आफ्रिकान्स भाषा-साहित्य : सुमारे तीन शतकांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत जाऊन राहिलेल्या डच लोकांच्या भाषेला आफ्रिकान्स हे नाव देण्यात येते. इंग्रजीच्या जोडीने ती दक्षिण आफ्रिकन संघराज्याची एक राष्ट्रभाषा म्हणून मान्य करण्यात आली आहे. व्याकरणदृष्ट्या या भाषेचे रूप अतिशय सोपे आहे. मूळ डच रहीवाशांची भाषा आदिवासी आफ्रिकनांनी अनुकरणाने स्वतःच्या उपयोगासाठी सोपी व किमान विकारयुक्त बनवली आणि नंतर या बोलीचा डचांच्या भाषेवर परिणाम होऊन तिला आजचे स्वरूप प्राप्त झाले असावे, असा अभ्यासकांचा तर्क आहे.

ध्वनिविचार : आफ्रिकान्स भाषेत लेखनासाठी रोमन लिपीचा उपयोग करतात. परंतु त्यामागे पुष्कळदा कोणतेही निश्चित तत्त्व नसते. उदा., g हे अक्षर घर्षक ‘ख’ साठी वापरले जाते, तर f व v ही अक्षरे घर्षक ‘फ’ साठी वापरली जातात. i हे अक्षरे ‘अ’ चा उच्चार दाखवते, तर ie चा उच्चार दीर्घ ‘ई’ होतो.

आफ्रिकान्सची ध्वनिव्यवस्था स्थूलमानाने पुढीलप्रमाणे आहे :

स्वर : (पुढचे) इ, ए, ॲ, इ‍ॅ, ऍ (मधले) अ, आ (मागचे) उ, ओ, ऑ (अनुनासिक) आं, अँ, आँ. सर्व स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ असू शकतात. (इ‍ॅ व ऍ हे इ व ए यांच्या उच्चारात गोल ओठ करून मिळतात).

व्यंजने :        स्फोटक : क, त, प, ब, द, ग. 

                       अनुनासिक : ङ, न, म.  

                       घर्षक : स, श, झ, ख, फ, व, ह. 

                       अर्धस्फोटक : च 

                       द्रव : र, ख. 

                       अर्धस्वर : य

रूपविचार : नामांचे अनेकवचन सामान्यतः ‘स्’ हा प्रत्यय लावून होते. लिंगे तीन आहेत. प्राणिवाचक शब्द अर्थानुसार पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असतात. इतर सर्व शब्द नपुंसकलिंगी आहेत. काही पुल्लिंगी शब्दांना प्रत्यय लावून स्त्रीलिंगी रूपे तयार होतात. इंग्रजीप्रमाणेच नामाचे वाक्यातील स्थान त्याच्यापूर्वी संबंधदर्शक शब्द ठेवून दाखवले जाते.

क्रियापदे विकाररहितच असतात. तिन्ही पुरुषांत, तिन्ही लिंगांत व दोन्ही वचनांत ‘आहे’ चे is आणि स्वामित्वदर्शक क्रियापदाचे (इंग्रजी have याला समानार्थक) het हेच रूप होते. संयोज्य किंवा असंयोज्य प्रत्यय वापरून भूत, भविष्य इ. काळ व क्रियापदाची इतर रूपे बनवता येतात. नकारदर्शक अव्यय क्रियापदांच्या पुढे व मागेही लागते.

विशेषणांना मूलभूत, तुलनात्मक व तमभावदर्शक प्रत्यय लागतात. ek मी, jy (u) तू, hy तो, sy ती, dit ते, one आम्ही. julle (u) तुम्ही, hulle ते-त्या-ती ही सर्वनामांची सरळ रूपे आहेत. याशिवाय प्रत्येक सर्वनामाची कर्मवाचक, स्वामित्ववाचक व स्वामित्वदर्शक नामवाचक अशी आणखी तीन रूपे होतात.

वाक्यविचार : क्रियापद (मुख्य किंवा सहायक) सामान्यतः वाक्याच्या शेवटी येते. 

कालेलकर, ना. गो.

साहित्य : आफ्रिकान्स भाषेतील साहित्यनिर्मिती एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सुरू झाली. या भाषेतील काव्यनिर्मिती विशेष उल्लेखनीय आहे. अगदी आरंभीचे आफ्रिकान्स काव्य बोधवादी स्वरूपाचे असले, तरी दक्षिण आफ्रिकेतील युद्धानंतरच्या काव्यात भावनेची सखोलता आढळते. एलिझाबेथ आयबर्स (१९२५ – १९३९), डिर्क ऑपरमन (१९१४ – १९४२) हे काही नामवंत कवी होत. एलिझाबेथ आयब्र्सवर एमिली डिकिन्सनचा काहीसा प्रभाव जाणवतो. तिच्या भावकवितांतून स्त्रीचे भावविश्व, मातृत्व यांसारखे विषय येतात. ऑपरमनच्या काव्यावर टी. एस्. एलियटचा परिणाम झालेला दिसतो. त्याच्या काव्यातील प्रतिमा आधुनिक जीवनातून सहजपणे आलेल्या दिसतात. धार्मिक व नैतिक मूल्यांची तीव्र जाणिव असलेल्या ह्या कवीचे काव्य आध्यात्मिकतेकडे झुकलेले आहे.

साध्या बोधवादी गोष्टींपासून वैशिष्ट्यपूर्ण कथा-कादंबऱ्यांपर्यंतचा आफ्रिकान्स गद्यलेखनाचा विकास अल्पावधीत घडून आलेला आहे. कथा-कादंबऱ्यांतून दक्षिण आफ्रिकेतील जीवनाचे विविध प्रकारे दर्शन घडते. तथापि कल्पनाशक्तीची चमक गद्यलेखनात फारशी आढळत नाही. निसर्ग व मानव यांतील झगडा, वन्य प्राणिजीवन, वर्णविद्वेष इ. विषय कथा-कादंबऱ्यांतून हाताळलेले आहेत. डी. एफ्. मालेर्ब, सी. एम्. व्हान डेन हीव्हर, मायक्रो, पी. जे. शमन हे या क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक. लेपोल्ट आणि ग्रॉसकॉफ यांनी यशस्वी नाट्यलेखन केले आहे. या भाषेतील अनेक ग्रंथांचे यूरोपीय भाषांत अनुवाद झालेले आहेत.

कुलकर्णी,  अ. र.