झां झाक रूसोरूसो, झां झाक: (२८ जून १७१२–२ जुलै १७७८). अठराव्या शतकातील एक थोर यूरोपीय विचारवंत आणि राजकीय सिध्दांत मांडणारा प्रसिद्ध फ्रेंच तत्ववेत्ता. ह्याचा जन्म स्वत्झर्लंडची राजधानी जिनीव्हा येथे ईझाक रूसो व आई सूझान बर्नार्ड यांच्या पोटी झाला. वडिलांचा घड्याळजीचा धंदा होता. रूसोला पद्धतशीर विद्यालयीन शिक्षण मिळालेले नव्हते. घरच्या व्यवसायात त्याने कधीच लक्ष दिले नाही. लहानपणीचा काळा काहीसा हुडपणात गेला असला, तरी त्याची ज्ञानलालसा आणि चिंतनशीलता तेव्हापासूनच स्पष्ट दिसत होती. वर्ष-दोन वर्षे एका नक्षीकाम करणाऱ्या कारागिराकडे, तर दोन तीन वर्षे एका वकीलाकडे त्याने उमेदवारी केली पण कुठेच धड मन न रमल्यामुळे १७२८ मध्ये तो घरातून पळाला. वर्ष-सहा महिने स्वित्झर्लंडमध्येच काढून तो पॅरिसला गेला. तेथेही उदरनिर्वाहासाठी त्याने अनेक प्रकारचे नोकरी व्यवसाय केले. त्याचे खाजगी जीवन तेव्हापासूनच अत्यंत स्वच्छंदी व स्वैर होते. आम्सी (पूर्व फ्रान्स) येथे मॅडम दी वॉरेन या श्रीमंत बाईकडे नोकरी करीत असता (१७३३–४०) तेथील मालकीणच त्याची प्रियकरीण झाली. पुढे एका हॉटेलमध्ये राहत असताना थेरेसी लेव्हिसिअर या तेथील मोलकरणीला त्याने आपली प्रेयसी करून टाकली (१७४५). तिच्यापासून त्याला झालेली पाच मुले एका अनाथ बालकाश्रमात वाढली. तिच्याशी त्याने पुढे १७६८ मध्ये विवाह केला. फ्रान्समध्ये १७५० पासून तेथील सर्व बौध्दिक आंदोलनात तो सहभागी झालेला दिसतो. १७५४ पासून त्याने स्वतंत्रपणे लेखन सुरू केले. डिस्कोर्सेस ऑन द ऑरिजिन ऑफ इनइकॉलिटी (१७५३) आणि सोशल कॉन्ट्रॅक्ट (१७६२) हे त्याचे राज्य शास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ. ह्याखेरीज कन्फेशन्स (१७८२) व आणखी काही स्फुट ललित स्वरूपाचे लेखनही त्याने केले. त्याचा एमिली (१७६२) हा शिक्षणशास्त्राविषयक प्रबंधक आहे. पॅरिस येथे दीद्रो या विश्वकोश कर्त्याबरोबर त्याची मैत्री जडली . त्याने रूसोकडून संगीतावरील काही लेख घेतले. याच काळात रूसोने काही नवीन संगीत रचना रचून संगीत प्रेमींवर प्रभाव पाडला. त्याच्या काही मतांमुळे फ्रान्समध्ये तेथील राजेशाही शासनाचा आणि ख्रिस्ती धर्मसंस्थेचा त्याच्यावर रोष झाला आणि त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला, तेव्हा काही काळ स्वित्झर्लंडमध्ये तो गेला व तेथून इंग्लंडमध्ये तो सु. वर्षभर राहिला होता. तो पुन्हा फ्रान्समध्ये गेला पण आयुष्यभर कुणाकडून ना कुणाकडून त्याचा पिच्छा होतच राहिला. 

पुढे तो आग्नेय फ्रान्समधील बूर्ग्वी या गावी राहू लागला. तत्पूर्वी त्याने डिक्शनरी द म्यूझिक (१७६५) हा संगीतावरील ग्रंथ पूर्ण केला. त्याने पॅरिसला स्थलांतर केले. तेथून एर्मनाँव्हील या ठिकाणी तो राहू लागला. तेथे तो मूत्रविषरक्तता या रोगाने मरण पावला.  

त्याचे एकंदर संपूर्ण आयुष्य पहाता ते बरेचसे कष्टात, दारिद्र्यात व हालअपेष्टात गेलेले दिसते पण तरीही त्याने आपले विचारस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्यही (जरी ते पूर्णपणे त्याच्या स्वतःच्याच तत्वज्ञानात बसण्यासारखे नव्हते तरीही) कोणत्याही परिस्थितीत कायम राखले, हे लक्षात घेण्यासारखे आहे. आधुनिकतेचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि क्रांतिवादाचा जनक म्हणून विख्यात झालेला रूसो हा बुध्दीवादाचा, विज्ञानाचा आणि आर्थिक प्रगतीचा कडवा विरोधक होता, हे विसंगत आणि अविश्वसनीय वाटत असले तरी ते सत्य आहे. त्याच्या मते माणसे ही स्वभावतः सरळ, साधीभोळी आणि एकमेकांच्या भावना आणि विचारांचा आदर करणारी अशी असतात. प्राथमिक अवस्थेतल्या माणसांचे जग हे त्याच्या मते नंदनवन होते. लोकसंख्या वाढली, पाठोपाठ अर्थोत्पादनाचे प्रमाण वाढले, त्याची नवीन साधने आणि नवी व्यवस्थापने आली व ह्यातून रूसोच्या म्हणण्याप्रमाणे, निरनिराळे तणाव निर्माण होत जाऊन तो मुळातला साधा माणूस बदलत चालला. वैयक्तिक मालमत्तेची कल्पना आली, रूजली आणि हे तुझे, हे माझे अशा स्वरूपाच्या संघर्षाना प्रारंभ झाला. माणूस जेव्हा पशुपक्ष्यांपेक्षा फार पुढे गेला, म्हणजे त्याची बुध्दी विकसित झाली आणि तो विचार करू लागला, तेव्हापासूनच रूसोच्या म्हणण्याप्रमाणे तो अधोगतीला लागला. नैसर्गिक जीवन हे तो आदर्श मानतो. माणसे स्वाभाविक प्रवृत्तीनुसार जीवनावश्यक गोष्टी मिळवून स्वाभाविक प्रवृत्तींनुसार एकमेकांना सहाय्य करीत होती तेव्हा कोणत्याही कृत्रिम संस्थांची, संघटनांची, राज्यसंस्थेची, दंडशक्तीची वगैरे कसलीच आवश्यकता नव्हती. हे सर्व प्रश्न त्याच्या मते प्रगत, सुबुद्ध आणि सुसंस्कृत समजल्या गेलेल्या अनैसर्गिक समाजामुळे निर्माण झालेले आहेत. तथापि त्या नैसर्गिक अवस्थेकडे पुन्हा जाणे शक्य नाही, ह्याची रूसोला पूर्ण जाणीव होती. माणसामाणसांतील संबंध अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊन त्यांना अनेकदा संघर्षात्मक स्वरूप येत आहे, ही भोवताली प्रत्यक्ष दिसणारी परिस्थिती तो नाकारू शकत नव्हता. मग आहे ह्या परिस्थितीत ते जुने प्राथमिक अवस्थेतील आदर्श समाजजीवन पुनरूज्जीवित करणे शक्य नाही, हे लक्षात घेऊन नव्या समाजाच्या स्थैर्यासाठी आणि सुखसमाधानासाठी काय करता येईल, ह्याचा विचार करणे त्याला आवश्यक वाटले. नव्या समाजव्यवस्थेसाठी राज्यसंस्था ही रूसोला अपरिहार्यच दिसली पण राज्यसंस्था हा काही नवा शोध किंवा नवी उपाययोजना नव्हती.पाश्चिमात्य संस्कृतीच्या वैचारिक इतिहासात ॲरिस्टॉटल आणि प्लेटोच्या काळापासून तिच्या उत्पत्ती, स्वरूप आणि कार्याविषयीचे विश्लेषण सुरूच होते. रूसोने त्याच्या आधीच्या विचारवंतांच्या सिंध्दांतांचे आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून परिशीलन करून एक स्वतंत्र विवेचन मांडले. तेच रूसोचा ⇨सामाजिक कराराचा सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे.त्याद्वारा त्याने राज्याची उत्पत्ती कशी होते, ह्याबद्दलचे आपले अनुमान तर दिलेच आहे पण त्याचबरोबर अनुषंगाने येणारे राज्य आणि व्यक्ती ह्यांचे संबंध कसे येतात, कसे असतात आणि कसे असले पाहिजेत ह्याचीही चिकित्सा केली आहे.  

राज्यसंस्था हा एक करार आहे ही कल्पना रूसोपूर्वी टॉमस हॉब्ज आणि जॉन लॉक ह्या दोन तत्ववेत्यांनी विस्ताराने मांडली होती. हॉब्जच्या मांडणीप्रमाणे राजसत्तेला अनियंत्रित अधिकार मिळत होते, तर लॉकच्या विचारप्रणालीत राज्यसत्तेवर काही अल्पस्वल्प बंधने येत होती. रूसोच्या सिध्दांताप्रमाणे नेमके काय होत होते हे ठरविणेच अवघड आहे. संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्यवादी आणि अमर्याद एकाधिकारवादी दोघेही आपापल्या भूमिकांच्या समर्थनार्थ रूसोच्या लेखनाचा आधार घेत असल्याचे विलक्षण दृश्य दिसते. 


रूसोने आपला सामाजिक कराराचा सिध्दांत समान ईहा (जनरल बिल) ह्या आपल्याच एका संकल्पनेवर उभा केलेला आहे. मोठा समाज एकत्र नांदत असला की सर्वांच्या हितासाठी सर्वांची मिळून एक,सर्वांना समान अशी सार्वत्रिक भावना किंवा इच्छा निर्माण होते. तीच समान ईहा होय. ही ईहा म्हणजे केवळ अनेकांच्या अनेक इच्छांची बेरीज नसते. ती स्वतंत्र ,सर्वामध्ये सारखीच वसत असलेली पण अमूर्त अशी एक प्रेरणा असते. समान ईहेला प्रत्येक व्यक्ती समूहनियंत्रणासाठी सर्व प्रकारचे अधिकार आपण होऊन प्रदान करते. आता त्या समान ईहेत त्या व्यक्तीची ईहा समाविष्ट असतेचआणि म्हणूनच रूसोच्या मते प्रत्येक व्यक्ती स्वतःचे स्वतःलाच सर्वाधिकार सुपूर्द करीत असते. तेव्हा ह्या प्रकारात त्याच्या मते कुणीच आपले स्वातंत्र्य गमावीत नाही परंतु ह्यापुढे रूसोला जेव्हा व्यवहारावर यावे लागते, तेव्हा वरील सारखे गूढ आणि संदिग्ध विचार सांगून भागेनासे होते. त्या समान ईहेचे प्रत्यक्ष आणि मूर्त स्वरूप कोठे दिसतेॽ ह्याचे उत्तर रूसोलाही राज्यसंस्थेत असेच द्यावे लागते. म्हणजेच समान ईहेला जी अनिर्बंध सत्ता द्यावयाची ती प्रत्यक्षात राज्यसंस्थेला मिळणे हे ओघानेच येते. तथापि राज्यसंस्था आणि समान ईहा एकच नव्हेत. राज्यही एक त्या ईहेने उभी केलेली यंत्रणा असते आणि अर्थातच त्या ईहेला ती यंत्रणा बदलणे मोडणे इ. स्वरूपाचे सर्व अधिकार असतात. तेथे रूसो समाज म्हणजेच राज्य मानतो पण राज्य आणि शासन ह्यात स्पष्ट भेद करून शासनावर नियंत्रण ठेवण्याचे समाजाचे म्हणजेच समाजातील व्यक्तीचे–अधिकार मान्य करीत आहे असे वाटते परंतु व्यवहारात प्रत्यक्ष समाजजीवनात ज्या अनेक गुंतागुंती दिसतात, त्यांची सोडवणूक कशी करावयाची याची समाधानकाराक उत्तरे रूसोच्या विवेचनातून हाती येत नाहीत. पुष्कळदा दोन -चार व्यक्तींची इच्छा समाजाचा किंवा समूहाचा जो विचार असतो, त्याहून वेगळी दिसते. कधी एकच व्यक्तीही संपूर्ण समाजाच्या श्रध्देच्या विरोधी बोलत असते किंवा वागत असते. अशा प्रसंगी रूसो त्या व्यक्तीला किंवा त्या अल्पसंख्य गटाला समान ईहेविरूद्ध म्हणजेच प्रत्यक्षात राज्याविरूद्ध वर्तन करायला मुभा देत नाही. समान ईहाच बदलता येणार असेल, तर एखादी व्यक्ती किंवा एखादा लहानसा गट राज्याविरूद्ध जाण्याचे स्वातंत्र्य घेऊ शकले असे त्यांच्या विवेचनातून ध्वनित होते पण म्हणजे व्यक्तीला अधिकार असा नाहीसमान ईहेच्या म्हणजेच शासनाच्या दंडाचा धोका पतकरून व्यक्तीने आपल्याला जे योग्य वाटते ते करावे, ह्यातून अधिक रूसोच्या तत्वज्ञानातून काही निघत नाही. 

रूसोच्या व्यक्तिमत्वाविषयी उलटसुलट मतप्रवाह प्रसृत झालेले आहेत. त्याच्या चरित्रकारांना तो त्याच्या लेखन कार्याप्रमाणेच कोड्यात टाकणारा, शिथिल मुक्त जीवन व्यतीत करणारा एक करडा नीतिउपदेशक वाटतो. तत्वचिंतक म्हणून त्याने ख्रिस्तीधर्म, बुध्दिवादी आणि जडवादी विचारसरणीच्या तत्कालीन चिंतनात समन्वय घडविण्याचा प्रयत्न केला. या समन्वयवादाला त्याने सूज्ञांचा भौतिकवाद किंवा ईश्वरवाद वा नागरी धर्म ही संज्ञा दिली. राजकीय विचारांच्या संदर्भात सामाजिक करार हा त्याचा सिंध्दांत इंग्रजी विचारवंतांचा आर्थिक उदारमतवाद आणि फ्रेंच तत्वज्ञ माँतेस्क्यू याची प्रत्यक्षार्थवादी अभिवृत्ती या दोहोंच्या पलीकडे जातो. त्याची ‘स्वाभाविक शिक्षण’ ही संकल्पना आणि विद्यार्थी व अध्यापक यांमध्ये त्याला अभिप्रेत असलेला मुक्त करार हे आधुनिक शिक्षणशास्त्राच्या चळवळीचे बीज आहे. एकूण त्याच्या चिंतनाला एक उदात्त बैठक होती आणि त्याची अभिव्यक्ती त्याच्या राज्यशास्त्रीय व तात्विक प्रबंधाबरोबरच त्याच्या आत्मवृत्तपर लेखन व रोमॅटिंक कादंबऱ्यायांसारख्या ललित लेखनातूनही व्यक्त होते. स्वातंत्र्याच्या समर्थकांना आणि मारेकऱ्यांनादोघांनाही रूसोचे तत्वज्ञान पाहिजे तसे सोईने घेता येते, असे राजकीय विचारांचा इतिहास लिहिणाऱ्या सबाईन, डॅनिंग इ. काही लेखकांनी नमूद करून ठेवले आहेतथापि तत्कालीन समाजावर रूसोच्या विचारांचा प्रभाव पडला, ही वस्तुस्थिती आहे. रूसो झाला नसता तर फ्रेंच राज्यक्रांतीही झाली नसती, असे नेपोलियन म्हणतो. फ्रेंच राज्यक्रांतीच्या उद्रेकांमध्ये अर्धनग्न, भुकेल्या जनतेबरोबररूसोसारख्या विचारवंतांचे जनमत प्रक्षुब्ध करण्यामध्ये जो महत्वाचा वाटा आहे, त्याचे हे वाक्य द्योतक आहे एवढेच. 

संदर्भ : 1. Babbitt, I. Roussea and Romanticism, Ausin (Tex.), 1977.

           2. Della, V. G. Rousseau and Marx and Other Writings, New Jersey, 1979.

         3. Durant, Will and Ariel, The Age of Nepoleon, New York, 1975.

        4. Fralin, R. Rousseau and Representation, New York, 1978.

        5. Green, F. C. Jean-Jaqcues Rouisseau : A Critical Study of His Life and Writing, Cambridge, 1955.

        6. Heavens, G. R. Jean-jaques Rousseau, Boston (Mass), 1978.

       7. Leigh, R. A. Ed. Correspondence Complete de Jean Jacques Rousseau 16 Vol., 1965-72.

         8. Masters, R. D. The Political Philosophy of Rousseau, Princeton, 1968.

        9. Sabine, G. K. A Histrory of Political Theory, New York, 1947.

आठवले, सदाशिव