सीम्नाँ, झॉर्झ : (१३ फेब्रुवारी १९०३— ४ सप्टेंबर १९८९). बेल्जियन साहित्यिक, रहस्यकथाकार. फ्रेंच भाषेत लेखन. जन्म बेल्जियममधील लीएझ येथे. त्याची आई डच होती वडील फ्रेंच. वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे त्याला वयाच्या पंधराव्या वर्षीच शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर वर्षभराने लीएझ गॅझेट या स्थानिक

झॉर्झ सीम्नाँवर्तमानपत्रासाठी वार्ताहर म्हणून तो काम करु लागला. त्या काळात गुन्हेगारी न्यायालयांतल्या व पोलीस कचेऱ्यांतल्या वार्ता गोळा करण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले. या अनुभवाचा त्याला कादंबऱ्या लिहिताना खूप उपयोग झाला. अबोर्ड द आर्क (इं. भा.) ही त्याची पहिली कादंबरी त्याने वयाच्या सतराव्या वर्षी ‘झॉर्झ सीम’ ह्या टोपणनावाने लिहिली. त्यानंतर निरनिराळ्या टोपणनावांनी त्याने गुप्तहेरांच्या चातुर्यावर आधारलेल्या कित्येक कादंबऱ्या लिहिल्या. त्याने एकूण सतरा टोपणनावांनी लिहिलेल्या सु. ४०० कादंबऱ्या व स्वतःच्या नावाने प्रसिद्घ केलेल्या २०० पेक्षा जास्त कादंबऱ्या, तसेच इतर प्रकारचे विपुल लेखन हे त्याच्या अफाट सर्जनशील निर्मितीची साक्ष पटवणारे आहे. तो अत्यंत लोकप्रिय असा बहुप्रसव लेखक होता. वाङ्‌मयीन दर्जा, गुणवत्ता, विपुल साहित्यनिर्मिती व अफाट लोकप्रियता या गुणांचा दुर्मिळ संगम त्याच्या ठायी दिसून येतो. १९२४ मध्ये तो पॅरिसला गेला आणि १९३० मध्ये त्याने कादंबरी-लेखनातून ‘माय्‌ग्रे ’ ही एका इन्स्पेक्टरची अविस्मरणीय व्यक्तिरेखा प्रथमतः निर्माण केली. पुढे त्याच्या अनेक कादंबऱ्यांतून येणारा इन्स्पेक्टर माय्‌ग्रे अतिशय लोकप्रिय ठरला. काहींच्या मते माय्‌ग्रेची व्यक्तिरेखा ही ⇨आर्थर कॉनन डॉइल (१८५९— १९३०) ह्यांनी निर्मिलेल्या ‘शेरलॉक होम्स’ ह्या चतुर गुप्तहेराच्या, जगद्‌विख्यात ठरलेल्या व्यक्तिरेखेच्या तोडीची आहे. माय्‌ग्रे हा अतिशय शांतपणे विचार करून, खोल अंतर्दृष्टीने गुंतागुंतीच्या गुन्हेगारी प्रकरणांच्या तळाशी जातो. गुन्ह्याला वेढणारी भयाकुलता आणि दुःख ह्यांची प्रभावी मांडणी तर सीम्नाँ करतोच परंतु त्याच्या कादंबऱ्यांतून एक भावगेय वातावरणही प्रत्ययास येते. त्यामुळे गुप्तहेर कथा-कादंबऱ्यांच्या सांकेतिकतेपासून त्याचे लेखन लक्षणीयपणे मुक्त राहते. अमुक एका गुन्ह्यामागची पार्श्वभूमी काय आणि गुन्हा करण्यामागील उद्देश काय हे वाचकांना स्पष्टपणे उलगडावे आणि रहस्य उलगडत उलगडतच कादंबरी पुढे जावी असा त्याचा प्रयत्न असतो. रहस्याचा उलगडा काय, हे त्यालाही माहीत नसून तोही आपल्याबरोबरच त्याचा शोध घेत आहे, अशीही जाणीव वाचकांना होते. माय्‌ग्रेची व्यक्तिरेखा पूर्णपणे विकसित करून आणि त्याच्या व्यक्तिगत मानसिकतेचे दर्शन घडवून सीम्नाँने ती कमालीची जिवंत केलेली आहे.

अनेक समीक्षकांना ‘माय्‌ग्रे’ ही व्यक्तिरेखा असलेल्या कादंबऱ्यांपेक्षा त्याच्या अन्य कादंबऱ्या उत्कृष्ट आहेत, असे वाटते. उदा., द मॅन हू वॉच्‌ड द ट्रेन्स गो बाय (१९३८, इं. भा.) आणि बरीचशी आत्मचरित्रात्मक असलेली पेडिग्री (१९४८). कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखेचा मनोविश्लेषणात्मक वेध घेणाऱ्या कादंबऱ्याही त्याने लिहिल्या. उदा., द हार्ट ऑफ अ मॅन (१९५०). ह्या कादंबरीत त्याने एका अभिनेत्याच्या जीवनातील सरत्या अवस्थांचे चित्रण केले आहे. द लिट्ल सेंट (१९६५) ह्या कादंबरीत त्याने एका थोर कलाकाराच्या जडणघडणीचा काळ दाखविला आहे. गंभीर आशयाच्या ह्या मानसशास्त्रीय कादंबऱ्यांनीच सीम्नाँने मुख्यत्वे समीक्षकांचे व जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. आंद्रे झीद याने सीम्नाँवर प्रबंध लिहून, ‘सीम्नाँ हा फ्रेंच भाषेतला आजचा सर्वश्रेष्ठ कादंबरीकार आहे’ , अशा शब्दांत त्याचा गौरव केला. फ्रांस्वा मोर्याक, टी. एस्. एलियट, इटालियन कवी मोन्ताले यांनीही सीम्नाँच्या कादंबऱ्यांतील गुणविशेषांची तारीफ केली आहे. त्याच्या बहुतेक कादंबऱ्यांची इंग्रजी भाषांतरे उपलब्ध आहेत. जगभरातल्या अनेक देशांतल्या अनेक भाषांत त्याच्या कादंबऱ्यांची भाषांतरे झाली आहेत. भाषांतराद्वारे जगभर वाचला जाणारा हा लेखक आहे. त्याच्या द ग्लास केज (१९७१, इं. भा.) ह्या कादंबरीचा एस्. डी. इनामदार यांनी काचेचा पिंजरा (१९८८) हा मराठी अनुवाद केला आहे. सीम्नाँच्या अनेक कादंबऱ्या नाटक, चित्रपट, दूरदर्शन या माध्यमांतून रुपांतरित झाल्या आहेत. त्याच्या सु. चाळीस कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आहेत. त्याने जगाच्या कानाकोपऱ्यांतून भ्रमंती केली व ह्या देशोदेशींच्या अनुभवांचे पडसाद त्याच्या साहित्यातून उमटले आहेत. त्याचे इंटिमेट मेम्वार्स हे आत्मकथन फ्रान्समध्ये १९८१ मध्ये, तर अमेरिकेत १९८४ मध्ये प्रकाशित झाले. त्यात त्याने आपल्या खाजगी जीवनाची मनमोकळी चर्चा केली आहे.

स्वित्झर्लंडमधील लोझां येथे तो निधन पावला.

इनामदार, श्री. दे. कुलकर्णी, अ. र.