गोल्दोनी, कार्लो : (२५ फेब्रुवारी १७०७—६ फेब्रुवारी १७९३). इटालियन नाटककार. जन्म व्हेनिसमध्ये. त्याने वकिली केली आणि काही काळ वाणिज्यदूत म्हणून वकिलातीमध्ये काम केले परंतु आपले खरे कार्य नाटके लिहिण्याचे आहे, असे त्याला कळून चुकले. १७४८ पासून त्याने आपला सर्व वेळ नाटके लिहिण्याच्या कामी लावला. १७६२ मध्ये तो पॅरिसला गेला आणि त्याने फ्रेंचमध्येही नाटके लिहिली.

गोल्दोनीची मुख्य कामगिरी म्हणजे इटलीच्या पारंपरिक सुखात्मिकेत— Commedia dell’arte मध्ये — त्याने घडवून आणलेली सुधारणा. पारंपरिक सुखात्मिकेत बरेचसे संवाद उत्स्फूर्तपणे म्हटले जात. तो मात्र आपल्या नाटकांच्या संहिता संपूर्ण लिहून काढीत असे आणि त्यांत कसलाही आगंतुकपणा आलेला त्याला चालत नसे त्याशिवाय कलावंतांनी रंगभूमीवर मुखवटे घालून येण्याची प्रथा त्याने मोडून टाकली.

फ्रेंच नाटककार मोल्येर याचा आदर्श पुढे ठेवून लोकांच्या वागणुकीच्या तऱ्हा आणि स्वभावांतील छटा दर्शविणाऱ्या सुखात्मिका त्याने लिहिल्या. त्याच्या नाटकांत खरीखुरी माणसे, खरे प्रसंग व रोजच्या व्यवहारातील भाषा आढळते. त्याच्या बहुतेक नाटकांत मध्यमवर्गीय व्हेनीशियन समाजाचे यथार्थ चित्रण केलेले दिसते. मोल्येरच्या नाटकांतील तरलता व तीव्र उपहास त्याच्या कलाकृतींत नसला, तरी नाट्यवस्तूचा विस्तार करण्याची लकब व विनोदबुद्धी यांत तो मोल्येरहून उणा नाही. त्याने सु. १२० सुखात्मिका लिहिल्या आणि ८० संगीतिकांसाठी लिब्रेत्तो लिहिले. त्याच्या उत्कृष्ट नाटकांत La bottega di caffe (१७५०, इं. शी. द कॉफी हाऊस), La Locandiera (१७५३, इं. शी. द इनकीपर), La casa nova (१७६०, इं. शी. द न्यू हाऊस) आणि Ilventaglio (१७६२, इं. शी. द फॅन) यांची गणना होते.

त्याने लिहिलेल्या फ्रेंच सुखात्मिकांपैकी Le bourru bienfaisant (१७७१, इं. शी. द बिनेफिसंट बेअरर) ही विख्यात होय. फ्रेंचमध्ये त्याने स्वतःच्या आठवणीही लिहून काढल्या आहेत (Memoires, १९०७, इं. भा. १९२६). पॅरिस येथे तो निधन पावला.

संदर्भ : Chatfield-Taylor, H.C. Goldoni, New York, 1913.

मेहता, कुमुद