ब्रताँ, आंद्रे : (१९ फेब्रुवारी १८९६-२८ सप्टेंबर १९६६). फ्रेंच कवी आणि⇨अतिवास्तववाद ह्या कला-साहित्यविषयक चळवळीचा आद्य प्रवर्तक. तशब्रे ह्या शहरी जन्म. शालेय जीवनापासूनच कवितालेखन. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर, पहिल्या महायुद्धाच्या काळात, फ्रेंच सैन्यात नोकरी. तेथे त्याच्या वैद्यकीय ज्ञानामुळे मनोदोषचिकित्साकेंद्रांतून त्याला काम देण्यात आले. ते करीत असताना जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड ह्याच्या ग्रंथांचा अभ्यास करण्याची संधी ब्रताँला मिळाली. ह्या विनाशाच्या प्रचीतीतून प्रस्थापित विचारसरणी, सामाजिक वर्तनाचे नियम, प्रचलित नीति-सौंदर्यमूल्ये ह्यांचे वैयथर्य जाणवलेल्या काही कलावंतांनी स्थापन केलेल्या ⇨दादावादकडे ब्रताँ आरंभी वळला. तथापि ह्या संप्रदायाच्या प्रभावाखाली तो फार काळ राहिला नाही. १९२४ साली अतिवास्तववादी चळवळीचा पहिला जाहीरनामा त्याने काढला आणि नंतर आणखी दोन जाहीरनामे काढले (१९३०, १९३४). ह्या जाहीरनाम्यांतून अतिवास्तववादी कला-साहित्यभूमिका स्पष्ट करण्यात आली होती. ब्रताँ ज्याच्यापासून दूर झाला, त्या दादावादाला सर्वच निरर्थक वाटत होते व त्याची भूमिका विवेकविरोधी होती. तथापि दादावाद्यांनी कला-साहित्याच्या संदर्भात अनेक धीट आणि तऱ्हेवाईक प्रयोग करून विमुक्त सर्जनशीलतेला जी चालना दिली होती, तिच्यातूनच अतिवास्तववादाचा उदय झाला होता. उच्च श्रेणीच्या वास्तवाचा-म्हणजेच अतिवास्तवाचा-शोध घेणे हे अतिवास्ववादाचे उद्दिष्ट होते आणि स्वप्नांतून वा अनिर्बंध कल्पानातरंगांतून हा शोध घेण्याचा त्याचा प्रयत्नव होता. तसेच भाषेला परंपरागत बांधणीपासून आणि अर्थापासून मुक्त करून अनेक अनाकलनीय, गूढ अनुभव सशब्द करणे शक्य होईल, अशी ब्रताँप्रणीत अतिवास्तववादाची भूमिका होती.

ले शाँ मान्येतिक (१९२१, इं. शी. मॅगनेकटिक फील्ड) आणि ले व्हाझ कोम्युनिकाँ (१९३२) हे त्याचे उल्लेखनीय काव्यग्रंथ असून नादज्या (१९२८) ही कादंबरीही त्याने लिहिली आहे. तथापि कवी वा कादंबरीकार म्हणून ब्रताँ हा विशेष ख्यातकीर्त नसून अतिवास्तववादाचा आद्य प्रवर्तक म्हणूनच तो मुख्यतः ओळखला जातो. पॅरिस येथे तो निधन पावला.

टोणगावकर, विजया