मादाम द स्तालस्ताल, मादाम द : (२२ एप्रिल १७६६ — १४ जुलै १८१७). चतुरस्र फ्रेंच लेखिका. जन्म पॅरिस शहरी. आईवडील स्विस. मूळ नाव आन-ल्वीझ झर्में नेकेर. तिचे वडील झाक नेकेर हे फ्रान्सचा राजा सोळावा लूई ह्याच्या सरकारात अर्थमंत्री होते. आई सुझान हिने पॅरिसमध्ये ख्यातनाम वाङ्मयीन–राजकीय सालाँ ( विद्वान, कला-कार, साहित्यिक, रा ज की य अशा व्यक्तींच्या बैठकीचे ठिकाण ) स्थापन केला होता. लहान असतानाही झर्में नेकेर आपल्या आईच्या सालाँमध्ये जाई तिथल्या चर्चा ऐकत असे आणि बौद्धिक कुतूहलांतून कधी कधी त्या चर्चांत भागही घेई. १७८६ मध्ये तिचा विवाह पॅरिसमध्ये असलेला स्वीडिश राजदूत एरिक द स्ताल-होलस्टाइन ह्याच्याशी झाला. काही व्यावहारिक हेतूने घडवून आणलेला हा विवाहसंबंध १७९७ मध्ये संपुष्टात आला.

  वयाच्या एकविसाव्या वर्षीच मादाम द स्तालने दोन नाटके लिहिली होती तथापि तिला कीर्ती प्राप्त झाली, ती लेटर्स ऑन द वर्क्स अँड द कॅरॅक्टर ऑफ जे. जे. रूसो (१७८८, इं. भा. ) या साहित्यकृतीमुळे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात आपल्या नवर्‍याच्या राजनैतिक दर्जामुळे तिला पॅरिसमध्ये राहूनही संरक्षण मिळाले. तिला तिचे असे काही राजकीय विचार होते. इंग्लंडमध्ये प्रचलित असलेल्या घटनात्मक राजेशाहीसारखी व्यवस्था फ्रान्समध्ये असावी, असे तिला वाटत होते. फ्रान्समध्ये दहशतीचे वातावरण असताना आपल्या अनेक समविचारी मित्रांना पळून जाण्यासाठी तिने मदत केली होती. सुंदर स्त्रियांत तिची गणना होत नसली, तरी एक बुद्धिमान आणि चतुर संभाषक म्हणून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विलक्षण प्रभाव पडे. अनेक पुरुष तिच्याकडे आकर्षिले जात आणि एकाच वेळी तिची अनेक प्रेमप्रकरणे चालू असत. विख्यात जर्मन पंडित आणि कवी ⇨ आउगुस्ट व्हिल्हेल्म फोन श्लेगेल हाही तिच्या प्रियकरांपैकी एक होता. बेंजामिन कॉन्स्टंट ह्या फ्रेंच-स्विस् लेखकाबरोबर तिने बारा वर्षे व्यतीत केली. कॉन्स्टंटने अडॉल्फ ह्या आपल्या कादंबरीत तिच्या-बरोबरच्या नातेसंबंधांचे विश्लेषण केले आहे.

  १७९३ मध्ये ती स्वित्झर्लंडला गेली आणि जिनीव्हाजवळच्या एका ठिकाणी असलेल्या तिच्या कुटुंबाच्या मालकीच्या घरात राहू लागली. तेथे यूरोपातील काही बुद्धिमंत एकत्र जमू लागले. फ्रान्समधले दहशतीचे वातावरण संपल्यानंतर १७९४ मध्ये ती फ्रान्समध्ये परतली. तिच्या सालाँमध्ये बुद्धिमंत पुन्हा जमू लागले. तिने राजकीय व वाङ्मयीन विषयां-वर अनेक निबंध लिहिले. त्यांतील ए ट्रीटिझ ऑन द इन्फ्ल्यूअन्स ऑफ द पॅशन्स अपॉन द हॅपिनेस ऑफ इंडिव्हिज्यूअल्स अँड ऑफ नेशन्स (१७९६, इं. भा. ) हा लेख यूरोपीय ⇨ स्वच्छंदतावादाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरला. स्वच्छंदतावादाच्या संदर्भात जर्मनीमध्ये ज्या कल्पना आकाराला येत होत्या, त्यांचा तिने मनःपूर्वक अभ्यास केला होता. ए ट्रीटिज ऑफ एन्शंट अँड मॉडर्न लिटरेचर अँड द इन्फ्ल्यूअन्स ऑफ लिटरेचर अपॉन सोसायटी (१८४०, इं. भा. ) हे तिचे पुस्तक अनेक नवनव्या कल्पनांनी संपन्न आहे. साहित्य हे सतत पूर्णत्वाच्या प्रकाशाकडे जात असते, असा विश्वास ह्या पुस्तकात तिने व्यक्त केला आहे. १८०२ मध्ये तिची देल्फीन ही कादंबरी प्रसिद्ध झाली. प्रेमातून आनंद प्राप्त करू पाहणार्‍या एका सुंदर स्त्रीच्या ह्या कहाणीत उदारमतवाद, घटस्फोट, ब्रिटिश लोक आणि प्रॉटेस्टंट पंथ ह्यांची प्रशंसा केली आहे. नेपोलियनची ह्या कादंबरीबद्दलची प्रतिक्रिया तीव्र नाराजीची होती. त्याच्या दृष्टीने ती अनैतिक, समाजविरोधी आणि कॅथलिक पंथविरोधी होती. परिणामतः मादाम द स्तालची पॅरिसमधून हकालपट्टी करण्यात आली. एरव्हीही नेपोलियनची शत्रू म्हणूनच तिची यूरोपमध्ये प्रतिमा होती. हकालपट्टीनंतर ती जर्मनीच्या दौर्‍यावर गेली. तिथला समाज आणि संस्कृती ह्यांच्याशी ती एकरूप झाली. पुढे ती इटलीला गेली आणि तेथे तिला कॉरीन (१८०७) ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. देल्फीन आणि कॉरीन ह्या दोन्ही कादंबर्‍यांच्या लेखनाचे वळण स्वच्छंदतावादी आहे. द लालमाग्न्य (१८१०, इं. शी. ‘ ऑन जर्मनी ’ ) ह्या तिच्या ग्रंथातही स्वच्छंदतावादाला अनुकूल अशी भूमिका दिसते. त्यामुळे स्वच्छंदतावादाची ती एक अग्रदूत मानली जाते. द लालमाग्न्यमध्ये तिने साहित्याचे दोन प्रकार मानले : एक उत्तरेकडचा, म्हणजे जर्मनी, इंग्लंड आणि स्कँडिनेव्हिया येथील आणि दुसरा दक्षिणेकडचा, म्हणजे फ्रान्स आणि इटली येथील. तिच्या मते उत्तरेकडचे साहित्य स्वच्छंदतावादी, मौलिक आणि मुक्त आहे, तर दक्षिणेकडचे अभिजाततावादी आणि सांकेतिक आहे. ह्या पुस्तकात जर्मन राष्ट्रवादाचाही गौरव आहे. हे पुस्तकही नेपोलियनच्या तिच्यावरच्या रोषास पात्र ठरले. १८१० मधील ह्या पुस्तकाची फ्रेंच आवृत्ती जप्त करून नष्ट करण्यात आली. अखेरीस १८१३ मध्ये ती इंग्लंडमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. पोलिसांनी पिच्छा पुरवल्यामुळे मादाम द स्ताल अखेरीस जिनीव्हाजवळच्या आपल्या घरी येऊन राहिली. रोक्का नावाच्या एका चोवीस वर्षीय इटालियन लेफ्टनंटबरोबर तिने विवाह केला होता (१८११). नेपोलियनचा पाडाव झाल्यानंतर ती पॅरिसला आली. अनेक कारणांनी तिच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम झाला होता. पॅरिसमध्येच ती निधन पावली.

  मादाम द स्तालचे महत्त्व वाङ्मयीन क्षेत्रात जेवढे आहे, त्यापेक्षा अन्य क्षेत्रांतही तिचे अधिक महत्त्व आहे. तिच्या कादंबर्‍या, नाटके आज फारशी  वाचली जात नाहीत पण तिने केलेल्या वैचारिक लेखनाचे मोल आजही मानले जाते. ती ज्या काळात जगली, त्या काळाचे परिपक्व भान तिला होते. यूरोपीय वैचारिक आणि वाङ्मयीन जगतावर तिचा मोठा प्रभाव होता.

 संदर्भ : 1. Gutwirth, Madelyn, Madame de Stael Novelist : The Emergence of the Artist as Woman, 1978. 

           2. Herold, Christopher, J. Mistress to an Age : A Life of Madame de Stael, 1981. 

           3. Hogsett, Charlotte, The Literary Existence of Germaine de Stael, 1987. 

           4. Wayne, Andrews, Germaine : A Portrait of Madame de Stael, 1963. 

           5. Winegarten, Renee, Madame de Stael, 1985.                      

कुलकर्णी, अ. र.