आंद्रे माल्‍रो

माल्‍रो, आंद्रे : (३ नोव्हेंबर १९०१–२३ नोव्हेंबर १९७६). विख्यात फ्रेंच कादंबरीकार, कलेइतिहासकार व मुत्सद्दी. जन्म पॅरिसमध्ये. त्याचे अगदी आरंभीचे जीवन, शिक्षण इत्यादीबाबतचे तपशील नीटसे मिळत नाहीत. 

तथापि वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एका प्राचीन मंदीराचा शोध घेण्यासाठी तो कंबोडियातील एका अरण्यात गेला. एका पुरातत्त्वविद्याविषयक नियतकालीकात त्या मंदिराविषयी त्याने वाचले होते. ते मंदिर त्याने पाहिले. तेथील शिल्पकलेचे काही नमुने त्याने गोळा केले परंतु फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली (त्या वेळी कंबोडिया फ्रेंच सत्तेखाली होता.) पॅरिसमधून ह्या प्रकरणी हस्तक्षेप झाल्यामुळे त्याचा तुरूंगवास टळला. ह्या काळात व्हिएतनामी आणि चिनी राष्ट्रवाद्यांशी त्याचा संबंध आला. फ्रेंच वसाहतवादाचा त्याला तिटकारा वाटू लागला, आणि आंतरराष्ट्रीय कम्युनिष्ट चळवळीचा तो एक खंबीर पुरस्कर्ता बनला. १९२५ नंतर तो चीनमध्ये गेला आणि तेथे दोन वर्षे राहिला. तेथील कम्युनिस्टांच्या चळवळीत सहभागी झाला. १९३० नंतर प्रभावी होत गेलेल्या नाझींच्या फॅसिस्ट विचारसरणीविरुद्धही त्याने आपला आवाज उठवला. १९३९ मध्ये नाझी जर्मनी आणि सोव्हिएत रशिया ह्यांच्यात झालेल्या करारानंतर तो कम्युनिस्टांपासून दूर झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फ्रेंच सैन्यात तो सामील झाला जर्मनांचा प्रतिकार करण्यासाठी फ्रेंचांनी चालविलेल्या भूमिगत चळवळीतही तो सहभागी झाला. स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू झाल्यानंतर जनरल फ्रँकोविरुद्ध लाढणाऱ्या प्रजासत्ताकवाद्यांना त्याने साहाय्य केले. त्यांचे हवाई पथक संघटित करून तो स्वतःही त्या पथकातून लढला. फ्रान्सचा समर्थ नेता चार्ल्स द गॉल ह्याचा माल्‍रो हा स्नेही आणि समर्थक. चौथ्या फ्रेंच प्रजासत्ताकाचा हंगामी अध्यक्ष म्हणून चार्ल्स द गॉलची जेव्हा एकमताने निवड झाली (नोव्हेंबर १९४५) तेव्हा त्याच्या सरकारात माहिती मंत्री म्हणून माल्‍रोची नेमणूक करण्यात आली. १९४६ च्या जानेवारीत चार्ल्स द गॉलने ह्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतु १९५८ मध्ये फ्रान्सचा पंतप्रधान म्हणून तो सत्तेवर आल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री (मिनिस्टर फॉर कल्चरल अफेअर्स) म्हणून माल्‍रोचा समावेश त्याने आपल्या मंत्रिमंडळात केला. एप्रिल १९६९ पर्यंत माल्‍रो ह्या पदावर होता. सांस्कृतिक कार्यमंत्री ह्या नात्याने माल्‍रोने फ्रेंच कलावस्तुसंग्रहालयांचे नूतनीकरण केले. फ्रान्समधील अनेक शहरांतून कलाकेंद्रे स्थापून चित्रपट, नाटके आणि अन्य कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचाव्यात, ह्यासाठी प्रयत्न केले. पॅरिस येथे तो निधन पावला.

माल्‍रोच्या कादंबऱ्यांत ले काँकेरां (१९२८ इ. भा. द काँकरर्स, १९२९), ला व्हा र्‌वायाल (१९३०, इं. भा. द रॉयल रोड, १९३५), ला काँदिस्याँ युमॅन (१९३० इं. भा. स्टॉर्म ओव्हर शांघाय, १९३४), ल तां द् मेप्री (१९३५ इं. भा. डेज ऑफ कंटेप्ट, १९३६), लेस्प्वार (१९३७ इं. भा. डेज ऑफ होप. १९३८), ले न्याये द्‌लाल्तॅनब्यूर्ग (१९४३ इं. भा. द. वॉलनट ट्रीज ऑफ आल्टेनबुर्ग, १९५२) ह्यांचा समावेश होतो.

१९२५ साली कँटनमध्ये असलेले वातावरण द काँकरर्समध्ये आढळते. साम्राज्यवाद्यांचा चीनवर असलेला प्रभाव आणि त्यांचे आर्थिक वर्चस्व नष्ट करण्यासाठी क्वोमिंतांग-कम्युनिस्टांनी चीनमध्ये केलेले प्रयत्न हा ह्या कादंबरीचा विषय. द रॉयल वे ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीत उद्‌ध्वस्त प्राचीन मंदिरातील मौल्यवान शिल्पकृती शोधण्यासाठी कंबोडियातील जंगलांत निघालेल्या एका तरूण फ्रेंच पुरातत्ववेत्त्याची आणि एका साहसी जर्मनाची कथा आहे.

कम्युनिस्टांनी १९२७ मध्ये शांघायमध्ये केलेला अपयशी उठाव स्टॉर्म ओव्हर शांघायमध्ये चित्रित केलेला आहे. तर नाझीच्या छळाला तोंड देणाऱ्या एका चेक कम्युनिष्ट नेत्याच्या प्रतिक्रिया डेज ऑफ कंटेप्टमध्ये पाहावयास मिळतात. डेज ऑफ होप ही कादंबरी माल्‍रोच्या स्पॅनिश यादवी युद्धातील अनुभवांवर आधारलेली आहे. आधुनिक यूरोपिअनांच्या दोन पिढ्यांचे अनुभव द वॉलनट ट्रीज ऑफ आल्टेनबुर्ग ह्या कांदबरीत विषय म्हणून येतात. माल्‍रोच्या, विशेष उल्लेखनीय अशा अन्य ग्रंथांत सकालोजी द् लार (१९४७ इं. भा. द साय्‌कॉलॉजी ऑफ आर्ट १९४९), ले व्हा द्यु सिलांस (१९५१ इं. भा. द व्हॉइसिस ऑफ सायलेन्स, १९५३), ला तांतास्पो द लॉक्सिदां (१९२६ इं. भा. टेंप्टेशन ऑफ वेस्ट (१९६१) आणि अँटी-मेम्वार्स (१९६७ इं. भा. १९६८) ह्यांचा समावेश होतो. द सायकॉलॉजी ऑफ आर्टस हा एक उत्कृष्ट कलासमीक्षात्मक निबंध होय. आपल्या सर्जनशील प्रतिभेच्या जोरावर माणून नियतीवर विजय मिळवू शकतो. असा विचार त्यात माल्‍रोने मांडलेला आहे. वैश्विक मानवतावाद आणि जगातील कलाकृतीमध्ये असलेले बंधुत्वाचे नाते हा द व्हॉइससिस ऑफ सायलेन्सचा विषय. ह्या नात्यातूनच जगात जे उदात्त, उन्नत असते, त्याचा वारसा माणसाला प्राप्त होतो आणि माणूस मृत्यूलाही आव्हान देऊ शकतो, हा आपला विश्वास माल्‍रोने द व्हॉइसिसमध्ये व्यक्त केला आहे. द टेंप्टेशन ऑफ वेस्टमध्ये एक चीनी आणि एक पाश्चात्य ह्यांच्यातील पत्ररूप वैचारिक संवाद आहे. पश्चिमी संस्कृती आपला विश्वास आणि गतिमानता गमावून बसलेली असून तिच्या संपर्काने पौर्वात्य संस्कृतीवरही तोच विपरीत परिणाम घडून येण्याची शक्यता आहे, हे माल्‍रोने ह्या संवादातून सांगितले आहे. अँटी-मेम्वार्स हे त्याचे वैशिष्ट्येपूर्ण आत्मचरित्र. त्यात त्याच्या अनुभवांच्या आणि साहसांच्या विविध पैलूंवर केलेले चिंतन आहे.

संदर्भ : 1. Blend Charles D. Andre Malraux : Tragic Humanist, 1963. 

             2. Boak, Denis, Andre Malraux, 1968. 

             3. Frohock W. M. Andre Malruax and the Tragic imagination, 1952.

             4. Gannon, Edward, The Honor of Being a Man: The World of Andre Malraux, 1957. 

             5. Horvath, Violet M. Andre Malraux : The Human Adventure, 1969.

             6. Langlois, W. G. Andre Malraus, The Indo-China Adventure, 1966.

             7. Lewis Richard, W. B. Ed. Malaux, 1964. 

             8. Payne, Robet, A Portrait of Andre Malraux, 1970.

             9. Wilkinson, David, Malraux : An Essay in Political Criticism, 1967.

कुलकर्णी, अ. र.