बोमार्शे, प्येअर ऑगस्तँ काराँ द : (२४ जानेवारी १७३२ – १८ मे १७९९). प्रसिद्ध फ्रेंच नाटककार. पॅरिसमध्ये जन्मला. त्याच्या नाटकातील क्रांतिकारक सामाजिक-राजकीय विचार पुढे घडून येणार असणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांतीचे सूचक ठरले. बोमार्शेने काही काळ वडिलांचा घड्याळे बनविण्याचा धंदा चालविला. पुढे राजघराण्यात संगीतशिक्षक या नात्याने त्याने काम केले. बोमार्शेचे आयुष्य अनेक प्रकारच्या साहसांनी भरलेले आहे. राजदरबारी हळूहळू बस्तान बसवून त्याने सरदारकीचा किताब विकत घेतला. तसेच अमेरिकन बंडखोर राज्यांना शस्त्रात्रे पुरविली. राजाच्या वतीने परकीय देशात गुप्त कामगिऱ्या पार पाडण्याचे काम त्याने अंगावर घेतले. स्वतःचा उत्कर्ष साधण्याकरिता, धमक्यांपासून खुशामतीपर्यंत सर्व तऱ्हेचे मार्ग त्याने चोखाळले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात त्याच्या भपकेदार राहणीमुळे त्याचे नाव संशयिताच्या यादीत होते, परंतु तो मोठ्या शिकस्तीने आरोपातून निसटू शकला.आरंभीची काही नाटके सोडल्यास बार्बीए द सेव्हील (१७७५) व मारियाज द फिगारो (१७८४) ही त्याची नाटके विलक्षण लोकप्रिय ठरली. बोमार्शेची नाट्यगुणांनी समृद्ध असलेली नाटके मोल्येरच्या घटनाप्रधान, उपहासगर्भ, विनोदी नाटकांचीच परंपरा चालवतात. सदर नाटकांच्या प्रयोगातून दीद्रोने मांडलेली अभिनयासंबंधीची व रंगमंचसजावटीची नवी तत्त्वे प्रथम लागू करण्यात आली. शाब्दिक कोट्या व प्रसंगनिष्ठ विनोदाने भरलेल्या बार्बीए द सेव्हील या नाटकात अनेक सामाजिक अन्यायांवर व अनिष्ट प्रवृत्तीवर अत्यंत निर्भीड व जहाल टीका आढळते. उदा., सामाजिक विषमता, सरदारवर्गाचे विशेष अधिकार, न्यायाचा पैशाच्या बाजूने झुकणारा काटा, श्रीमंतामध्ये आढळणारी नैतिक शिथिलता इत्यादी. मारियाज द फिगारो हे नाटक पहिल्या नाटकाचा कालदृष्ट्या उत्तरार्ध समजता येईल. या नाटकातील फिगारोची व्यक्तिरेखा अधिक प्रगल्भ आहे. पहिल्या नाटकातील सामाजिक दंभस्फोटाचा सूर दुसऱ्या नाटकात राजकीय स्वरुप धारण करतो. राजकीय संस्था व राजकीय हक्क त्याच्या टीकेचे लक्ष्य झाले आहे. काउंटला आव्हान देणारे फिगारोचे ‘तुम्ही केवळ जन्मण्याचे कष्ट घेतलेत’ हे शब्द पुढे येणाऱ्या राज्यक्रांतीचे निदर्शक ठरतात.बोमार्शेने निर्माण केलेली फिगारोची अविस्मरणीय व्यक्तिरेखा डॉन क्विक्झोटप्रमाणे साहित्यात अजरामर झालेली आहे. स्वभावाने साहसी व निर्भिड, पण प्रसंगी खुशामत करूनही संकटातून सुटणारा व आपल्या प्रासंगिक विनोदाने अखंड हसविणारा फिगारो अतिशय भावनाप्रधान व गंभीर आहे. या दृष्टीने मारियाज द फिगारो या नाटकातील फिगारोचे स्वागत वैशिष्ट्यपूर्ण आहे.बोमार्शे नाटककंपन्याविरुद्ध नाटककारांचे हक्क प्रस्थापित करण्याकरिता झगडला. त्याने १७८४ ते १७९० पर्यंत व्हॉल्तेअरच्या लिखाणाची संपूर्ण आवृत्ती काढण्याचे अत्यंत कठीण व पैशाच्या दृष्टीने फायदा नसलेले काम यशस्वी रीतीने केले. ही अधिकृत आवृत्ती प्रसिद्ध आहे. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

टोणगावकर, विजया