इब्सेन, हेन्‍रिक : (२० मार्च १८२८–२३ मे १९०६). आधुनिक यूरोपीय नाट्याचा पाया घालणारा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा नॉर्वेजियन नाटककार. जन्म नॉर्वेमधील शेएन येथे. वडिलांच्या व्यापारातील अपयशामुळे इब्सेनचे बालपण आणि तारुण्यातील आरंभीची काही वर्षे फार हलाखीत गेली. वयाच्या पंधराव्या वर्षी तो ग्रिम्स्टा येथे आला आणि एका औषधविक्रेत्याचा साहाय्यक म्हणून त्याने काम केले. १८५० मध्ये तो ऑस्लोस आला. एका वर्षाने बर्गेन येथील द नॉर्वेजियन थिएटर या संस्थेसाठी दर वर्षी एक नवे नाटक लिहिण्याची कामगिरी त्याच्याकडे सोपविण्यात आली. या जबाबदारीच्या अनुषंगाने इब्सेनने डेन्मार्क व जर्मनी या देशांना भेटी देऊन तेथील रंगभूमींचा अभ्यास केला. १८५७ मध्ये तो वरील नाट्यसंस्थेचा दिग्दर्शक बनला. मध्यंतरी तो एका तरुणीच्या प्रेमात पडला परंतु त्यानंतर पाच वर्षांनी (१८५८) त्याने सुझाना थोरेसेन नावाच्या दुसर्‍याच एका तरुणीशी विवाह केला. आपल्या उमेदीची जवळजवळ सत्तावीस वर्षे इब्सेनने रोम, ड्रेझ्‌डेन व म्यूनिक येथे घालविली. १८९१ मध्ये तो नॉर्वेस परतला व उर्वरित आयुष्य त्याने ऑस्लो येथेच व्यतीत केले.

इब्सेन

इब्सेनने पंचवीस नाटके लिहिली. त्यांपैकी काही विशेष महत्वाची नाटके इंग्रजी शीर्षकार्थाने पुढे दिली आहेत : लव्ह्‌ज कॉमेडी (१८६२), ब्रांद (१८६६), पीर जिंत (१८६७), पिलर्स ऑफ सोसायटी (१८७७), ए डॉल्स हाऊस (१८७९), घोस्ट्‌स (१८८१), ॲन एनिमी ऑफ द पीपल (१८८२), द वाइल्ड डक (१८८४), हेड्‌डा गॅब्‍लर (१८९०) आणि द मास्टर बिल्डर (१८९२). नाटकांप्रमाणेच त्याच्या कविता (Digte, इं. शी. पोएम्स, १८७१) आणि निबंध प्रकाशित झाले आहेत.

यूरोपीय रंगभूमीच्या व नाट्यसाहित्याच्या प्रमुख धारेतील इब्सेन एक क्रांतिकारक नाटककार मानला जातो. अभिजात ग्रीक नाटकांतील काटेकोर बांधेसूदपणा आणि त्यांतील तत्त्वप्रवण संघर्ष हे विशेष इब्सेनच्याही नाटकांत आढळतात. पूर्वकालीन घटनांवर एखाद्या रहस्यकथेप्रमाणे हळूहळू प्रकाशझोत टाकत नेण्याचे तंत्र सॉफोक्लीझच्या ईडिपस टिरॅनस  या नाटकाधारे त्याने योजिलेले दिसते. घोस्ट्‌स  या नाटकातील ओस्वाल्डला आपल्या गुप्तरोगाचे होणारे ज्ञान व या बाबतीत त्याचे वडिलांशी असणारे साम्य इब्सेनवरील ग्रीक प्रभाव सूचित करतात. हेड्‍डा गॅब्‍लर, रिबेक्का, नोरा यांसारख्या तेजस्वी नायिका समर्थपणे उभ्या करण्यात इब्सेनची विशेष प्रसिद्धी आहे. त्याची अनेक नाटके पद्यात्मक असून त्यांवरील शेक्सपिअर व बायरन यांचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो. इब्सेनच्या नाट्यविकासाचा क्रम शेक्सपिअरच्या नाट्यविकासासारखाच आहे. त्याची सुरुवातीची नाटके परीकथा आणि इतिहास यांवर आधारित आहेत. नंतरची बरीचशी नाटके वैयक्तिक-सामाजिक समस्यांवर अधिष्ठित आहेत. परस्परविरोधी आशय आणि व्यक्तिरेखा यांची गुंफण करणारी एक ठळक प्रक्रियाच त्याच्या सर्व नाटकांतून जाणवते. इब्सेनचा नाट्याशय व व्यक्तिरेखा ढोबळ आहेत, असा मात्र याचा अर्थ नाही. इब्सेन शेवटीशेवटी गूढवादाकडे वळलेला दिसतो. वाइल्ड डकमधील हंसी व छोटी एडविग, मास्टर बिल्डरमधील आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारी चित्रे यांसारख्या गोष्टींतून इब्सेन गूढतेला सामोरा जाताना दिसतो. इब्सेनच्या नाट्यसृष्टीतील जीवनदर्शन शोकात्म आहे. त्याच्या नाटकांतील सामर्थ्यशाली व्यक्ती नियतीने शेवटी शोकात्मिकतेच्या दिशेने वळविलेल्या दिसतात. व्यक्तिजीवन हे नियतीनेच पूर्वनियोजित केलेले असते, असे इब्सेन वारंवार सूचित करतो. ट्रोल म्हणजे व्यक्तीला गूढगहन अशा भवितव्याकडे खेचून नेणारी हाक. ही ट्रोलची कल्पना त्याच्या नाट्य सृष्टीचा गाभा आहे. नियतीची ही साद कधी व्यक्तिरूपाने, तर कधी मृत्युरूपाने अवतरत असते. यांखेरीज तिची नानाविध रूपे त्याच्या नाटकांतून आढळतात.

इब्सेनच्या नाटकांतून खलनायक बाद झालेला आहे. खलत्वापेक्षाही गूढ नियतीनेच व्यक्तिजीवनाशी केलेले वैर त्याच्या नाटकांतून दिसून येते. त्याच्या सामाजिक नाटकांत निबर रूढी, जाचक सामाजिक संकेत, छुप्या लैंगिक वासना, विवाहसंस्थेतील कृत्रिमता, मानवी स्वार्थबुद्धी आणि व्यक्तीला नाना प्रकारे भिवविणारा भूतकाळ इत्यादींच्या रूपाने खलत्व रूपास येते. यामुळे इब्सेनची नाटके तत्त्वप्रवण बनतात परंतु त्याच्या नाटकांतील जाणवणारी तत्त्वे म्हणजे त्यांची स्थूल तात्पर्ये नव्हेत. उदा., ए डॉल्स हाऊस  या नाटकाचा निष्कर्ष म्हणजे स्त्रीला पुरुषापेक्षा कमी लेखणे व तशाच कमीपणाने तिला वागवणे अनिष्ट आहे, असाच आणि एवढाच नव्हे. या स्थूल निष्कर्षाच्याही पलीकडे इब्सेनचे जीवनविषयक तत्त्वज्ञान दडलेले असते. त्याची भूमिका नीत्‌शेशी काहीशी जुळल्यासारखी वाटते पण ती ख्रिस्ती विचारप्रणालीच्या विरोधी आहे, असे दिसत नाही. जेथे प्रेम आणि सामर्थ्य यांचे मीलन घडते, अशा भविष्याचा वेध घेणाऱ्या व्यक्तिरेखा आणि त्यांमागील जीवनचैतन्याच्या प्रेरणा यांत कुठेतरी इब्सेनचे जीवनविषयक तत्त्वज्ञान लपलेले असावे.

इब्सेनने नाटकाच्या बाह्य तंत्रातही क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले. तत्कालीन गिचमिडीचे व निर्जीव असे नाट्यतंत्र दूर सारून त्याने सुटसुटीत, स्फोटक आणि प्रत्यक्ष जीवनाला सामोरे जाणारे नाट्यतंत्र उभे केले. या तंत्राचा प्रभावी आविष्कार ए डॉल्स हाऊस सारख्या त्याच्या सामाजिक नाटकात दिसत असल्याने इब्सेनचे प्रस्तुत नाटक जगभर गाजले. इब्सेनच्या नाट्यविशेषांचे अनुकरण सर्वत्र होऊन ‘इब्सेनवाद’ अशी एक स्वतंत्र प्रणालीच जागतिक नाट्यक्षेत्रात प्रचलित झाली. १९३० नंतरची मराठी रंगभूमी व नाटके यांवर इब्सेनचा प्रभाव आहे. आज इब्सेनवाद मागे पडला असला, तरी एक श्रेष्ठ नाटककार म्हणून इब्सेनचे स्थान अढळ आहे.

संदर्भ : 1. Heiber, Hans; Trans. Tate, Joan, Ibsen : A Portrait of the Artist, London. 1969.

2. Knight, W. G. Ibsen, Edinburgh, 1962.

कुलकर्णी, अनिरुद्ध