सीरानो द बेर्झीराक, साव्हीनॉद : (६ मार्च १६१९— २८ जुलै १६५५). फ्रेंच उपरोधकार आणि नाटककार. जन्म पॅरिस शहरी. बेर्झीराक ह्या पॅरिस जवळच्या गावातील एका धर्मगुरुकडे आरंभीचे काही शिक्षण घेतल्यानंतर ‘कॉलेज द बोव्हे’ मध्ये तो शिकू लागला. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने लष्करात नोकरी पतकरली.

साव्हीनॉदतिथे असताना युद्घात तो दोनदा गंभीर जखमी झाला होता. वयाच्या तिसाव्या वर्षी तो साहित्यनिर्मितीकडे वळला. त्या सुमारास फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨प्येअर गासँदी (१५९२— १६५५)ह्याच्या सहवासात आला. गासँदी हा जसा तत्त्वज्ञ, तसाच खगोलशास्त्राचा अभ्यासकही होता. गासँदीच्या प्रभावातून सीरानोने ए व्हॉयेज टु द मुन विथ सम अकाउंट ऑफ द सोलर वर्ल्ड ( मरणोत्तर प्रकाशित, १६६२ इं. भा. १७५४) हे पुस्तक लिहिले. चंद्र आणि सूर्य ह्यांवर जाण्यासाठी केलेल्या प्रवासांच्या काल्पनिक कथांतून काही धार्मिक आणि ग्रहताऱ्यांविषयीच्या समजुती ह्यांवर त्याने उपरोधप्रचुर टीका केली. सीरानोने आपल्या अशा लेखनातून वैज्ञानिक ज्ञानाचा आणि दृष्टीचा उपयोग केल्यामुळे नव्या वैज्ञानिक प्रणाली लोकप्रिय होण्यास मदत झाली. पण त्याचा रोख मुख्यतः अधिकारशाहीवर—विशेषतः धार्मिक— टीका करण्याचा होता. त्याच्या लेखनातील कविकल्पनांतून फोनो, जड पदार्थांची आणवीय संरचना, क्ष-किरण अशा पुढील काळातील शोधांचा विषय ठरलेल्या कल्पनांचे पूर्वसूचन जाणवते परंतु त्यांतून वैज्ञानिक प्रणाली आकाराला आणण्याचा प्रयत्न दिसत नाही.

सीरानोने लिहिलेल्या नाटकांत ‘द डेथ ऑफ ॲग्रिपाइन’ (१६५४, इं. शी.) ही शोकात्मिका आणि ‘द पेडंट इमिटेटेड’ (१६५४, इं. शी.) ही सुखात्मिका ह्यांचा समावेश होतो. ह्यांपैकी ‘द डेथ …’ मध्ये पावित्र्यविडंबनाचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता, तसेच ‘द पेडंट …’ बद्दलही प्रतिकूल भावना व्यक्त केली गेली होती. परंतु ह्या सुखात्मिकेतला जिवंतपणा नंतरच्या पिढ्यांतील वाचकांना भावतो. विख्यात फ्रेंच सुखात्मिकाकार ⇨मोल्येर (१६२२— ७३) ह्याने आपल्या एका सुखात्मिकेतील काही प्रसंगांसाठी ‘द पेडंट…’ चा उपयोग करून घेतला होता.

सीरानो हा विज्ञाननिष्ठ विचारांचा होता. त्याच्या कादंबऱ्यांतून पुढे विकसित होत गेलेल्या ⇨विज्ञानकथा ह्या वाङ्‌मयप्रकाराचे पूर्वसूचन आढळते. विज्ञान आणि तंत्रविद्या ह्यांच्या विकासातून मानवाचे भविष्य उजळेल, असा त्याचा विश्वास होता. त्याने खणखणीत राजकीय वादांसाठी पुस्तपत्रेही लिहिली. अशा ह्या साहित्यिकाच्या साहित्यगुणांना आणि मौलिकतेला विसाव्या शतकातल्या साहित्याभ्यासकांनी मान्यता प्राप्त करून दिली. फ्रेंच नाटककार ⇨एदमाँ रॉस्तां (१८६८— १९१८) ह्याने आपले सीरानो द बेर्झीराक हे नाटक त्याच्या जीवनाच्या आधारे रचल्याचे म्हटले जात असले, तरी ते अनैतिहासिक असल्याची टीका झालेली आहे.

पॅरिस येथेच सीरानोचे निधन झाले.

कुलकर्णी, अ. र.