्येक हिवाळी पाहुणे म्हणून येतात आणि उन्हाळ्यात आपआपल्या ठिकाणी परत जातात. जिला भारतीय म्हणता येईल अशी एकच जात आढळते या जातीला ‘छोटा वलयी प्लवर’ म्हणतात. याचे शास्त्रीय नाव कॅरॅड्रियस ड्युबियस असे आहे. याच्या दोन प्रजाती भारतात आढळतात. यांपैकी मोठीचे शास्त्रीय नाव कॅरॅड्रियस ड्यु.क्युरोनिकस आणि लहानीचे कॅरॅड्रियस ड्यु. जडोंनी असे आहे. क्युरोनिकस ही प्रजाती भारतात कायम राहणारी नाही. या प्रजातीचे पक्षी हिवाळ्यात भारतात येतात व एप्रिल-मे मध्ये विणीकरिता उत्तर आशियात परत जातात. जर्डोनी ही प्रजाती भारतात कायम राहणारी असून तिची वीणही येथेच होते.

छोटा वलयी प्लव्हर

नद्या, नदीमुखे, तलाव, वगैरेंच्या रेताड किंवा चिखलट काठांवर हा राहतो. यांचे विखुरलेले कळप किंवा जोडपी असतात. हा पक्षी ⇨ लाव्यापेक्षा लहान (लांबी सु. १८ सेंमी.) असतो. डोके मोठे कपाळ पांढरे कानाभोवतालचा, डोळ्याभोवतालचा आणि माथ्याचा पुढचा भाग काळा हनुवटी, गळा आणि मान पांढरी मानेच्या भागच्या भागाभोवती काळे वलय शरीराच्या वरच्या बाजूचा रंग तपकिरी, खालच्या बाजूचा पांढरा डोळे मोठे, चोच काळी आणि पाय पिवळे असतात.

लहान-मोठे किडे, वाळूतील तुडतुडे व लहान खेकडे हे याचे भक्ष्य होय. भक्ष्य शोधीत पाण्याच्या काठी तो हिंडत असतो. याच्या शरीराचा रंग भोवतालच्या परिस्थितीशी इतका एकरूप झालेला असतो की, तो चटकन दिसून येत नाही. याचा पाठलाग केला, तर थोडा वेळ तो जमिनीवरच धावतो व नंतर चटकन उडून जातो व उडताना एक प्रकारची शीळ घातल्यासारखा आवाज काढतो.

याच्या प्रजोत्पादनाचा काळ मार्चपासून मेपर्यत असतो. नदीच्या काठावरील किंवा ओढ्यांच्या पात्रातील वाळूत थोडीशी जागा उकरून तिच्याच मादी चार अंडी घालते ती पिवळसर दगडी किंवा हिरवट करड्या रंगाची असून त्यांच्यावर गडद तपकिरी किंवा अगदी पुसट जांभळे ठिपके किंवा चिन्हे असतात.

कर्वे, ज. नी.