ह्यूगो, व्हिक्टर : (२६ फेब्रुवारी १८०२–२२ मे १८८५). फ्रेंच कवी, कादंबरीकार व नाटककार. फ्रेंच स्वच्छंदतावादी साहित्यिकां-पैकी एक व्हिक्टर ह्यूगोज्येष्ठ व साक्षेपी साहित्यिक. जन्म पूर्व फ्रान्समधील बझांसाँ ह्या शहरी. नेपोलियनच्या सैन्यात त्याचे वडील अधिकारी होते. कायद्याचा अभ्यासानंतर तो साहित्याकडे वळला. आईच्या प्रोत्साहनाने त्याने उेपीर्शीींरींर्शीी ङळींींशीरळीश हे नियतकालिक सुरू केले (१८१९–२१). त्यात त्याने लामार्तीन, आंद्रे, द शेन्ये अशा कवींवर लेख लिहिले. वयाच्या चौदाव्या वर्षापासून तो स्वतःही कविता करीत असे. ह्या नियतकालिकातून त्याने स्वतःच्या तसेच त्याच्या मित्रांच्या कविताही प्रसिद्ध केल्या. १८२१ मध्ये त्याची आई मरण पावली. त्यानंतर एका वर्षाने त्याने आपली बालपणीची मैत्रिण आदेल फ्यूशे हिच्याशी विवाह केला.

ह्यूगोने आपला ‘डायव्हर्स ओड्स अँड पोएम्स ‘( इं. शी.) हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध केला (१८२३). त्यानंतर त्याची हान्स ऑफ आइस-लँड (इं. भा. १८२५) ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. शार्ल नोड्ये ह्या लेखक-पत्रकाराचे लक्ष या कादंबरीने वेधून घेतले आणि त्याने ह्यूगोला त्याच्या मित्रमंडळात आणले. हे सर्व स्वच्छंदतावादी होते. त्या वाङ्मयीन वर्तुळात गेल्यानंतर त्यांच्यासह त्याने ङर र्चीीश ऋीरपलरळीश (१८२३-२४) हे नियतकालिक सुरू केले. १८२४ मध्ये त्याने ‘न्यू ओड्स’ (इं. शी.) हा आपल्या नव्या कवितांचा संग्रहप्रसिद्ध केला. द स्लेव्ह किंग (१८२६, इं. भा.) हा त्याने लिहिलेला रोमान्स प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘ओड्स अँड बॅलड्स’ (१८२६, इं. शी.) आणि ले झॉरिआंताल (१८२९) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. ‘ओड्स अँड बॅलड्स’ ही त्याने पूर्वी लिहिलेल्या कवितांची परिवर्धित आवृत्ती. ले झॉरिआंतालमध्ये पौर्वात्य वातावरणाची निर्मिती दिसते. ह्या दोन्ही संग्रहांवर स्वच्छंदतावादाचा प्रभाव आहेच. त्याने रचिलेल्या ला लेजांद दे सिॲक्ल (१८५९, इं. शी. ‘द लेजंड ऑफ सेन्चूरीज’) ह्या महाकाव्यात. तीव्र कल्पनाशक्ती आणि रचनाकौशल्य हे त्याचे गुण प्रकर्षाने प्रकट होतात.

क्रॉम्वेल (१८२७) ह्या पद्य नाटकाला ह्यूगोने लिहिलेली प्रस्तावना हा स्वच्छंदतावादाचा अधिकृत जाहीरनामा समजला जातो. ह्या जाहीर-नाम्यात ‘द्राम’ ह्या नवीन नाट्यप्रकाराची तत्त्वे ह्यूगोने विशद केली. अभिजाततावादाचा त्याग करावा स्थलकालाचे ऐक्यही नको, पण कृतीचे (ॲक्शन) भान ठेवावे कलेच्या चेहऱ्यांवर मुखवटे चढवून ते झाकणारे जुने प्लॅस्टर फोडून काढावे कलेच्या संदर्भात नियम नाहीत आणि आदर्शही नाहीत, असे विचार त्याने मांडले. क्रॉम्वेलच्या दीर्घ रचनेमुळे ते नाटक कधीच रंगभूमीवर आले नाही तथापि यॅर्नानी (१८३०) हे पद्य नाटक आले आणि त्याच्या पहिल्या दोन प्रयोगांच्या वेळी अभिजाततावादी आणि स्वच्छंदतावादी ह्यांच्यात संघर्ष झाला. स्वच्छंदता-वादी नाट्यकृतींसाठी ह्या संघर्षात मिळालेला विजय संस्मरणीय होता.

मारिअन देलोर्मे (१८३१), ‘द किंग ॲम्यूजिस हिमसेल्फ’ (१८३२, इं. शी.), ‘राय ब्लास’ (१८३८, इं. शी.) आणि ‘द बर्ग्रेव्ह्ज’ (१८४३, इं. शी.) ही त्याची अन्य काही नाटके. ह्यूगोला त्याची आरंभीचीकीर्ती त्याच्या नाटकांमुळे मिळाली परंतु त्याहीपेक्षा मोठी कीर्ती त्याला त्याच्या द हंचबॅक ऑफ नोटरडॅम (१८३१, इं. भा.) ह्या ऐतिहासिक कादंबरीमुळे मिळाली. अकराव्या लूईच्या कारकिर्दीतील मध्ययुगीन जीवन ह्या कादंबरीत प्रतिबिंबित झाले आहे. कुबडा क्वासिमोदी आणि जिप्सी मुलगी एस्मेराल्दा ह्यांच्या जीवनात आर्चडीकन फ्रोल्लो आणि फीबसनावाचा सैनिक कसे दुःख निर्माण करतात, हे दाखवून ह्यूगो तत्कालीन समाजातील अन्यायाविरुद्ध प्रखर टीका करतो. तत्कालीन समाजाच्या सदसद्बुद्धीला ह्या कादंबरीने जागृत केले. द लास्ट डेज ऑफ ए कंडेम्ड (१८२९, इं. भा.) ह्या त्याच्या आधीच्या कादंबरीपेक्षा द हंचबॅक … ही अधिक प्रभावी होती. द लास्ट डेज .. मध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या एका कैद्याचा अखेरचा दिवस हा विषय आहे. मानवतावादी दृष्टिकोणातून लिहिलेल्या ह्या कादंबरीत मृत्युदंडाच्या शिक्षेविरुद्ध ह्यूगोने आपला निषेध नोंदविला होता. ले मिझेराब्ल (१८६२) ही त्याची कादंबरीही अतिशय यशस्वी ठरली. ह्या कादंबरीची अनेक भाषांतरे झाली. साने गुरुजींनी दुःखी ह्या नावाने ह्या कादंबरीचा आशय मराठीत संक्षिप्त स्वरूपात लिहिला. आपल्या प्रतिभेच्या विविध पैलूंनी ह्या थोर साहित्यिकाने एकोणिसावे शतक उजळून टाकले.

१८१४ मध्ये स्थापन झालेली बूर्बाँ राजवट १८३० मध्ये संपुष्टात आली आणि जुलै १८३० मध्ये ⇨ लूई फिलिप आर्लेआं ह्याची राजवट आली. ह्या राजवटीत ह्यूगोला संपत्ती आणि मानमान्यता मिळाली. १५ वर्षे तो फ्रान्सचा अधिकृत कवी होता.

ह्यूगोचे १८३०–४० ह्या काळात चार काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. ‘ऑटम लीव्ह्ज’ (१८३१, इं. शी.), साँग्ज ऑफ ट्वायलाइट (१८३५, इं. भा.), ‘इनर व्हॉइसिस’ (१८३७, इं. शी.) आणि ‘सनलाइट अँड शॅडोज’ (१८४०, इं. शी.). ‘ऑटम लीव्ह्ज ‘मध्येउत्कट आत्मपरता आहे, तर ‘साँग्ज ऑफ..’ मध्ये उघडपणे राजकीय स्वरूपाच्या कविता आहेत. ‘इनर व्हॉइसिस ‘मधल्या कविता आत्मपर आणि तत्त्वचिंतनात्मक आहेत. ‘सनलाइट अँड शॅडोज ‘मध्ये रंग आणि चित्रमयता निर्माण करण्याचे त्याचे सामर्थ्य प्रत्ययास येते तथापि केवळ व्यक्तिगत भावनांचा आविष्कार घडवून आणण्यात ह्यूगोला समाधाननव्हते. त्याला आपल्या काळाचा खणखणीत प्रतिध्वनी व्हावयाचे होते. त्याच्या कवितांतून राजकीय आणि तात्त्विक समस्या त्या काळातील धार्मिक आणि सामाजिक अस्वस्थतेच्या आवाजाशी एकरूप करावयाच्या होत्या. त्याच्या अनेक कविता नेपोलियनला उद्देशून लिहिलेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर फ्रान्सने पुन्हा प्रजासत्ताक ध्येयांकडे जावे, ह्या त्याच्या समकालिनांच्या भावनेत तो सहभागी होता.

उपर्युक्त काळातली ह्यूगोची सर्जनशीलता इतकी उत्कट होती, कीत्याने ह्या काळात नाटकेही लिहिली. आपल्या राजकीय आणि सामाजिक कल्पनांसाठी त्याने ह्या नाटकांच्या रूपाने एक व्यासपीठ निर्माण केले. द किंग्ज फूल (१८३२, इं. भा.), बोर्जिया अँड मारी ह्यूडर (१८३३), ‘आंजेलो, टायरंट ऑफ पॅड्यूआ’ (१८३५, इं. शी.) ही त्यांतील काही नाटके होत.

काही अयशस्वी प्रयत्नांनंतर फ्रेंच अकादमीवर त्याची निवड होऊन त्याच्या वाङ्मयीन कर्तृत्वाला मान्यता मिळाली (१८४१).

ह्यूगोच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षाही निर्माण झाली होती. आरंभी तो राजसत्तावादी होता नंतर तो नेमस्त झाला आणि हळूहळू तो उदारमतवादी झाला. परंतु १८४८ च्या क्रांतीत जेव्हा लूई फिलिप आर्लेआं हा सत्तेवरून खेचला गेला, तेव्हा लामार्तीनच्या हंगामी सरकारशी सूर जुळवणे त्याला आरंभी अवघड गेले. कारण अजूनही घटनात्मक राजेशाही फ्रान्ससाठी उत्तम ठरेल असे त्याला वाटत होते. तरीही घटना समितीत पॅरिसतर्फे ‘डेप्युटी’ म्हणून आणि पुढे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर तो निवडून गेला. पुढे १८४८ मध्ये पुन्हा क्रांती होऊन नेपोलियन बोनापार्टचा पुतण्या लूई नेपोलियन हा अध्यक्ष म्हणून निवडून आला आणि नंतर संसद विसर्जित करून २ डिसेंबर १८५२ रोजी तिसरा नेपोलियन ह्या नावाने सम्राट झाला. तो अध्यक्षपदाचा उमेदवार असताना ह्यूगोने त्याला पाठिंबा दिला होता परंतु जसजसा तो अधिकारशाहीकडे झुकू लागला, तसतसा त्याला विरोध होऊ लागला. त्याच्या विरोधकांत ह्यूगोही होता. त्यामुळे त्याला ब्रूसेल्सला पळून जावे लागले. १८५१–७० ह्या काळात तो परागंदाचे जीवन जगला.

परागंदावस्थेत ह्यूगोने जे लेखन केले, त्यात तिसऱ्या नेपालियनवरच्या उपरोधप्रचुर लेखनाचा समावेश आहे. उदा., ‘द पनिशमेंट्स’ (१८५३, इं. शी.) हा काव्यसंग्रह . अशा राजकीय कवितेने त्याच्या मनाला समाधान लाभले, तरी तशा कवितेच्या मर्यादाही त्याला जाणवत होत्या. त्यामुळे तो १८४०–५० ह्या काळातील त्याच्या अप्रकाशित कवितांकडे वळला आणि ‘द कॉन्टेम्प्लेशन’ (१८५६, इं. शी.) ह्या त्याच्या नव्या काव्य-संग्रहावर काम करू लागला. त्याच्या कवितांपैकी सर्वांत विशुद्ध म्हणाव्यात अशा कविता या संग्रहात आहेत. त्या हृदयस्पर्शीही आहेत कारण त्याच्या दिवंगत कन्येच्या आठवणी ह्या कवितांच्या केंद्रस्थानी आहेत. त्याचप्रमाणे एका चिंतकाचे भारलेले मनही त्या कवितांत आहे. त्याच्या काही कवितांतून संदेह आणि श्रद्धा ह्यांच्यातील संघर्षाने त्रस्त-अस्वस्थ झालेले मन प्रत्ययास येते. ‘द एंड ऑफ सेटन’ (इं. शी.) व ‘गॉड’ (इं. शी.) ही दोन काव्येही त्याने लिहिली. त्यांतून तो दुष्टतेच्या (एव्हिल) समस्येशी झगडताना दिसतो. १८५४–६० ह्या काळात लिहिलेली ही काव्ये आहेत. उपर्युक्त ले मिझेराब्ल ही कादंबरीही ह्या परागंदा असल्याच्या काळात लिहिलेली आहे. ह्या काळात लिहिलेले अन्य काही ग्रंथ असे : विल्यम शेक्सपिअर (१८६४) हा निबंध ग्रंथ द टॉय्लर्स ऑफ द सी (१८६६, इं. भा.) आणि द मॅन हू लाफ्स (१८६९, इं. भा.) ह्या दोन कादंबऱ्या.

नाइंटीथ्री (१८७४, इं. भा.) ही त्याची अखेरची कादंबरी. तीत फ्रान्सच्या इतिहासातील गोंधळाचे आणि झुंडशाहीचे १७९३ हे वर्ष केंद्रस्थानी आहे आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मानवी न्याय आणि दया ह्यांचे प्रश्न उभे केलेले आहेत. १८७१ मध्ये फ्रान्समध्ये तिसऱ्या प्रजासत्ताकाची स्थापना झाल्यानंतर ह्यूगो पॅरिसला परतला. ‘नॅशनल असेंब्ली ‘मध्ये तो ‘डेप्यूटी’ झाला (१८७१) पण एकाच महिन्यानंतर त्याने राजीनामा दिला. आयुष्यातल्या कसोटी घेणाऱ्या अनुभवांनंतर तो थकला होता. इतरही दुःखदायक प्रसंग आले. १८६८ मध्येच त्याची पत्नी मरण पावली. १८७१ मध्ये त्याचा एक मुलगा मरण पावला आणि दुसरा १८७३ मध्ये निवर्तला. त्याला पन्नास वर्षे निष्ठेने साथ देणारी त्याची प्रेयसी ज्यूलिएट ही १८८३ मध्ये निधन पावली. त्यानंतर दोन वर्षांनी ह्यूगो मरण पावला. राष्ट्रीय इतमामाने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ह्यूगोने विपुल लेखन केले. फ्रेंच साहित्यात त्याच्या साहित्याचे खूप कौतुक झाले असे म्हणावे लागेल तथापि त्याच्या मरणसमयी थोर कवी ही त्याला मिळालेली मान्यता पुढे क्षीण होत गेली. त्याच्या काही थोड्या कविताच स्मरल्या जाऊ लागल्या. ले मिझेराब्लची कीर्ती मात्र कमी झालीनाही. विख्यात फ्रेंच कादंबरीकार आंद्रे झीद ह्याने ह्यूगोचे वर्णन सर्वश्रेष्ठ फ्रेंच कवी असे केले होते.

पॅरिस येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Affron, Charles, A Stage for Poets : Studies in the Theatre of Hugo and Musset, 1971.

          2. Brombert, Victor, Victor Hugo and the Visionary Novel, 1984.

          3. Grant, M. Eliot, The Career of Victor Hugo, 1945, reprinted 1969.

         4. Houston, John Porter, Victor Hugo, rev. ed. 1988.

         5. Maurois, Andre, Olympio … The Life of Victor Hugo, 1956, reissued 1985.

         6. Richardson, Johanna, Victor Hugo, 1976.

गुडेकर, विजया म.